अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?

अंधाराचं एक बरं असतं, सगळा उजेड काळाभोर असल्यानं कुणाच्या डोळ्यातले भाव वगैरे दिसत नाहीत. दारुचंही तसं एक बरंच असतं की ती पोटात गेली की कान मुके अन जीभ बहीरी होऊन जाते. त्यामुळे पॅडी आणि सॅन्डी अंधारात दारुकाम करत बसले होते या घटनेतच मोठी सीनर्जी होती. सीनर्जी म्हणजे १+१>२!

थोड्याच वेळात हॉस्टेलच्या ज्या भिंतीवर बसून आपण दारु पित आहोत ती आपण चल म्हटलं की चालायला लागेल इतपत आत्मविश्वास आल्यावर सॅन्डीला जोराचं रडु आलं. म्हणजे तो इमोशनलच झाला जवळ जवळ! गेले कित्येक दिवस पॅडी जे ऎकत होता ते त्यानं "य"व्यांदा ऎकलं. म्हणजे एनपीचं उभरतं पोलिटीकल करिअर कसं खलास झालं, सॅन्डीवर कसा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याला आता विद्यार्थी बंधु-भगिनींची सेवा कशी करता येणार नाही वगैरे वगैरे.

"तुला काय वाटतं?" सॅन्डीचा झुलता प्रश्न पॅडीला गिरमिटात पेन्सील घालून टोक काढल्या सारखा वाटला. पॅडीला वाटलं आपण सरळ सगळं कबूल करुन माफी मागून टाकावी. पाठीत खंजीर खुपसला की तो छातीतून बाहेर येईलच असं नाही. पण खिडकीबाहेर सिगरेटी टाकल्या की न्युटनच्या कृपेनं त्या खाली येणारच ही काळ्या दगडावरची रेघ. सॅन्डीला रागाच्या भरात आपण त्याच्या सिगरेटी फेकून दिल्या हे कळालं की काय या विचारांनी पॅडी सॉलीड अस्वस्थ झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला न्युटनचा येतो त्याहून किती तरी जास्त राग पॅडीला त्या मिनिटाला आला. आय-झ्यॅक-न्यु-ट-न. पॅडीनं लगेच प्लॅन-बी तयार केला. माफी सोबत सिगरेटची किंमत सॅन्डीला देऊन टाकायची. एक सिगरेट रु. १.५० तर ३ सिगरेटला किती? आधी पॅडी गोंधळला. एक सिगरेट रु. १.५० की रु. २.५०? की रु. ३.५०? मग त्याला लॉ ऑफ ऍव्हरेज आठवला. एक सिगरेट रु. २.५० तर ३ सिगरेटला किती? पॅडीला आपण शेवटचं त्रैराशिक कधी सोडवलं होतं हेच आठवत नाही. मनातल्या मनात त्यानं कॅल्क्युलेटरच्या मायला घाण घाण शिव्या दिल्या. आपण हाता-पायांची बोटं वापरुन काही तरी मोजायचो हे आठवुन त्याला थोडा दिलासा मिळाला. आपल्याला दारु प्यायला बसण्याआधी बोटं नक्की होती हे ही त्याला आठवत असतं. कधी आकाशातल्या तारयांकडे, कधी स्वतःच्या बोटांकडे बघून मनाशी पुटपुटणारा पॅडी बघून सॅन्डीला आळु पिक्चरमधला काके आठवला. त्यानं परत पॅडीला ढोसून विचारलं " अबे तुला काय वाटतं, डोलीनं असं का केलं असेल?"

आपल्या पापाला अजूनही वाचा फुटली नाही याचा आनंद लपवत पॅडी जागचा उठला. भिंत अजूनही चालत नसते पण पॅडी झुलत असतो. पॅडीनं डोळे कोरडे केले, घसा साफ केला आणि मोठ्या नाटकी आवेशात त्यानं कधी तरी वाचलेलं घडघडा बोलून दाखवलं

He was my friend, faithful and just to me:

But Brutus says he was ambitious;

And Brutus is an honourable man….


"च्यायला भारीए रे हे. म्हणजे काय?"

"काय की बॉ. शेक्सपिअरचं आहे. कधी तरी वाचलं होतं"

"हं...यू लव्ह शेक्सपिअर हं?!..."

"आय लव्ह शॅन्डी ऍन्ड आय लव्ह शेक्सपिअर"

"तसं नाय काही. यू लव्ह सॅन्डी ऍन्ड यू लव्ह सेक्सपिअर."

सॅन्डीच्या जोकवर दोघंही सिरीअलमधल्या रावणासारखं हाहाहाहा असं गडगडाटी हसले.

पॅडीला वाटलं हा जोक मीरेला सांगायला पाहीजे. मीरेला की अनिलाला? पॅडीला काहीच कळत नाही. पोरांच्या पोटातल्या दारुची वाफ मेंदूत पोचल्याचं कळताच वाफेच्या इंजिनासारखी भिंत आपोआप चालायला लागली.

भिंत चालत चालत सॅन्डीच्या गावापर्यंत जाते आणि त्याच्या बापाला साद्यंत वृतांत सांगते. भिंतीवर खालच्या बाजुला एक छोटी चांदणी काढून अत्यंत बारीक टायपात लिहीलं असतं "संजय"

सेमिस्टर संपलं तसं सॅन्डीच्या बापानं सॅन्डीचा बाडबिस्तरा गावातल्या लोकल कॉलेजात हलवला.


अजूनही गदगदून आलं की पॅडी सॅन्डीच्या रिकाम्या पलंगाकडे पाहून खच्चून हाक देतो "सॅन्डी, भाड्या कुठंयस तू?"





पुढला भाग: अपुर्णांकाची अवतरणे- ।४/४।-टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ

Comments

Megha said…
ha ha ha mastaaa. bhari zalay he pan..kay pan zyak lihilay...aata last part pan asach laukar post kar..kiti havrat aahot na aamhi..are pan aata last part kadhi vachate asa zalay...laptop direct tuzya brain la connect karata aala asta tar kiti bara zala asta...hi hi...
.....
आपली कमेण्ट ४/४ नंतर.
Anonymous said…
समवेद,
काय नाटक आहे कळालं नाही. तुमच्या ब्लॉगवर कसा आलो माहीत नाही. पण हातातली सगळी कामे सोडून अधाश्यासारखा वाचत गेलो. डोकं पार सुन्न झालं. लौकीक जगाचा पार विसर पडला.
नावापासून सगळंच निराळं. ग्रेस, जीए, महेश एलकुंचवार या सगळ्यांच मला पण आकर्षण. पण फारसं कधी वाचायला मिळालं नाही. तुमचा ब्लॉग वाचताना मात्र जणू ही उणीव भरून निघाली. अहो काय लिहीता काय तुम्ही? आवडलेले किती म्हणून सांगू? ’भंपि’ असो की ’मरा सालेहो’. ’जेजुरी’ असो की ’वसंतरावांवरचा लेख’. हॉस्टेलची वर्णने किंवा स्मिताची गोष्ट. अगदी तुमच्या लग्नाची कथा. झपाटून गेल्यासारखा वाचत गेलो. मागे आमचा डिलीव्हरी मॅनेजर येवून उभा राहिला तरी मी मंतरलेल्या अवस्थेतच. वेड. निव्वळ वेड.
त्यातून कळालं की तुम्हीही माझ्यासारखेच ERP बॅकग्राउंडवाले. मी सुरूवातीची काही वर्षे core mechanical industryमध्ये काढल्यानंतर आयटी मध्ये शिरलो अन्‌ गेली पाच-सहा वर्षे ERP मध्ये आहे. पण साहित्याचं वेड मी टिकवू शकलो नाही आणि तुम्ही ते सांभाळलंत.
पण ब्लॉग एकदम चाबूक !!!!!!!
Samved said…
धन्यवाद विक्रांत, तुम्ही लाजवता आहात...
darshana said…
great re... kasa suchata tula sagala???
next part lavakar post kar
Anonymous said…
हे वाचा. तुम्हाला आवडेल.
http://vikrantdeshmukh.blogspot.com/