भिंतीवरोनी कोणी सरसरोनी वेगे गेले
वसुंधराबाईंनी भेंडी चिरायला घेतली आणि त्यांची जणू तंद्रीच लागली. भेंडीतून निघणारी चिकट तार त्यांनी बोटांच्या दोन टोकांवर पेलली आणि डोळे बारीक करुन त्या तारेकडे बघताना त्यांच्याही नकळत त्यांचं तोंड सताड उघडं पडलं. शेंबडी भेंडी बघत त्या कितीही वेळ उभ्या राहु शकल्या असत्या, त्यांना दिवसभरात विशेष असं काही काम नसतं. पण समाधीच्या अवस्थेत देखिल त्यांना ’चकचक’ असा आवाज ऎकु आला आणि डोळ्यात अचानक उगवलेली भिती दाबत त्यांनी चौकसपणे स्वयंपाकघरातल्या सगळ्या भिंती निरखुन पाहील्या. ट्युबलाईटवर काळसर चिकटा आला होता, ऑईलपेन्ट लावलेल्या भिंतीवर खरवडलेल्या कोळ्याच्या जाळ्यांचे व्रण ताजेच होते, एक्सॉस्ट फॅनभोवती काळ्यांचे धुळकट कोष नीटसपणे गोळा झाले होते, माळ्यावरच्या तांब्यांच्या भांड्यांवर हिरवट शेवाळं पसरलं होतं, सगळं कसं गेलं कित्येक वर्षं होतं तस्संच होतं पण तो आवाज मात्र नवा होता. पाहाणीच्या दुसऱ्या फेरीत मात्र ट्युबलाईटच्या पातळ पट्टीमागे त्यांना अचानक ’ती’ दिसली- स्तब्ध, भावनाहीन मण्यांसारखे डोळे, आटवलेल्या दुधई रंगात न्हाऊन काढलेली, हातातल्या निबर भेंडीएवढ्याच आकाराची-किळसवाणी पाल. हातातली भेंडी...