कवितांचा गाव..

इयत्ता ९वीतली गोष्टं आहे, कुळकर्णीबाई (तेंव्हा "मॅडम"चं राज्य नव्हतं!) "चिमण्या" नावाचा धडा शिकवत होत्या.."आणि हा धडा ग्रेस या लेखकाने लिहीलेला असून तो माणिक गोडघाटेंनी भाषांतरीत केला आहे"..अस्मादिकांनी ताबडतोब तीव्र निषेध व्यक्त केला.."बाई बाई..माणिक गोडघाटे म्हणजेच ग्रेस..एकच आहेत..टोपणनाव!!" बाईंनी उदार मनाने चूक कबूल केली आणि आमची छाती अभिमानाने भरुन आली. ग्रेसची आणि माझी ओळख अशी अपघातानेच झाली.
आता थोडा अजून फ्लॅशबॅक.. घरात उठताबसता पुस्तकांची चर्चा सुरु असायची..आई दादा मराठीचे प्राध्यापक होते (आमच्या सुदैवाची हद्द!) आणि दादानां कवितांचा विलक्षण नाद. आमच्या लहानपणी त्यांनी किती तरी कविता आमच्याकडून चालीत पाठ करुन घेतल्या होत्या पण कवितांसारखा सुंदर अनुभव, सरकारी कॄपेने काही गुणांचा आणि आम्ही अजून थोडे हुशार असल्याने, निबंधात चांगली छाप पाडण्यापुरता मर्यादित होता.
पण या "चिमण्या" प्रकारेने कशी ती माहीत नाही, एक जादूच केली. कवितांच्या बाबतीत शक्यतो बालभारतीच्या पुढे न जाणारी आमची गाडी सरळ संध्याकाळच्या कवितांच्या दारात येऊन ठाकली.
मग ग्रेसच्या कवितांनी माझं जे काही केलं तो एक वेगळाच विषय आहे, त्या विषयी नंतर कधीतरी!
हा ग्रेस नावाचा गॄहस्थ कायमचाच मुक्कामी आला असताना अजून एक भुताटकी अनुभवाला आली दिलीप चित्रे या नावानी. हे तिसरंच झांगड होतं. कोणीतरी काहीतरी लिहीत सुटावं आणि त्याची कविता व्हावी हा सरळ योग नाहीच. म्हणूनच विंदा त्यांना महाभूत म्हणतात! ग्रेसच्या अनवट शब्दकळा आणि चित्र्यांचं अनुभवांना सरळ भिडत जाणं, नंतर वाचलेल्या बहुतेक कवींच्या दशांगुळे वर राहून गेलं ते गेलच.
कवींच्या ढोबळ प्रेमात पडण्याचे दिवस सरल्यावर कधी मुक्तातल्या नामदेव ढसाळांची कविता आवडून गेली (तितकंच सोनाली चं त्यात असणंही!!), कधी रेग्यांच्या किंचीत कविता, कधी दिप्ती नवलच्या..

अनुभवांची तोडफोड न करता व्यक्त होण्याचं अप्रतीम सामर्थ्य ज्या कवितांनी दिलं, त्या सगळ्या कवितांसाठी हा आजचा ब्लॉग!!!!

Comments

Sneha Kulkarni said…
'कवितांचा गाव' आवडला! कवितेवरती अजून लिहा नं, वाचायला आवडेल. एक शंका, 'मुक्ता' मध्ये महानोरांच्या कविता आहेत हे माहित होते. ढसाळांची कविता कुठली आहे?
Samved said…
Thanks स्नेहा! जेंव्हा सुचेल तेंव्हा नक्की लिहीन.
मुक्तात अविनाश नारकर सोनालीला जी कविता म्हणून दाखवतो ती ढसाळांची आहे. "रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो..."
मुक्तात महानोरांसोबत मल्लिका अमरशेखांची "तू तलम अग्नीची पात" अशी एक सुरेख कविता पण आहे. तुम्हाला नक्की आवडेल..