शुभ्र कबूतर युगायुगांचे
युगांत झाला तसं नेमून दिलेल्या कामागत चहुबाजूने समुद्र चढले. कणा कणाने, क्षणा क्षणाने अवघी पृथ्वी जलमय झाली. रंग-रेषांगत सारे सजीव-निर्जीव कोणत्याही खुणा मागे न ठेवता हल्केच ओघळुन गेले. सारे संपले तसे आकाशाने एकदाच आपले सबंध प्रतिबिंब हळुहळु स्थिरावणारया पाण्यात पाहीले. पाण्याशी कानगोष्टी करायला आकाशाला क्षितीजाची आता गरजच नव्हती मुळी. एक हळुवार फुंकर मारली तरी शहारे यायचे पाण्यावर. दहा महीने चाललेली पाण्याची देहमग्नता मोडली ती नोहच्या निर्मितीच्या नव्या खुणा वागवणारया बोटीने. नोहनं हाताच्या ओंजळीत धरलेलं शुभ्र कबूतर एकवार सश्रद्धपणे डोळ्यांना टेकवलं आणि जमिनीच्या शोधार्थ त्याला आकाशात सोडून दिलं. आशेचा चिवट अदृष्य तंतू पायी बांधलेलं ते कबूतर थोड्याच वेळात ऑलिव्हची डहाळी चोचींत घेऊन नव्या विश्वाची ग्वाही फिरवत परत आलं. ********************************************************************************* विशाल सागराच्या मधोमध उगवलेल्या शाबोध बेटावर कल्लोळ शांतता होती. जगातले काही प्रज्ञावंत काही दशकांपासून तिथे राहात होते आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं, त्यांनी शाबोधभोवती जणु अदृश्य पोलाद...