झेन आर्ट ऑफ सुसाईड- प्रतिमांचे तारण

॥१।।

"ब्रम्हदेवा, हैस का?" अशी दणदणीत हाक फक्त शिवराजच मारु शकतो. त्याला मी दार उघडुन आत घेतलं तेव्हा चार मजले चढून त्याचा भाता फुलला होता. खरं म्हणजे माझं नाव ब्रम्हे पण शिवराज मला कायमंच विविध नावानं हाका मारतो. आम्ही सगळी दोस्त मंडळी ठरवुन एमपीय्सी झालो. मी पोलीसात फौजदार, कुणी तलाठी, कुणी अजून काही आणि तसंच शिवराज राज्य वखार मंडळात चिकटला. "बोला चित्रगुप्त" मी त्याला डिवचुन बोलायचं म्हणून बोललो आणि अपेक्षेनुसार उसळुन निषेधाच्या स्वरात शिवराज म्हणाला "आम्ही वखारीतही कारकुन आणि देवांच्या राज्यातही कारकुनच म्हणा की एकुण! मरु दे. मला तुझा एक युनिफॉर्ममधला रुबाबदार फोटो दे" माझ्या बीटमधले शिपाई मला पिक्चरमधल्यासारखे साहेब म्हणतात मला माहीत होतं पण त्यांची लोणीबाजी शिवराजपर्यंत गेली असेल वाटलं नव्हतं. "अरे खेचत नाही बाबा. खरंच दे. तुला फेसबुक माहीतीए का? नसेलच माहीत, तुम्ही पैलवान लोक. ते असतं, त्यावर जुने मित्र शोधता येतात. नवे मित्र मिळवता येतात. त्यावर शिव नावासोबत तुझा फोटो टाकावा म्हणतो. आपला फोटो टाकला तर फेबु बंद पडायचं घाबरुन" राक्षसी हसत शिवराजनं माझ्या पोटात चार गुच्चे लावले.मला आता पुर्ण लिंक लागली. कसल्याशा योजनेखाली त्यानं एक सरकारी लॅपटॉप काढला होता. वखारीत वेळ जात नाही म्हणून तिथं हा लॅपटॉपवर काही तरी चाळे करायचा. ही फेबु भानगड मी ऎकून होतो. शिवराज दिसायला अर्क होता खरं; पुढे आलेले तंबाखुचे डागवाले दात, काळाकभिन्न रंग, सुटलेलं अस्ताव्यस्त पोट पण म्हणून माझ्या फोटोनं काय साध्य होणार होतं मला कळालं नाही. शेवटी खाली नाव शिवराजचंच असणार होतं नां? "आपले सगळे मित्र तर इथंच आहेत. तुला कशाला हवय ते फेबु?" मी टाळण्याच्या दृष्टीनं उगाच काही तरी बोललो. "कल्पना कर उद्या फेबुवर मला तन्वी भेटली तर? ती विचारेल ब्रम्हे कुठे आहे?" माझ्या पोटात पाशवी गुद्दे मारत शिवराजनं जुन्या तारा उगाच छेडल्या. मी नाईलाजानं माझा फोटो त्याला देऊन त्याची बोळवण केली.तन्वी एव्हाना दोनेक मुलांची आई झाली असेल...मी कटाक्षानं विचार करायचं टाळलं

।।२।।

जवळजवळ तीन महीन्यांनी शिवराज भेटला तेव्हा हरवल्यासारखा वाटला. दोन पेग पोटात गेल्यावर त्याचं तोंड सुटलं. "फेबुवर खुप दोस्त भेटले. तिकडे अमेरिकेत गेलेले पण. काही नवे दोस्त पण मिळालेत. माझा फोटो बघून लोक क्राईमबद्दल काय काय विचारत असतात. मी नेटवरचं बघून काही तरी त्यांना सांगत असतो. लोकांना भारी वाटतं." त्यानं माझ्या फोटोला त्याचा फोटो म्हटल्यावर मला दचकायलाच झालं. कदाचित चढली असेल...पण दोनातच? "तुला माधुरी आठवते का? ती पण आहे फेबुवर. अमेरिकेत असते. अजून तिनं फ्रेन्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट नाही केलीए. तिला कदाचित वेळ नसेल, किंवा मी आठवत नसेल..." शिवराजनं माधुरीपाई कॉलेजभर घातलेले अनेक धिंगाणे मी विसरलो नव्हतो. ती कश्याला करेल मैत्री? माधुरीसोबत येणारं जोड-नावही मी विसरलो नव्हतो. मीही खरुज काढलीच "तो विशाल आहे का रे फेबुवर?" विशाल आणि माधुरीचं कॉलेजात "होतं" असं म्हणायचे सगळे. "नाय रे. अजून तरी नाय दिसला. तुझी तन्वीपण आहे बरं का फेबुवर. छान मुलगी आहे तिला तिच्याच सारखी दिसणारी." हरामखोराला चढली नव्हती म्हणायची...

||३॥

ब्रम्हेनं विशालाचा विषय काढल्यावर शिवराजला राहावलं नाही. वखारीत गेल्यावर त्यानं दबक्या हातांनी विशालचं फेबु प्रोफाईल काढलं. डोळ्यांवर गॉगल चढवलेला देखणा बेफिकीर फोटो होता त्याचा. शिवराजनं रजिस्टरमधल्या नोंदी बघाव्यात तश्या निरखुन तिथल्या कॉमेन्ट्स बघितल्या. ढीगभर लोकांनी अगम्य भाषेत लोल, बफन, थनक्स असं कायबाय लिहीलं होतं. माधुरीच्या अगदीच मोजक्या पण सुचक नोंदीही त्याला दिसल्या. शिवराजचा अगम्य शब्द गुगल करायचा उत्साह लगेच मावळला. विशालचं प्रोफाईल बऱ्याच अंशी कुलुपबंद होतं. शिवराजनं हर प्रकारे शिरकाव करुन बघितला पण गोल फिरुन फेबु परत पासवर्डवर थबकायचं. वैतागुन शिवराजनं मा-धु-री टाईपलं आणि सखेद आर्श्चयानं फेबुची तटबंदी सपशेल कोसळली. शिवराज विस्फारलेल्या डोळ्यांनी विशालचं फेबु अंतरंग बघत राहीला.

॥४॥

वखारीतून फोन म्हटल्यावर मला शिवराजशिवाय दुसऱ्या कुणाचा असेल असं वाटलंच नाही.
"इन्स्पेक्टर ब्रम्हे का? मी दाभाडे बोलतोय राज्य वखार मंडळातून"
"बोला" माझा आवाज प्रचंड साशंक.
"अहो तुमचे दोस्त आहेत कुठे? कधी येतात कधी जातात कळत नाही. हल्ली रात्रीची जास्त घेतात की त्यांच्या झोपेचे वांधे चाललेत माहीत नाही. बघावं तेव्हा डोळे तारवटलेले असतात. कधी टेबलावर पाय पसरुन झोपी जातात आणि आता जवळ जवळ आठवडा झाला, ऑफिसात फिरकलेच नैत. अहो आम्ही सांभाळुन घेतोय पण कुठं पर्यंत? शिवराजचे दोस्त म्हणून मला फक्त तुमचीच माहीती होती म्हणून तुमच्या कानावर घालावं म्हटलं"
"बरं झालं दाभाडेसाहेब तुम्ही मला सांगीतलंत. शिवराजचं इथे फारसं जवळंच असं कुणी नाही. मी बघतो काय करायचं ते"

॥५॥

मध्यरात्रीचं शिवराजनं हल्कंच फेबुवर विशालच्या नावाखाली प्रवेश केला.
"महीन्याभराचा विरह संपला...मी परत आलोय"
तासाभरात दहाएक लाईक्स आणि तितकेच वेलकमचे संदेश आले.
गेल्या कितीतरी रात्री शिवराजनं विशालच्या संदेशांची नीट छाननी केली होती. कोण कुणाचं कोण आहे, कुणाशी विशाल कसा बोलतो, त्याची भाषा काय असते, कोण कुठं आहे हे सगळं त्यानं व्यवस्थित पाहून ठेवलं होतं. माधुरीशी त्याची सलगी काय पातळीची होती हे ही त्याला समजुन चुकलं होतं. मात्र गेला महीनाभर हवेत विरावा तसा विशाल फेबुवरुन अदृश्ष्य झाला होता. अगदी माधुरीलासुद्धा त्यानं फक्त ’भेटू’ एव्हढाच शेवटचा संदेश पाठवला होता. विशाल परत आला तर काय? या नावडत्या प्रश्नावर विचार करायचाच नाही असं ठरवुन शिवराज अमेरिकन वेळेत परकाया प्रवेश करुन विशालमय बनायचा. मित्रांशी गप्पा, छेडखानी, नेटवरचे जुनेच विनोद विशालच्या प्रोफाईलवर दुथडीभरुन वाहायला लागले.

॥६॥

असंख्य प्रयत्न करुनही काही केल्या मला शिवराज भेटत नव्हता. हा योगायोग होता का या बद्दल मला साधार शंकाच होती. शेवटी साध्या वर्दीतले काही शिपाई त्याच्या मागावर ठेवून मी त्याची कुंडली नव्यानं मांडली.
लपंडाव संपवत मी त्याला उडप्याच्या हॉटेलात ओढतच आणला.
"काय शिव?" माझ्या आवाजातली चीडचीड न लपवता मी सरळच मुद्द्यावर आलो
"हाय शिव. किती वर्षांनी भेटतोय आपण" शिवराजच्या वागण्याबोलण्यात, कपड्यांमधे कमालीचा फरक पडला होता आणि तो टिपता टिपता त्याच्या बोलण्याकडे माझं दुर्लक्षच झालं.
"नुक्ताच परत आलोय अमेरिकेहुन, महीन्याभरासाठी" शिवराज नशेत नसला तरी तारेतच बोलत होता "लग्न करुन जाईन म्हणतो. तुला माधुरी आठवते नां? तिच्याशी लग्न करतोय मी. तू कसा विसरशील म्हणा तिला....कॉलेजमधे असताना काय मागे लागायाचास तू तिच्या! पण बरं झालं शिव, तू तुझ्या मागं लागण्याच्या गुणाचा वापर पोलिसगिरीत करतोयस ते. मी वाचतो फेसबुकवर तुझे किस्से आणि केसेस. धमाल येते रे. तुझं नाव शिव न ठेवता शॅरलॅक होम्स ठेवायला पाहीजे!"
मला सणकुन भोवळ आली. हे नक्की काय चाललय? हा मला शिव का म्हणतोय? आणि स्वतःला काय समजतोय?
आपल्याला आडून आडून बोलता येत नाही. मी फौजदारी आवाज लावत विचारलं "शिवराज, नाटक करत असशील तर बंद कर. वखारीतून तुझा दाभाडे रोज मला विचारतो तू कुठे आहेस म्हणून आणि तू हे मधेच अमेरिकेचं काही तरी बरळतोयस. हे काय लावलंयस तू? असली नकली क्राईमचे किस्से स्वतःच्या नावानं आणि माझ्या फोटोखाली खपवलेस. आणि आता मला शिव म्हणतोयस. गांजापाणी केलं असशील तर ऎक, मी ब्रम्हे, फौजदार ब्रम्हे आणि तू शिवराज. आता भरभर बोल"
गडगडाटी हसत शिवराजनं बिस्लेरी तोंडाला लावली "शिव-शिव, माय फ्रेन्ड शिव, तू कामाच्या जबरदस्त ताणाखाली आहेस? मी विशाल आणि तू फौजदार शिव, लेट्स गेट इट क्लिअर! आपण कॉलेजमधे एकत्र होतो आणि खुप वर्षांनी आपण आता फेसबुकवर भेटलोय. यात काय कन्फ्युशन आहे मित्रा?"
मला आता गरगरायला होतं होतं. शिवराज कधी उठून निघून गेला मला कळालंही नाही.

पुढे कित्येक दिवस मला शिवराज कुठेच दिसला भेटला नाही.

॥७॥

डोकं चक्रावणाऱ्या अनेक केसेस मी वाचतो, बघतो पण शिवराजचं प्रकरण एकदम भुतीया होतं. हे वेड की भानामती की काही बाहेरचं म्हणायचं मला कळत नव्हतं. डोक्यात सतत शिवराज-विशाल-माधुरी हेच घुमत होतं. आणि त्यातच बसच्या तुडुंब गर्दीत मला माधुरीसारखी दिसणारी कुणीतरी दिसली. ही बया अमेरिकेतून कश्याला आणि कधी आली? एकटीच की विशालही असेल सोबत? मग शिवराज लग्नाचं म्हणतो ते खरं की काय? की शिवराज म्हणजेच विशाल असेल? मी डोकं चाचपुन बघितलं, अजून तरी ते जागेवरंच होतं.
नंतरचे दोन दिवस फॉलो केल्यावर माझी खात्रीच पटली की ती बया माधुरीच होती.
एक घाव दोन तुकडे करायचं ठरवुन माधुरीच्या घराच्या एकट कोपऱ्यावर एका संध्याकाळी मी उभा राहीलो. अंधारुन आलं तरी मला सरावानं माणुस ओळखु आलं असतं. नेहमीपेक्षा अंमळ उशीराच माधुरी अंगावरुन पुढं गेली.
"सुक सुक" काय बोलायचं ते न ठरवल्यानं माझ्या घशाला कोरडं पडली होती "माधुरी? माधुरी..."
माधुरीनं अंधारात वळून बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. साशंक चेहऱ्यावर आधी अविश्वास आणि नंतर भितीचं भयाण सावट दाटून आलं. तिचे भोकर डोळे अजूनच विस्फारले आणि चेहरा पांढराफटक पडला. तिनं दुसऱ्या सेकंदाला तोंडावर हात दाबला तरी त्यातून अस्फुट अशी किंकाळी निघालीच
"शिव...नाही...शक्य नाही...भुत...शिव..मी नाही" आणि ती बेशुद्ध पडली.
गर्दी जमून तमाशा होण्याआधी मला हे प्रकरण समजुन घ्यायचं होतं. मी तिला जीपच्या मागच्या सीटवर नीट झोपवलं. आता फक्त असंख्य प्रश्न...माधुरी मला शिव का म्हणाली? आणि काय शक्य नव्हतं? तिला कुठलं भुत दिसलं म्हणून ती घाबरुन बेशुद्ध पडली?
पाण्याचा शिपका तोंडावर बसला तशी माधुरीला हुशारी आली.
"माधुरी, मला ओळखलंस. आपण कॉलेजमधे एकत्र होतो..."
"शिव, मला का छळतोस? जिवंतपणी कॉलेजभर माझी बदनामी करुन छळलंस आणि आता.." माधुरीनं दोन्ही हातांनी चेहरा गच्च झाकून घेतला "आधी विशाल परत आला आणि आता तू...देवा शपत सांगते जे घडलं ते संतापाच्या भरात घडलं....विशालचा फेसबुकवर मेसेज आला तेव्हा आधी वाटलं की कुणीतरी गंमत करतय, भयंकर गंमत पण नंतर काहीच न घडल्यासारखं विशाल फेसबुकवरुन नेहमीप्रमाणे अपडेट पाठवत राहीला. मी घाबरले. हे कसं शक्यय? पण कुणाला सांगायची सोय नव्हती. माझा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण आज तू..."
मी आवाक होऊन ऎकत होतो. हातातला ससा मोडु न देता जाळं मांडायचं होतं आता "काय सांगितलं विशालनं माझ्याबद्दल?"
"विशालनं परवा कामाच्या ताणाखाली तू आत्महत्या केल्याचा अपडेट टाकला होता. मी स्वतः तुझ्या फेसबुकवर तुझी सुसाईड नोट वाचली नंतर. खरं सांगते शिव, कॉलेजनंतर फेसबुकवर तू येईपर्यंत मला तू लक्षातही राहीला नव्हतास. पण तू आज इथे..."
शिवराजनं वेडेपणाच्या भरात फेबुवर असले उद्योग करुन ठेवले असतील याची मला सुतरामही शंका नव्हती. आणि इथे ही बाई मला भुत समजुन कसकसले कन्फेशन देत होती. ही इतके वर्ष अमेरिकेततरी होती का याचीही मला आता खात्री नव्हती. अस्तित्वाचे भास निर्माण करणारी फेबुसारखी कसली ही प्रतीसृष्टी होती देव जाणे. स्वतःविषयीच्या असंख्य खऱ्या-खोट्या समजांना उजाळा देत मैत्रीचे कच्चे-पक्के उमाळे काढणाऱ्यांची कमतरता नव्हती तर तिथे!
"आणि विशाल का आलाय परत?" विचारचक्रातून भानावर येत मी खेळ चालु ठेवला
"माहीत नाही शिव" गुडघ्यांमधे डोकं घालून माधुरी म्हणाली "पण विश्वास ठेव, मी त्याला मुद्दाम धक्का दिला नव्हता. तो अमेरिकेतून आला तेव्हा मला वाटलं तो माझ्याशी लग्न करायला आलाय. पण त्याला नाती नको होती. म्हणाला, अमेरिकेला चल, एकत्र पण बंधनाशिवाय राहु. शब्दाला शब्द वाढला आणि हात झिडकारुन उठताना तोल जाऊन दरीकाठच्या जंगलात तो गडगडत गेला. काट्यकुट्यातून, दगडधोंड्यावर ठेचकाळत दरीच्या तळाशी विशालला जाताना मी स्वतः पाहीलय शिव. आणि दोन महीन्यांनी अचानक विशालचं फेसबुकवर अपडेट येतं ’मी परत आलोय’ तर याचा अर्थ काय लावायचा शिव? मागचे संदर्भ नाहीत, शब्दांच्या अर्थांमधे प्राण नाहीत फक्त मध्यरात्रीचे फेसबुक अपडेट येत राहातात. विशालच्या अतृप्त आत्म्यानं त्याच्या फेसबुकचा ताबा घेतला असेल का असा प्रश्न वेडगळ ठरवण्याआधी आज तू हा असा इथे..."

॥८॥

डॉक्टरांनी शिवराजला फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डरची पुढची पायरी सांगत त्याच्यावर उपचार सुरु केले. त्या डिजीटल दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्षात जगणं सुरु करायला शिवराजला वेळ लागत होता खरं पण गेले काही दिवस तो त्याच्या वखारीत नियमित जात होता.

॥९॥

त्या रात्री रुटीन गस्त घालत मी शिवराजच्या घराजवळ होतो. स्वारी काय करतेय बघावं म्हणून मी खिडकीकडे सहज बघितलं आणि दचकलोच. खिडकीच्या दुधी काचेवर शिवरामची सावली पडली होती. कश्यावर तरी उभा असावा असं वाटलं आणि एक छतावरुन एक फिकट रेघेसारखी सावली लटकत होती. काय होतय हे लक्षात होऊन मी जीवाच्या आकांतानं त्याच्या घराच्या दरवाजावर थापा मारायला सुरुवात केली. शिवराजनं दार उघडलं, चेहऱ्यावर गोंधळलेले आणि अपराधी भाव. मी आत डोकावुन बघितलं. शिवराजनं पंख्याला दोरी लटकावुन त्याच्या लॅपटॉपला गळफास लावला होता. लॅपटॉपवर विशालच्या फेबुची प्रोफाईल स्पष्ट दिसत होती.
"एका प्रतिबिंबासारखा चिकटलाय विशाल माझ्या आयुष्याला, ब्रम्हे. आरश्यावरचं हे धुकं उठल्याशिवाय मला माझा चेहरा दिसुच शकणार नाही. आज विशालनं स्वतःला संपवलं तर उद्या शिवराज जगेल. विशाल मस्ट डाय"
मी मुकपणे मान हलवली. काल एका अर्थी विशालचा खुन झाला होता, आज एका अर्थी विशालनं आत्महत्या करणार होता.

Comments

:)

फेसबुक म्हणजे इंटरनेटच्या अभासी जगातली सर्वात अचाट आणि अतर्क्य गोष्ट आहे असं माझं स्प आणि प्रा मत आहे. कळस म्हणजे what happens in there doesn't stay in there :O

असो, तुमचं आहे का फेबु प्रोफाइल ? ;)
सॉरी बॉस, पहिल्याचा तीव्र दाहकपणा आणि अल्पाक्षरत्व यात नाही. तसाच नेमकेपणाही. फिलॉसॉफिकल की रहस्यमय या गोंधळात गंडलंय हे प्रकरण.
THEPROPHET said…
जबरदस्त!! एकदम झकास!!
yogik said…
jackass!! jackass
Samved said…
धन्यवाद मित्रांनो.
बाकी काही लिहीण्याआधी या सिरिजंच तिसरं आवर्तन लिहीण्याच्या प्रयत्नात आहे. ते झालं की बाकी काय लिहायचं ते ठरवेन