आईराजा उदो उदो
आठवणींचा नुस्ता काला झालाय. नियमांचे गारगोटी अट्टहास होण्याआधीच्या देवी तुझ्या आठवणी, देवी तुझा गोंधळ.
सातलाच
रात्र व्हायची, लाईटीचे निव्वळ अपवाद, आग्रहही नसायचाच, लोक तसे समजुतदार
होते. गोंधळाच्या रात्री मग तेलाचे पलिते पेटायचे. सरगाठ, निरगाठ, आतली
गाठ, सगळं सगळं आवळुन आराधी, आराधणी जुन्या साड्यांचे पलिते बनवायचे.
पलिते, घट्ट, सापासारखे, भप्पकन पेटून उठायचे नाही पण धुमसत राहायचे,
रात्रभर. आराधी एरवी म्युन्सीपाल्टीत गटारगाडा ओढायचा पण नवरात्रात आकाशी
निळ्या रंगाचा नेहरुशर्ट घालायचा. बघावं तेव्हा नशेत असल्यासारखे डोळे
चढलेले, केस खांद्यावरुन खाली ओघळलेले, त्याच्याशी एक वाक्य बोलायचं म्हटलं
की पाक्पुक व्हायचं. पण त्याच्या हलगीचं भारी आकर्षण. हलगी चढव्हायला
आगीवर शेकावी लागायची. ताणलेल्या कातड्यावर फटकारलं की आवाज होतोच.
कॅलिडास्कोप
थोडा फिरवला की मला सुभाषदादाचा भाऊ आठवतो. भिमसेनांकडे शिकायचा.
उन्हाळ्यात तो आला की रात्री गाण्यांची मैफल जमायची. सर्वात शेवटी त्याला
कुणीतरी जोगवा म्हणायचा आग्रह करायचा. पेटी-तबला बाजुला सारुन भली मोठी
परात तो उपडी घालायचा आणि त्यावर ताल धरुन तो ’आईचा जोगवा जोगवा जोगवा
मागेन’ म्हणायचा. अंगभर नुस्ता ताल; आपेगावकरबापुंच्या पखवाजासारखा,
घुमत्कार...ताणलेल्या कातड्यावर फटकारलं की आवाज होतोच.
पलित्यांच्या
उजेडात जेव्हढं देऊळ उजळायचं तेव्हढाच अंधार अंग चोरत प्रदक्षिणेचे रस्ते
अजून गर्द करायचा. देवळात महापूर...माणसांचा, करवंट्यांचा, घामाचा.
महापूर...श्रद्धा, पाप निस्तरण्याचा, परंपरा, विश्वासाचा. भावनेचा तुंबा
स्फोट. हिरव्या साड्यांची देवीच्या खोलीत महाप्रचंड लाट...आणि देवी?
केसांना उदवुन आलीस
पाण्याला भलती ओल
हिरव्या लहरीतून उठते
तू लख्ख जरीचे फुल
चांदीचे डोळे भगवे
मणक्यात खडीचे सर्प
निजलेल्या गोष्टीमधला
तू गारठलेला बर्फ
मळवटात दडल्या रेषा
कवड्यांचे भाकित थोर
लखलखत्या पदरावरती
तू भुल घातला मोर
पलित्यांच्या
उजेडात पालखी निघायची. छोटीशी दिपमाळ चमकुन उभी राहायची. झांज, हलगीच्या
आवाजाचा गोंगाट व्हायचा नाही. तालात कसलं आव्हान नसायचं. एक नुस्ताच झेन
प्रवाह- नैसर्गिकरित्या वाहात जाण्याचा. पालखी परतली की देवळात गोंधळ सुरु
व्हायचा. दुरड्या सरकवल्या जायच्या. कवड्यांची किणकिण वाढायची.
कॅलिडास्कोप
परत फिरतो. मारुतीराव चितमपल्लींनी वारसाहक्कात देवीची कवड्य़ांची माळ आणि
दुरडी मागून घेतली होती म्हणतात. मोठं कठीण व्रत. म्हटलंच तर देहभानाच्या
स्वातंत्र्याचा एक अजाण उत्सव.
आराधणी
बेभान घुमत असतात. मोकळे केस, कपाळभर पसरलेलं मळवट, अस्ताव्यस्त
पदर...कुठल्या दबलेल्या भावना, दडपलेल्या वासना उन्मुक्त वाहात असतात. देवी
स्वस्थ उभी असते. मध्येच पलित्यांच्या उजेडात एखादी गोंदणनक्षी क्षणभर
चमकून जाते.
हातांवर नक्षी हिरवी
गोंदणात लपवी राणी
प्रश्नांचे टिंब ठिबकते
की गुढ आतले पाणी
बाईचे अंगण भुरटे
कवड्यांची उन्मन माळ
सांभाळ बयो पदराला
न गावात उडेल गं राळ
कवड्यांचे बनती फासे
चालीत बदलते दान
पलित्यांच्या अंधारात
देहातून उफळे रान
गोंधळ संपत येतो तसा ’आईराजा उदे उदे’चा एकच गजर होतो. देवळाच्या अवकाशात काही क्षणांपुरता गोठलेला काळ परत मोकळा वाहु लागतो.
देवी बंद दाराआड मुर्ती होवून उभी असते.
Comments