पांढऱ्या पायांची काळी मांजर

लोक कधी ही येऊ शकतात. लेकवी (ढ लोकांसाठी: लेखक + कवी = लेकवी) रिकामा असला तरी त्याला आपण उपलब्ध नाहीत सांगायला आवडतं. त्यामुळं आता दार उघडून लेकवी नुक्तेच सुक्ष्मात गेले असं विक्षिप्त उत्तर द्यावं की काय या विचारात असताना दुसऱ्यांदा दारावर टकटक झाली. खरं तर ही अशी सुर्य वितळत असतानाची वेळ म्हणजे व्याकूळ होऊन हातांना शब्दांचं सहावं बोट फुटण्याची वेळ. पण नेमकी लेकवीची दर्दभऱ्या गजलांची सीडी गेले दोन दिवस खरखरत असल्यानं त्याला पुरेसं व्याकूळ होता येत नव्हतं. त्याच्या कुठल्यातरी टेकी फ्याननं सांगीतल्याप्रमाणं त्यानं ती सर्फ मधे बुडवून उन्हात वाळत टाकली होती पण त्या गायकाचा गळा म्हणावा तितका अजून साफ झाला नव्हता. थोडक्यात ऎन संध्याकाळचा लेकवी चक्क मोकळा होता आणि आता तीच ती टकटक परत...

साशंक नजरेनं लेकवीनं दार किलंकिलं करुन बघितलं, पण बाहेर कुणीच नव्हतं. लेकवी ऑलमोस्ट अश्रद्धेय असल्यानं त्याचा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण उगाच धोका नको म्हणून त्यानं ’श्रीराम’ म्हणत सुस्कारा टाकला. दार लावून तो वळला तर नेमकं पायात काही तरी गुबगुबीत अडखळलं. अल्टर ईगोनं यावं तसं अगदी सहजपणे एक मांजर आत आलं होतं. आमंत्रणाच्याबाबतीत अगदी संवेदनशील असणाऱ्या लेकवीला खरा धक्का बसला जेव्हा ते मांजर हक्कानं सोफ्याच्या उशीला टेकून बसलं. ’शुक शुक’ कुठल्यातरी जुन्या पुस्तकात दिलेला मांजर हाकलण्याचा मंत्र लेकवीला नैसर्गिकरित्या आठवला. मांजर ढिम्म हललं नाही. वैतागून लेकवींनं टेबलावरचा काठोकाठ भरलेला पिवळा स्ट्रेस बॉल मांजराच्या बाजुला पडेल अश्या बेतानं फेकून मारला. समिक्षक उचलतो तेव्हढीच बेताची नजर वर करुन मांजरानं बॉलचा आढावा घेतला.

"तुझं झालं असेल तर तू बसु शकतोस" किंचीत घसा खाकरुन मांजर बोललं "तुझंच घर आहे." स्वतःच्याही नकळत लेकवी समोरच्या सॊफ्यावर बसला. "बोलणारं मांजर बघण्यातलं नवलं संपलं की सांग, मग बोलू", भावनाविरहीत आवाजात मांजर बोललं तसं लेकवी आपलीच लाज वाटली. तेव्हढ्या काही सेकंदात त्यानं मांजराचं प्रोफायलिंग पुर्ण केलं होतं; उंची मांजरा एव्हढी, वय मांजरा एव्हढं, डोळे घारे, रंग काळा मिट्ट आणि पाय- पांढरे!

"तू...तू बोलतेस?" क्षणभर तू म्हणावं की तुम्ही असा लेकवीचा गोंधळ उडाला खरा पण तो सावरला "आणि इथे काय करतेस? काय काम आहे?"

मांजरानं डोळे मिटले, मिश्या किंचीत फिस्कारल्या आणि संयमी स्वरात ते उत्तरलं "मी वाट्टेल ते उत्तर देऊ शकते, उदा. मी छोटा चेतन आहे. पण त्यानं काय फरक पडणारै? मी सध्या फक्त एक मांजर आहे, काळ्या रंगाचं आणि पांढऱ्या पायांचं. मांजर अश्याकरता कारण सगळ्या पाळीव प्राण्यात आत्मभान असणारी मी एकमेव प्राणी आहे आणि त्याच मुळे स्वार्थीही. मी तुमच्यात असतेही आणि त्याचवेळी मी स्वतंत्र ही असते, कलावंत समाजात वावरतो तस्संच सेम टू सेम."

"हे बघ" राग आवरत लेकवी म्हणाला "मी विविध विषयांवर लिहीतो म्हणून मी बोलणाऱ्या मांजरावर लिहीनच असं नाही. शिवाय लिंगाचा किती हा गोंधळ; ती मांजर की ते मांजर? निदान तो मांजर म्हणजे बोका एव्हढं तरी नशीबानं ठरलय तुमच्यात...लेख भर मला हा लिंगोबाचा डोंगर चढत उतरत बसावं लागेल, नकोच ते...." लेकवीला सरतशेवटी एक तुच्छतापुर्ण विनोद करता आला याचा बक्कळ आनंद झाला. शिवाय हल्ली मांजराबद्दल वगैरे कोण वाचतं?

मांजरानं खास मार्जार स्टाईलनं लेकवीकडं पुर्ण दुर्लक्ष केलं. "म्हणजे तू लेखक समजतोस स्वतःला...." लेकवीच्या दृष्टीनं हा अक्षम्य अपमान होता पण मांजरानं आवाजातला करडेपणा जराही जाऊ दिला नाही "तुझ्या लेखकपणाचा ताळेबंद समजून घ्यायला तर मी आले आहे..." समिक्षकांनीच हे मांजर आपल्या अंगावर घातलं आहे हा लेकवीचा संशय आता जवळ जवळ फिटलाच. तरीही त्याला मनात कुठेतरी गुलाबी वाटून गेलं....पण म्हणून पांढऱ्या पायांचं काळं मांजर?

लेकवीच्या मागे मागे मांजर आतल्या खोलीत गेलं आणि आपण एका नव्या विश्वाची निर्मिती पाहातोय की काय या कल्पनेनं भ्रमित झालं.

उर्जास्त्रोतांनी भारलेल्या दोन खांबांदरम्यान विविधरंगी प्रकाश उत्सर्जित करणारा एक चौरस ठोकळा स्वतःच्या त्रिमीत कर्णाभोवती कुठल्याही आधाराविना फिरत होता. तो ठोकळा ना जमिनीवर टेकलेला होता ना त्यानं खांबांचा आधार घेतला होता, जणू की दुसरा त्रिशंकुच. सोबत कसलाही आवाज नाही, अधून मधून फक्त सोनेरी रंगाचे प्रकाशाचे काही शिंतोडे तेव्हढे जमिनीवर सांडत होते. एखाद्या यंत्राला जश्या तेल, वंगण पुरवणाऱ्या नळ्या असतात तश्या दोन नळ्या त्या ठोकळ्याच्या वर लटकत होत्या. एका नळीच्या वर भानामती असावी असे खुप सारे अंगठे आणि हसरे गोल होते आणि दुसऱ्या नळी जवळ कसलंस वर्गीकरण केलेली पुस्तकांची एक मर्यादित चळत होती.

मांजरानं डोळे भिरभिरे करणं थांबवलं तेव्हा त्याला चौरस ठोकळ्यावर कुठे ’टीव टीव टिटवी’, कुठे ’तू नळ्या’, तर कुठे ’फ-कर्म’ अशी संबोधनं दिसली. "सोशल मिडीया" लेकवीनं विनाकारणच नम्र सुरात माहिती दिली "मी आपलं गंमत म्हणून त्यांना वेगळ्या बाजाची नावं दिली आहेत; सामान्य भाषेत ट्वीटर, यु ट्युब आणि फेसबुक"

मांजरानं कुठून तरी डेटा ऍनॅलिसिसचं छोटेखानी यंत्र काढलं आणि लेकवीच्या फेसबुकाची कुंडली मांडली "तुझ्या ओळखीच्या लोकांपैकी १३% लोक तुझे नातेवाईक आहेत, ७% लोक तुझे ऑफीसवाले, ३५% लोक तुझे शाळा, कॉलेज मधले मित्र आणि तब्बल ४५% लोक नाव असलेले कलावंत आहेत."

"असतील" लेकवी आकडेमोडींनी फारसा प्रभावित होणाऱ्यांपैकी नसतो "यातली कलावंत मंडळी महत्वाची...त्यांची आणि माझी जात एकच. पुर्वी म्हणे साहित्यीक कट्टे असायचे तसंच आता हा आभासी कट्टा झालाय. आम्हाला इथं काळ-काम-वेगाच्या त्रैराशिकात न अडकता बोलता येतं, कल्पनांची देवाणघेवाण करता येते"

हसणारं मांजर आज पर्यंत कोणी बघितलेलं नाही पण लेकवीच्या उत्तरावर मांजरानं जो काही चेहरा केला त्यालाच बहुदा कुत्सीत हास्य म्हणत असतील "४५% कलावंतांपैकी जेमतेम पाच टक्क्यांनी तुला त्यांच्या फेसबुकात ’मित्र’ या कॅटगरीत टाकलं आहे, उरलेल्यांनी तुझी बोळवण ’निव्वळ ओळखीचा’ अशी केली आहे. तू जी कल्पनांची देवाणघेवाण म्हणतोस ती त्या कलावंतांनी टाकलेल्या कुठल्याही नोंदीवरची तुझी प्रतिक्रिया असते ’बरोबर आहे ताई’, ’मलाही अगदी अस्संच वाटतं’ किंवा ’क्या बात है मित्रा’ अश्या अर्थाची. शिवाय तुझ्या कुठल्याही नोंदीवर कुठल्याही कलावंतानं प्रतिक्रिया दिल्याचं मला तरी दिसत नाही"

नवी चप्पल म्हणत नाचत जायला आणि ताज्या उष्ण शेणात नेमका पाय पडायला एकच गाठ पडावी तसं काहीसं लेकवीचं झालं. "नेटवर्किंग म्हणतात त्याला" लेकवी पुटपुटला "साहित्यीक बनण्याची ती पहीली पायरी आहे." खोलवर दडवलेली गुपीतं उपटून काढत लेकवी मांजरापुढे का कोण जाणे पण नागवा झाला "तुला त्या दोन नळ्या दिसताहेत नां, त्यातली पहीली नळी नेमकी या मित्रांसाठी. त्यांची नोंद आली रे आली की आधी त्या नळीतून पिळून एक लाईकचा अंगठा आधी डकवायचा, कधीमधी बदल म्हणून स्मायली टाकायचा; नोंद नंतर वाचली किंवा कधी नाही वाचली तरी चालते. पण सतत मी तुझा भक्त आहे ही जाणीव त्या कलाकाराला व्हायला हवी. कलावंत स्तुतीवर जगतो गं, तुझ्यासारख्या मांजरीला नाही समजायचं ते. असे शेकडो लाईक बघितले की त्या कलावंतालाही भरुन येतं. कधी तरी मग त्याला ही हे जाणवतं की हा माणूस आपल्या प्रत्येक नोंदीवर आवर्जून मत देतो आणि मग एक अनुबंध निर्माण होण्याची शक्यता जन्माला येते"

"भाट लेकाचा" मांजरानं अर्थातच हे स्वगत म्हटलं आणि प्रकट प्रश्न विचारतं झालं "आणि ती दुसरी नळी? पुस्तकांच्या चळतीजवळची??"

"नुस्ती पुस्तकं नाही ती...त्यात सीड्यापण आहेत" लेकवीनं आवर्जून सांगीतलं "त्यातून लिहीण्याचा मूड तयार होतो..."

"आणि ईमेजही..." मांजरानं डेटा ऍनॅलिसिसचं यंत्र परत एकदा चालवलं "हे बघं, तू गेल्या महीन्यात बरोबर पाचवेळा दर्दभऱ्या गजलांची क्लीप टाकलीस आणि पंधरा लोकांनी तुझ्या संगीताच्या जाणीवेचं कौतूक केलं. आणि सत्तावीस लोकांनी तुझ्या आवडीच्या लेखकांचे उतारे आणि कवींच्या कविता..."

"इनफ.." लेकवी सात्वीक संतापला की त्याचं इंग्रजी बाहेर येतं " धिस इज ब्लडी इन्सल्टींग. माझ्या संवेदनशीलतेचा अपमान करते आहेस तू..."

"नाही, तसं नाही" मांजरीनं आपला हट्ट सोडला नाही "त्यांनी लिहीलेलं तू परत टाईपण्यात कसली आली संवेदनशीलता?"

"माझ्याच संवेदना जर त्यांनी शब्दबद्ध केल्या तर तीच गोष्ट मी परत का सांगायची?" लेकवीच्या मते हा बेजोड सवाल होता " निव्वळ व्यक्त होणं ही माझी त्या क्षणाची गरज असते आणि म्हणून मी माझ्याच अर्थाचे पण वेगळ्या हातांनी लिहीलेले शब्द परत लिहीतो, हे पुरेसं नाही?"

"ठीक, हे क्षणभर मान्य" मांजरानं स्वतःभोवती एक गिरकी घेतली "पण हे एव्हढंच आहे? आता या पुस्तकांचं वर्गीकरण बघ नां; गौरी आणि सानिया, गुलजार आणि गालीब, पु ल आणि वुडहाऊस, जी ए आणि ग्रेस, चित्रे आणि कोलटकर....कसं नेमकं आहे! तुला या पुस्तकातले मूड स्वतःवर रुजवून घ्यायला आवडतात. तू जीए किंवा ग्रेस पांघरुन घेतोस आणि तुला वाटतं की आपण पराकोटीचे दुःखी, नियतीवादी झालो आहोत. गौरी किंवा सानियाच्या कुशीत असलास की तुला वाटलं की आपण बंडखोर स्त्रीवादी आहोत. त्यांच्या लेखांचे प्यारे टाकून असं जाहीर रित्या सतत हुळहुळणं तुझ्या संवेदनशीलतेवर शिक्कामोर्तबच नाही का! जुनंच वाचून लोकांनी स्स्स....केलं की तुला एक नशिलं समाधान मिळतं. मग तसंच काहीस लिहून तू मोकळा होतोस. एक लेखक, कवी म्हणून, तुझं अस्तित्व ते काय? तू कोण आहेस?"

"मी महाकवी दुःखाचा । प्राचीन नदी..." लेकवीनं सुर पकडायचा प्रयत्न केला. त्याला अजूनही आपण एका पांढऱ्या पायांच्या काळ्या मांजराला का उत्तर देऊ लागतो हे उलगडलं नव्हतं.

"ते ग्रेसांचं.." मांजर एक पंजा वर करत लेकवीला थांबवत म्हणालं "तुझं काय?"

"कवींचे गोत्र एक असते" बाणेदारपणे लेकवी उत्तरला "मी माझं गद्य अमक्याच्या कवितेभोवती रचतो आणि तमक्याच्या गद्यावरुन मी उद्दीपित होऊन कविता करतो म्हणजे मी लेखक नाही? जगातली आठवी आणि त्यानंतरची प्रत्येक गोष्ट ही लेखकांनी केलेली नक्कलच आहे. मग माझ्याच लेखकपणावर आक्षेप का?"

मांजरानं शेपूट गुंडाळून प्रश्नार्थक चिन्ह तयार केलं "आठवी आणि त्यानंतरची प्रत्येक कथा त्या त्या लेखकाची दृष्टी घेऊन अवतरली. प्रत्येकाने मुळ कथाबीज वापरुन नव्या कथेत आपापल्या परीनं विरोधाभास, ताण निर्माण केला, आपले अनुभव, आपल्या नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना ओतल्या, आपण राहातो त्या समाजाच्या मर्यांद्या तोलून पाहील्या. तुझ्या कथांमधे तुझे स्वतःचे अनुभव कुठे आहेत? थोरामोठ्यांचे अनुभव आपलेच समजून तू त्यावर निव्वळ शब्दांच्या बेगडी झुली चढवतोस. लाईकच्या बदली लाईक आणि ’अप्रतिम सुंदर’ च्या बदली ’अप्रतिम सुंदर’ अशी दाद देणाऱ्या खुशमस्कऱ्यांच्या जाळ्यात अडकून त्यांना हवं ते लिहीतोस. अमाश्या पोर्णिमेच्या राती जोगत्याच्या अंगात देवी येते तसा एखादा लेखक तुझ्या अंगात येतो आणि तू लिहीत सुटतोस. तद्दन अंधश्रद्धेशिवाय काय म्हणावं याला! लिहायचं तर प्रतिभा, अनुभव आणि शब्दवंशाचे राजस शाप वागवता यायला हवेत. तुझ्या वाचनावर तू अगम्य मर्याद्या घालून घेतल्या आहेस. तुझं समाजभान सोशलमिडीया पलीकडे शुन्य आहे. तुझ्या लिखाणातल्या प्रतिमा, अगदी शब्दकळादेखिल, तू तत्क्षणी जे वाचत असतोस त्या लेखकासारख्या असतात. त्यामुळं तुझं लिखाण तात्कालीक, उथळ आणि खोटं आहे! तू आणि तुझ्या भोवतालची सगळीच ईको-सिस्टीम तुझा लेखक असण्याचा गंड सतत कुरवाळत असते पण माझ्या क्विझोट्या, कधी तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर स्वतःच लिखाण तोलून तर बघ..."

लेकवीनं कराकरा डोकं खाजवलं आणि दणकन टेबलावर बुक्की मारली "हे फार क्रूर आहे, हे फार क्रूर आहे." मांजरासमोर रडणं कितपत बरं दिसतं हे न कळाल्यानं त्यानं वाहाणारं नाक तसंच वरपलं, किती तरी वेळ. किती तरी वेळ तो डोळे मिटून बसून राहीला आणि उसळणाऱ्या रक्ताचे कढ आवरत राहीला.

मांजरानं चोरपावलांनी जाऊन चहा करुन आणला "घे, कोरा चहा आहे. दूध मी प्याले...थंड दुध ऍसिडीटी मारतं म्हणे"

लेकवीला असं वाटलं की आपल्याला मांजराचं पटतय. त्याला कुणीही पुराव्यानिशी काही समजावलं की त्याला ते लगेच पटतं. पण आपल्या एका अस्तित्वाचे सारे पुरावेच असे नाकारायचे आणि तेही एका पांढऱ्या पायांच्या काळ्या मांजराच्या सांगण्यावरुन, म्हणजे कठीणच होतं.

"पुढच्यावेळी चहा कोरा करणार असशील तर चतकोर लिंबु पिळ त्यात. कोऱ्या चहावर पिवळ्या लिंबानं मी तुझंच नाव लिहीत गेलो....असो" लेकवीनं थोडं आवरतं घेतलं "मग मी लिहीणं बंद करु म्हणतेस? सगळं निरर्थक आहे?" लेकवीला कुणीतरी आपल्या आत्म्याचे स्वप्नघोष अलगद खुडून नेल्यासारखं वाटत होतं "म्हणजे आता कारकुन वापरतात तेच शब्द आम्ही वापरायचे..म्हणजे आता आम्ही भुकेच्या सीमा पोट आणि पोटाखाली आखून घ्यायच्या...म्हणजे आता आम्ही यो यो हनी सिंगची गाणी ऎकायची..."

"यो यो हनी सिंगचा देशीवाद नेमाड्यांपेक्षा फार वेगळा नाही बरं का" मांजर मिश्कीलपणे बोललं "सत्ताविसाव्या वर्षी काय कुरवाळायचं आणि तू उसनेवारीची दुःख कुरवाळत बसलासं..." मांजर अचानक संस्कारी झालं "जगाचं ओझं न घेता मस्त मोकळेपणानं एकदा नाचून बघ, चार वेगळ्या लेखकांची पुस्तकं कोणत्याही अपेक्षा न ठेवता वाचून बघ, जमलं तर एखादी छानशी मैत्रिण मिळवं , निरर्थक कुठल्याश्या गावाला चक्कर टाक आणि पारावरच्या म्हाताऱ्यांची चिवट जीवनेच्छा टिपून आण" मांजरानं टूण्णकन टेबलावर उडी मारली. आपला शुभ्र पंजा लेकवीच्या डोळ्यासमोर नाचवत ते म्हणालं "या पुढंच तुझं लिखाण कुणाच्याही भावनांच्या ऋणात राहू नये म्हणून मी तुला एक पंजा मारणार आहे. खरं तर मी तुला चावू ही शकते पण ते फार डाउन मार्केट दिसेल. शिवाय तुझ्या कपाळावर पॉटरांच्या हॅरी सारखी खुण बरीक शोभूनही दिसेल. या नंतर तुला कुणासारखं, कुणाच्या ओझ्याखाली लिहावं वाटलं की तुझ्या कपाळावरची ही खुण विलक्षण दुखून माझा प्रत्येक शब्द तुझ्या मेंदूत परत परत घुमत राहील. मी आता जाणारै. पण जायच्या आधी तुला एक मनीचा श्लोक सांगून जाणारै- तुला आवडणारा एखादा विषय पकडून त्याचा छान अभ्यास कर, त्याविषयी कुणासाठी म्हणून नाही तर तुला रुचेल ते, हवं तेव्हाच लिही. हल्ली लोक स्वतःच मी अमूक विषयातली तज्ञ असं जाहीर करतात, भलेही लिखाण पाककृतींबद्दल किंवा सामाजिक विषयावरचं रिपोर्ताज असू दे, स्वतःच ’मी लेखक’ अशी ओळख रुजवतात. या मोहात पडू नकोस. लेखकानं आधी स्वतःशी प्रामाणीक असायला हवं. भेटणाऱ्या शक्यतांना नाकारु नकोस पण त्यांना आत पाझरायला वेळ दे. अजून काय सांगु? म्या...हाव चा मंत्र लक्षात ठेव म्हणजे झालं"

पांढऱ्या पायांचं काळं मांजर जसं न बोलवता आलं होतं, तसंच न हाकलता गेलंही; जाताना लेकवीच्या मनातली अनिष्ट कोळीष्टकं घेऊन गेलं.

Comments

Anonymous said…

*सूर्य *पूर्ण *कुत्सित *पहिली *सात्विक *प्रामाणिक
K Manisha said…
Mast...khup chaan....perfect lekvi as expected by Mani :)
Keep it up
Samved said…
Anonymous, thank you🙇, I depend on friends like you to correct it grammatically
Samved said…
धन्यवाद मनी 😃, सर्व लेकवी कडून आभार