अदृष्यांच्या भेटींचे दृष्टांत
बेटां-बेटांनी बनलेली असतात माणसं. प्रत्येक ओळखी साठी एक नवाच कप्पा, एक नवंच बेट. वाहात बेटे जवळ आली तर माणसांचं जंगल होईल याची भिती. पूर आलाच तर काही बेटांना बुडवुनही पुराणकालीन नोहा सारखी बाकीची बेटे वागवत मानवजातीचं अस्तित्व मिरवत पुढे जायचं आपण. पण आता हे वेगळं. आता हे वेगळं, कारण मी स्वतःच स्वतःला तुझ्या बेटावर पुनर्वसित करत आहे. फाळणीसारख्या काही खुणा, किंचित कत्तलींचे इतिहास आणि आठवणी साठवणारया मेंदुंच्या काही पेशी मागे सोडून मी आज तुझ्या वसतीला आलोय. रंगांचे काही तलाव होते माझ्या बेटावर, तिथून तुला आवडणारे करडे, तपकिरी, काळपट रंग आणलेत मी. तश्याच काही विराण्या रागदारीतून अन शुष्क, विराण, बेभान ऋतु सोबतीला. तू म्हणालीस एकट्या माणसाला इतकं पुरेसं असतं. मी तुझ्या वसतीला आलो आणि मी हे लपवले नाही. मी काहीच लपवत नसतो पण माझ्या आगमनाचे उत्सवही तू किंवा मी साजरे केले नाहीत. किंबहुना आता नवेच पाठशिवणीचे खेळ सुरु झाले आहेत. तुझ्या शहरात राहायचं आणि तुलाच टाळायचं. हे खेळाचे नियम की आपल्या संबंधांचे तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न; मला कळत नसतं. तुझ्या असंख्य चेहरयातला एक आर्टी चेहरा मी निव...