भिंतीवरोनी कोणी सरसरोनी वेगे गेले


वसुंधराबाईंनी भेंडी चिरायला घेतली आणि त्यांची जणू तंद्रीच लागली. भेंडीतून निघणारी चिकट तार त्यांनी बोटांच्या दोन टोकांवर पेलली आणि डोळे बारीक करुन त्या तारेकडे बघताना त्यांच्याही नकळत त्यांचं तोंड सताड उघडं पडलं. शेंबडी भेंडी बघत त्या कितीही वेळ उभ्या राहु शकल्या असत्या, त्यांना दिवसभरात विशेष असं काही काम नसतं. पण समाधीच्या अवस्थेत देखिल त्यांना ’चकचक’ असा आवाज ऎकु आला आणि डोळ्यात अचानक उगवलेली भिती दाबत त्यांनी चौकसपणे स्वयंपाकघरातल्या सगळ्या भिंती निरखुन पाहील्या. ट्युबलाईटवर काळसर चिकटा आला होता, ऑईलपेन्ट लावलेल्या भिंतीवर खरवडलेल्या कोळ्याच्या जाळ्यांचे व्रण ताजेच होते, एक्सॉस्ट फॅनभोवती काळ्यांचे धुळकट कोष नीटसपणे गोळा झाले होते, माळ्यावरच्या तांब्यांच्या भांड्यांवर हिरवट शेवाळं पसरलं होतं, सगळं कसं गेलं कित्येक वर्षं होतं तस्संच होतं पण तो आवाज मात्र नवा होता. पाहाणीच्या दुसऱ्या फेरीत मात्र ट्युबलाईटच्या पातळ पट्टीमागे त्यांना अचानक ’ती’ दिसली- स्तब्ध, भावनाहीन मण्यांसारखे डोळे, आटवलेल्या दुधई रंगात न्हाऊन काढलेली, हातातल्या निबर भेंडीएवढ्याच आकाराची-किळसवाणी पाल. हातातली भेंडी टाकून वसुंधराबाई तश्याच स्वयंपाकघराबाहेर पळाल्या. त्या किंचाळल्याही असतील पण त्यांना ते ऎकु आलं नाही. पलीकडच्या खोलीत बिछान्यात रुजलेल्या रंगरावांनाही ती ऎकु गेली असेल-नसेल पण त्यांना ते सांगता येणं अशक्य होतं.
रंगराव गेला महिनाभर अंथरुणाला खिळून होते. अर्धांगवायुनं त्यांची अवस्था मेंदूतून सळई खुपसलेल्या बकऱ्यासारखी झाली होती. बुबुळांवर आकार उमटायचे पण त्यांना नाव नसायचं, कानांवर आवाज आदळायचे आणि समुद्राच्या वांझोट्या लाटांसारखे विरुन जायचे. गटाराच्या कडेला वाढणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांसारखी रंगरावांची निव्वळ जैविक वाढ तेव्हढी सुरु होती.

ठीक होते तेव्हा रंगराव वकिली करायचे, धो धो नसली तरी त्यांची वकिली बरी चालायची. शिवाय पुर्वापार चालत आलेली शेती होती. थोडक्यात चतकोर आकाराच्या शहरात त्यांचं बरं चाललं होतं. अचानक त्यांची अवस्था अशी पाचोळल्यागत झाली आणि ते जणु बिछान्यावर रुजूनच गेले. त्यांचं असं झाल्यानं बाहेरची कामं करायला आताशा शेतीवरचे गडी यायचे, त्यामुळे वसुंधराबाईंच्या आयुष्यात अशी फार काही मोठी उलथापालथ झाली नव्हती. पण आजच्या सारखा प्रसंग ओढावला तर काय करायचं हे मात्र त्यांना उमगत नव्हतं.

औषधांसोबतच रक्ताभिसरण सुधरण्यासाठी रंगरावांना मालिश करा असं डॉक्टरांनी सांगीतल्यावर कुणी तरी वसुंधराबाईंना सुध्याचं नाव सांगीतलं. सुध्या मुकाट मानेनं बंगल्यातल्या आतल्या खोलीत जायचा आणि रंगरावांना तास-दोन तास मळून आला तसाच वापस जायचा. वसुंधराबाईंनी त्याला कधी धडसा बघितलाही नव्हता. आणि आज

...हातातली भेंडी टाकून वसुंधराबाई तश्याच स्वयंपाकघराबाहेर पळाल्या.

रंगरावांच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. सावळ्या रंगाचा सुध्या एकाग्रतेने रंगरावांच्या अस्ताव्यस्त देहावरुन तेलाने माखलेले हात सटासट फिरवत होता. रंगरावांच्या जवळजवळ निर्वस्त्र देहात आज कोणतीही शरम नव्हती. वसुंधराबाई भिती विसरुन नव्या कुतुहलानं रंगरावांना बघत राहील्या. त्यांचं लग्न झाले तेव्हा त्यांनी सव्वीशी ओलांडली होती आणि रंगराव त्यांच्याहून चांगले दहा वर्षांनी मोठे होते. त्या नात्याच्या घडणावळीतच एक जूनपणा भरला होता. त्यात रंगरावांना शरीराचं म्हणून आकर्षण असं कधी वाटलंच नाही, होती ती नागवेपणाची भिती. लग्नानंतरचे थोडक्यातले शृंगार घुसमटलेल्या कपड्यांआडून काळोखात कसेबसे पार पडायचे. आणि आज, तब्बल सातेक वर्षांनी, वसुंधराबाई रंगरावांचा संवेदनाहीन अनावृत्त देह निःसंकोचपणे न्याहाळत होत्या. त्या बेडौल शरीरावर एखाद्या कुशल वादकासारखी सुध्याची बोटं तालबद्ध फिरत होती. रंगरावांच्या बोंगाळलेल्या शरीरापुढे सुध्या आखीवरेखीव दिसत होता. शरीरपणाचे सारे मायने तरुणपणाभोवती फिरत असतात. वसुंधराबाई नव्या कुतुहलानं सुध्याकडे बघायला लागल्या. सुध्याच्या काळ्यासावळ्या अंगावर बोटभरदेखिल अगोचर चरबी नव्हती. जमिनीतून उगवल्यागत त्याच्या पायांनी त्याचं शरीर भक्कमपणे पेललं होतं. वसुंधराबाईं अधाशी नजरेनं सुध्याकडे बघत राहील्या. आपल्याच शरीराच्या हाका त्यांना नव्याने ऎकु आल्या, कदाचित प्रथमच. वासनांचे लसलसते कोंभ त्वचेतून बाहेर पडतील की काय या भितीनं त्या घाईघाईनं परत फिरल्या.

अंमळ उशीरानंच डोळा लागल्यानं वसुंधराबाईंची सकाळही उशीराच झाली. डोळ्यात स्वप्नांची कसलीशी गुणगुण घेऊन त्यांनी सुध्यासाठी दार उघडुन ठेवलं आणि बाथरुमच्या उबदार वातावरणात त्या शिरल्या. ’चकचक’ परत तोच आवाज ऎकु आला, स्पष्टच, या वेळी जरा जवळुन. मोठ्या कुतुहलानं त्यांच्याकडे पाहात ती पाल कोपऱ्यातल्या साडीच्या घडीवर उभी होती. समोरच्या दोन पावलांवर किंचीत उभं ठाकल्यासारख्या आवेशात ती पुढची दिशा ठरवत होती. तिच्या पाठीवर टरारुन फुगलेला मणका नुस्ता दुधई नव्हता, तर त्यावर काहीसे काळसर डागही होते. वसुंधराबाईंच्या घशाला कोरड पडली. क्षणभर ती पाल सरसरली तत्क्षणी वसुंधराबाईंनी जीवाच्या आकांतानी बाहेर धाव घेतली. कदाचित त्या ओरडल्याही असतील. नाही तर सुध्याचं नेमकं त्यावेळी तिथं असणं हा एक फडतुस योगायोग असता.

सुध्यानं लवलवत्या पालीवर भांडंभर गरम पाणी ओतलं तशी ती पुतळ्यासारखी जागीच गोठून गेली. मोठ्या शुरपणे मग त्यानं ती उचलून खिडकीबाहेर बागेत टाकली. वसुंधराबाईंनी शक्यतांना उन्मादांचे पाय लावले. मोठ्या हिंमतीनं त्यांनी अंगावरची वस्त्रमग्न शरम दूर केली. सुध्या गळ्यात अडलेला आवंढा गिळून वसुंधराबाईंना बघत होता. वयानं लहान असला तरी पुरुष होता तो. वसुंधराबाईंनी पुढाकार घेऊन सुध्याला जवळ ओढला तसा तो त्यांच्या शरीराच्या धगीत मवाळपणे वितळत गेला. हातांनी एकेक अंग चाचपताना वसुंधराबाईंनी हलकेच सुध्याच्या अंगावरचे कपडे दूर केले. उघड्या डोळ्यांनी त्यांना एक पुरुष बघायचा होता. सुध्याच्या अनावृत्त शरीराला बघताना नकळत वसुंधराबाईंच्या तोंडून अस्फुट किंकाळी निघाली. त्याच्या काळ्या सावळ्या अंगावर चांदणं पडावं तसे डाग होते, आटवलेल्या दुधई रंगाचे- पालीसारखे लांबडे. त्याचे वळवळणारे हात, डोळ्यातलं भिरभिरेपण सारंच कसं पाली सारखं...लिबलिबीत.... विलक्षण किळस येऊन त्यांनी सुध्याला दूर ढकललं. किती तरी वेळ अंगावर, पाठीवर, मांड्य़ांवर, चेहऱ्यावर सर्वत्र उमटलेले स्पर्श पुसण्याचे त्या निकराने प्रयत्न करत राहील्या.

कसबसे कपडे चढवून त्या रंगरावांच्या खोलीत पोचल्या. नुक्त्याच बागेत टाकलेल्या पालीसारखे रंगराव पलंगावर निश्चल पडले होते.

घरभर पालींच्या "चकचक" आवाजाचा नुसता कोलाहल माजला होता.

Comments

आवडली. पण पेठेबाई काही डोक्यातून गेल्या नाहीत. कदाचित माझ्या कोर्‍या नसलेल्या पाटीचाही दोष असेल. शिवाय पहिलाच खर्डा प्रकाशित केला आहेस असंही वाटत राहिलं. त्यात कितीतरी जागा आहेत अजून. पत्रातून सविस्तर लिहिते.
Samved said…
धन्यवाद! पेठेबाईंचा संदर्भ कळाला नाही? पहीला खर्डा....हंहंहंहं (इंग्रजीमधेच बरं वाटतं हे!). थोडंसं खरं आहे. पण जो काही कचरा अडकलाय लिखाण प्रक्रियेत, तो निघणं जास्तं महत्वाचं नाही का? हो, मी परत वाचायलाही सुरुवात केली बरं का :)
पत्राची वाट बघतोय (संपादकांचं पत्र ते!! कासाविस व्हायलाच होणार)