Sunday, December 8, 2013

मराठी कथेचं कृष्णविवर आणि परिघावरचा वाचक

निमित्त- लोकसत्तेमध्ये आलेला रेखा इनामदार-साने (कथा आक्रसते) आणि राजन खान (कथा टिकून राहील...) यांचा मराठी कथेबद्दलचा उहापोह

सर्वसाधारणपणे आपल्याकडे वाङमयीन चर्चेचा एक बाज असतो; कधी आपण शैलीची चर्चा करतो, कधी ग्रामीण-शहरी-दलित-महिला अश्या वर्गीकरणात रमतो, कधी रवीकिरण-दुर्बोध-नव इ. शब्दछलात गुंततो तर क्वचित अभ्यासु लेखक असलाच तर ऍरिस्टॉटल, जंग, फ्राऊ, भरतमुनी यांच्या चष्म्यातून आपण आपली पुस्तकं पाहातो. समिक्षेसाठी तटस्थता आणि अभ्यास आवश्यक आहेच पण तटस्थता म्हणजे कोरडेपणा नाही. लेखन प्रक्रियेत जवळ जवळ शुन्य सहभाग असणाऱ्या वाचकाचा वाचण्याच्या क्रियेत मात्र १००% सहभाग असतो. मग मराठी कथा-कविता-कादंबरी इ. च्या स्थित्यंतराचा अभ्यास करताना वाचकाच्या भुमिकेचा विचार करायला हरकत नसावी. वाचणाऱ्यांच्या जगात पडलेल्या फरकाचा विशेषतः कथेवर कसा परिणाम झाला असावा याचं हे अनुमान.

वाचणाऱ्यांचे मी माझ्यासोईसाठी दोन गट पाडतो; नवशिक्षीत आणि सुशिक्षीत.

सुशिक्षीत- दोन पिढ्यांहून जास्त साक्षर असणारी कुटूंब आणि वाचन म्हणजे वर्तमानपत्र आणि पाठ्यपुस्तक या पलीकडंच जग.

नवशिक्षीत - दोन किंवा निव्वळ पहीलीच पिढी साक्षर असणारी कुटूंब आणि वाचन म्हणजे वर्तमानपत्र आणि पाठ्यपुस्तक या पलीकडंच जग.

शिवाय आपण इथे वाचणाऱ्या लोकांबद्दलच बोलतोय. न वाचणारे निरक्षर किंवा रानटी असतात(च) असं नाही.

हे असं का? सांख्यिकीच्या भाषेत सांगायचं तर, माझ्या मते हे दोन क्लस्टर आहेत आणि त्यांचे पॅटर्न्स निराळे आहेत. म्हणून व्याख्यांचा हा उपद्व्याप.

॥सुशिक्षीत॥

या वर्गातही परत शिरोडकर तर ते जीए अशी रेंज आहेच पण आवडींची सरासरी घेऊन पुढील विधाने मी करत आहे. वाचनाची आवड असणारा, किमानपक्षी चांगले लेखक/ चांगली पुस्तकं यांची नोंद ठेवून असणारा हा वर्ग आहे! या वर्गाला वाचनाची एक बरी अशी बेसलाईन आहे. तरीही हा वर्ग कथेपासून दुरावतो आहे. हा एक गंभीर प्रश्न आहे. कोषातले लेखकराव आणि गोंधळलेले प्रकाशक यांना या प्रश्नाची सर्वंगोल अशी कितपत जाण आहे याची कल्पना नाही.

माझ्या मते या दुरावण्यामागे irrelevance आणि globalization अशी दोन मुख्य कारणं आहेत. इथे एक लक्ष्यात घ्यायला हवं की मराठी कविता जशी स्वकेंद्रीत आणि (म्हणून?) दुर्बोध होत गेली (म्हणे) आणि त्यामुळे वाचकापासून दूर होत गेली, तसं कथेच्या बाबतीत झालेलं नाही. कथा वाचकाच्या दृष्टीने irrelevant होत गेली आहे दुर्बोध नव्हे. कथेचा रिलेव्हन्स हा अनेक पातळ्यांवर असु शकतो, वास्तव, जगण्याची मुल्य, समाजव्यवस्था, समाजकारण, राजकारण, व्यवसाय, तंत्रज्ञान इ. इ. मुळात या आणि अश्या अनेक गोष्टी ज्यांना आपण समाजाची एका अर्थाने ईको-सिस्टीम म्हणू शकतो ती प्रचंड वेगाने बदलत आहे. हा बदल आणि वेग मराठी कथेला पुर्णपणे नवा आहे. या बदलाला तोलु शकेल असे सशक्त लेखक मराठीत आहेत कुठे? जगण्याचे वास्तव अनेक पातळ्यांवर बदलत असताना कथेचा पट मात्र अजूनही पारंपारिकच आहे. कल्पनाशक्ती ताणून लिहीलेल्या फॅन्टसी हास्यास्पद वाटू लागल्याहेत. विज्ञानकथांमधलं विज्ञान कमालीचं तुटपुंजं ठरु लागलय. सामाजिक पार्श्वभुमीच्या कथांना जाती-जमातीचे धमकीबाज वास्तव जोडलं जातय. भयकथा, रहस्यकथा हा प्रकार तर जवळ जवळ संपलाच आहे. या परिस्थितीत वाचकानं काय करावं? याचं उत्तर काही प्रमाणात ग्लोबलायझेशन मधे दडलेलं आहे. सुशिक्षीत वाचकाला मराठीत जो डिस्कनेक्ट जाणवतोय तो जागतिक वाङमय काही प्रमाणात भरुन काढत आहे. एव्हढं नाही तर जागतिक वाङमयात जे प्रयोग सुरु असतात, जे विषय हाताळले जाताहेत त्याच्याशी हा वाचक जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःला जोडु पाहातो आहे. हा बदल मराठी कथेचं रिकामं झालेलं जग व्यापु पाहातो आहे.

या वाचक वर्गाला सद्य स्थितीत परत मराठी कथेला जोडण्याच्या दोन संधी होत. एक म्हणजे जागतिक वाङमय रुपांतरीत करुन मराठीत आणणे. नवशिक्षीत वर्गालाही एक नवं दालन यामुळे उपलब्ध होईल. इंग्रजी किंवा इतर भाषांचं अज्ञान हा मुख्य अडथळा यामुळे पार होईल. पण यात प्रकाशकांची आर्थिक गणितं कशी सुटतील याची कल्पना करणं कठीण आहे. दुसरी संधी होती मराठी ब्लॉग्स. ’होती’ म्हणण्याचं कारण म्हणजे एक आशादायक सुरुवातीनंतर या माध्यमाची दिशाच हरवली आहे. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

 ॥नवशिक्षीत॥

सुशिक्षीत वाचकवर्गाला असणारी वाचनाची परंपरा दुर्दैवाने या वर्गाला नाही आणि त्यासाठी लागणारी ईको-सिस्टीमही नाही. भाषेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात पुर्वी घरातलं कुणी नं कुणी असायचं, त्यांना अभ्यासक्रमात चांगली पुस्तकं असायची आणि त्या निमित्तानं घरात चांगल्या लेखकाचा/पुस्तकाचा प्रवेश व्हायचा. आज मराठी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम मरणपंथाला लागला आहे. शिक्षणक्षेत्रातल्या अत्यंत मर्यादित नौकरीच्या संधी आणि सरकारी/सामाजिक अनास्था यामुळे पुढच्या १० वर्षात हे अभ्यासक्रम बंद पडले तर नवल नसावं. मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात राजकीय वशिल्याने लागलेल्या अत्यंत सुमार पुस्तकातून वाचनाची कसली आवड जोपासली जाणार? जाती-पातींची घाणेरडी गणितं, प्रादेशिकवाद आणि शिक्षकांचा दर्जा या सगळ्यांचं प्रतिबिंब मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्पष्ट दिसु शकतं. वाचन संस्कृतीच्या जोपासनेला कीड लागली आहे ती अशी. या बिंदुपासून सुरु होणारी कीड पुढच्या पिढीच्या वाचनाचा दर्जा खाऊन टाकत आहे. इथे परत एकदा नवशिक्षीतची जी व्याख्या योजलेली आहे ती बघणं गरजेचं आहे. या वर्गाला वाचनाची मर्यादित परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे एका पिढीचं होणारं नुकसान हे ताबडतोब पुढच्या पिढीमधे परिवर्तित होताना दिसतं.

नवशिक्षीत वर्गासाठी व्यवस्थेचं बाजारिकरण आणि मनोरंजनाच्या इतर साधनांची रेलचेल हा वाचन संस्कृतीवर झालेला दुसरा महत्वपुर्ण आघात. हातांच्या बोटांवर उपलब्ध असणारी इंटरनेटाधारीत मनोरंजनाची स्वस्त आणि चमकदार दुनिया, विकी-पिडीत ज्ञानाची छोटीशी तय्यार गोळी यापुढे संथ लयीतली मराठी कथा मागे पडत आहे.

शहरामधे तितकीशी न जाणवणारी जाती समिकरणांची धग गावाकडे अगदी वाचक संस्कृतीत देखील जाणवते. लेखकाचे आडनाव बघून पुस्तक घेण्याची एक नवीच प्रथा, विशेषतः ग्रंथालयांमधे सुरु झालेला दिसते.

 

मराठी कथेपासून दूर जाणारे हे दोन्ही वाचक मग नक्की काय वाचताहेत? सुशिक्षित वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर आत्म/चरित्र, प्रवासवर्णन, भाषांतरीत इ. वाचतो आहे. प्रदर्शनांमधून अजूनही तो जुन्याच लेखकांची जुनीच पुस्तक विकत घेत आहे. तर नवशिक्षीत वाचक सेल्फहेल्प, धार्मिक इ. पुस्तकांकडे वळला आहे.

गेल्या कित्येक वर्षांत मी कुणालाही नाटक विकत घेताना बघितलेलं नाही. कविता बहुदा स्वखर्चाने (अर्थात कवीच्या) आणि स्वखुशीने (अर्थात कवीच्या) छापलेल्या असल्याने कवी मंडळींना कवितासंग्रहाच्या खपाशी फारसं सोयरसुतक नसतं. प्रसिद्ध कवींच्या कविताही वर्षानुवर्ष उचलल्या जात नाहीत. त्यातल्या त्यात कादंबरीचे दिवस बरे आहेत पण दणकट अशी कादंबरी पाच-सात वर्षात एखादीच येते हेही वास्तव.

4 comments:

Meghana Bhuskute said...

बदललेली रंगरंगोटी बदल म्हणूनच स्वागतार्ह. एरवी काही फारशी आवडण्यात आलेली नाही. पण ते असो. पोस्टबद्दल:
मला इतकं ठाम समीक्षात्मक असं काही म्हणताना जाम अधांतरी वाटतं. त्यामुळे माझा सूर डळमळीत लागणार. नि ते बरंच आहे. मला वाटतं, कथा लिहिली जात नसेल तर तो आजचा फॉर्म नसेलच. हे सुटकावादी विधान वाटतंय? हं, मलाही. पण तरीही तसंच वाटतंय. माझ्या वाचनाच्याच सवयी इतक्या वेगात नि इतक्या आमूलाग्र बदलत चालल्याहेत... वाचनाचा आवाका झपाट्यानं कमी होतोय, असं म्हटलं असतं. पण मी कादंबरीइतक्या लांबीच्या भल्यामोठ्या फॅनफिक्स वाचण्यात मी अजूनही रात्री खर्ची पाडतेय, त्यामुळे प्रश्न आवाक्याचा नसावा. मला हव्या असलेल्या ठिकाणी (अर्थातच जालावर) मला हव्या असलेल्या रिलेव्हन्ससकट (मला ज्याच्याशी काही नातं सांगता येईल अशा प्रकारे) काही मिळालं तर मी ते वाचीन, एरवी तू म्हणालास तसं जग जवळ आलेलं आहे. बाकी ब्लॉग्स ही खरंच संधी होती का? काही हातांच्या बोटांवर मोजून संपतीलसे अपवाद सोडले तर मराठी ब्लॉगांवर जे काही लिहिलं जातंय ते पाहता मला मराठी ब्लॉग नि मराठी कथा या दोन संज्ञा एका वाक्यात वापरायचीही लाज वाटतेय.

Raj said...

ब्लॉग साहित्याचं एक माध्यम होऊ शकलं असतं हे तितकसं पटत नाही. अगदी जागतिक पातळीवर बघितलं तरी किती ब्लॉग साहित्याला वाहिलेले दिसतात आणि त्यात किती प्रकाशित होण्याइतके यशस्वी होतात? ज्यांच्या ब्लॉगची पुस्तकं निघतात ते बहुतेक
वेळा इतर विषयांवरच असतात. मराठीत मुख्य अडचण आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार ही आहेच. मराठीतील बहुतेक प्रथितयश लेखक ब्लॉगकडे वळलेच नाहीत. (आपण लिहीलेलं लोकांना चक्क फुकट वाचायला द्यायचं?) जे थोडेफार आहेत ते आपण रोज केर काढतो तसे ब्लॉगवर पोस्ट टाकतात. मग कधी वर्तमानपत्रात छापून आलेला लेख इकडे पेस्टवायचा, (पैसे मिळालेत ना, मग हरकत नाही). बरेचदा एखाद्या लेखकाचं पुस्तक आणि ब्लॉग वाचला तर ते सकस लिखाण पुस्तकासाठी राखून ठेवत आहेत असं लक्षात येतं. शिवाय दुसरं म्हणजे कमीत कमी कष्टात काम व्हायला हवं आहे. सध्याच्या मराठी वर्तमानपत्रांच्या ऑनलाइन एडीशन वाचणे म्हणजे छळ असतो. सगळीकडे झैराती भरलेल्या, मजकूर वाट्टेल तसा कोंबलेला, दोन प्यारामध्ये एक स्पेस टाकावी नाहीतर एडीटरच्या मर्जीप्रमाणे कुठेही स्पेस पडते, वाक्ये लोंबकळतात काय वाटेल ते चालू असतं. त्या मानाने ब्लॉवगवरचं एडीटींग सुबक असतं आणि बरेचदा ब्लॉवरचे लेख अधिक काळजीपूर्वक लिहीलेले आढळतात. "भारतात शास्त्रज्ञ नाहीत.." वगैरे कैच्याकै विधानं करायची, संदर्भ द्यायचे नाहीत हे प्रकार वर्तमानपत्रात फार आढळतात.

Meghana Bhuskute said...

राजच्या कमेंटवर विचार केल्यानंतर -
पूर्वी कथा कुठे छापून येत असत संग्रह निघण्याआधी? नियतकालिकांत. नियतकालिकांना कुणीतरी एक संपादक असे. त्याची काहीएक भूमिका असे. त्यानं काही वर्षं काही बरं, वाचायजोगं निवडून छापल्यावर, त्याची पुण्याई जमा होई आणि त्याच्या पुण्याईवर विसंबून त्याच्या नियतकालिकातल्या कथांनाही (कथा म्हणजे कथा असं नाही. वाचायजोगं काहीही) ही पुण्याई चिकटे. जालावर संपादक इल्ले. त्याचे फायदे आहेत ते आहेत. पण तोटेही आहेत - ते म्हणजे अमुक एका ठिकाणी आपलं छापून यावं असं आमिषच नाही. काहीही लिहा, छापलं जाईलच. पैशाचं मरू दे. ते तसेही मराठी साहित्यात कधीच नव्हते. पण ’इथे आलं बॉ छापून’ अशी शेखी स्वत:शीतरी मिरवावी असं ’निवडक’ छापणारा प्लॅटफॉर्मच नाही.
रेरेबद्दल: आपण घाऊक माती खाल्लेली आहे.

Samved said...

मित्रांनो, प्रतिक्रियेवर उत्तर द्यायला अंम्मळ उशीर झालाय. वीकेन्ड-पॅरेन्ट्स असतात तसा मी वीकेन्ड-लेखक(!) झालोय.
मेघना- जुना रंग बघून मला वीट आलाय. लिहिण्यात उजेड आणि ब्लॉग कसले सजवायचे? नीट गाडी रुळावर आल्यावर बघू..मला नाही वाटत कथा फॉर्म म्हणून irrelevent झाली आहे. irrelevent झालाय ते कथेचं बीज असं मला वाटतं. ब्लॉगचा मुद्दा हा या संदर्भात होता. प्रचलित अर्थाचे कोणतेच खर्च नसल्याने कथेबद्दलचे प्रयोग, तिला relevent करण्यासाठी लागणारे विषय, तिच्या नव्या स्वरुपाला पेलु शकणारे लेखक इ इ ब्लॉगवर सहज शक्य होतं. ती संधी आपण जवळ जवळ गमावलीच असं मला म्हणायचं होतं.

राज- वरचा मुद्दा परत उगाळत नाही. पण तुझं साहित्याला वाहीलेले ब्लॉग किती या प्रश्नाचं उत्तर मला तरी माहीत नाही. माझा (उगाच) असा अंदाज आहे की बाहेरची जनता आपल्या मानाने जास्त सक्रिय असावी. तिकडल्या काही भक्तांचे ब्लॉग मी अधेमधे वाचतो पण मग त्यांचे देवही थोर आहेत, शेक्सपिअर न दांटे न काय काय. या चालीवर उद्या कुणी महाभारतावर ब्लॉग सुरु केला तर तुला नाही वाटत की तो थोर आणि साहित्यीक होऊ शकेल म्हणून? निदान शक्यता तरी आहे. आपल्या लेखकांची आर्थिक स्थिती अजूनही तशीच खडतर आहे का रे की त्यांनी फुकट विरुद्ध रॉयल्टी (तेच ते....१२ वर्षात १००० प्रतींच्या २ छापण्या काढल्या राव!) असा विचार करावा? म्हणजे कॅप्टन ध्रुव लिहीणाऱ्या कुण्या लेखक प्रकाश वेदनं असा विचार केला तर मी समजु शकतो रे. स्टेशनावर ज्याम खपतात तशी पुस्तकं...

परत मेघना- हा प्वाईंन्ट पण बरोबर. रे रे चं नाहीच बोललं तर बरं होईल. मी डायरेक्ट भीमराव पांचाळ रचीत जखमा अश्या सुगंधी गायला सुरुवात करेन तर तुला भारी पडेल