वैती

आज वैती दरबारात उभी होती. अंगावरच्या वस्त्रांच्या चिंधुकल्या सावरल्या तरी विखरुन जातील अश्या विसविसलेल्या. विशेष प्रसंग म्हणून मध्यरात्री भरवलेला दरबार आणि त्यातले खासेच मानकरी वृद्ध डोळ्यांनी वैतीवर चोरुन कटाक्ष टाकत होते. शरीराच्या गरजा भुक आणि हव्यास यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात, ज्ञानी अमात्यांच्या मनात नकळत चोरटा विचार आला. सरावाने कमावलेला कोडगेपणा क्षणभरासाठी कमी पडला, पण क्षणभरच. अमात्य दुसऱ्या क्षणी कर्तव्यकठोर प्रधानाच्या भुमिकेत शिरले. आणि आवाजातला करडेपणा न लपवता त्यांनी हलकेच हा दिली "वैती"
राजा शौनकाने आपला चिंतातुर चेहरा वैतीकडे वळवला. वैतीला पाहाताना शौनकालाही अंगभर डोळे फुटले. पण आजचा प्रसंग वेगळा होता.
"वैती, तुझ्या जंगलातून तुला शोधून आणून या अवेळ दरबारात उभे करण्यामागे काही कारणं आहेत. सुर्याचा किरणही पोचत नाही अश्या गुहांमधे राहातेस तू.जवळपासच्या वस्तीतले लोक घाबरतात तुला. तू म्हणे वशीकरण जाणतेस. पशु-पक्ष्यांना त्यांच्या भाषेत बोलतेस. वस्तीतली तरुण मुलं जंगलात चुकली की तुझी भुल पडते त्यांना. त्यांना कैद करतेस तू तुझ्या चित्रांमधून आणि असंबद्ध गाण्यांतुन. गावात परत आले तरी त्या मुलांची भुल उतरत नाही. तुझ्या नजरबंदीची जादु उतरत नाही."
"कुणी खरंच रस्ता चुकतं तर कुणी सरावाचा रस्ता चुकवुन जंगलात येतं." निर्भीड आवाजात वैती उत्तरली "माझी भाषा ज्यांना कळते, त्यांना असंबद्ध गाण्यातले सुर उमगतात, रेषांमधले अंधार उजळुन मिळतात. गावात जाऊन मग ती त्यांची गाणी करतात, शिल्प करतात, चित्र करतात किंवा मुकाट मनात तरंगांचे गान करतात. त्यांना त्यांचे डोह सापडवुन देणं हे माझं प्रारब्ध. बुडणे वा तरणे हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न."
अमात्यांनी नकारार्थी मान हलवली. कुमारांना असले शौक नव्हते.
धीर एकवटुन अमात्यांनी विचारलं "वशीकरण जाणतेस तू?" कुमारांना वैतीच्या जंगलात घुटमळताना बघितल्याची स्वारांची खबर होती...
वैतीचं जंगल अजून गडद झालं.
शरीर असतंच, शरीराला भुक असते, भुल असते आणि मोहही असतो. निती-नियमांच्या चौकटी वेशीबाहेर पडलं की कश्या कोसळतात हे फक्त मीच जाणते. आणि त्याहुनही तुमची वेस नकोच होती मला म्हणून तर समाजापासून लांब जंगलात एक माझं जंगल उभारलं मी. शरीर असतंच महाराज आणि निर्मितीच्या अवघड क्षणी देहाला शरण जाणं ही असतं. स्वतःच असं जंगल असणं तसही फार टोकाचं असतं.
"तुमचे कुमार हरवलेत? जंगलात?" मनातली सगळी आंदोलनं झटकुन वैतीनं प्रश्न केला. सतत वेड्या माणसांसारखी आतच आत कोडी सोडवु नयेत इतपत व्यवहार ज्ञान तिनं मिळवलं होतं. कानांवर उडत उडत आलेल्या अफवांना तिनं नुस्तं प्रश्नचिन्ह चिकटवलं होतं आत्ताच.
दरबारात कुजबुजीचं पीक पिकलं. गेले कित्येक दिवस कुमार, या राज्याचा वारस, बेपत्ता होता ही फक्त खास्यांनाच ठाऊक असणारी बातमी या जंगली पोरीलाही माहीत होती? की लोक म्हणतात तसं भविष्य दिसतं हिला? की कुठल्या पक्षानं सांगीतलं हिच्या कानात? कुमारांचे शौक तसे पिढीजात...हिच्या रंगीत देहाच्या भुलीत फसणंही फार अशक्य नव्हतं त्यांच्यासाठी.....
"कुमारांना पाहीलसं तू?" एकमेकांना जोखण्याच्या खेळाचा विलक्षण कंटाळा येऊन उद्वेगाने शौनकाने थेट प्रश्न विचारला "कुमार आले होते तुझ्याकडे? तुझं तारुण्य, तुझं गुढं, तुझं शरीर निव्वळं एक रमल आहे, लोक म्हणतात.... फशी पाडलसं तू माझ्या मुलाला...?"
"महाराज, देह हेच अंतीम सत्य असतं?" स्वतःच्याही नकळत वैती जंगलात शिरली
कित्येक वर्षांपुर्वी हाच प्रश्न अमात्यांनी ऎकला नव्हता काय? तो प्रसंग आजच्यापेक्षाही खाजगी आणि नाजुक होता..
************************************************************************************* राणीवशातल्या दासीनं शौनकाला जे सांगीतलं ते खोटं ठरतं तर दासीचं काळीज महाराज स्वतःच्या हातांनी हासडते.
सुकन्या महाराणी राजाशी एकनिष्ठ नाहीत हे सांगताना दासीची जीभ न झडते तरच नवल. एकनिष्ठ आणि विश्वासातल्या अमात्यांना तेव्हढं घेऊन करायची तेव्हढी चौकशी महाराजांनी केली. हल्ली सुदेव पंडीताची राणी महालात जास्त लगबग महाराजांनीही टिपली.
"तुम्हाला काय कमी आहे म्हणून तुम्ही सुदेव पंडीताच्या कच्छपी लागावं?" आवाजाच्या मर्याद्या सांभाळत शौनकानं विचारलं
"आमच्यात काय कमी म्हणून आपण रितसर चार लग्न केलीत महाराज?" महाराणी कसल्याश्या अजब निश्चयासह बोलत होत्या
"या राज्याला आपण वारस दिला नाहीत महाराणी"
"या राज्याला अजूनही वारस नाही महाराज"
अमात्यांनी शौनकाच्या तलवारीची मुठ न धरती तर अनर्थ होता.
नखाखाली मुंगी मरावी तसा सुदेवपंडीत एके दिवशी पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली टिचून मेला. आरोप ठेवले की प्रत्यारोप आले, न्यायनिवाडाही आला. वेडेपणाला धरबंध नसतो हे तसं फार सोईस्कर. मरण्याआधी शौनकाचा निर्वंश होण्याचा सुदेवाचा शाप सुकन्येने कोरडेपणाने पचवला. बाईपणाच्या चक्राकार कोड्याचा मध्य काय हे तिला स्वतःला कधीच ठरवता येत नाही सुकन्येला पुन्हा तिच प्रचिती आली.
************************************************************************************* वैतीनं सोबत आणलेली झाडाची साल जमिनीवर पसरवली. जीव वाचवुन इथून निघायचं तर काही समजांनां वाढवायला हवं. चित्रलिपीतून कुमारांचा शोध घेण्याचा नजरबंद प्रयोग वैती भर दरबारात करणार होती.
पळसाचा लालभडक रंग, गवतचुऱ्याचा गर्द हिरवा अन वैतीच्या पोतडीतून असे असंख्य रंग निघत राहीले. बोटांनी वैती रंगाचं गारुड पसरवत राहीली. झाडं, मनुष्याकृत्या, रंग-सावल्यांचे असंख्य खेळ वैती मनापासून मांडत होती.चित्रातलं जंगल वैतीवर चढू लागलं. रंगवताना ती स्वतःचं अस्तित्व आणि काल-स्थलाच्या मर्याद्या विसरुन गेली.
************************************************************************************* ऎन मध्यरात्री अमात्य सुकन्या महाराणींना घेऊन ज्यावेळी जंगलातून जात होते, त्याच वेळी इकडे त्यांच्या महालाला लागलेल्या आगीत राणीविषयी महाराजांचं मन कलुषित करणारी दासी जळून मेली. महाराणींच्या मरणाचा शोक शौनकाला आणि इतर दासींना अनावर झाला होता. मेलेल्या दासीच्या अंगावर राजदागिने चढवायची क्लृप्ती कामाला आली होती, शौनकानं विचार केला. सुकन्येला मरण तर येणार होतं पण इतकं सहजी नाही.
"अमात्य" आपलं भविष्य उमजुन सुकन्येनं रहस्याचा उलगडा केला "आम्हाला मारण्याचं पातक कराल ते ठीक पण आमच्या पोटी जन्मु घातलेल्या जीवाचा काय अपराध?"
अमात्यांनी चमकुन सुकन्येकडे पाहीलं "पण महाराज.."
"हे मुल महाराजांचंच आहे अमात्य, विश्वास ठेवा. कुणाच्या न कळत चौकटीची बंधन उधळणं आम्हाला सहज शक्य होतं. महाराज अंगवस्त्रांची गुपीतं जपतात, तशी आम्हालाही जपता आली असती. मात्र आम्ही परंपरांचा मान राखत स्वतःच्या ईच्छा-अनिच्छांचा विचार न करता शरीर फक्त महाराजांच्याच आधीन केलं. पण आपण विद्वान, आपणच सांगावं देह हेच अंतीम सत्य असतं? आम्हाला सुदेवाच्या पांडिती चातुर्याची, तल्लख विनोद बुद्धीची आणि विविध विषयातल्या सखोल ज्ञानाची भुरळ पडली. कुणी सांगावं शरीराची पडलीही नसती"
"पण आपण महाराजांना आपल्या या अवस्थेविषयी सांगीतलं का नाही? गेली कित्येक वर्षं या राज्याला वारस मिळावा म्हणून यज्ञ, मंत्र-तंत्र, होम होताहेत..."
"कट-कारस्थानं, युद्ध यातून महाराज आमच्या वाट्याला येतात ते असे किती? आणि कुणी सांगावं, बाकीच्या वांझ राण्या मंत्र-तंत्रही करतील. आम्ही महाराजांना ही बातमी सांगण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहात होतो आणि आज ही वेळ, हा प्रसंग" सुकन्या विषण्ण आवाजात उत्तरली
"अमात्य, आपण आता परत फिरलो तर? आपण सत्यकथन कराल तर महाराज ऎकतीलही"
अमात्यांचा गळा दाटून आला "महाराणी, आपल्या महालाला लागलेल्या आगीत एव्हाना कुणी जळालंही असेल. आपल्या सुतकाचे खाजगी उत्सव एव्हाना सुरुही झाले असतील. शरीर अंतीम सत्य नसेलही महाराणी पण त्याच्या अस्तासोबत अनेक प्रश्न मिटतात हे खरं"
"अमात्य, ही रत्नं, हे पाचु, हे दागिने, सारं सारं घ्या" दीनवाणेपणानं सुकन्या म्हणाली "पण अश्या अवस्थेत आमच्या हत्येचं पातक घेऊ नका अमात्य"
क्षणभर थबकुन अमात्यांनी जवळच्या शेल्यात सुकन्येचे सारे दागिने घेतले. बोटातली राजमुद्रा तेव्ह्ढी सुकन्येला परत करत अमात्य थकून म्हणाले "आपली पारखं चुकली महाराणी. पण आम्ही कर्तव्यात चुकायचो नाहीत"
************************************************************************************* वैतीनं झाडाच्या सालावर सबंध जंगल उतरवलं होतं. हिरवी तपकिरी पानं, हत्तीच्या पायागत माजलेल्या झाडांची खोडं, त्यावरुन अल्लाद लटकणाऱ्या वेली आणि साऱ्यांना छेदून जाणारा करपट लोखंडी भाला. भाल्याच्या टोकावर चितारलेलं शौनकाच्या निशाणाचं चिन्हं गर्दीतही उठून दिसत होतं. "निश्चितच" शौनकानं दोन्ही हात पाठीमागे बांधत घोषणा केली "कुमार जंगलात आहेत." वैतीचं चित्र हुबेहुब असणार, नव्हे ते आहेच. फक्त कुमार परतेपर्यंत गुप्तता पाळणं आवश्यक आहे. शौनकानं काही क्षण विचार केला आणि मागे उभा असणाऱ्या सेवकाच्या कानात काही कुजबुज केली.
थोड्याच वेळात सेवक एक मोठा घडा घेऊन आला. घड्याचं तोंड मोठ्या कसोशीनं बांधलेलं. त्यानं तो वैती समोर ठेवला.
"यात तुझं इनाम आहे. तुझं कसब आम्ही पाहीलं. अजून थोडी परिक्षा बाकी आहे. घड्यात न बघता केवळ स्पर्शानं आत काय आहे हे ओळखशिल तर जंगल तुला जहागिरीत देऊन टाकु"

साशंक नजरेनं वैतीनं घड्यावरंच फडकं बाजुला केलं आणि आत हात घातला. तलम काळा पोत एकसंध अंधार, जीवघेणा तीव्र. तिनं चुरुन पाहीला नाजुक बोटांनी आणि स्वतःच्याच स्पर्शानी शहारली. रिकामपणाचा डोह स्थिरावला तसं घड्याच्या तळाशी तिला हिवाळा सापडला. आर्त तिला गाणं सुचलं-कधीचं हरवलेलं

ती चांदण वेळच होती । चांदही थबकला होता
उन्माद फुलाचा शोषून । सर्प थरारत होता.
तो तटतटलेला माथा । डोळ्यात वीजेचा साज
श्वास म्हणावा त्याला । भासते समुद्री गाज.

वैतीचा श्वास जड झाला. शरीराचं ओझं झालं. परत परत कुणी शरीराला डसावं आणि त्याचीच चटक लागावी असा घटभारी मंतर. मोठीच गंमत असते शरीराची, वेदनेपलीकडच्या सुखाची.

एका विलक्षण नशेत वैतीनं दरबार सोडला आणि ती दिसेनाशी झाली.
अचानक झालेल्या या घटनांची संगती न लागलेल्या अमात्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्यानं शौनकाकडे पाहीलं तेव्हा शौनक उत्तरला "कुमार सापडेपर्यंत आपण गुप्तता पाळायला हवी. कोण जाणे ही पोर झाडाच्या कानात बोलेल तर वाऱ्यासोबत जगभर कुमारांच्या गायब होण्याची बातमी पसरेल. पण आता धोका नाही. ही जंगलात जाईपर्यंत घड्यातल्या सापाचं विष भिनेल हिच्या शरीरात. संथ पण मोठं परिणामकारक असतं या सापाचं विष"
"अमात्य, ते चित्र बघा. जंगलाचा कुठला भाग असेल असं वाटतं ते पाहा आणि सैनिकांच्या तुकडीला घेऊन जंगल पिंजून काढा" शौनकानं अतीव समाधानानं आज्ञा सोडली.
अमात्यांनी चित्र निरखुन पाहीलं आणि नकळत त्यांच्या तोंडून अस्फुट किंकाळी बाहेर पडली.

एव्हाना चित्राचे रंग वाळले होते.
हिरवी तपकिरी पानं, हत्तीच्या पायागत माजलेल्या झाडांची खोडं, त्यावरुन अल्लाद लटकणाऱ्या वेली, साऱ्यांना छेदून जाणारा करपट लोखंडी भाला. आणि भाल्याला एखाद्या वेलीसारखा लगडुन लख्ख निळाशार सर्प. गुंजासारखे लाल त्याचे डोळे भाल्याच्या टोकाला टोचलेल्या पौरुषाला जणु संमोहित करत होते. आकाशाच्या निळ्या धुक्यात कुमारांचा चेहरा हलकाच लपून गेला होता

अमात्यांनी चार सैनिकांना घेऊन जंगलाकडे धाव घेतली
************************************************************************************* कुमारांनी मोठ्या प्रयत्नांनी वैतीची गुहा शोधून काढली होती. तिच्या असंख्य कहाण्या आणि तिच्या देहाचं गारुड यांची त्यांना भुरळ पडली होती. अजिंक्य असलेलं तिच्या देहाचं चक्रव्युह त्यांना भेदायचं होतं.
मद धुंद असल्यागत चालत येणारी वैती कुमारांनी पाहीली आणि त्यांच्या शरीराचे रोखलेले बांध तट्तटा तुटले.

वैतीला वाटलं आपल्या डोळ्यांवर कुणी चढलय. घड्यातला अंधार अंगभर पसरलाय. उष्ण-थंड समुद्री लाटा अंगभर आदळाताहेत.
परत परत कुणी शरीराला डसावं आणि त्याचीच चटक लागावी असा घटभारी मंतर. मोठीच गंमत असते शरीराची, वेदनेपलीकडच्या सुखाची.

थरथरले क्षणभर सारे । तो अजिंक्य अजिंक्य होता
धुंदीत परत मग फिरला । तो सर्प देखणा होता.
मी ओतप्रोत निलकांती । क्षण अनंत मग कैफाचे
ओठांनी टिपले होते । लावण्य निळे सर्पाचे.
************************************************************************************* अमात्यांनी वैतीच्या गुहेत प्रवेश केला तेव्हा पहाटेच्या फटफटत्या उजेडात त्यांना निळेजार पडलेले वैती आणि कुमारांचे निष्प्राण देह दिसले.
...आणि वैतीच्या बोटात काळी पडलेली सुकन्येची राजमुद्रा.

Comments

अप्रतीम!!! ती कविता तर खूपच आवडली..आपलीच आहे का अजून कोणाची? पूर्ण कविता मिळू शकेल?
Samved said…
Thanks Swati, AAshlesha.

It's my poem n it's complete...you need to view it differently. here it goes in original format

ती चांदण वेळच होती
चांदही थबकला होता
उन्माद फुलाचा शोषून
सर्प थरारत होता

तो तटतटलेला माथा
डोळ्यात वीजेचा साज
श्वास म्हणावा त्याला
भासते समुद्री गाज

थरथरले क्षणभर सारे
तो अजिंक्य अजिंक्य होता
धुंदीत परत मग फिरला
तो सर्प देखणा होता

मी ओतप्रोत निलकांती
क्षण अनंत मग कैफाचे
ओठांनी टिपले होते
लावण्य निळे सर्पाचे
Abhijit Bathe said…
Samved -

sahee hai man!
Looks like after 4 long years you are finally getting somewhere.
kshipra said…
mast. kavita pan
a Sane man said…
वेल्हाळ आणि addictive!
a Sane man said…
आणि हो, कविता विशेष वेल्हाळ आणि addictive.
Samved said…
बाठेला त्या दिवशी सांगत होतो, कविता फार आधी लिहीलेली, इंजिनिअरींगला असताना. च्यामारी, झाली की १४ वर्ष! आणि त्यावर गोष्ट गेले कित्येक महीने चढत होती. तिचा फॉरमॅट आणि भाषा दोन्ही गोष्टीच्या सांगाड्यावर काही केल्या चढत नव्हते. अशी तशी लिहून पाहीली पण छे. शेवटी बासनात बांधून टाकून दिली. मग एक दिवस सगळंच सुचलं आणि पुढे जायला मी मोकळा झालो
Anonymous said…
Awesome...!!!
Anonymous said…
Awesome..!!
Samved said…
Thanks गायत्री
Sachin said…
... म्हणजे I am crushed.
मला haunting वाटले आणि एखादी जीव जाळणारी चीज वाचली कि हूर्हूरीचा जो अनुभव येतो तो आला. १५ दिवस या ब्लॉग ने झपाटले आहे. त्यावरची हि cumulative प्रतिक्रिया. असाच अनुभव तुमच्या "सुनी", "वजा लसावि", "बॅन्डीट क्वीन आणि रणरणतं ऊन"
आदि पोस्ट्स वाचताना आला. प्रकाशक असतो तर तुमचा, त्या श्रद्धा, गायत्री, मेघना, ज्ञानदा, निमिष, अभिजित यांचे ब्लॉग निवडक कॉमेंट्स सह जसेच्या तसे छापले असते आणि एखादी मस्त ब्लॉग सेरीज काढली असती. { खरे साहित्य कुठे कुठे फळ-फळत असते :-) } तुम्ही सातत्य ठेवले आहे हे एक भारी. नाहीतरी काहीजणांना माझा शाप लागणार आहे!
Samved said…
थॅन्क्स सचिन!