Posts

Showing posts from May, 2017

जगावेगळी बाई

देखण्या बायांना कळत नाही माझ्यात असं काय निराळं आहे. तसं बघाल तर, मला कोणी गो..ड नाही म्हणणार आणि हो, बेतलेल्या शरीराच्या चमकदार ठक्यांसारखी मी आखीवरेखीव देखिल  नाही. पण माझं शरीर- माझे नियम शंकासुरांनो ध्यानात ठेवा कायम. खोटं वाटतयं? माझ्या मर्जीवरच झुलतो माझ्या कंबरेचा झोका चाली मधला तोरा आणि ओठांवरचा धोका. शहाणी ती बाय मी आहेच जगावेगळी. तुमच्या वर्तुळात बिंधास मी घुसते तेव्हा मधमाश्यांसारखे फेर धरतात पुरुष माझ्याभोवती, कुणी विस्फारल्या डोळ्यांनी नकळत उभं राहातं तर कुणी उंच खुर्चीतून गुडघ्यांवर  कोसळतं . ही जादू माझ्या चमकदार डोळ्यांची ही जादू माझ्या खळखळून हसण्याची ही जादू बिनतोड माझ्या ठुमक्याची आणि आनंदानी थिरकणाऱ्या माझ्या पायांची. कारण शहाणी ती बाय मी आहेच जगावेगळी. पुरुषांना प्रयत्न करुनही कळत नाही नेमकं काय वेगळं आहे माझ्यात. देहदार पदर काही उलगडून दाखवते तरीही काही शिरत नाही त्यांच्या सनातन डोक्यात. खुळ्यांनो, तुमच्या चौकटीबाहेर आहे माझं देहभान जे वाहातं पाठीच्या खोल पन्हाळीतून सांडतं आश्वासक हसण्यातून कधी हिंदोळतं स्तनांच्या...

सिद्धार्थ कवडीवाले , हल्ली फार डेंजर असतं

हल्ली फार डेंजर असतं निळ्या रंगाची बंदूक घेऊन गढूळलेल्या डोळ्यांचा माणूस सतत आपल्या पाळतीवर असतो टू कीप डॉक्टर अवे म्हणून जराशी हिमालयन सफरचंदे झूम बराबर झूम च्या  आनंदी  तालावर नाचवावीत डोक्यावर तर निळ्या बंदुकीचं टारगट तोंड वळलेलं दिसतं आपल्याच मोहरलेल्या डोक्याकडे काचपेट्यांच्या शीतल मायेतून अंधाऱ्या ओव्हरब्रिज कडे जाताना गॉशियन आकारातल्या भीतीला दटावण्यासाठी आपण जेव्हा करत असतो भीमरूपी महारुद्राचं आणि अनोव्हीय नियमांचं फ्युजन, पहाऱ्यावर असतेच रोखून पाहणाऱ्या गढूळलेल्या डोळ्यांची जोडी शुन्य-एक-शुन्य-एक-शुन्य-एक-शुन्य-एक स्वरांचा तीव्र निषाद लावलेल्या पावसाचा फायदा घेऊन आपण गर्दीत मिसळू पाहतो तोंडाला पाने पुसणाऱ्या माणसांच्या तेव्हा शेजारून जाणारा कुणी गुणगुणत जातो गर्दीत गारद्यांच्या.. आणि बंदुकीची निळसर नळी बोटांना हलकेच दंश करून अदृश्य होते हल्ली फार डेंजर असतं माणसांची सर्वत्र झडती घ्यायला हवी असं म्हणत आपण खसाखसा चेहरा पुसत आरसा बघतो आणि कंबरेला खोचलेली निळ्या रंगाची बंदूक मेजावर ठेवून झोपायला जातो