सामान

जीन्सच्या दोन्ही खिशात हात घालून परक्यासारखी तिने तिची खोली निरखुन पाहीली. लिमिटेड पसारा तिला नेहमीच आवडायचा. घर हॉटेलसारखं चकाचक कश्याला ठेवायचं? थोडं अस्ताव्यस्त असलं की घरात कसं चैतन्य वाटतं हा तिचा आणि तिच्या बाबाचा लाडका फंडा आईने गेल्या चार दिवसात गुंडाळुन ठेवला होता. "एनी वे" तिने मनातच खांदे उडवले, "लग्न झालं की हे घर सोडायचंच आहे. मग आई आणि बाबा त्यांना आवडेल आणि जमेल तसं घर ठेवतीलंच की. सुरुवात माझ्या खोलीपासून केली समजू" तिनं अस्वस्थपणे स्वतःशीच हसण्याचा प्रयत्न केला. "अजून चारंच दिवस!" कुठे जायचय यावर दिवसांचे वेग अवलंबुन असतात हे लक्षात न आल्याने चार दिवस म्हणजे अंतर जवळ की कमी, याचे हिशोब ती मनात मांडु लागली. मापनातली दोन भिन्न परिमाणे एकत्र आणूनही तिला ते उमगलं नाही. अर्थात तिच्या समजण्याउमजण्याने वेळ किंवा अंतर, काहीच कमी जास्त झालं नसतं.

धडधडत्या मनानं तिने तिचं कपाट उघडलं. तिचा खजिना, आईच्या भाषेत कचरा, अजूनही तिथेच होता. हळूवारपणे तिने एकेक गोष्टं जमिनीवर ठेवायला सुरुवात केली. आजीने आणलेली भातुकलीची भांडी, हात मोडलेली बाहुली, बाबासोबत जमा केलेले रंगीत दगड, आपल्याला आवडतात म्हणून आईने कुठून कुठून जमा केलेली नाणी...सारं तसंच होतं..तिथंच राहाणार होतं, तिला वगळता.

कपाटातल्या कुलुपबंद ड्रॉवरला तिने हलकासा हिसका दिला आणि भुकेल्या लांडग्यासारख्या सारयाच आठवणी उसळून अंगावर आल्या. बाबांनी आग्रह करुन तिला हा कुलुपबंद कप्पा दिला होता आणि त्याची किल्ली हरवल्यावर, त्यांनीच तिला हे हिसका तंत्र शिकवलं होतं. त्या दोघांव्यतिरिक्त बाकी सारयांसाठी तो कप्पा कायमच कुलुपबंद होता. आठवतात तेव्हापासुनच्या वाढदिवसाचे ग्रिटींग्ज, जुन्या, हरवलेल्या-सापडलेल्या मित्रमैत्रिणींचे फोटो, जीवापाड जपलेली काही पत्रं..

परवानगी असते तेव्हढं सारं सामान ग्रॅमग्रॅमचं गणित करुन तिच्या आईनं आधीच भरुन ठेवलं होतं. तिनं तिचं सामान नेण्याविषयी विचारलं तेव्हा बाबा कसंबसं हसल्यासारखं करुन खांद्यात वाकले होते, क्षणभर, तितकंच.

तिने हळुवारपणे मोठ्या प्रेमाने एकेक वस्तुवरुन हात फिरवत तिथेच जमिनीवर डोकं टेकवलं. गळ्यात कढ आणि डोळ्यात हिमान स्वप्नं कधी दाटून आली तिलाच कळालं नाही.

"वेडी मुलगी" पाय न वाजवता बाबा तिच्या जवळ येऊन बसला. तिच्या केसातुन हलकेच हात फिरवताना त्याला उगाचच कोवळ्या जावळाचा वास आला. तिच्या खिशातुन ओघळलेल्या काही जुन्या आठवणी आईने आर्तपणे उचलल्या. "मी जरा जागा करुन पोरीच्या चार जुन्या गोष्टी भरतेच. नव्या प्रदेशात एव्हढंच तिचं सोयर"

Comments

नगमे है ... किस्से है ... बाते है ... यादे है!
....

याहून जास्त काही लिहिलं तर उगाच शब्दबंबाळ होईल.
सही. खूपच छान लिहिलय. जुन्या आठवणी आल्या उगाच....
पहिल्यांदा घरट्याची उब सोडून बाहेर पडताना सगळ्यांनाच - पडणार्‍यांना आणि त्या प्रसंगाचे साक्षी असणार्‍यांना - कठीण जात नाही??
छान!
असेच वेळोवेळी असोशीने जमा केलेले खजिने आठवले, आणि मग कधीतरी 'पुरे आता यात गुंतणं' असं वाटून ते निग्रहाने नाहीसे करणंही.
वस्तू नाहीश्या केल्या तरीही वस्ती न सोडलेल्या काही आठवणींनी डोळाही घातला.. आणि या वेळी त्यांच्यावर न चिडता मी निमूट पराभव मान्यही करून टाकला. :)
कोहम said…
संवेद....

हा खेळ खेळण्यातंच अर्ध आयुष्य जात असेल कदाचित. नविन्याच्या पाठी धावायचं आणि नवं ते जुनं झालं आणि दुसरं नवं सापडलं की जुन्या नव्याच्या आठवणी उगाळत बसायचं. का?
Monsieur K said…
very subtle.. very touching..
sangram mhanto, tey gaana aathavala..
Snehal Nagori said…
tya sodun jaychya junya aathwanin peksha aai baba ch emotional hona jaad jata kharach... good one
Megha said…
ya goshtitalya kititari goshti mazyach vatat aahet.....maza khajina,bahuli,dagad,jamavaleli nani,maza kappa aani tyacha famous kulup....ki sagalyanchyach lahanpanichya aathvani sarakhya astat? sagalya lahanpanichya aathvani aalya...mastach han sami...
Aparna said…
paani aanlas dolyat!
Maze Godrej che kapaat (ji fakta ekach avarleli jaga mhanun sarv jan imp. goshti thevanyasathi wapartat) dolyasamor aale ani vatle kahi diwasanni kinva mahinyanni kinva varshanni, mi pan asheech basen ka tyapudhyat?
Aai ani babanna backgroundla gheun? :)