नव्वदोत्तरी साहित्य


साहित्य जागरच्या अंकासाठी वाचलेल्या लेखाची मुळ प्रत

नव्वदोत्तरी साहित्याबद्दल  बोलणं म्हणजे शक्यतांच्या टोकावर आपण डगमगत असल्याची कबूली देणं आहे. या बिंदूपासून असंख्य रस्ते फुटतात, काही हमरस्त्याला मिळणारे असतील, काही अनवट पायवाटांसारखे असतील तर काही दरीच्या तळाशी पोचवणारेही असतील. मराठी साहित्य यातले कुठले रस्ते निवडेल हे सांगणं कठीण आहे. म्हणून मला आज फक्त काही शक्यता इथं मांडायच्या आहेत. मी इथे तुम्हाला विशिष्ट लेखक ,पुस्तकं सुचवणार नाही, किंवा मी बऱ्या वाईटाची समिक्षाही करणार नाही. नव्वदीच्या दशकात मराठी साहित्यात  जे बदल झाले ते का झाले हे जर आपल्याला शोधता आलं तर पुढे येणाऱ्या बदलांचा आपल्याला अंदाज बांधता येईल तेव्हढ्यासाठी हा प्रयत्न.


सर्वसाधारणपणे नव्वदीच्या दशकाच्या अध्यातमध्यात दोन, तीन मोठे बदल घडले. आधीची दशकं गाजवणाऱ्या अनेक मराठी लेखकांचं लिहीणं उतरणीला लागलं किंवा बंद पडलं, राजकारणाचे पट नव्यानं मांडण्यात आले   आणि जागतिकीकरण आपल्या घरात घुसलं.  नव्वदोत्तरी साहित्याबद्दल  बोलायचं तर, या बदलांना सुटं न बघता परिक्षानळीत एकत्र ओतणं आवश्यक आहे.

नव्वदीचं दशक सुरु झालं आणि मराठी जनमानाला भावणाऱ्या पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, शंकरराव खरात, व पु काळे, रणजीत देसाई, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, बाबुराब बागुल यांच्यासारख्या अनेक लिहीत्या लेखकांचे हात चालणं बंद झालं. आधीच्या पिढीतले असंख्य जेष्ठ लेखक काळाच्या एका टप्प्यावर अडकल्यानं त्यांचं लिखाण नव्या पिढीला आपलंस वाटत नव्हतं. शिवाय ही पिढी निव्वळ वयाकडे बघून प्रश्न गिळणारी नव्हती.  आणि त्यांच्या समोर प्रश्नही असंख्य होते. जागतिकीकरणामुळे त्यांना मिळणार एक्सपोजर मोठं होतं, प्रोजेक्ट गुटनबर्गसारख्या ऑनलाईन लायब्रऱ्यांमुळं जगभरातलं साहित्य वाचायची सोय झाली होती, आणि म्हणूनच या पिढीला, तुम्हा-आम्हाला मराठी साहित्याला लावायला एक नवी जागतिक फुटपट्टी मिळाली. जाणत्या वाचकांसमोर मराठी साहित्याचे मर्यादित आयाम या निमित्तानं उघड झाले. याच सुमारास दलित साहित्य, ग्रामीण साहित्य वाचणाऱ्या नववाचकवर्गासमोर बदललेल्या राजकारणाच्या रुपानं एक नवं डीस्ट्रॅक्श्नन मिळालं. मराठवाडा विद्यापिठाचं नामांतर, मंडल आयोग, बाबरी मस्जिद, राजकारणाचं वेगानं झालेलं बाजारीकरण या सगळ्यांमुळं या वाचकवर्गाच्या वाचनाची काही टोकं बोथट झाली, काही विझून गेली तर काही नव्यानं उगवली.

नव्वदीच्या दशकात सशक्त कथा आणि कादंबऱ्या यांचं वर्तुळ आक्रसत गेलं आणि नॉन-फिक्शन प्रकारात मोडणारी पुस्तकांना मोठीच मागणी आली. मीना प्रभूंची माझं लंडन, चिनी माती, अच्युत गोडबोलेंची बोर्डरुम ही यातली काही मोठी नावं. विकतं ते पिकतं या न्यायानं अनेक लेखक, थॅन्क्स टू इंटरनेट, ट्रॅव्हललॉग लिहू लागले, गुगलणं आणि विकीपिडीयाचं भाषांतर करुन गंभीर पुस्तकं लिहू लागले पण तोवर जागतिकिकरणामुळे मध्यमवर्गाचं परदेशी हिंडणं सहज झालं होतं, त्याच्या इंग्रजी गंभीर वाचनाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. आणि वाचक चोखंदळ झाले. त्यामुळं या जॉनरच्या पुस्तकांवर काही मर्यादा आल्या. पण आजही वेगळं आणि अर्थपुर्ण लिहीणाऱ्या लेखकाला वाचक उचलून धरता. ट्रॅव्हललॉग प्रकारातलं सुपरस्पेशलायझेशन म्हणता येईल अश्या ऑफबीट प्रवासावर लिहीणाऱ्या मिलिंद गुणाजी, जयप्रकाश प्रधान अश्या लेखकांना आजही वाचक आवडीनं वाचतात.

इंटरनेटमुळं मराठी साहित्यात अजून एक मोठा बदल झाला. ब्लॉग, संस्थळं आवाक्यात आले आणि लेखक-कवींचा जणू पूरच आला. विषयाचं बंधन नाही, संपादकाची टोचणी नाही, पैशाचे फारसे व्यवहार नाही याहून जास्त बहुप्रसवा नवकवी, नवलेखकाला काय हवं असतं! पण मराठीत ब्लॉग जेव्हढ्या वेगानं फसफसून आले तेव्हढ्याच वेगात आटूनही गेले. या निमित्तानं काही वेगळे प्रयोगही झाले. नव्या लेखकांना किंचित चौकट देऊन रेषेवरची अक्षरे, मिसळपाव, मायबोली, ऎसी अक्षरे, डीजिटल दिवाळी असे काही ऑनलाईन फोरम बनले.  काही संस्थळं बंद पडली, काही जोमानं सुरु राहीली तर काहींचा एको चेम्बर झाला. ब्लॉगची नवलाई संपली आणि काही लेखक फेसबुकवर लिहू लागले. बागूल, खरात ढसाळानंतर काहीसं थकलेलं दलित साहित्य आणि चौकटीत अडकलेलं ग्रामीण साहित्य या निमित्तानं पुन्हा प्रकाशात  येऊ पाहातंय. एकूणातच यातून काही चांगले लेखक पुढे येऊ शकतात.

नव्या माध्यमात हे सगळं सुरु असताना, प्रस्थापित माध्यमातून लक्ष्मीकांत देशमुख, , पंकज कुरुलकर, सदानंद देशमुख, प्रविण बांदेकर, राजन खान असे काही लेखक सातत्यानं लिहीत राहीले.  स्त्री लेखकांबद्दल बोलायचं तर कविता महाजन, उर्मिला पवार , मोनिका गजेन्द्रगडकर अशी काही नावं ठळकपणे डोळ्यासमोर येतात. ही प्रातिनिधिक नाव आहेत, सगळ्यांची नावं घेता येणं शक्य नाही.  

या नव्या-जुन्या, शहरी-ग्रामीण लेखकांनी मराठी साहित्याचा पारंपारिक पोत बदलण्याचा, त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न केला, अजूनही करत आहेत. बदलणारे सामाजिक - आर्थिक-राजकीय संदर्भ, कुटूंबव्यवस्थेतली नवीन समिकरणं, टॅबूतून मोकळी होऊ पाहाणारी लैंगिकता, बोथट होत जाणाऱ्या संवेदना एक-ना-अनेक घटक आज लेखकासमोर नवनवे प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकऱ्याच्या पारंपारिक प्रश्नांच्या पलीकडे जाऊन त्याचे कौटुंबिक, सामाजिक तानेबाने जोखणारी बारोमास असो, किंवा डिंक जोडप्याची, शुद्ध शहरी अस्वस्थतेची गोष्ट सांगणाऱ्या प्रणव सखदेवची निळ्या दाताची दंतकथा असो, हा मराठी साहित्याला पुढे नेणारा टप्पा आहे. अजूनही मराठीत न सरावलेले बरेच ज्यॉनर आहेत, त्यात खरंखुरं यंग ऍडल्ट फीक्शन येतं, साय-फाय येतं, सिंहासन, मुंबै दिनांक येऊन गेले तरी पुरुन उरेल एव्हढं राजकारण येतं, हॅरी पॉटरनं घराघरात आणलेलं फॅंटसी आणि चांगले थ्रिलरही येतातंच.  उद्या कदाचित यातून सोईस्कर ई-बुक पुढे येतिल, फोनमध्ये सहज येऊन बसणारे ऑडीओ बुक बनतील. शक्यतांचं हे टोक खुप हवंहवंस आहे. 

आणि असं असतांनाही मला आपण  शक्यतांच्या टोकावर डगमगत आहोत असं वाटतं. वेगळं म्हणजेच चांगलं हा मराठी मनाचा भाबडेपणा लेखकाकडून नवे प्रयोग तर करुन घेतो पण त्यात काळाच्या कसोटीवर टिकण्याची खात्री नाही. बरं असा प्रयोग पचवू पाहाणारा वाचकवर्ग तो किती असतो? अगदी थोडका! म्हणजे नवे प्रयोग दीर्घकाळ चालले नाहीत की तो लेखक मरणार. साधारण वाचक वर्ग मोठा असला तरी त्याला आता करमणूकीची असंख्य साधनं आहेत, टीव्ही तर होताच आता जोडीला नेटफ्लिक्स सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मही आलेत. शिवाय चोविस तास फुकट असणाऱ्या समाजमाध्यमांनी नव्यानं वाचू शकणारा एक मोठा वर्ग हडप केलाय. प्रकाशकांची, वितरकांची आर्थिक गणितं बघितली तर वेगळं वाचणारा थोडका वाचकवर्ग आणि पुस्तकांपासून दूर जाऊ पाहाणारा सरासरी वाचकवर्ग ही दोन्ही टोकं त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाहीत. आणि म्हणून एक शक्यता ही देखिल आहेच की आज जशी दुकानात पुस्तकं मिळतात, उद्या ती तशी मिळणार नाहीत.

पण माणसानं आशावादी असावं. पाब्लो नेरुदा म्हणतो You can cut all the flowers but you cannot keep Spring from coming. नवीन लेखक प्रकाशकांना शोधण्याऎवजी ई-बुक, सेल्फ पब्लिकेशनचा मार्ग धरतील, छोट्या गावांपर्यंत पुस्तक पोचवायचं असेल तर पब्लिश-ऑन-डीमांड सारख्या लोकलाईज्ड सर्विसेस वापरात येतील आणि ज्यांना पुस्तक ऎकण्यात आनंद मिळतो त्यांच्यासाठी ऑडीओबुकमुळे पुस्तकं पर्फॉमिंग आर्ट्च्या लेव्हलला येतच आहेत.

तेव्हा मित्रांनो शक्यतांच्या टोकावर डगमगतांना आपण सावरुन बसणार आहोत कारण झिनो टूट्च्या शब्दात सांगायचं तर Stories are the currency of life. The richer the stories the richer the life.

Comments