मोठा छान उजळ उंदीर

दिवस: आद्य आणि अनंत

पाल, साप, उंदीर, सरडे यांना फक्त बायकांनीच घाबरावे असा नियम आहे का? म्हणजे, सारवासारव नाही करत मी, पण मला घाबरण्यापेक्षा किळसच जास्त वाटते त्यांची.

दिवस: अकरावा (कुठून तरी सुरु करायलाच पाहीजे नाही का? Placeholder पलीकडे याचं फार काही महत्व नाही)

अचानकच गावात फार उंदीर दिसताहेत. त्यांच्या दिसण्याची इतकी म्हणून सवय झाली आहे की मघाशी पल्याडच्या बिल्डींग मधल्या पांडेकाकु मला उंदरासारख्या दात विचकुन हसल्या सारख्या वाटल्या. आणि तो ढापण्या जोश्या, त्याच्या संघीष्ट मिशा, गेल्या दोन दिवसात जास्तच फेंदारलेल्या दिसताहेत, उंदरासारख्या?

दिवस: तेरावा (१३? छान छान)

डोकं भंजाळलं आहे नुस्तं. कसली ही करणी? कुणी केली? गावातले लोक हळु हळु उंदीर होताहेत?

दिवस: सतरावा

मी चिमटा घेऊन बघितला हो! पण खरच शेजारच्या टुमण्याचा उंदीर झालाय. आणि त्याची ती गोंडस, नुक्तच लग्न होऊन आलेली टुमणी पण...श्श्श्श्श्शी...तिची उंदरीण, आय मिन, गोंडस उंदरीण झालीय

दिवस: तेविसावा आणि पुढे तसंच काहीसं...

"हॅल्लो! काय चावटपणा चाललाय हा? कुणाला नाही कळालं तरी तुम्ही आपले प्राईम नंबर टाकून दिवसागणीक आमच्यावर एक टिपणी लिहीताय हे आलय आमच्या ध्यानात"

"कोण?"

"उंदीर"

समोरच उभा होता पण दिसणार कसा? आवाजाच्या दिशेने बघितला तेव्हा मोठा छान उजळ उंदीर समोर उभा; हात हलवत!

"काय आहे?"
"कुठे काय? म्हटलं तुम्ही लेखक लोकं, लिहीताबिहीता. म्हणून आलो. आमच्यावर लिहीणार का?"
"का? तुम्ही काय पराक्रम केलात म्हणून तुमच्यावर लिहावं? टुमणीची उंदरीण केली म्हणून?"
"ते टुमणीचं तुम्ही फार मनाला लावून घेतलत लेखकराव...तिचा टुमण्या बघा कसा खुष आहे. त्यानीं नवी गाडी पण घेतली परवा. खाल्ले की नाही पेढे त्याचे?"
"गाडीचं कौतुक मला नको सांगुस.."
"मग काय तुमची न खपलेली पुस्तकं आम्ही खाल्ली, त्याचं कौतुक करु? टुमण्यानं गाडी घेतली, पांडेकाकुंचा मुलगा पार अमेरीकेत गेला तर तुम्हाला ते काय मोरली करप्ट वगैरे वाटतात की काय? "
"पण ते म्हणजे सगळं काही? अगदी अर्ध्या चड्डीतल्या जोश्यानं सुद्धा त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत घातला..हे टू मच होतय"
"सगळ्यात पहीलं करेक्शन; चड्डी नेहमी अर्धीच असते, अजून अर्धी करु नका"
"अरे कसले विनोद करतोस फालतुचे! प्रश्न किती गंभीर होताहेत कळतय का तुला? आपली संस्कृती.."
"काय होतय तिला? लेखकराव, डोळे उघडा, नवं जग जन्माला आलयं. आता राज्य आमचं आहे. खाणंपिणं, जगणं, मजा मारणं तुम्हाला अजूनही पाप वाटत असेल तर तुम्हाला आणि तुमच्या सारख्या फाटक्या लोकांना आम्ही कुरतडून ठेवु. जे आहे ते इथे आहे, आत्ता आहे. आमचा सोनेरी आणि आदर्श उद्यावर विश्वास नाही. तुम्ही ट ला ट लावता म्हणून तुमचे पुर्वज माकड होते हे वास्तव बदलत नाही. सर्व्हायवल ऑफ फिटेस्टचा नियम इथे ही लागु होत राहाणार हे लक्षात ठेवा मिस्टर लेखक"

"तू म्हणतोस ते खरं असेलही पण माकडं आणि बाकीचे फिटेस्ट प्राणी जंगलातच राहीले हे विसरु नकोस. ज्या मजांच्या तू गमजा मारतो आहेस, ती माणूस इव्हॉल्व्ह झाला म्हणून शक्य आहे. आता उद्याचा माणूस घडवायचा असेल तर आजही काही शेपट्या गमावण्याची तयारी हवी"

"प्रश्नाचा भाग न बनता उत्तराचा भाग बनलात, आवडलं मला लेखकराव. पण क्रांती करायची तर आहे त्या व्यवस्थेचा आधी भाग तरी बना, बघा तरी कशी आहे ती. किती बरोबर आणि किती चुक, बाहेरच बसून बघणार? खेळ न खेळताच नियम बदलण्याबद्दल बोलाल तर कुणीच ऎकणार नाही. खेळ खेळा, त्यात जिंका आणि मग मान वर करुन नियम बदलण्याबद्दल बोला. खेळाचे नियम बदलण्याच्या आधीच नियम तोडाल, तर खेळाबाहेर फेकले जाल फुकात"



अनंतकाळ न सुटलेला प्रश्न आज सुटला या आनंदात लेखकरावांनी नुक्तंच फुटलेलं शेपुट लाडात उडवुन बघितलं.

मोठ्या छान उजळ उंदरानं त्याच्या आत नव्यानं धडधडू लागलेलं माणसाचं काळीज चाचपत उड्या मारुन बघितल्या.

Comments

"..खेळ खेळा, त्यात जिंका आणि मग मान वर करुन नियम बदलण्याबद्दल बोला."

लाख मोलाची गोष्ट.
आत्ता ६ व्यांदा वाचून काढलं सलग.. पण कसलाच रेफ़रन्स लागत नाहीये. लयच ऍब्स्ट्रॅक्ट झालंय हे, संवेद! :)
Samved said…
सर्किट, धाडशी आहेस बुवा..६व्यांदा वाचलस म्हणजे आता माझी नैतिक वगैरे जबाबदारी वाढवलीस राव! तर विक्रमा, मला खांद्यावर नेतो आहेसच तर तुझा भार हलका करण्यासाठी ऎक ही एक अजिबातच पौराणिक नसणारी गोष्टं. व्यवहार आणि न-व्यवहार यांच्यातला हा संवाद आहे. लेखकरावाला मुळातच व्यवहारी जगण्याची आणि त्याच्या अनुषंगाने येणारया मोजमापाची चिड आहे. आणि उंदीर हा rat race चा प्रतिनिधी आहे. तर मुळात हे आत्मचिंतन! कुणीच एक बरोबर किंवा चुक नाही तर you only need to play a double role असा हा संदीग्ध अर्थाचा उखाणा!
Megha said…
thanks for the vikram-vetal goshta...mala pan kalala navata kahich...hi hi..pan nehemi nehemi mich ka mhanayacha na? aadhich tar tumacha saglyancha aarop asto ki mala kahich kalat nahi...pan circuit mhanato tasa kharach na kalnyasarakha zalay,aani tyana vicharala mhanun sangitalas tari...mala tar sangitala pan nastas....so thanks to circuit too.
हा..हा.. आता कसं! सगळं झेपलं. सही जमलाय हा ही उखाणा! :)
Aparna said…
Jya goshti aaplya itar vachakanna kalalya naheet, tya mala pahilyach vachanat kalavya ani jya mala kalu nayet tyanchi itaranni wahava karavi!
Kay mhanu mi aata!
Aparna!