आरसा आपुलिये/आंगी आपण पाहे/तरी जाणणें जाणों लाहे/आपणयातें

मुलभुत, उदाहरणार्थ हिंसा, सत्ता, निष्ठा किंवा व्यभिचार वगैरे वगैरे...
...

कॉलनीच्या ओसाड पटांगणात महाळुंग्यानं उगाच रिकाम्या फुटबॉलला लाथ घातली. पंधरा-वीस मिनीटांत निदान तीनवेळा तो वॉचमनला वेळ विचारुन आला होता. रवीवारी दुपारी काही केल्या दोनच्या पुढे घडाळ्याचा काटा काही सरकत नव्हता. या वेळी कुणाच्या घरी जाऊन खेळायचं म्हणजे फुकटात शिव्या खायच्या इतपत व्यवहार त्याला माहीत होता. रिकाम्या गोकर्ण्याचं तसं नव्हतं. तो येताना सगळ्या मित्रांची दार वाजवत आलेला. दार वाजवल्यावर ’कोण’ या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत पण रिकाम्या तिथे थांबला नव्हता. रिकाम्याला पाहून महाळुंग्याला उगीच बरं वाटलं. रिकाम्याचं भरुन वाहाणारं नाक आणि विटके कपडे यांच्या पलीकडेही महाळुंग्याला रिकाम्या आवडायचा. म्हणजे साहित्यीक भाषेत कसं इमानी वगैरे होता तो. महाळुंग्यानं प्रेमाच्या भरात आरोळी ठोकली "हैश्य्य्य्य्य्य्य्य." फुटबॉलला मनसोक्त तुडवून झाल्यावर रिकाम्यानं खिशातून मोर मारुन भरल्यासारखी निळीगर्द गोटी काढली आणि डोळ्याला लावून गंमत बघायला लागला. "च्यायला" मैदाच्या पोत्यासारखा भुस्स्स रिकाम्या, गोटीतून गरागरा इकडेतिकडे बघत म्हणाला "लै भारी दिस्तं बे यातून." ज्या अर्थी रिकाम्याला नाकातली लोळी सिंपली ग्रॅव्हीटी गुणगुणत खाली आलेली कळालं पण नाही त्या अर्थी खरंच त्या गोटीतून लैच भारी दिसत असणार हे महाळुंग्यानं ताडलं आणि रिकाम्याच्या हातातून ती गोटी जवळ जवळ हिसकावुनच घेतली. निळ्या गोटीतून खुपच वेळ निळंच दिसत या पलीकडे महाळुंग्याला त्यात काय लै भारी आहे हे कळत नव्हतं. "कायपण! नुस्तंच निळं" महाळुंग्यानं त्याचं कोपर रागारागात रिकाम्याच्या मांडीवर दाबलं. तितक्यात एक निळा मुलगा सायकल हाकत ग्राऊंडवर येताना महाळुंग्याला दिसला. महाळुंग्यानं दचकून डोळ्यावरची गोटी बाजूला केली. "मी, पिंगाक्ष. इथे नविन आलोय राहायला." स्वच्छ आवाजात तो स्वच्छ मुलगा बोलला. का ते कळालं नाही पण महाळुंग्या उगीच मनात खट्टु झाला. रंगीत खडुच्या बदल्यात वासाचा खोडरबराचा तुकडा अदला-बदल करुन मिळतो तसं काही तरी करुन पिंगाक्षाचं नाव, त्याचा स्वच्छ रंग, त्याच्या आजुबाजुला दरवळणारा पावडरचा ब्येष्टं वास सारं कश्याच्या तरी बदल्यात आपल्याला बदलून मिळावं असं महाळुंग्याला उगाच वाटलं.

बघण्या-दाखवण्याचे अनेक कार्यक्रम पार पडून पिंगाक्ष अखेर रिकाम्याच्या शाळेत पडला अन पवित्र झाला. शाळा सुटे पर्यंत शिळा होत जाणारया रिकाम्याबरोबर बसण्यात खरंतर पिंगाक्षाला कसलाच रस नव्हता पण वर्षाच्या अध्येमध्येच वर्गात आल्यानं दुसरी कोणतीच जागा रिकामी नव्हती. आठवड्याच्या आतच पिंगाक्षाचा रिकाम्याविषयी शिसारी ते करुणा, कणव इ. इ. असा एक समृद्ध बुद्ध प्रवास झाला.

पिंगाक्ष रिकाम्याचं काय सुरु आहे हे बघतच राहीला. समोर बसणारया मुलाच्या बगळा शुभ्र शर्टवर रिकाम्यानं पेनचं टोक अल्लाद टेकवलं होतं. टिपूसभर निळा थेंब बघता बघता मोठाच मोठा होत जात होता. त्या निळसर बनत जाणारया ढगाकडे बघण्यात रिकाम्या इतका तल्लीन झाला होता की बाहेर आलेलं त्याचं जीभेचं टोक नाकाला लागेल की काय असं पिंगाक्षाला वाटलं. त्या दोघांची ही तंद्री मोडणारा एक मोठा आवाज झाला आणि रिकाम्याला वाटलं त्याच्या निळ्या ढगातून वीजचं पडली. पिंगाक्ष घाबरुन उभा राहीला तेव्हा कुठे रिकाम्याला पाठीत बसलेल्या गुद्याची जाणीव झाली. पुढे किती तरी वेळ, का कोण जाणे, पिंगाक्ष गोकर्णाच्या वागणुकीची हमी देत राहीला.

पिंगाक्षाच्या या अनपेक्षित मदतीची परतफेड रिकाम्यानं त्याला घरी जाताना सायकलवरुन डब्बलसीट नेऊन केली. रिकाम्याच्या आयुष्यात त्या सायकलचं जे काही महत्व होतं, त्या हिशोबानं त्यानं पिंगाक्षाचा सर्वोच्च सन्मान केला होता.

पिंगाक्ष आणि रिकाम्या हे नवं घट्ट समिकरण पाहून महाळुंग्याला काही तरी तुटल्यासारखं वाटलं आणि त्यापेक्षाही जास्त त्याला ते अपमानकारक वाटलं.

कुठल्याही सर्वसाधारण दर्जाच्या संध्याकाळसारख्यावेळी महाळुंग्याला मैदानावर अचानकच एकटा रिकाम्या दिसला. "जॉली आणि स्टॅच्यु" डोळ्यात जाईल इतपत अंतरावरुन बोट नाचवत महाळुंग्या जुनाच खेळ नव्यानं खेळला. रिकाम्या नेहमीप्रमाणेच कॅज्युअल. त्यानं हातावर निरखुन पाहीलं आणि स्वच्छतेच्या भलभलत्या भाषणापायी पिंगाक्षाला मनातल्यामनात शिव्या हासडल्या. त्याच्या हातावर जॉलीपुरताही शाईचा ठिपका नव्हता. त्यानं निराशेनं मान हलवली. कदाचित ती निळीशार गोटी महाळुंग्याला द्यावी लागणार होती. "जॉली आणि स्टॅच्यु एकदम. जॉली नसेल तर समोरच्या पाण्याच्या टाकीवर डोळे मिटून चढायचं आणि स्टॅच्यु असताना हलायच नाही" महाळुंग्यानं अप्रतिम गेम टाकला होता; एकाचवेळी हलायचं आणि हलायच नाही पण असं काही तरी. उंचचंउंच टाकीवर डगमगत्या शिडीवरुन चढायचं म्हणजे हातपाय मोडून घ्यायची खात्री. त्यापेक्षा स्टॅच्यु होऊन उभं राहावं असा सर्वमान्य विचार करुन रिकाम्या जॉली नसल्याबद्दल काय शिक्षा मिळणार याचा विचार करत उभा राहीला. स्टॅच्यु ओव्हर झाल्यावर महाळुंग्यानं दहा बचाबच बुक्के जीव खाऊन रिकाम्याच्या पाठीत घातले. रिकाम्याला वाटलं आपलं आतडंच उलटून पडेल. रिकाम्या कितीतरी वेळ आतल्या आत मोडत राहीला. दिवसाचा थोडा अंश घेऊन संध्याकाळ विझत गेली आणि भुकेल्या लांडग्याप्रमाणे रात्र स्वप्नांवर तुटून पडली. रात्र भर रिकाम्याला गर्गर फिरत पाठीत बसणारा महाळुंग्याचा हात आणि त्याच्या डोळ्यात पेटलेला सुर्य दिसत राहीला.

रिकाम्या महाळुंग्याच्या घरात भाड्याने राहातो ही बातमी पिंगाक्षाला फारशी मजेदार वाटली नसली तरी महाळुंग्याच्या पाठीमागे त्याचा जो उल्लेख होतो तो मात्र पिंगाक्षाला खचितच मजेदार वाटला. त्याचा अर्थ काय आहे हे माहीत नसलं तरी एक न केलेली गोष्ट करायला मिळते याच्या आनंदात पिंगाक्षाने त्याला ऎन मैदानात एकदा खच्चून "ए भाडखाऊ" अशी हाक मारली आणि आख्खं मैदान कचाकचा हसलं. मैदानावर पुढचे कितीतरी दिवसं हात लांब करुन गोलगोल फिरत छोट्या पोरी नवंच गाणं म्हणायच्या "साडे बाई माडे/कोणं खातो भाडे//भाड्याची बायको पळाली/गंगेमध्ये बुडाली!"

महाळुंग्याचं दोस्तांत मिसळणं हळुहळु कमी झालं. संध्याकाळभर तो डुगडुगत्या शिडीवरुन टाकीवर जाऊन बसायचा. रिकाम्या पाहात असायचा. महाळुंग्याला असा संपु द्यायचा नव्हता त्याला. वेळ संपल्यासारखा सुर्य एक दिवस घाई घाईत बुडाला तसं रिकाम्यानं हलकेच टाकीखालची शिडी काढून टाकली. रिकाम्याच्या दृष्टीनं भिडस्त सुडाची ती परिसीमाच होती. महाळुंग्याला कळेपर्यंत मैदान ओसाड पडलं होतं. त्याला असं वाटलं की त्याचं उरलेलं सारं आयुष्य त्या टाकीवरच जाणार. त्याच्या पोटातून आरपार कळ गेली. वॉचमननं त्याला बरयाच वेळानं खाली उतरवलं तेव्हा ओलेत्या कपड्यांमध्ये त्याचा स्वाभिमान विझु विझु झाला होता.

कुणी नाही बघून महाळुंग्यानं एक दिवस दुपारीच रिकाम्याची सायकल विस्कटून टाकली. सायकलचा एक एक सुटा भाग बघूनही रिकाम्या रडला नाही. चेंदामेंदा झालेला आपलाच माणूस अनोळखी वाटला तर शोक कसला करणार? रिकाम्यानं महाळुंग्याच्या दारावर त्वेषानं सायकलचे काही अवशेष फेकले आणि निग्रहाने रडू आवरत "भाडखाऊ" असा उद्धार करत चालता झाला.

अंगावरचे माराचे वळ मिटण्याआधीच रिकाम्यानं महाळुंग्याचं घर सोडलं आणि तेव्हाच कधी तरी महाळुंग्याचं आतलं एक टोक तुटलं ते तुटलंच.

सुर्य उगवतो आणि मावळतो ही किती मोठ्ठी गोष्ट आहे नां! क्षण, तास, दिवस, आठवडे इ. इ. सरत राहातात आपोआप.

जाणारया दिवसांसोबत मनात अढी ठेवून पोरं आढीत घातलेल्या आंब्यासारखी पिकत राहीली..



Comments

a Sane man said…
अप्रतिम...चिक्कार आवडलं!!
कोहम said…
apratim,

dvesh pikavat thevaNe ha tyancha dhanda aNi apaN tyancha dhanda fukaTat karun deto he apalyala na samajaNe ha apala moorkhapaNa.

Good one...
क्लास...
’बोक्या’नंतर अजून एक ’पूर्ण’ गोष्ट.

मोर मारून भरल्यासारखी निळी गोटी. समृद्ध बुद्धप्रवास. सर्वसाधारण दर्जाची संध्याकाळसारखी वेळ.
मनात अढी - आंब्यांची अढी. पिकणारी पोरं. फक्त पिकणारी? पिकल्यानंतर?
आतलं टोक तुटलं. तुटतंच. सूर्य उगवतो नि मावळतो ही खरंच मोठ्ठी गोष्ट...

या वेळी आपली तक्रार नाही, कथा अपुरी म्हणून. ’निखळ आभार’!
Nandan said…
wa! - ajoon kay lihu?
Samved said…
Thanks..
पोस्टच्या टायटलचं श्रेय कवी ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांना
Anand Sarolkar said…
Class...khupach sahi jhala ahe he..

ekdum shaletle diwas athavle. characterschi nava ashi vichitra ka te kahi samajla nahi bua aaplyala.
Samved said…
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ आनंद..शेवटी कुणी तरी नावांचा उल्लेख केला तर! आम्ही लहान असताना नावांचे खुपच अपभ्रंश व्हायचे, त्याची आठवण म्हणून हा प्रयोग. दुसरी गंमत म्हणजे लहानपणी आपणही गोष्ट लिहावी हा एक किडा होता. पात्रांचं नाव काय ठेवावं या पुढे कधी गाडी सरकायचीच नाही. त्याची आठवण म्हणून जरा विचित्र नाव ठेवली..तेव्हढाच आपला सुड :)