माया
हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे त्यात तगमग नसते उन्हाळी निवून जाण्याचे सोसही नसतात तुझ्या गुणसुत्रांची मांडण कदाचित तशीच; तालबद्ध अवरोहांची विलंबित लय. तुटण्याचे भय आणि जोडण्याची उत्कटता समेवर पेलतात तुझे मायावी हात.. हात.. बर्फाचे अभ्रकशुभ्र.. किंचित पारदर्शी आणि संदिग्धही.. माझ्या देहचूर कविता झाडात चंद्र अडकावा तश्या उसवतात तुझ्या स्पर्शातून स्पर्श... बर्फाचा.. अस्तित्वाचे दंश पुसून रक्ताशी एकरुप होणारा वंशहीन.. हिवाळी ओल्या तहानेसारखा तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या हवाली करताना फकिराच्या वासनेचा उरुस तुझ्या दिठीत पाहीला मी आणि तेव्हापासून माझ्या चेतनातंतूंवरुन वाहाताहेत तुझे ओले स्पर्श