गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी

बयो, चाफ्याचं वेडं मोठं जीवघेणं. मणीदार सर्पाला ही सुटत नाही सुगंधाची चटक आणि तुझं वय हे असं, बेभान. म्हणालीस, पापण्यांवर तोलेन वरचेवर एखादं फुल, अस्पर्श, म्हणजे स्वप्नही भारलेलं सुगंधी पडेल. होतं असं? पडतात अशी ठरवुन स्वप्न? तुझ्या स्वप्नात चाफा, चाफ्याच्या स्वप्नात तू. परत चाफा, परत तू. आणि मग लहान लहान होत तुमच्या प्रतिमा एक होऊन जातील. तू चाफा-चाफा म्हणजेच तू.

चाफ्याचं झाडं ही जरा अल्लडच. पानांचे बहर जेमतेम येताहेत तोवर टच्च गर्भार कळ्यांचे ऋतु पानांआडून बेबंद उलगडुही लागले. पानांची नवथर नवलाई निरखावी की कळ्यांचे गर्भार सोस जपावेत हा मोठा जीवघेणा प्रश्न. पानांवरच्या रेषांत भविष्य बघून तू म्हणालीस, कळ्यांना जपायला हवं. सावल्यांच्या दीर्घ साजणवेळी वाऱ्यावर वाहून आले असतील निळावंतीचे काही शब्द कानी, झाडांना तुझी भाषा समजते. पानांच्या कोषात कळ्यांचे संभ्रम दडून गेले.

सुर्य कलथुन जाण्याआधी आमरशी रंगाचा पट्टा ओढतो तरी कळ्या शहारत नाहीत. वाऱ्याच्या भुलीला फशी पडून त्या गंधही उधळत नाहीत. उत्कट डोळ्यांनी पाहात राहातेस तू गुणसुत्रांची मायावी मांडणी. फुलांवर इतका लळा लावु नये कधी मुली. मोह, क्षणभंगुरता आणि निर्मिती यांच्या विलक्षण त्रिमितीत अडकली असते त्यांची नियती. आणि बंदिस्त आकृत्यांमधे जगणारी माणसं आपण, चार टिंबांच्या चौकोनात किंवा अनंत बिंदुंच्या वर्तुळात. थोडं वेडं असावं लागतं माणसाला, गच्च आवाजात म्हणतेस तू, The neighbors do not yet suspect! The woods exchange a smile!

कळ्यांना फुलायला शिळी निमित्ते नकोच होती. ऋतुंचे चक्र हा उधळण रोखण्याचा फ SS क्त बहाणा. आणि आता तू देहातीत स्पर्शांनी उलगडते आहेस कळ्यांची स्वप्नलिपी.

स्पर्श म्हणजे मुळमाया. स्पर्श म्हणजे अद्वैत भाषा. स्वतःच्याही नकळत चाफा तुझ्याच दिठीत फुलत गेला.

मुळांना असु नये प्रकाशाचं वेड. त्यांनी मातीत पाय रोवून उभं राहावं शाश्वत असं काहीच नसणाऱ्या सत्यासारखं. क्षणभर चाफा सारंच विसरला. क्षणभर मग तू ही डोळे मिटले.

तू चाफ्यात अन् चाफा तुझ्यात रुजून गेला.

Comments

Megha said…
APRATEEM! dusare shabda ch nahit...
Samved said…
Thank You Megha! English lines belong to Dickson
a Sane man said…
हे इथेही लिहावं वाटलं म्हणून. मला ना एक मस्त गाणं ऐकल्यासारखं वाटतंय...सारखं ऐकत राहावं असं....अर्थबिर्थ पाहू मागाहून...लागत जातील..असं..मस्त!
संदिग्ध अर्थांचे उखाणे.... :)
मस्तच रे!
Samved said…
*Dickson-->Dickinson...Typo

Sane- yea, we discussed. :) thanks buddy. Keep singing

Neeraja- thanks
Sneha Kulkarni said…
Samved, surekh lihila aahes.
Anonymous said…
khup sunder re. intangible aahe yaatal feeling. ajun tarangtay kahitari manat..
Samved said…
स्नेहा, सोनल- थॅन्क्स. अजूनही लोकांना झाडंबिडं आवडतात (जरी पोस्ट झाडावरच असेल किंवा नसेल) वाचीन बरं वाटलं
Megha said…
parat parat vachtey...kavitach zaliye hi tar....kasa suchata?
kshipra said…
मोह, क्षणभंगुरता आणि निर्मिती यांच्या विलक्षण त्रिमितीत अडकली असते त्यांची नियती.

मुळांना असु नये प्रकाशाचं वेड. त्यांनी मातीत पाय रोवून उभं राहावं शाश्वत असं काहीच नसणाऱ्या सत्यासारखं.

मस्त.
Samved said…
ट्युलिप, यशोधरा (दर वेळी मला अवचटांच्या मुली सारखं वाटतं तुझं नाव- म्हणजे आहे तेच पण तरीही तसंच!), क्षिप्रा- सोनचाफाच तो. साधं थोडंच असतं त्याचं?

मेघा- :) कसं सुचलं? सुचलं झालं..पोस्टची वेळ बघ. पहाटे साडे बारा :))
Jaswandi said…
Sundar...Sundar.. Bhannaatt sundar
खल्लास. शब्द फुकट घालवू नयेत, पण भावना पोचवाव्यात, म्हणून केवळ.
Samved said…
जास्वंदी, मेघना- टीव्हीतल्या सारखं सांगायचं तर मी तुमचे आभार करतो
Pradeep's said…
Mast re Samved , aaj tujha blog vachala :) tu khoop sahi lihitos. tu baravi la astana alka vahinikade apan bhetlelo :) Laturla.