मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (2)
..."नवीन येणाऱ्यात नुस्ता पुष्कर नव्हता. त्याच्या मागोमाग आठवड्याभरात वि.र. सहमोरे सर पण आले, भुगोल शिकवायला."....
वि.रं नी पहील्याच तासाला येताना जगाचा थोर मोठा नकाशा आणला.
"अय्या, सरांपेक्षा नकाशाची पुंगळीच जास्त उंचै" चिमणी पुटपुटली
चिमणीचं पुटपुटणं बाजाच्या पेटीच्या भाषेत बोलायचं तर सर्वसाधारण वरच्या पट्टीत असतं.
वि.रं गर्रकन वळले आणि खडुचा एक ढेलपा त्यांनी उभ्या जागून चिमणीला फेकून मारला. खडू मिसाईल भिरभिरत रस्ता चुकून मिस वनच्या चष्म्यावर ताडकन आपटलं. शंकरानं मदनाला बाण लागल्यावर जसं नजरेनंच जाळून मारलं, अगदी डिट्टो तोच लुक मिस वननं वि.रं ना दिला.
वि.र सॉरी म्हणतील अश्या आशेनं किंचित तक्रारवजा सुरात मंजु म्हणाली "सर, खडु मला लागला"नाव काय तुझं?"
चढ्या स्वरात वि.रं चा प्रश्न.मिस मंजु पाटील" मंजुच्या या मिस प्रकरणामुळेच बियाण्यानं तिचं नाव मिस वन ठेवलं होतं.मिस?"
वि.रं चा स्वर कडसर झाला "मातृभाषेत कुमारी असं म्हणतात पाटलीणबाई. आणि लागला खडु तर काय झालं? तुझे आणि या वर्गातल्या सगळ्यांचे गुण चांगले माहीत आहेत मला"
उरलेला तास तंग हवेत कसाबसा संपला पण मुलं जरा गंभीर झाली होती. आप्पासाहेब वयाच्या या वळणावर आलेल्या मुलांशी नेहमीच अहो-जाहो बोलायचे. बरेचसे इतर शिक्षकही अगदी अहो-जाहो नाही केलं तरी मुलांशी आब राखून बोलायचे. मुख्याध्यापिका असणाऱ्या दातेबाई वेळोवेळी मिटींग्स, वर्कशॉप मधून वयात येणाऱ्या मुलांमधल्या शारीरीक आणि मानसिक बदलांचा आणि त्यांच्याशी कसं वागायचं यावर चर्चा करायच्या. या सगळ्या पार्श्वभुमीवर वि.रंच वागणं थोडं खटकलंच.
मधल्या सुटीनंतर बहुदा वि.रंचा तास असायचा. येता जाता आप्पासाहेब बघायचे, कायम चार आठ मुलं शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभी असायची. त्यांनी एकदा वि.रंना सांगून बघण्याचा प्रयत्न केला पण ताजे ताजे शिक्षक झालेले वि.र. वस्सकन आप्पासाहेबांच्याच अंगावर धावून आले. तेव्हापासून आप्पासाहेबांनी वि.रंच्या नावानं तौबा केली.
पहील्या चाचणीनंतर मुलं विरुद्ध वि.र. हा सामना अधिकृतच झाला.
डब्बल भिंग्याला भुगोलात विसापैकी फक्त बारा मार्क पडले तेव्हा त्याच्यासोबत आख्खा वर्गही चक्रावला. त्याचे निदान चार मार्क तर व्याकरण, विरामचिन्हे यातच गेले होते.
"पण सर भुगोलाच्या पेपरमधे स्वल्पविराम नाही दिला म्हणून तुम्ही मार्क काटले?" डब्बल भिंग्याच्या आवाजात तक्रारीचा सुर जास्त होता की आश्चर्याचा सांगणं कठीण होतं "आणि हे बघा, नकाशात मी डब्लीन बरोबर दाखवलय तरी तुम्ही शुन्य मार्क दिलेत?"
डब्बल भिंग्याच्या नाचऱ्या हातातलं पुस्तक टेबलवर ठेवत वि.रंनी फुटपट्टी काढली. "हे बघ, आपल्या पुस्तकात या बिंदुपासून डब्लीन ३.३ मिमी आहे. तुझ्या नकाशात ते ५.७ मिमीवर आलय.
"पण सर" नेहमीच्या प्रथेप्रमाणं आधी पुष्करचं पोट आणि नंतर उरलेला पुष्कर वि.रंच्या टेबलापाशी पोचला "पुस्तकातल्या नकाशाचा आकार आणि पेपरमधल्या नकाशाचा आकार यात फरक आहे सर. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं इथलं आणि तिथलं अंतर कसं कंपेअर करणार? हे बघा मी दाखवतो.."
वरिष्ठांना आडवं जाऊ नये अशी कोणत्या तरी भाषेत म्हण असण्याची दाट शक्यता आहे. पण पुष्करनं अजाणतेपणी ते केलं. आणि त्यात भर म्हणून वि.रंच्या हातून पुस्तक जवळ जवळ हिसकावून घेताना त्यानं ते टरकावलं देखिल.
वि.र. त्या मिनीटाला एखाद्या चिमटण्या काळ्या वांग्यासारखे जांभळे पडले.
"सर, चुकून..." पुष्करला इंट्युशन की काय म्हणतात ते झालं.
वि.र. पुढची काही मिनीटं अत्यंत खुनशीपणे फळ्यावरचा भला मोठ्ठा गोल खडुनं रंगवत होते.
"हा गोल आता नाकानं पुस" वि.रं नी पुष्करला दफा ३०२ सुनवली. ’यांना मारायचही नाही म्हणे. टोणगे कुठचे!’ वि.र मनाशी पुटपुटले.
प्रचंड अविश्वासानं पुष्करनं वि.र, फळा आणि वर्गाकडे बघितलं "सर, मी ते पान चिकटवुन देतो. हवं तर नवीन पुस्तक आणून देतो"
कुठल्याशा बुकडेपोवाल्यानं फुकट दिलेलं पुस्तक फाटल्याचा राग जास्त येतोय की पुष्करच्या ऑफरचा ते वि.रंना समजत नव्हतं.
वर्गाबाहेर रुतलेले आप्पासाहेब आणि दातेबाई गुपचुप टीचररुमकडे निघून गेले.
"उद्यापासून माझ्या वर्गात बसु नकोस" वि.रंनी राग गिळत निर्णय दिला.
"अय्या, याला काही अर्थै का?" चिमणी नेहमीच्या आवाजात पुटपुटली "फ्फीया देऊन येतो आम्ही. आमचं काय ईबीसी नै"
गरज पडली की आठवी ड चा वर्ग लिंगभेद विसरुन सण्णकुन एकत्र येतोच.
वि.रंनी उसवलेला तास कसाबसा आवरुन टाकला.
मधल्या सुट्टीत मुलं वर्गात डब्बा खायची पण पुष्कर आल्यापासून काळा पहाड आणि कंपनी त्याच्या घरी जाऊन डब्बा खायला लागली. पुष्करची आई पोरांना लिंबुटिंबु काहीबाही देत राहायची. शाळेला घर जवळ असल्यानं डब्बा खाऊनही गप्पा टाकायला वेळ मिळायचा तरीही हाशहुश्य करतच मुलं पाचव्या तासाला वर्गात घुसायची. मुली अर्थातच आणि नेहमी प्रमाणेच मुलांहुन हुशार. गपागपा डब्बा खाऊन मधल्या मोठ्या ग्राउंडावर कालच्या टीव्ही सिरीअलची मधल्या म्युजीकसहीत गोष्ट सांगायचं त्यांचं काम तन्मयतेनं चालायचं.
शाळेची इमारत आयताकृती होती. लांबीच्या एका टोकाला टीचररुम होती तर दुसऱ्या टोकाला आठवी ड चा वर्ग. आठवी ड पासून आयताचा कर्ण काढला तर कर्णाच्या दुसऱ्या टोकाला शाळेचं प्रवेशद्वार होतं. आयताच्या लांबी-रुंदीवर विविध खोल्या होत्या तर क्षेत्रफळभर मैदान पसरलं होतं
दुसऱ्या दिवशी मधली सुट्टी संपल्याची घंटा वाजली तसं दबा धरुन बसलेले वि.र. वर्गाकडे पळत सुटले. वि.र. वर्गात पोचले तेव्हा जेमतेम बारा पंधरा पोरं वर्गात होती. उशीरा पोचलेली चाळीसेक पोरं वि.रंनी शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभी ठेवली.
हा प्रकार दोनचार दिवस घडल्यावर पोरांनी ठरवलं की काही झालं तरी आता वि.रंच्या आधी वर्गात शिरायचं.
हातात फाटलेलं पुस्तक घेऊन वि.र. त्याही दिवशी टीचररुमच्या दारात जवळजवळ पळण्याच्या पोझ मधे होते. ग्राउंडच्या कर्णाच्या टोकावर मुलं जेवण आटोपून पोचतच आली होती. मुली कसलासा सद्गुरुंचा आदेश आल्यागत जेवण होऊनही वर्गाच्या दाराजवळच रेंगाळत होत्या.
रणांगणावर ’हल्ला’ असा आदेश आला की तोफगोळे जसे सटासट सुटतात तसं घंटा झाली की टीचररुमच्या सीमेवरुन वि.र. पळत सुटले, मैदानातून मुलं धावत सुटली आणि वर्गाच्या दाराशी मुलींनी एकच काला केला.
वि.र. दारातून आत घुसताना दोनेक मुलं त्यांना धक्का देऊनही आत गेले. बाजीप्रभुच्या आवेशात वि.रंनी दरवाजाच्या खिंडीवर हात रोवून मुलांना रोकण्याचा प्रयत्न केला पण पुष्करच्या पोटापुढे त्यांची एक चालली नाही. गड पडला,वि.र. आत ढकलेले गेले आणि त्या हातघाईच्या लढाईला टर्रर्र असं एक अनपेक्षित पार्श्वसंगीत मिळालं आणि काही सेकंदांकरता काळ थांबला की काय म्हणतात तसं झालं.
"माझी चप्पल...माझी चप्पल" कपाळावरच्या कुंकवाला धक्का लागल्यासारखा वि.रंचा आक्रोश काही सेकंदात निश्चयी क्रोधात परावर्तीत झाला. दाराबाहेर काळा पहाड, डब्बल भिंग्या, चिमणी, थरकाप, बियाणी आणि अजून दहाएक मुलं उभी होती. दाराच्या चौकटीवर नरसिंहासारखे वि.र उभे होते आणि हातात अंगठा तुटलेली चप्पल..
"आत या" वि.रंचा आवाज मुठबंद रागासारखा कमी शब्दांमधे कॉन्सन्ट्रेटेड झाला होता "आत्ता धक्काबुक्की करुन कोण कोण आत आले ते सगळे उभे राहा"वर्ग सुन्न झाला.
एकेक करत पाचसहा मुलं उभी राहीली.
"पुष्कर?" वि.रंच्या आवाजाला गर्जनेचे झालर होती.
"सर, माझं पोट वर्गाच्या आत पोचलं होतं, म्हणजे मी वर्गात वेळेत पोचलो होतो" पुष्करच्या युक्तीवादावर कणभरसुद्धा हसु सांडलं नाही.
वि.रंनी पुष्करचं बकोटं धरुन त्याला द्रौपदीसारखं जवळजवळ फरफटतंच बियाण्याच्या बाजुला उभं केलं आणि क्षणार्धात नकाशाच्या पुंगळीखालचा लाकडी दांडु फर्रर्र करुन ओढून काढला.
"हात पुढं कर" चिमणीकडे वळून त्यांनी दांडु सण्णकन खाली आणला. चिमणीचा जीव साकाळला
"बेशरम कुठ्चे, गुरुजनांचा आदर कसा करायचा माहीत नाही आणि हे म्हणे आठवीत आलेत" वि.रंच उघड स्वगत.
चिमणीनं डोळ्यातलं पाणी निग्रहानं परतवलं आणि दुसरा हात पुढे केला.
सुडदार नागांचं डसणं एखाद्या व्यसनासारखं असतं. एकातुन दुसरं उमलावं तशी हिंसेची वर्तुळं अनंतपणे उमलत राहीली.
वि.रंनी बेभानपणे मुलांच्या उलट्या-सुलट्या हातावर दांड्यानी रट्टे मारले. पुष्कर, डब्बल भिंग्यांनी मारापाई हातांची होणारी आग शमावी म्हणून हात मागे घेतले तर वि.रंनी पोटरीवर सपासप वार केले. काळा पहाडच्या कमावलेल्या अंगावर जेव्हा लाकडी दांडु काड्कन मोडला तेव्हा मुलांच्या अंगाइतकेच त्यांच्या डोळ्यातही नक्षत्रांचे लालसर वेल टरारुन फुलले. दांडु मोडला तसा वि.रंनी बियाण्याच्या शैलीदार केसांना पकडुन त्याला भिंतीवर ढकलुन दिलं.
स्वतःचा आब आणि अंतर राखुन असणारी मंजु मात्र त्या मिनीटाला ऊठली. बंड करणाऱ्या शिपायांना एक सामुहीक उर्मी बांधून ठेवते. मंजु पाठोपाठ थरकाप कुणी न सांगताच उठली आणि वर्गाबाहेर जायला निघाली. लंगडत, डोळ्यातलं पाणी मागे सारत, अपमानाचे तीव्र पडसाद मनात साठवत बराचसा वर्ग खोली बाहेर पडला.
"मी म्हणते आत्ता मुलांची मेडीकल करा" महाजन बाईंनी चिमणीसमोरच आप्पासाहेबांना खडा सवाल टाकला. दातेबाई नसताना आप्पासाहेबांवर हे धर्मसंकट शेकलं होतं. मुलांसोबत धीर देत पुष्करची आई उभी होती. प्रकरण पेटणार ओळखुन आप्पासाहेबांनी दोन दिवस मागून घेतले.
संध्याकाळच्या धुसर उजेडात मुलं शाळेबाहेरच्या ग्राउंडवर बसून चर्चा करत होती.
"मी वड्डरवाडीतून पोरं घेऊन येतो. पाच-पाच रुपयात पोरं येतात. शाळा सुटली की धरतील मास्तराला आणि गपागप हाणतील" काळा पहाड संतापानं नुस्ता धगधगत होता.
"विष घालायला पायजेल" फुल्या फुल्या तोंडातच गिळत बियाणी बोल्ला.
"आपल्याकडे हर्क्युलस सायकलै" डब्बल भिंग्या बेअकल्यासारखा बावळट्ट आयड्या देतो "सरांच्या बियसेला ठोकला नां तर नळकांड वाकडं व्हायचं. परमनंट! मग बसा बोंबलत"
"कुणी काही केलं नाही" पुष्कर टम्मं फुगलेल्या पोटरीवरुन हात फिरवत भीषण आवाजात म्हणाला "तर उद्या मी त्याला पप्पांच्या गाडीखाली क्रश करेन. एकेक हाड मोडेपर्यंत अंगावरुन गाडी फिरवत राहीन-मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे..."
त्याच संध्याकाळी आप्पासाहेब, राठौरसर आणि महाजनबाई यांनीही चर्चेचं गुऱ्हाळ लावलं होतं.
चिंताक्रांत स्वरात आप्पासाहेब म्हणाले "काही कळत नाही बुवा हा वि.र. एव्हढा संतापी का आहे ते! वयात आलेल्या मुलांना असं वाकडंतिकडं मारायचं म्हणजे...कठीणचै"
"नक्की घरी प्रॉब्लेम असणार सर" महाजनबाई अनुभवाची झालर लावून अंदाज बांधतात "त्यांचे वडील किंवा आई संतापी असणार बघा. संतापी म्हणजे महासंतापी, जमदग्नीच म्हणा नां. काय हो राठौरसर, तुम्हाला काय वाटत?"
"छे छे" ओसांडणारा मुखरस सांभाळत राठौरसर म्हणाले "मी पण हाणतो पोरांना, अगदी पोरींच्या पाठीत पण गुच्चे घालतो. पण म्हणून काय मी संतापी झालो काय? आमचे मायबाप पण एक्दम सरळ. अहो पोरं चुकली की होतं असं कधी कधी. उगीच याची साल त्याला लावु नका"
"असं कसं म्हणता सर?" महाजनबाई उसळुन म्हणाल्या "आता आमची सावली त्याच वर्गात आहे. मस्तीखोर आहे, सगळ्या सरा-बाईंच्या नकला करते, वि.रंची तर सुरेखच करते, तुम्ही पाहीलत की त्या दिवशी आमच्या घरी. म्हणून आता तिला मारायची का? का हो आप्पासाहेब?"
"खरय" आप्पासाहेब म्हणाले " मागे तुम्ही मला बियाणीच्या केसबद्दल सांगीतलत. तुमचं त्याला तेव्हा शिक्षा करणं योग्यच होतं. पण म्हणून मी त्याला उठसुठ झोडायचं का? पोराचे गणितातले मार्क बघा, पैकीच्या पैकी. मी तुम्हाला मंजु पाटील, मोहन साळेकर बद्दल सांगीतलं. ती पोरं मला मोकळेपणानं सगळं सांगतात, त्यांनी वि.रंच्या काढलेल्या अभ्यासु खोड्यापण. म्हणून मी त्यांना तुडवुन काढायचं का? उद्याची मेरिटची पोरं आहेत ती. त्यांच्या व्रात्यपणात त्रास देण्यापेक्षा धिटाई, नवीन काही करुन बघण्याची उर्मी जास्त आहे. वि.र एकदम स्पोर्ट नाहीत हेच खरंय. हे काही तरी वेगळंच आहे"
"थोडा माझाच गाढवपणा झाला म्हणायचा" अपराधी आवाजात राठौरसर म्हणाले "मीच आपलं वि.र.ला ’बसायला’ बोलावलं होतं दोन-पाचवेळा. म्हटलं नवीन नवीन झालेलं मास्तरै. ’बसलं’ की कसं ओळखही होती आणि कोण पोरं कशी आह्ते, किती वांड आहेत तेही कानावर घालता येतं. पण हे सगळं इतकं सिरिअसली घेईल कुणाला माहीत होतं"
आप्पासाहेब आणि महाजनबाई आवाक होऊन राठौरसरांकडे पाहात राहीले.
घरी आल्यावर डब्बल भिंग्याला राहून राहून भेदरल्यासारखं होत होतं. हे नक्की झालेल्या प्रकारामुळे की पुष्करच्या प्रतिज्ञेमुळं होतय कळेनासं झाल्यावर मात्र त्यानं आत्तापर्यंत जे कधीच केलं नव्हतं ते करायचं ठरवलं. रात्री उशीराचं सायकलवर टांग मारुन तो मिस वनच्या घरी निघाला.
'आता आम्हाला शिकवायला तुम्हाला आता कितपत आवडेल कल्पना नाही पण कुठल्याही छोट्या मोठ्या कारणावरुन आमचा जीव धोक्यात घालण्याची आमची इच्छा नाही. गुरुर ब्रम्हा। गुरुर विष्णु... ’ असं काहीसं निवेदन वर्गात ठेवून काळा पहाडनं शक्ती लावून आख्खा वर्ग बाहेर काढला. श्लोकाची आयडीया त्याला फारशी आवडली नव्हती पण मिस वन पुढे त्याचं काही एक चाललं नाही. ’वक्रुत्व’ चांगलं असल्यानं ती निवेदनही चांगलंच लिहील असं डब्बल भिंग्यानं त्याला खात्रीशीर पटवलं होतं. शिवाय ही अहिंसक आयडीयापण तिचीच होती.
वि.र. वर्गात आले, त्यांनी टेबलावर ठेवलेलं निवेदन वाचलं आणि शिकवायला सुरु केलं.दुसऱ्याही दिवशी वि.र. वर्गात आले आणि रिकाम्या वर्गाला शिकवायला सुरु केलं पण त्यांना आज जरा विचित्रच वाटलं. उद्या जर आपण रिकाम्या वर्गात मनाशीच असं बडबडताना दिसु तर आपल्याला वेड लागलं ही अफवा शाळेत पसरायला वेळ लागणार नाही असं त्यांना घट्टच वाटलं.
तिसऱ्या दिवशीपासून वि.रंनी वर्गावर येणं बंद केलं.
पुढच्या चारेक दिवसात दातेबाईंनी सगळ्या प्रकरणाची नीट चौकशी केली. मुलांशी, पालकांशी, सहशिक्षकांशी बोलून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवलं.
दुसऱ्या गावी असणाऱ्या शाळेच्या शाखेत वि.रंची बदली झाली.
बियाणी, पुष्कर यांची आठवी ड मधून दुसऱ्या तुकडीत बदली झाली.
मुलांना आणि पालकांना कडक समज देऊन दातेबाईंनी या प्रकरणावर पडदा पाडला.
आठवड्याभरात राठौरसरांनी परगावच्या शाखेत शिकवणाऱ्या आपल्या मेव्हणीचा कौटुंबीक कारणावरुन बदलीची विनंती करणारा अर्ज दातेबाईंना दिला.
गंमत म्हणजे राठौरसरांची मेव्हणीपण भुगोलच शिकवायची.
Comments
लोक नावं ठेवतात- सोबत गाढव असूनही दोघेही चालताहेत म्हणून
बाप गाढवावर बसतो आणि मुलगा मुकाट चालत राहातो.
लोक नावं ठेवतात- सोबत लहान मुलगा असूनही गाढवावर बाप बसलाय आणि मुलाला चालवत नेतो आहे म्हणून
मुलगा गाढवावर बसतो आणि बाप वाट तुडवायला लागतो.
लोक नावं ठेवतात- तरुण असूनही मुलगा गाढवावर बसलाय आणि म्हाताऱ्या बापाला चालवत नेतो आहे म्हणून
मुलगा आणि बाप गाढवाला डोक्यावर घेऊन चालत सुटतात.
लोक हसायला लागतात.
तात्पर्य, असुच दे