बोका
नवकथेतून आल्यासारखा बोका बराच वेळ रिकामा विचार करत बसला. रात्रीची झोप उत्तम झाली होती. सकाळी सकाळी ऊन खाऊन झालं होतं पण त्याचा काही केल्या आज मूड येत नव्हता. गल्लीतल्या चार-दोन उनाड आणि उथळ मांजरींनी त्याच्याकडे बघून शेपूट हलवली होती खरं पण त्याला अजिबातच रोमॅन्टीक वाटलं नाही. एका नॉर्मल बोक्यासाठी हे अतीच होतं नाही का? कोपरयातल्या लव्हबर्डच्या आवाजाने त्याची समाधी मोडली आणि स्मिताने ठेवलेल्या भांडंभर दुधावर त्याने रात्रभराचा उपास सोडायला सुरुवात केली. स्मिताचं खरं नाव स्मिता नसून स्मिथा राव आहे हे बोक्याला नसलं तरी आपल्याला माहीती हवं. पण बोका आणि इतरही बरेच लोक स्मिथाला स्मिता, स्मित किंवा मिस राव अश्या अनेक नावांनी ओळखायचे. बोक्याशी तादादत्म्यता म्हणून आपणही स्मिताच म्हणू या. स्मिताचं आयुष्य वेळापत्रकाचे रकाने असतात तसं चौकोनी; ऑफिस- ऑफिस-ऑफिस-आणि घर. पहाटे घर सोडण्यापुर्वी नाईलाजाने आरसा बघायचा आणि घाईघाईने ऑफिसच्या दिशेने गाडी हाकायची. एकदा का त्या स्वाईपिंग मशिन मधे ऍटेन्डन्स कार्ड घातलं की चरकातल्या उसाला होत नसेल तितका आनंद स्मिताला व्हायचा. बाकीच्या बरयाच मुली ऑफिसात आल्या की ...