अपुर्णांकाची अवतरणे- ।४/४।-टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ
[पुस्तक शेवटाकडून वाचण्याचा उरफाटा शौक नसेल तर ही गोष्ट पुढील क्रमाने वाचा: अपुर्णांकाची अवतरणे- ।१/४।-रम्य ते अभयारण्य अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू? ] कॅन्टीनच्या मागल्या बाजुला बसून मीरा पॅडीला प्रेम करावं भिल्लाच्या बाणासारखं वगैरे सांगत होती. तिचा गळा किंवा आपले डोळे भरुन आले तर काय करायचं या विचारांनी पॅडीचं लक्ष पारंच उडालं. त्यानं गेले कित्येक दिवस रुमाल धुतलेलाच नव्हता. संत्र्यासारखं रुमालाची घडी सोलत सोलत त्यानं सगळ्या बाजु वापरुन टाकल्या होत्या आणि आत्ता निकराच्या प्रसंगी रुमाल लागला तर रुमाल म्हणून त्याच्याकडे एक घामट काळपट चौरस कापडी तुकडा होता. त्यानं कसंबसं मीरेला थांबवलं. अनिलाला आर्चिजच महागड आय लव्ह यू वालं ग्रिटींग देऊन ऑलमोस्ट एक वर्ष झालं होतं. शिवाय ग्रिटींगमधलं गाणं वाजणं बंद झालं तर स्पेअर असावा म्हणून एक बटण सेल पण दिलेला. बाटलीभर गुलकंद निघेल इतके गुलाब देऊन झाले होते. पण तिच्या नरडीतून हो काही निघाला नव्हता. या सगळ्याची पुढची पायरी म्हणजे तिला पळवुन नेणं. पण पॅडी ऎनवेळी चपलेचा अंगठा त...