इंजिनिअरींगचे दिवस

आमचं FE, TEचं हॉस्टेल तसं नवं होतं आणि कॉलेजपासून थोडंस लांबदेखील. SE, BEचं हॉस्टेल मात्र कॉलेजच्या आवारातच होतं. कॉलेज तसं फार मोठं नव्हतं. मुख्य बिल्डींग, ड्रॉईंगहॉल्स आणि लॅब्ज सारं C आकारात. C संपतो तिथे वर्कशॉप्स. हा झाला कॉलेजचा मुख्य भाग. वर्कशॉपच्या मागे ऍनेक्स बिल्डींग. आणि मुख्य Cच्या एका बाजुला एक नवी बिल्डींग जोडलेली आणि दुसरया बाजुला लायब्ररी आणि त्यावर ऑडीटोरीयम. सगळं एकदम शिस्तीत म्हणजे कसं की मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल मुख्य शाखा म्हणून त्या मुख्य बिल्डींग मधे म्हणजे C मधे. सिव्हील पण मुख्यच शाखा पण का कोण जाणे त्यांचे वर्ग सगळ्यात मागे ऍनेक्स बिल्डींग मधे भरायचे. कदाचित सिव्हीलची पोरं आणि बरयाच प्रमाणात पोरीही विविधगुणदर्शनात वाकबगार होते. उगाच कुणाला आल्या आल्या कॉलेजच्या कलागुणांचं प्रदर्शन नको म्हणून त्यांना वाळीत टाकलं असेल. कॉलेजची सारी फेसव्हॅल्यु मात्र त्या नव्या बिल्डींगमधे होती. ती बिल्डींग ईलेक्ट्रॉनिक्स आणि कंम्प्युटरच्या गुणी, शांत, सालस, सज्जन, अभ्यासु इ. इ. गुणांनी ठासून भरलेल्या शाम नावांच्या मुलांनी बहरलेली होती. त्यांच्या वर्गभगिनी सर्वसाधारण नाठाळ, खट्याळ, (वयोपरत्वे) सुंदर (तेव्हा तरी वाटायच्या!), ऎनवेळी अभ्यास करुनही क्लास मिळवण्याची अद्भुत कला अवगत असणारया जादुगारणी वगैरे वगैरे होत्या.

सर्व शाखांसाठी पहीलं वर्ष जनरल असतं, म्हणजे तोच अभ्यासक्रम. सर्वसाधारणपणे ड्रॉईंग, लॅब्ज आणि वर्कशॉप शारीरीकदृष्ट्या थोडे कठीण असतात. पण मग अचानकच कधी तरी दिव्या भारतीनं सुसाईड केली म्हणून बॉयलरवर तिचा फोटॊ चिकटवुन, त्याला हार घालून, रितसर श्रद्धांजली वाहीली आणि कॉमनऑफ घेतला असे रिलिफ असायचे. ड्रॉईंगच्यावेळी घोडा व्हायचा. म्हणजे उभ्या उभ्या झोप. वर्कशॉप म्हणजे पहील्या वर्षी चंगळ. खुरपं, स्टुल असले भणंग प्रकार बनवायला शिकवायचे. त्यात मि.मि. चे हिशोब. च्यायला, समजा तो स्टुल चांगला एक सेन्टीमिटरनं कमी जास्त झाला तर त्यावर बसणारा माणूस पडणार आहे का? आपण घरी सगळ्या सर्कसी करतोच की नाही? पण नाही. ते स्क्रॅप करा आणि नव्यानं बनवा. ते व्हर्निअर कॅलिपर आणि स्क्रुगेज नावाचे मंगळावरुन डायरेक्ट आयात केलेले प्रकार काही कुणाला झेपायचे नाहीत. मग कधी तरी दया येऊन एखादा कमी खडूस इनस्ट्र्क्टर (सर..सर..) पटकन तो जॉब बनवुन द्यायचा. ते स्टुल आणि खुरपी परवडली म्हणायला लावणारा स्मिथी नावाचा एक राक्षस होता. लोखंडाच्या दोन चिपा घ्यायच्या आणि त्याचा एक जॉब करावा लागायचा. हा जॉब कोणत्याही इंजिनिअरींग कॉलेज मधे कॉमन बरं का. त्या जॉबचं नाव मेल-फिमेल. नावाच्या बाबतीत एखाद्याची विनोदबुद्धी किती कारुण्यदायक असु शकते याचं वेगळं उदाहरण शोधून सापडणार नाही. या जॉबचा माझ्या बालमनावर इतका विपरीत परिणाम झाला की डा विन्सी कोड वाचताना जिथे जिथे स्त्री-पुरुष युनियनचे सिम्बलीक संदर्भ आले होते, मला तिथे तिथे हा मेल-फिमेल जॉबच दिसायचा. तर हा हाताला फोडं आणणारा जॉब २-३ रिजेक्ट नंतर परफेक्ट जमवुन निवांत बसलेल्या टोणग्याला नाजूक आवाजातली एखादी विनवणी आली की परत तिचा जॉब घासायला तयार होताना बघून, अजिबातच जॉब न जमलेले आमच्या सारखे काही जाम खुश व्हायचे.

कॉलेजचं एक आकर्षण होतं भव्य ऑडिटोरीयम. आमची ऍडमिशन प्रोसेस तिथेच झालेली त्यामुळे कॉलेजचा पाहीलेला पहिला भाग म्हणून त्या विषयी वेगळं ममत्व. गॅदरिंगचे दिवस आले की तिथे ऑडिशन्स, गाण्याच्या प्रॅक्टीसी यांना नुस्त उधाण यायचं. हिंदी गाणी खुप झाली म्हणून एक वर्ष ऎन दुपारी मराठी भावगीतांची स्पर्धा ठेवली. एका माठानं भेसुर आवाजात "अश्विनी ये नां" हे "भाव्गीत" म्हटल्यावर त्याला बिनतोड वन्समोअर देणं तर आपलं "पर्मकर्त्व्य" होतं.

कॅन्टीन नही देख्या तो क्या देख्या? चांगला सहा-सव्वासहा फुटाचा देखणा शेट्टी आण्णा चालवायचा आमचं कॅन्टीन. मैत्रिची असंख्य वर्तुळं असायची, रुममेट्स, वर्गमित्र, जीवापाड सख्खे मित्र, खोल आतल्या मैत्रिणी, सिनिअर्स, ज्युनिअर्स, सख्खे, चुलत, मावस मित्र-मैत्रिणी इ. इ.. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी कुणी न कुणी कॅन्टीन मधे पडीक असायचंच. आण्णाचे टेबल तुटेपर्यंत वाजवत बसलो तरी त्याचे ना नसायचे. कॅन्टीनमधे आम्ही गाण्याच्या प्रॅक्टीशी केल्या, पुस्तक वाचली, अभ्यास केला, नाचलो, हसलो, रडलो आणि जमलं तेव्हा तेव्हा खादाडीही केली. कॉलेज सोडताना स्क्रॅपबुकमधे आण्णाने फिलॉसॉफरच्या तोडीचा "संदेश" दिला होता. आम्ही दिलेलं छोटसं गिफ्ट घेताना आण्णाने "फिर मिलते है" चा वादा केला होता. बघु या कधी जमतो ते.

Comments

a Sane man said…
"ते स्टुल आणि खुरपी परवडली म्हणायला लावणारा स्मिथी नावाचा एक राक्षस होता...त्या जॉबचं नाव मेल-फिमेल. नावाच्या बाबतीत एखाद्याची विनोदबुद्धी किती कारुण्यदायक असु शकते याचं वेगळं उदाहरण शोधून सापडणार नाही...अजिबातच जॉब न जमलेले आमच्या सारखे काही जाम खुश व्हायचे."

:D:D:D:D:D:D
... शाम नावांची मुलं...

कसला अफलातून प्रकार आहे हा! मागे नेटवरून 'मराठी मुलगी' नावाचा आत्यंतिक विनोदी प्रकार पसरत होता. त्यात तुझे हे 'शाम' चपखल बसले असते जाऊन...

लगे रहो! माझ्या एका मित्राच्या भाषेत 'लई मज्ज्या येती...' लवकर लवकर लिवा...
Megha said…
magachya post peksha he post zakaas utarala aahe....vachayala maja aali.
commonoff vagere shabda kiti divsani vachale....kalach mala fishpond shabda aathvat navata.
ajun pudhacha bhag yenare ka re?
Mints! said…
aha kay sahi!

majhe college che diwas ani profeshwar lokani kelele atyacharahi!
saamved -- tujhaa blog interesting aahe ... shaaMtapaNe vaachoon kaLaveenach.
"saahebloka" hyaa maajhyaa lekhaalaa pratikreyesaaThee dhans re ...
'category' Tharalee kee kaLav lagech :)
- Sandeep
www.atakmatak.blogspot.com
Nandan said…
sahi :)
smithy...najook aavajatali vinavaNee...he tar agadi same to same :D
सेम टू सेम रे भाऊ...!!!
आमचही फ़र्स्ट इअर असच निघालं ... फ़रक इतकाच की मी Electronics ला होतो ... पण attitude mech/Electrical वालीच :))
Male-Female jobचं नाव ऐकल्यानंतर लहानसं हसु पसरला होतं सगळ्यांच्या गालावर पण मास्तरांना दिसलं फ़क्त माझ्याच चेहर्यावर.. पुढे काय झाले हे सांगणे नलगे :)
मनापासुन आवडलं...
सेम टू सेम रे भाऊ...!!!
आमचही फ़र्स्ट इअर असच निघालं ... फ़रक इतकाच की मी Electronics ला होतो ... पण Attitude Mech/electवालीच :))
Male-Female jobचं नाव ऐकल्या नंतर लहानसं हसु पसरला होतं सगळ्यांच्या गालावर पण मास्तरांना दिसलं फ़क्त माझ्याच चेहर्यावर.. पुढे काय झाले हे सांगणे नलगे :)
मनापासुन आवडलं...
mad-z said…
मला जर एक दंबुक गवसली तर पहिल्या दोन गोळ्या तुलाच. शाम नावाची मुलं का? न्हाई आवडलं मला. कट्टी जा.

बाकी छान. हे लीव्हायला घेतलंस खरं पण लई बख्खळ हाय चार वर्षांचं "गणित". कधी संपलं का आपली ATKT?