चौकटी बाहेरचं गाणं: मुझे जां ना कहो मेरी जां...
काही समज असतात म्हणजे पक्केच असतात. उदा. सिनेमातलं गाणं म्हणजे किशोर आणि लता. मापटं दाबून दाबून मी त्यात आशा बसवतोच, पर्यायच नाही. सिनेमातलं गाणं म्हणजे आर डी., सलीलदा वगैरे वगैरे. जिनिअस लोकांमधे असली प्रतवारी करायलं बसलं की तुम पुकार लो वाला हेमंतकुमार, आपकी याद आती रही वाली छाया गांगुली, लग जा गले वाला मदन मोहन, सिने मे जलन वाला जयदेव ते पार.. दिल से वाला रहमान येऊन आपल्याकडे "यू तुच्छ!" अशी नजर टाकताहेत असा सॉलीड भास होतो. तोंडावर असं सण्णकुन आपटल्यावरही जित्याची खोड जात नाही. मग ठरवलं काही तरी सर्वसमावेश (!) करु आणि आपल्याला बिनतोड कोण आवडतं ते एकदाचं (हाय...) ठरवुनच टाकु. निवांतात कॉम्बिनेशन्स बघायला बसलो. लता- आर डी- गुलजार, आशा- आर डी - गुलजार इ. इ. म्हटलं यातून लसावि काढू आणि वा वा....गणित आणि कला यांचा अपूर्व संगम घडवुन आणि. . हे वेडेचाळे अजून किती चालले असते माहीत नाही पण मुझे जां ना कहो मेरी जां..आठवलं आणि खेळ खल्लास झाला. जिनिअसांमधे नंबरांची उतरण कसली लावायची? गाणं- गुलजार संगीत- कनु राय आवाज- गीता दत्त मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां जां ना कहो...