माया आणि कबीरची रेल्वेयात्रा
॥ १ ॥
आमचा जायाचा दिवस आला तसा आज्जीचा गोंधल जबरदस्त वाढलाय. तिनं सकाल पासून चार वेला बॅगा उघडल्या-पॅक केल्या शेवटी शुभादि बोल्ली की आता निघे पर्यंत बॅगा उघड्याच राहु दे. आबांचं वेगलंच अस्तं. ते गेलेत कबिरला घेऊन मार्केटात. मला तर मज्जाच वाटतै आणि भितीपण. मी, कबीर आणि शुभादि...तिघं एकटेच जाणार जम्मुपर्यंत! म्हंजे कसं नां की मी मोठ्ठी आहे, फोर्थमधे, पण कबीर अजून फर्स्टमधेच आहे आणि शुभादि कॉलेजात जाते पण तिला जम्मु कुठं माहीतै? म्हंजे सगल्यांना लीड मलाच करायचं...म्हंजे हे
असं झालंच नस्तं पण मध्येच बाबा आजारी पडला आणि आईला घाईघाईनं विमानानं जावं लागलं, म्हंजे आज्जी बोल्लीच, गेली पोर्गी उडत आणि आता आम्ही जाणार झुक झुक झुक करत २-३ दिवसात..जम्मुला. सगले लोक उनांत समर वॅकेशनला जम्मुला येतात आणि आम्ही जम्मुहून कोल्लापुरात आलो. पण आबाज्जी कडे खुप मज्जा येते. आंबे, भेल, मिसल...कबीरनं मामाबरोबर जाऊन चोरुन नॉनव्हेजपण खाल्लं, मी पण, शुभादि आणि आबांनीपण...आज्जीसोडून सगल्यांनी. आणि काय काय गिफ्ट...मामीनं लाकडाचा खेलायचा कम्प्लीट सेट दिलाय, त्यात ज्युली नावाची जाडी बार्बी पण आहे (आज्जी तिला ठकी म्हण्ते), आबांनी कब्याला लाकडाचा बेब्लेड आणलाय आणि हो....बाईज्जीनं मला एक साडी आण्लीऎ. पण ती आई कधी कधी घालते तशी लुंगीसारखी नाहै, ती पॅन्ट सारखी घालता येते. बाईज्जी..म्हंजे आईच्या आईची आई! ती पण अशीच साडी घालते. ती खुप ओल्ड आहे आणि सारखी झोपून
असते पण तिला खुप गोष्टी येतात. मी आणि कब्ब्या रोज रात्री तिच्याकडून गोष्ट ऎकतो. तिची स्कीन एकद्म झोलायला लाग्लीऎ आणि गोष्ट सांगताना ती सारखी आमच्या डोक्यावरुन हात फिरवते मग तिच्या चष्म्यावर आतून फॉग येतो. आई गावाला जाताना तिला भेटून खुप रडली. का?
॥ २ ॥
आबा आम्हाला स्टेशनावर दोन तास आधीच घेऊन आले. आज्जी वैतागुन बोल्ली आबा नेहमीच असं करतात. पण आबा आज्जीवर कधीच वर्डत नाहीत कारण आज्जी आबांहून थोडी उंच आहे. आज्जी इतकी उंच आहे की तिला चप्पलपण शिवून घ्यावी लागते. कोल्लापुरातले लोक खुप भेल खातात, शुभादि स्टेशनावरपण भेल खातै. आज्जी बोल्ली चुरमुऱ्याच्या ढिगाऱ्यात ती एक दिवस हरवणार. मज्जाचै. मी काऊन्ट केलं, शुभादिनं दोन प्लेटा भेल खाल्ल्या आणि अजून दोन प्लेटा पार्सलपण आण्लं. तिच्या केसांमधे स्टारसारखे चुर्मुरे चिकटले होते, मज्जा.
इतक्या लांब शुभादि आम्हाला एकटीच घेऊन जाणार म्हणजे ती बाबापेक्षा शुर असणार. ती पण तिच्या कॉलेजच्या सैन्यात आहे, त्याला एन्शीशी म्हणतात.
खुप वेलानं आमची गाडी आली. आबा, मामी आणि शुभादीनं आमचं सामान डब्यात नेऊन ठेवलं. आबांनी सेव्हन्थ टाईम बॅगा मोजल्या आणि आज्जीनं पोरांना नीट घेऊन जा असं टेन्थ टाईम सांगीतलं. कबीर वरच्या बर्थवरुन सारखं जै हन्मान उडी मारत होता आणि
त्याला एकद्म जग्गी अंकल दिसले. जग्गी अंकल बाबाच्याच युनीटमधे आहेत. त्यांच्या सोबत जस्लीन आंटी आणि बोबोपण होता. मग काय मज्जा. जग्गी अंकल आबांशी येऊन बोल्ले तितक्या वेलात बोबो त्याची ब्याग घेऊन आमच्या बर्थवर येऊन पण गेला. बोबो माझ्याच स्कुलमधे थर्डस्टॅन्डर्डमधे आहे पण तो माझ्याहून उंच आहे. आणि त्याच्यावर त्याचा छोटासा झुट्टु. तो नेहमी त्याच्या शर्टाच्या रंगाला म्याचींग असतो, आज ग्रीन! मग मी जस्लीन आंटी सोबत आज्जीकडे गेले. आज्जी तिच्या डेन्जर हिंदीत आंटीशी बोलत होती आणि मग आमच्या गाडीची मोठ्ठी शिट्टी वाजली. आज्जीनं मला घट्ट मिठी मारली, तिच्या चष्यावरपण बाईज्जीसारखाच फॉग आला होता. मला कलेचना, माझ्या डोल्यावरपण कुठून ओला ओला फॉग आला
॥ ३ ॥
मी, कब्बा आणि बोबो वरच्या बर्थवर स्नेकलॅडर खेलत बसलो. कब्ब्याला टेनच्या पुढे काऊंटीग येत नसल्यानं त्याचं पॉनपण मलाच हलवावं लागतं. त्याला साप चावला की तो उगीच जोरात रडतो. मग मी, बोबो त्याला साप चावावूच देत नै! आमच्या समोरच्या बर्थवर एक काका बसलेत. ते म्हणाले त्यांना पण खेलायचय. शुभादिनं त्यांना बघून नमस्ते केलं आणि आम्हाला हलुच म्हणाली की ते खुप मोठे पंडीत आहेत. नागपुरला बाबाच्या घरीपण पंडीत येतो. तो कचोरी मस्त करतो. म्हणून मी काकांना विचारलं की त्यांना काय बनवता येतं तर ते मोठ्या आवाजात हसले. मला तर एकदम खुप साऱ्या घंटा वाजल्यासारखं वाटलं. मग जग्गी
अंकल आणि आंटी आले, त्यांनी पण पंडीतना नमस्ते केलं. हे नक्कीच मास्टरशेफ असणार. मग त्यांनी माझं नाव विचारलं. ’माया’ बोल्ल्यावर ते बोल्ले ’खुप छान नाव’. त्यांनी मग कबीरचं नाव विचारलं. मग त्यांनी डोले मिटले आणि ते गायलाच लागले "माया महा ठगनी हम जानी, कहे कबीर सुनो भई साधो, यह सब अकथ कहानी" परत एकदा खुप साऱ्या घंटा वाजल्या.....म्हंजे ते गाणारे पंडीतजी होते....आणि त्यांनी आमच्यावर लगेच गाणं पण बनवलं!! मज्जा! बोबो थोडा नाराज झाला की त्याचं नाव गाण्यात का नाही पण मग पंडीतजी बोल्ले की तो आमचा भई म्हण्जे भाऊ आहे आणि त्याचं नाव सुद्धा गाण्यात आहे...आमचं गाणं ऎकायला डब्यातले खुप लोक जमा झाले होते आणि सगल्यांनी पंडितजींना नमस्ते केलं. मला तर फक्त पिक्चरची गाणी आवडतात (आणि नाचायलापण) पण या पंडितजींनी आत्ता बोल्लेलं गाणं एक्दम मस्त होतं. नंतर कबीर त्यांच्या पार्टीत गेला आणि त्यांना गाणं सांगत बसला. बोबो खेलता खेलता झोपून गेला आणि गाडीतल्या ब्ल्यु लाईटमधे पंडितजींच छोट्या आवाजातलं गाणं एंजल सारखं हलुहलु उडायला लागलं.
॥ ४ ॥
च्या गर्म च्या....कापी कापी कापी...... आबा डोले उघडले की चहा मागतात आणि ते आज्जीला "च....हा...." असा आवाज देतात. पण आबा आत्ता च्या च्या कापी कापी का बोलत होते? मी उठून बसले आणि कललं की मी रेल्वेत है. शुभादिच्या बाजूला कब्या अजूनपण झोपला होता. बाईज्जीच्या गोष्टीत कुंभकर्ण होता तसा...शुभादि स्टॅच्यु केल्यासारखी बस्ली होती. मला बघून ती हसली. शुभादि हसली की खुप सुंदरच दिसते, अगदी आईसारखी.
कधीकधी काही नाही केलं की खुप मज्जा येते. सीटवरुन डोकं खाली सोडून थंड थंड खिडकीला पाय लावून लोलायला भारी वाटतं. शुभादिनंपण तसंच लोलून घेतलं आणि तिचा फेवरेट क्वश्चन केला ’माया मेमसाब, झोप हुआ क्या? कैसा हुआ?’ कधीकधी काही नाही केलं तरी हसु येतं... आम्ही मग ब्रश करायला गेलो. बेसिनच्या पाण्याला, माझ्या अंगाला, शुभादिच्या हातांना वेगलाच वास येत होता. ’लोखंडाचा’ शुभादि म्हणाली. मी सांगीतलं ’नाही नाही, रेल्वेचा’.
आम्ही मग कापी घेतली. ’बिस्कीट’? विचारायच्या आधीच शुभादिनं चार पुडे काढले. ’मारी’ ? ’नको, ते आजारी लोकांचं बिस्कीटै’, ’मोनॅको’? ’नको, दुधात मीठ घातलं की दुध नास्तं असं बोल्ली आज्जी, मला पार्लेजी दे’. शुभादि म्हणाली कापीत बिस्कीट बुडवणं क्रिमिनल असतं. माझ्या कापीत एका क्रिमिनल बुडूनच गेला मग मी दुसरा क्रिमिनल पाठवला. कापी संपल्यावर शुभादिनं क्रिमिनलचा चिखल अस्सा बोटांनी जमा करुन खायला शिकवला...
॥ ५ ॥
कबीर झोपेतून उठला की खुपवेल बोलतच नाही. त्याची स्टायलै ती. तो हात-पाय सगले पोटावर जमा करुन ठेवतो, शुभादि त्याला मग मांजर म्हण्ते. बोबो मस्त पिवल्या फुलाच्या नाईटड्रेसमधे चालत चालत आला (जग्गी अंकलचापण नाईटसुट सेमटूसेम होता). मग कबीरशेट नीटच जागा झाला. बोर्नविटा पिताना त्यानं पण दोन-तीन क्रिमिनलचा चिखल केला मग त्याला एक्दम पंडितजी आठवले, ’गानं अंकल कुठं गेले’? असं त्यानं दोनदा विचाऱल्यावर शुभादिनं ते रात्रीच उतरुन गेले असं सांगीतलं. कबीर खत्रा बोबडं बोलतो. त्याला र, ड, ल बोल्ताच येत नाही...’ल’? - ’ल’, कल्लं नां? हां! मग तो डोले मिटून मांडी घालून बसला आणि बोर्नविटाचा डब्बा बोबोला दिला. एक हात कानावर ठेवून त्यानं एक्दम पंडितजींसारखं गाणंच सुरु केलं आणि बोबोनं तबला! मज्जा, मला तर खुप हसु आलं पण शुभादिनं माझं तोंड गच्च दाबून ठेवलं. कब्या जोरजोरात ’आ..आ...सा...ले..गा..मा’ असं कायच्या काय ओरडत होता. थोड्यावेलानं एक्दम तो खत्रा ’आ आ आ’ करत वर्डाय्लाच लाग्ला आणि उड्यापण मारायला लागला. त्याच्या सोबत तबला घेऊन बोबोपण उड्या मारायला लागला.
शुभादिला कलेचना की तो असं का करतोय मग कब्या बोल्ला ’झुलंल- झुलंल’... सीटच्या टोकाला मिशी हलवंत एक झुरल आमच्याकडं बघत होतं. बोबोनं उडी थांबवली आणि ’जै हन्मान’ बोलत त्यानं तबला झुललावर फेकला. झुलंल पलालं- बोबो पण पलाला. पाच मीन्टं नुस्ती रेस...बोबो मिशीला धरुन मग झुलंलची मेलेली डेड्बॉडी घेऊनच आला. आमची एन्शीशी डोल्यासमोर डेन्जर झुलंल बघून घाबरलीच. बोबो आणि कबीरचा बॅन्ड परत सुरु झाला पण त्यांना आता सालेगामाचा कंटाला आला म्हणून ते बल्ले बल्ले बोलत होते. शुभादिनं हलुच कब्याला दुसऱ्या सीटावरचं झुलंल दाखवलं, ती बोल्ली की तो मेलेल्या झुलंलाचा आत्मा है आणि आता तो बोबोचा बदला घेणारै. बोबो खुप घाबलला. त्याच्या गल्यात बाप्पाचं लॉकेट होतं, ते धरुन तो सारखं त्या झुलंलाला ’भाग जा’ म्हणत होतं. झुलंल तर नाही गेलं पण बोबो घाबरुन पलून गेला
॥ ६ ॥
आम्हाला खुप कंटाला आला म्हणून आम्ही बोबोच्या सीटवर गेलो. आम्हाला तिथंपण खुप कंटाला आला म्हणून आम्ही आंटींना खायला मागितलं. आमच्या सीटच्या बाजुच्या सीटवर एक छोटी मुलगी तिच्या आईसोबत बसली होती. ती अग्गो बाई मधल्या ’नाक नकटं-डोले मोठ्ठे’ सारखी दिसत होती. ती मस्त चिक्कु खात होती आणि आम्ही चिपा (असं आई म्हणते...). मी तिला थोड्या चिपा दिल्या, त्या तिनं लगेच खाल्या. मग तिला रडत रडत तिच्या आईनं भात खाऊ घातला. मी तिला अजून थोड्या चिपा दिल्या, त्या
त्या तिनं लगेच खाल्या. मग तिला रडत रडत तिच्या आईनं भात खाऊ घातला. मी तिला अजून थोड्या चिपा दिल्या, त्या तिनं लगेच खाल्या. तिच्या आईनं मग तिला टमाटा सुप घेऊन दिलं, त्याच्या सोबत मी तिला थोड्या चिपा पुन्हा दिल्या, त्या तिनं लगेच खाल्या. थोड्या वेलानं ती तिच्या आईच्या प्लेटातून समोसा खायला लागली. तिला तिखट लागल्यावर बोबोनं तिला गुडदाणी दिली. बोबोनं मला हलुच विचारलं, ’तो खुप खुप खाणारा राक्षस कोण’? मी बोल्ले-’बकासुर’. लगेच बोबो म्हणाला मग आता हिचं नाव ’बकी’.
कुठं तरी गाडी थांबल्यावर जग्गी अंकल आमच्या साठी मॅजिक पेन घेऊन आले. तो छान काठीसारखा लांब है आणि त्यानं दोन्ही बाजूंनी लिहिता येतं. बोबो बकी समोर उबं राहून बोल्ला ’मॅजिक देखो मेरा, हसेगा चेहरा तेरा’. मग त्यानं पेन मागं लपवला, वन-टू-थ्री केलं आणि पेन मधून वाकवून हाफच केला. ह्यॅ, काय पण, साधा फोल्डींग पेन होता, त्यात काय मॅजिक? पण बकी ला
मॅजिक खुप आवडलं. तिनं टाल्या वाजवून ’मॅजिक मॅजिक’ असा ओरडा केला. बोबोची असं काही करताना खुपदा फजिती होते. पण बकी ला मज्जा आली. मग तिनं बोबोच्या हातातून पेन घेतला आणि कड्कन मधून मोडला आणि बोल्ली ’पलत मॅजिक कल, पलत मॅजिक कल’ !!. बोबो पेनचे दोन टुकडे घेऊन जोरात रडायलाच लागला!
मला माझा पेन बोबोला देताना आधी रडु आलं पण नंतर खुप मस्त वाटलं. कुणाला काही दिलं की कधी कधी मस्त वाटतं...
जस्लीन आंटीनं मला जवल घेऊन माझे खुप लाड केले. मला एक्दम आईची आठवण आली. आईची आठवण आली की पोटात खोल खोल अंधार पडतो...
॥ ७ ॥
मला रडू आलं की शुभादिला लगेच कलतं. ती म्हणाली मग आम्ही चित्र काढत बसलो. कबीरनं बाबाचं बंदुक घेतलेलं चित्र काढलं आणि मी आईचं. बोबो खुप छान चित्र काढतो, त्यानं उडता सुपरमॅन काढला. मग मी बोल्ले की आता तू पण चित्र काढ. तिनं आधी कबीरच्या चित्रात एक चिमणी काढली. ती मस्त बंदुकीच्या टोकावर बसली होती. मग तीच चिमणी तिनं माझ्या चित्रात आईच्या डोक्यावर बसलेली काढली. आई एक्दमच क्युट दिसायलाग्ली. बोबो बोल्ला की सुपरमॅन चिमणीपेक्षा फास्ट असतो म्हणून चिमणी त्याच्या अंगावर बसूच नाय शकत. पण शुभादि एक्दम भारी है. तिनं सुपरमॅनच्या उडणाऱ्या केपला पकडून उडणाऱ्या खुप साऱ्या चिमण्या काढल्या. म्हंजे आता चिमण्याच सुपरमॅनला उचलुन उडत होत्या! मज्जा...
मग आम्ही फोनवर गाणं लावून नाचलो. माझी डान्स टीचर सारखी बोल्ते वेन ह्यॅप्पी- डॅन्स, वेन सॅड- डॅन्स. पण मग आमची बॅटरीच खतम झाली. फुस्स्स..मला आता खुपच सॅड वाटलं, असं वाटलं की ही गाडी फुडे जातच नै. आणि आपण आई-बाबांना कधीच भेटणार नै. मला रडू आलं की शुभादिला लगेच कलतं. शुभादि बोल्ली गोष्ट सांगते, लच्छीची. लच्छी? असं काय नाव असतं का? पण गोष्ट एकदम भारी. माझ्यासारखंच नाचणारी मुलगी असते, तिला मोर भेटतो, मग दोघं मिलून नाचतात...मग शुभादी म्हणाली की नंतर मोर नाही आला तरी पण ती लच्छी नाचतच राहाते. ती काही तरी वेगलंच बोलते, म्हणाली की ’बॅटरी खतम झाली तरी चाल्तं, आपण नाचत राहायचं, आपणंच मोर व्हायचं म्हंजे कुणाची वाट बघायचं कामच नाही. पण आपल्याला सगलंच कुटं होता येतं? वाट पाहात आपणच मोर होतो’ आणि मग ती वेगलंच हस्ली.
शुभादिला रडू आलं की मला लगेच कलतं.
॥ ९ ॥
बगं, मी बोल्ले ना की ही गाडी फुडे जातच नै. रात्रीतून गाडी एक्दम स्टॅच्यु केल्यासारखी फ्रीझ! जग्गी अंकल बोल्ले की काहीतरी तकनिकी खराबी आली आणि दुसऱ्या स्टेशनवरुन नवीन इंजन येईपर्यंत आमची गाडी याच स्टेशनावर फुस्स्स्स. मला जोराचं रडू आलं पण तेव्हढ्यात जग्गी अंकल बोल्ले की खाली उतरुन स्टेशनमधे खेला, ते काय तरी बोलून आमची गाडी पट्कन सुरु करतील.
हे स्टेशनतर टॉय स्टेशनसारखं छोटं होतं, मी, बोबो आणि कबीरनं पलायची रनिंग रेस लावली तर आम्हाला साधे २ मिनीटपण नाय लाग्ले...तिथं एक मस्त चमकणारं मशिन होतं. जस्लिन आंटी बोल्ल्या की ते वजनाचं मशिन आहे. आधी कब्यानं पैसे टाकले, फुस्स्स...काहीच नाही झालं मग बोबोनं ट्राय मारला तरी पण
स्वप्नात मी घोड्यावरुन आई-बाबाकडे जात होते आणि घोड्याच्या तोंडातून रेल्वेसारखा कू.. कू...असा आवाज येत होता....
काय नै झालं. मग मी उभं राहून पैसे टाकले तेव्हाचं या दोघांनी मशिनवर जंप मारली...हा हा...खुप सारे लाईट चमकले आणि आतलं चक्रपण फिरलं आणि एक छोटं तिकीट बाहेर आलं. त्यावर लिहीलं होतं वजन: ४७ किलो. या दुष्ट लोकांमुलं माझं वजन ४७ किलो आलं! मला फक्त माझं वजन करुन बघायचं होतं पण कब्या ऎकायलाच तयार नव्हता मग मी एक फाईट दिली, तो रडत शुभादीकडं चाल्ला म्हणून मी त्याला पकडायला त्याच्यावर जंप मारली आणि बोबोनं माझ्यावर. आम्ही पाच मिनीटं खुपच कल्ला केला. तेव्हढ्यात तिकडून एक चिडके दिसणारे काका आमच्यावर वर्डतच आले. बाहर दंगा-अंदर दंगा असं कायसं बोलत ते शुभादिला रागावलेच. मग आम्ही परत डब्यात चढून बसलो. शुभादिनं माझ्या हातातलं वजनच तिकीट घेतलं आणि बाजू पलटून माझ्या हातात देत बोल्ली ’पढो माया मेमसाब’. खुप घाण हॅन्डरायटींग मधे छापलं होतं "आज का भविष्य: आपके प्रियजनोंसे मुलाकात होने का अवसर"
॥ १० ॥
शुभादिनं हलुच हलवलं आणि बोल्ली ’चलो माया मेमसाब’. मला तर झोपेत काहीच कललं नाही. जग्गी अंकलनी आमचं सामान स्टेशनवर ठेवलं होतं आणि बोबो जस्लिन आंटीच्या कडेवर झोपला होता. शुभादिनं कब्याला कडेवर घेतलं होतं. मला तर भितीच वाटली म्हणून मी बोल्ले ’आपली गाडी? जम्मु?? आई बाबा???’ शुभादि बोल्ली की बाहेर एका गावात ब्लास्ट झाला म्हणून आमची गाडी रात्रभर थांबवली होती. पलीकडून काल आमच्यावर वरडलेले काका आमच्याकडंच आले. शुभादि बोल्ली की आता आपण त्यांच्याकडे राहाणार...डेन्जर....पण ते आमचं सामान स्टेशनबाहेर ठेवून चाल्ले गेले. पण ते परत आले आणि आम्हाला सगल्यांना चहा देऊन गेले. ते आज खुपच चांगले वाग्ले...
बोबोनं लांबून येणाऱ्या दोन गाड्या बघितल्या आणि बोल्ला की त्या मिल्ट्रीच्या जिप्सी गाड्या आहेत. बोबोला गाड्या खुप आवडतात, तो मोठा झाला की गराजचा बिजनेस करणारै, त्याच्या मामासारखा. पण इथे त्या गाड्यांची इतकी धूल होती की जिप्सीफिप्सी नुस्तं बंडल, बोबो उगीच फेकतोय हे मला कलालं. पण खलंच दोन जिप्सी आमच्या इथे आल्या आणि त्यातून दोन जवान येऊन जग्गी अंकलला सॅल्युट करुन काही तरी बोल्ले. पण मग जादुच झाली. धुलीतून आई-बाबा हसत हसत येताना दिस्ले. ’माया मेमसाब, आज का भविष्य: आपके प्रियजनोंसे मुलाकात होने का अवसर....लक्षात आहे नां?’ हलुच शुभादि माझ्या कानात बोल्ली.... हुर्रे हुर्रे....रस्त्यात प्रॉब्लेम झाला असं जग्गी अंकलनी काल रात्री सांगीतल्यावर आई-बाबा आम्हाला न्यायला इथे आले होते! हुर्रे हुर्रे....कबीर पलत जाऊन आईच्या कडेवर बसला होता आणि बाबानं मला मस्त हवेत उंच उडवलं होतं...
गाडीतून जाताना मी आमच्या रेल्वेला बाय केलं आणि कब्या आणि बोबो सोबत जोरात ओरडलो ’हस्ता ला विस्ता’
Comments
बाकी सगळं एकत्र टाकलं आहेस ते ठीकच. सोयीचं आहे वाचणं.
प्रत्युषला सांग की खूप खूप आवडलय.
http://sharmilacollectingmoments.blogspot.in/