Sunday, March 27, 2011

अनु का बाई सु अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया

यत्ता सहावीतला चि. सव्यसाची बुक्कलवार वर्गभेदाचा बळी पडला म्हणणं म्हणजे जगाला प्रेम अर्पावे ही वैषयिक कविता आहे म्हणण्यासारखंच झालं. पण चि. सव्यसाचीच्या मते तरी तसंच झालं होतं. परंपरागतरित्या अ, ब, क आणि ड तुकड्यांना काही अर्थ होता आणि दुसऱ्या गावाहुन बदली होऊन आल्यानंच आपण ड तुकडीत ढकलले गेले आहोत हा त्याचा ठाम समज शाळा सुरु होई पर्यंत राहाणार होता. ऎन उन्हाळ्यात नव्या गावात यावं लागल्यानं शेजारच्या बंगल्यातली लिला देशपांडे सोडली तर त्याची कुणाशीही ओळख होऊ शकली नव्हती. "पाचवी-सहावीतली मुलं तुम्ही. कसलं मुलगा-मुलगी करता रे?" असं आईनं दहावेळा वैतागुन म्हटलं तरी लिला देशपांडे ही मुलगीच आहे या बद्दल चि. सव्यसाचीला तिळमात्र संशय नव्हता. ती फ्रॉक घालायची, तिच्याकडे चेंडु-बॅट ऎवजी बाहुल्या होता आणि ती मठ्ठासारखी पुस्तकं वाचायची तरीही तिच्याशी खेळण्यावाचून पर्याय नाही हे कळून चि. सव्यसाचीला अव्यक्त दुःख झालेलं. पण एक दिवस त्यानं पुढाकार घेऊन जमेल तेव्हढं मऊ आवाजात लिला देशपांडेला म्हटलं"ही बघ तुझी बाब्री. मी तिला डॅन्सच्या स्टेप्स शिकवत होतो तर हिचा हात बघ नां. काई तरी झालं..." पुढच्या काही सेकंदात चि. सव्यसाचीला अनुक्रमे डोक्यावर बारकासा आघात, कानात मोठ्ठा घंटानाद आणि चेहऱ्यावर मार्जार-खुणांची जळजळती आग असे साक्षात्कार झाले. अपघातानंतर जेव्हा चि. सव्यसाची भानावर आला तेव्हा त्याच्या चुकांची उजळणी झाली, बाहुली ही बाहुली नसते तर ती फ्यॅम्ली मेम्बर असते आणि तिचं नाव बाब्री नसून बार्बी असतं, ती लग्नाची बार्बी असल्यानं ती डॅन्स करणार नसते आणि सर्वात वाईट म्हणजे तिचा हात नुक्ताच मुळापासून उखडुन निघालेला असतो. लिला देशपांडेनं या गुन्ह्यासाठी त्याला कधीच माफ केलं नसतं. पण ती चि. सव्यसाचीहुन तब्बल एक वर्षानं मोठी असल्यानं नव्या शाळेत जाताना त्याला सोबत घेऊन जाणं ती टाळु शकत नव्हती. तसा तिच्या आईचा आदेशच होता मुळी. गावातला मोठा चौक ओलांडताना लिला देशपांडेनं जेव्हा त्याचा हात धरला तेव्हा चि. सव्यसाची प्रचंड अस्वस्थ झाला. नव्या गावात त्याला कुणी ओळखत नव्हतं म्हणून ठीक.
शाळेच्या रस्त्यात लिला देशपांडेनं त्याला फारचं महत्वाची माहिती सांगीतली. त्यांच्या शाळेची म्हणे फाळणी झाली होती; जुनी शाळा आणि नवी शाळा. जुनी शाळा गावात, लहान जागेत होती आणि नवी शाळा शाळेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत होती. तिला मोठं ग्राऊंड होतं पण ती जर्रा गावाबाहेर होती. जुन्या गावाबाहेर जे नवं गाव होतं तिथं नवी शाळा होती आणि त्यात बहुतेक नव्या गावातली नवी मुलंच होती. चि. सव्यसाची नव्यानव्यानं गडबडुन गेला. "पण लक्षात ठेव, जुनी शाळा हीच खरी शाळा. आपल्या देशाचा, गुरुजनांचा आणि शाळेचा मान राखावा. तुला शिकवतीलच. लहान आहेस अजून" लिला देशपांडेच्या शेवटच्या वाक्यानं नाही म्हटलं तरी चि. सव्यसाची दुखावला गेला. "आणि एक, तू ड मधे आहेस नां? हे बघ, अ म्हणजे फक्त हुशार मुलींचा वर्ग, ब म्हणजे फक्त मुलांचा वर्ग. हे नव्या शाळेत आहेत. क आणि ड जुन्या शाळेत आहेत. क मध्ये फक्त मुली आहेत आणि ड मध्ये हुशार मुली आणि मुलं मिक्स आहेत" मुलांचं नीट वर्गीकरण करत लिला देशपांडेनं सांगीतलं. थोडक्यात हुशार मुलं ही संरक्षित प्रजाती असून ती दुर्मिळ आहे आणि त्यांची हुशारी कायम ठेवण्यासाठी त्यांना ड वर्गातल्या हुशार मुलींसोबत ठेवावं लागतं हे लिला देशपांडेनं चि. सव्यसाचीच्या मनावर यशस्वीपणे बिंबवलं.
अशी पराभुत मनोवृत्ती घेऊन चि. सव्यसाची वर्गात आला तेव्हा त्याला वाटलं त्याच्या विपरीत त्याला पुढचं बाकडं बसायला मिळालं. पण त्याचं कारणही उघड होतं. पुढच्या चार बाकड्यांवर चार गुणिले पाच अश्या एकुणात सबंध वीस मुली होत्या. त्यांच्या मागच्या बेंचवर चि. सव्यसाची बसवला होता.
"अबे, क्लास्टीचर कोणये बे?" बाजुचं पोरगं फिसफिस्लं. तो ही नवा होता हे चि. सव्यसाचीला नंतर कळालं.
उन्मेष बेतुरकर ज्यांना शाळेत सगळेजण उन्मेष सर म्हणायचे ते क्लास-टीचर आहेत कळाल्यावर जुन्या पोरा-पोरींमधे उत्साहाचं वातावरण पसरलं. उन्मेष सर गणित भारी शिकवायचे आणि सोबतीला त्यांच्या वर्गाची गॅदरिंगला जय्यत तयारी करुन घ्यायचे त्यामुळे त्यांच्या वर्गाचं दरवर्षी चांगलं नाव व्हायचं. उन्मेष सरांच्या स्वभावाची झलक नव्या वर्गाच्या ओळख परेडीतच मिळाली. त्यांनी ताबडतोब सगळ्या पोट्यासोट्यांना घरगुती करुन टाकलं. काहीच दिवसात चि. सव्यसाची बुक्कलवारचा रितसर बुकल्या झाला, त्याच्या बाजुच्या नव्या मुलाचं नामकरण नित्या झालं, खो खो खेळणाऱ्या सदानंद मिटकरीचं मिट्या आणि सतत डोळे उघड-मिट करणाऱ्या मुदकण्णाचं मिचमिच्या असं नाव पडलं. मुली तश्या नशिबवान, वैशालीचं वैशे आणि मंजुशाचं फक्त मंजे झालं.
"बुकल्या, तू कश्याला रोज त्या पोरीसोबत येतोस बे?" फारुक उर्फ फाऱ्यानं मधल्या सुटीत डबा खाताना विचारलं आणि त्यावर नित्या, मिट्या सगळेच फिस्सकन हसले. "चौकात घाबरत असलं तो" कुणीतरी म्हणालं अन सगळेच एकदम फुटले. खजील आवाजात बुकल्या जमेल तेव्हढा जोर आणून म्हणाला "आपण नाई कुणाला घाबरत, ऎरक्ताची शप्पत." "नक्की नाई?" नित्यानं विचारलं "निळ्यासारखं समोरच्या पोरीला गुच्चा ठेवून दाखवशील तर खरं...."
बुकल्या दोन पोर सोडून त्याच्याच बाकड्यावर बसलेल्या निळकंठाकडे लक्ष देऊन पाहात होता. त्याच्या बाकड्यासमोर पोरींच बाकडं होतं. बाकड्याबाहेर आलेलं पाठीचं कुबड, त्यावर कुणाच्या भिस्स वेण्या तर कुणाचे तरी गजरे लोंबत होते. दोन तासांच्या मध्ये सर यायला अजून वेळ होता तेव्ह्ढ्यात निळ्याचं पेन खाली पडलं. दोन बाकड्यांमधे अंतरच इतकं कमी होतं की निळ्या पेन घ्यायला खाली वाकला अन त्याचं टणकं डोकं समोरच्या सुरेखा साळुंकेच्या पाठीत धाप्पकन आपटलं. कळवळुन तिचा जीव वर आला. मधल्या सुट्टीत मिट्या, नित्या, फाऱ्या सगळ्यांनी निळ्याभोवती गराडा घातला. "मायला" दर वाक्यागणीक एक शिवी असं गणित असलेला मिट्या म्हणाला " ती साळुंके पोरींची मॉनिटर काय झाली, टर्टर वाढलीचे तिची. बघितलनं, मोरे सर आपलं चुकलं की उलट्या हातावर फुटपट्टीनं हाणतात आणि साळुंकी मात्र फेव्हरेट. तिला नुस्तंच ’पुढच्या वेळी निट करा साळुंकेबाई’ असं...पोरी म्हणजे तापे नुस्ता" आपण मुलीशी कधीच लग्न करणार नाही अशी भीषण प्रतिज्ञा मिट्यानं तसल्या लहान वयात केली होती.
मिट्याचं स्फुर्तीदायक की काय म्हणतात ते तसलं भाषण ऎकून सगळ्यांनाच त्वेष चढला. यापुढे शिवाजीला जसे मुगल तश्या पोरांसाठी पोरी म्हणजे कट्टर वैरी हे जणु ठरुनच गेलं. निळ्यासारखं बुकल्यानं त्याच्या समोर बसणाऱ्या अनुसुया पवारचा बदला घ्यायचा असं ठरलं. मिट्याच्या मते अनुसुया पवार ही गणितात डुंबणारी लठ्ठ म्हैस होती. ती भराभरा गणितं सोडवायची आणि बाकीच्या पोरांना मग भाषण ऎकावं लागायचं. प्रत्यक्ष मिट्याला तिच्याकडून एकदोनदा वही तपासुन घ्यावी लागली होती. गणिताच्या दातेबाईंचा आग्रहच होता तसा.
बुकल्यानं हातातली वही खाली टाकली, इकडे तिकडे पाहात तो धाडकन खाली वाकला. अनुसुया पवारची पाठ आता येईल मग येईल असा विचार करत असतानाच त्याचा शब्दशः कपाळमोक्ष झाला. अगदी ऎनवेळी अनुसुया पवार पुढे सरकली आणि बुकल्याचं डोक बाकड्याच्या काठावर आपटलं. "मंजे, काळ-काम-वेगाची गणितं नीट कर हो बाई" अनुसुया पवारचा खवट आवाज बुकल्याच्या कानात स्पेशल ईफेक्ट सारखा घुमत होता "ऎन परिक्षेत नाही तर म्हणशील, आमचं कपाळच फुटकं...या चाचणीच्या सिल्यॅबस मधे आहे तो च्पाटर"
बघता बघता अर्ध वर्ष निघून गेलं. शाळेत गॅदरिंगचं वारं पसरलं. उन्मेषसरांनी ठराविक मुलांची मिटींग बोलावली. "आपल्याला या वर्षी खो-खोची ट्रॉफी मिळालीच पाहीजे. गेल्या वर्षी ब तुकडीकडून तुम्ही वाईट हरला होतात, मला आठवतय. हा मिट्या सोडला तर साधे नियमही ठाऊक नव्हते कुणाला. यंदा नवी टीम बनवु, प्रॅक्टीस करु. आणि जिंकून दाखवु"
आठवड्याच्या आत पॉलिटेक्निकच्या ग्राऊंडवर पहाटे पाचला पोरं प्रॅक्टीसला जमु लागली. मिट्या कॅप्टन आणि नित्या उप-कॅप्टन बनला. दोघांनाही सगळे नियम पाठ होते. उघड्या पायांनी ग्राऊंडवर पळताना खडे बोचले की देव आठवायचे पण स्वतः उन्मेषसर हजर आहेत म्हटलं की पोरांमधे दहा हत्तींचं बळ यायचं.
प्रत्यक्ष खेळ सुरु झाले आणि शाळेत उत्साहाचा वारु बेलगाम दौडु लागला. कब्बडी, लंगडी, मल्लखांब, धावणे एक ना अनेक स्पर्धांचं नुस्तं मोहळ उठलं. नव्या शाळेच्या ग्राऊंडवर स्पर्धा असल्यानं तिथली पोरं-पोरी फुकट भाव खात होती. स्पर्धेगणिक जुने विरुद्ध नवे असे वाद उफाळुन यायला लागले. कधी नव्हे ते लहान-मोठे वर्ग विसरुन जुन्या-नव्यांचं घोषणांच युद्ध सुरु झालं.
वर्ग सजावट स्पर्धेत बुकल्याचा वर्ग सजवताना पाचवी ड तल्या पोरांनी पताका कापून चिकटवल्या तर लिला देशपांडेनं सहावी क च्या मुलींची समुहगायनाची प्रॅक्टीस करुन घेतली. एकूणात स्पर्धा नवी विरुद्ध जुनी शाळा अशी सुरु झाली होती. स्पर्धांमधे जे मागे पडत होते ते आपल्या शाळेच्या बाकीच्या वर्गांना मदत करयाला पुढे सरसावले होते.
बघता बघता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली. सहावी ड विरुद्ध गतवर्षीचे विजेते सातवी ब यांची खो-खोची फायनल मॅच लागली. मिट्यानं अप्रतिम पोल मारले आणि तीनेक गडी टिपले. उजवा पाय पुढे घेत डाव्या हातानं पोलचं टोक धरायचं आणि पोलवर शरीर तोलत झपकन दुसऱ्या बाजुला झुकून पलीकडचा गडी टिपायचा. मिट्यानं प्रॅक्टीसच्या दरम्यान हे अनेकवेळा केलं होतं. आजही त्यानं उन्मेषसरांना निराश केलं नव्हतं. प्रयत्न करुनही बुकल्याला प्रॅक्टीसमधे पोल मारायला कधीच जमलं नव्हतं. त्याचा दरचवेळी फाऊल व्हायचा. नित्याला पोल मारणं तितकं सफाईनं जमायचं नाही. पण तो सॉलीड पळपुटा होता. बुटका असल्यानं नुस्ता खाली वाकला तरी सातवी ब च्या पोरांच्या हातातून तो निसटुन जायचा. शेवटचे ३ गडी राहीले असताना नित्याला खो मिळाला आणि त्याच्या समोर असलेल्या पोरावर त्यानं डाईव्ह मारला. शेवटची पाच मिनिटं उरली होती आणि सातवी ब ची दोन टाळकी अजूनही जीव खाऊन पळत होती. बुकल्याला खो मिळाला. त्यानं मान खाली घातली आणि सरळ रेषेत तो उठला. सरळ उठशिल तर कुठल्याही बाजुला वळता येईल, मिट्यानं त्याला प्रॅक्टीसच्या दरम्यान सांगीतलं होतं. समोरचा पोरगा कधी उजवीकडे तर कधी डावीकडे झुकत चांगलीच हुल देत होता. अजूनही बुकल्यानं दिशा ठरवली नव्हती. कुणीतरी काऊंट-डाऊन करत होतं आणि मैदानावर सण्ण शांतता होती. "बुकल्या डाईव्ह मार" बाहेरुन कुणीतरी सणसणीत ओरडलं. बुकल्यानं लक्षच दिलं नाही. पडलं की आपल्याला चांगलच लागत हे तो स्वानुभवावरुन ओळखुन होता. इतक्यात बुकल्याला झुलवण्याच्या नादात सातवी ब चं ते पोरगं रेषेबाहेर गेलं आणि फुकटंच आऊट झालं. प्रचंड ओरड्यात आणि शिट्यांमधून देखिल दोन मिनीटं उरल्याचं बुकल्याला कळून गेलं. त्यानं उजवीकडे वळून दिशा पकडली. "जिंकुन जिंकुन जिंकणार कोण? जुन्या शाळेशिवाय दुसरं कोण!" तसल्या गोंधळातसुद्धा लिला देशपांडेचा आवाज सॉलीड घुमला. उन्मेषसरांनी डोळे वटारुन पाहील्यावर तिनं लगेच सुधारणा केली "जिंकुन जिंकुन जिंकणार कोण? सहावी ड शिवाय दुसरं कोण!"
"बुकल्या घेऊन टाक. बुकल्या देऊन टाक. सबसे आगे बच्चे कौन? जितेगा भाई जितेगा...." शेवटच्या मिनीटात घोषणांच जणु युद्ध सुरु झालं होतं. बुकल्याला चकवुन शेवटचा गडी दुसऱ्या बाजुला जात होता. आता खो दिला तरच हा टिपला जाईल हे ओळखुन बुकल्या आत वळला आणि त्यानं तोल सावरायला म्हणून लांब केलेल्या हाताला पलीकडचं सावज अलगद लागलं. लांब हात असणारी माणसं थोर नशीबाची असतात असं बुकल्याची आई नेहमी म्हणायची, त्याला विनाकारण आठवलं. मैदानावर जुन्या शाळेच्या पोरांनी धमाल गोंधळ घातला होता. तब्बल तीन वर्षांनी जुनी शाळा जिंकली होती.
"ए सव्या, इकडे ये" लिला देशपांडेनं गोंधळ थोडा ओसरल्यावर बुकल्याला कोपऱ्यात बोलावलं "छान खेळलास हं. तुझ्या मित्रांनाही सांग. आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान वाटला" एका डोळ्यानं पलीकडे उभ्या असणाऱ्या मिट्या, नित्याकडे बघत बुकल्या लाजून "थ्यॅन्कु थ्यॅन्कु" म्हणाला. "तुम्ही खेळत होता तेव्हा तिकडे तुमच्या वर्गाला बाय मिळत मिळत तुमच्या वर्गातल्या मुलीदेखिल खो खोच्या फायनलला पोचल्यात. त्या बिचाऱ्यांना तसं काही फारसं येत नाही. शिवणापाणी खेळल्यासारख्या पळतात बिचाऱ्या. तुम्ही मदत कराल तर त्याही जिंकतील. शिकवाल त्यांना? उद्या त्यांची फायनल आहे..." लिला देशपांडेनं जणु वात काढलेला सुतळी बॉम्ब पेटवुन बुकल्याच्या हातात दिला.
"वेडपटैस का बे?" मिट्यानं तिथंच हिशोब संपवला "आपण आणि पोरींना मदत? जीव गेला तरी नाही" मिट्या नाही म्हटल्यावर नित्या आणि फाऱ्यानंही पाठ फिरवली. तिथंच कोपऱ्यात उभं राहून पोरी मोठ्या आशेनं वाट पाहात होत्या. "त्यांची फायनलै. नव्या शाळेतल्या अ तुकडी बरोबर. पाचवीतल्या पोरींकडून हरतील तर शेण घालतील सगळे आपल्या तोंडात" वैतागुन बुकल्या बोलला. "मग तू कर की मदत. आम्ही नाही नाही म्हणणार त्याला." फाऱ्यानं तोडगा काढला.
मुदकण्णाला घेऊन संध्याकाळभर बुकल्या वैशी, सुरेखा, मंजी, अनुसुया यांना खेळाचे नियम समजावत राहीला. केवळ वाघ मागे लागला तरच धावु अश्या शिकंदर नशीबाच्या या पोरी उद्या काय खो खो खेळतील याची चिंता घेऊन बुकल्या उशिराचा घरी निघाला. लिला देशपांडे सोबत जाताना पहिल्यांदाच त्याला लाजल्यासारखं वाटलं नाही.
उन्मेषसरांनी कंपलसरी केलं म्हणून सगळे वर्ग मुलींच्या मॅचसाठी आले होते. मैदानात खेळ सुरु होता की निबंधस्पर्धा हे कळु नये इतपत शांतता होती. ना आरडा-ओरडा ना घोषणा. केवळ बाय मिळून दोन्ही संघ फायनलला आले होते. सहावी डच्या सगळ्या पोरी बाद झाल्या आणि नव्या शाळेतल्या पोरांना अचानक स्फुरण चढलं. नेहमीचे "जितेगा भाई जितेगा.." सुरु झालं. वैशीनं सुस्त उभ्या असलेल्या दोन पोरी एका दमात टिपल्या आणि बुकल्यानं नकळत जोरदार आवाज लावला "सहावी ड आगे बढो, हम तुम्हारे साथ है" युद्ध सुरु झालं की डॊळ्यात रक्त उतरतं म्हणतात. बघता बघता सहावी ड च्या पोरी पाचवी अ ला भारी पडु लागल्या. मंजीनं पळताना समोरच्या पोरीला दणकुन ढकलला तेव्हा नित्यानं कचकचित शिट्टी मारली. शेवटची काही मिनिटं उरली तेव्हा अनुसुयाला खो मिळाला. फारसं पळावं लागु नये या हिशोबानं तिनं पोल जवळची जागा पकडुन ठेवली होती. वेगात खो देण्याची प्रथा नसल्यानं पळापळीची स्पर्धा असल्यागत पोरी नुस्त्याच पळत होत्या. "ही जाडी काय स्पीडची गणितं करत पळतै का बे?" मिट्यानं वैतागुन हवेतच त्वेषानं मुठ फिरवली. "ए अन्सुये. पकड त्या पोरीला" मिट्याच्याही नकळत त्याच्या तोंडून निघून गेलं. हाताला लागता लागता पोरगी निसटते की काय वाटलं तेव्हा पोल जवळ अनुसुयेनं खो देऊन पोरगी टिपवली. शेवटचा एक मिनीट उरला आणि अनुसुया परत कुणाच्यातरी मागे पळत होती. आता मात्र मिट्याच्या आतला कॅप्टन जागा झाला होता. मैदानाबाहेरुन उड्या मारुन मारुन तो सुचना द्यायला लागला. अनुसुया खो देतच नाहीए म्ह्टल्यावर त्यानं सरळंच आवाज लावला "अनु का बाई सु, अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया. अनु का बाई सु, अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया" न सुटणारं गणितं जिद्दीनं सोडवावं तसं अनुसुयानं शेवटी त्या पोरीला पकडला. ती पोलजवळ उभी होती. मैदानात कुणीच उतरलं नाही हे बघून तिनं मागे बघत मिट्याला म्हटलं "यांचे अजून तीन गडी राहीलेत. काय करु?" "अग बघतेस काय? त्या रेषेजवळ त्या पोरी उभ्या आहेत. त्यांना आपल्याला पळायचय हे कुणी सांगीतलं नसणार. पळ आणि तिथंच टिप त्यांना" जिवापलीकडची चपळाई दाखवुन अनुसुयेनं शेवटच्या काही सेकंदात तीन बळी मिळवले आणि मॅच संपल्याची शिट्टी झाली. मैदानभर अनु का बाई सु, अनु का बाई या- अनु का बाई अन्सुयाचा नुस्ता जयघोष झाला.
सहावी ड चा वर्ग जिंकला होता. सर्वार्थानं जिंकला होता.
काही अस्फुट रेषा नुक्त्याच पुसल्या गेल्या होत्या

8 comments:

तृप्ती said...

खूप भारी. आवडलीच एकदमच. सगळे बारकावे अगदी धम्माल आहेत.

Parag said...

Best!!!! Ekdum mast.....

Parag said...

Best!!!! Ekdum mast

Samved said...

Thanks Trupti, Parag. Well, it's almost a true story!!! :)

a Sane man said...

:) बोकिलांनंतर तूच आहेस. खर्रं!

Samved said...

सेन, काय पण! गेले कित्येक महीन्यातला बॅकलॉग लिहून निघाला या एक दोन पोस्ट्नं.........मनात असून लिहीता न येणं म्हणजे काय हा वाईट अनुभव बाबा

Meghana Bhuskute said...

(अत्यंत अपराधीपणे) मी नव्हतं हे पोस्ट वाचलं, राहूनच गेलं.
कैच्याकै झालंय.
बायदीवे - बोकील मला नाही आवडत. ’शाळा’वाले तर नाहीच. त्यामुळे बोकिलांनंतर वगैरे नाही.

Samved said...

ये मेघ्ना..हे अस्लं चालणार नै. वेळेत उठायचं, वेळेत शाळेत जाय्च तस्सं वेळेत वाचायचं सुद्धा. नाही तर फळ्यावर ३०च्या पुढचे पाढे लिहावे लागतील..