चौकटी बाहेरचं गाणं: मुझे जां ना कहो मेरी जां...


काही समज असतात म्हणजे पक्केच असतात. उदा. सिनेमातलं गाणं म्हणजे किशोर आणि लता. मापटं दाबून दाबून मी त्यात आशा बसवतोच, पर्यायच नाही. सिनेमातलं गाणं म्हणजे आर डी., सलीलदा वगैरे वगैरे. जिनिअस लोकांमधे असली प्रतवारी करायलं बसलं की तुम पुकार लो वाला हेमंतकुमार, आपकी याद आती रही वाली छाया गांगुली, लग जा गले वाला मदन मोहन, सिने मे जलन वाला जयदेव ते पार.. दिल से वाला रहमान येऊन आपल्याकडे "यू तुच्छ!" अशी नजर टाकताहेत असा सॉलीड भास होतो. तोंडावर असं सण्णकुन आपटल्यावरही जित्याची खोड जात नाही.

मग ठरवलं काही तरी सर्वसमावेश (!) करु आणि आपल्याला बिनतोड कोण आवडतं ते एकदाचं (हाय...) ठरवुनच टाकु.

निवांतात कॉम्बिनेशन्स बघायला बसलो. लता- आर डी- गुलजार, आशा- आर डी - गुलजार इ. इ. म्हटलं यातून लसावि काढू आणि वा वा....गणित आणि कला यांचा अपूर्व संगम घडवुन आणि. . हे वेडेचाळे अजून किती चालले असते माहीत नाही पण मुझे जां ना कहो मेरी जां..आठवलं आणि खेळ खल्लास झाला. जिनिअसांमधे नंबरांची उतरण कसली लावायची?

गाणं- गुलजार
संगीत- कनु राय
आवाज- गीता दत्त

मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां
जां ना कहो अनजान मुझे, जान कहां रहती है सदा
अनजाने क्‍या जानें, जान के जाए कौन भला
मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां ।।


सर्कसच्या धुवट प्रकाशात जग्लरनं सराईतपणे चेंडु हवेत फिरवावेत तसं गुलजार शब्द फिरवतो. जीवलगाची ही जीवघेणी विनवणी! सगळ्या भाषांमधे अशीनतशी शब्दांची गंमत असतेच. पण हिंदी/उर्दुला जो लहेजा आहे, जी आदब आहे, जे वजन आहे ते (कबुल करुनच टाकतो) मराठीला नाही. मराठी तशी टणक आणि प्रसंगी उग्र भाषा आहे. अर्थात आरती प्रभु वगैरेंनीं त्यातूनही नक्षीकाम केलेलं आहे ही त्यांची प्रतिभासाधना. असो. शब्दांचे खेळ खेळताना हे सिनेमातलं गाणं आहे याचं गुलजारनं कुठंच भान सुटु दिलं नाहीए. पती-पत्नीतला दुरावा जां ना कहो अनजान मुझे या एकाच ओळीत अधोरेखित करुन आख्ख्या सिनेमाचा गाभा हा असा पकडायला फार ताकद लागते. प्राण-प्राणनाथा अशी उतरंड रचताना नात्यांमधली अनोळख सारा सारीपाट क्षणार्धात उधळु शकते ही शक्यता, नव्हे, ही भिती, गीता दत्तच्या आवाजात लख्ख ऎकु येते.

हे गाणं गीता दत्तखेरीज कुण्या दुसऱ्याच्या आवाजात ही कल्पना देखील असह्य आहे. किंचित अनुनासिक, अस्पष्ट, बंगाली छापाचा गीता दत्तचा आवाज गाण्याच्या दोन-तीन मिनिटात गाण्यात भावना पाहीजे म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच आहे. गाण्याच्या सुरुवातीला मुझे जां ना कहो मेरी जां वर निव्वळ अर्धा मिलिमीटरचं हसु, जां शब्दावर अंग-बेतलेलं कंपन आणि गाणंभर पसरलेली कमालीची दुखावलेली मादकता.

सुखे सावन बरस गए
कितने बार इन आंखोसे
दो बुंदे ना बरसे, इन भिगी पलकों से
मेरी जां...

या कडव्यात दुसऱ्या ओळीत गाणं आऊट ऑफ ट्युन होण्याचं किंवा यतीभंग होण्याचं भय काय असतं हे कुठलाही गानवेडा सहज सांगु शकतो. कनु रायनं काय चतकोर-पाव सुरात ते जे काही सांभाळलय त्याला तोड नाही! या गृहस्थाविषयी आपल्याला काहीच माहिती नसावी? पाप..

तिसरं कडवं परत गुलजार आणि गीता दत्तच्या नावानं!

होंठ झुके जब होठोंपर
सांस उलझी हो सांसोमें
दो जुडवा होठों की, बात कहो आंखोंसे
मेरी जां...

दबलेल्या श्रृंगाराची अव्यक्त अनुभुती अजून किती समर्पक शब्दात सांगावी गुलजार माणसा? आणि गीता दत्तनं सांस उलझी हो सांसोमें ओळीत सांस शब्दावर जे काही चेटूक केलय ते शब्दातीत आहे.शहाण्या माणसानं लौकीक अर्थानं श्वास रोखून पुनःपुन्हा या ओळी ऎकाव्यात. प्रत्येक कडव्याच्या पहील्या दोन ओळींच्या पुनरावृत्तीत, कंपनांमधे अतीसुक्ष्म फरक आहे. पहील्यांदा येताना या ओळी किंचित आवेगाने, ठसठशीतपणे येतात. पुनरावृत्तीत मात्र हताश झाल्यागत, साशंकपणे सोडुन दिल्याप्रमाणे प्रवाही येतात. शेवटच्या कडव्यात हे प्रकर्षानं जाणवतं सांस शब्दावर. पहील्यांदा गाताना तो शब्द किंचित आत ओढून घेतलेला आहे. जिनिअस! गाण्याविषयी बोलताना पडद्यावर ते साकारणाऱ्या पात्रांना टाळायचा मी फार प्रयत्न करतोय पण या कडव्यात ते अशक्य होऊन बसलय. स्मिताविषयी लिहीताना मागं मी लिहीलं होतं की सध्या सिनेमात इतके प्रयोग सुरु असताना त्या प्रयोगांना न्याय द्यायला स्मिता आज हवी होती. संजीवकुमारच्या बाबतीत हेच वाक्य मी काना-मात्रेचा बदल न करता म्हणु शकतो. पुर्ण गाणंभर त्यानं अवघडलेपण, हरवलेपण, रितेपण अत्यंत सहजतेनं वागवलय. दो जुडवा होठों की ओळींवर मात्र त्यानं त्याचे सिग्नेचर लुक्स दिलेत. ठाकुर डोळ्यांनी बोलतो तो असा! तनुजाच्या बाबतीत म्हटलं तर अन्यायच झाला. नुतनच्या अव्वल बेंचमार्कशी तुलना आणि तिचा स्वतःचा ढांग स्वभाव यामुळे तनुजा कायमच रॉ राहीली. कुठल्याही अविर्भावाशिवाय तनुजा या संपुर्ण गाण्यात हातातुन काही तरी अनमोल निसटण्याची धास्ती, कोसळतय ते सावरण्याचे आटोकाट प्रयत्न, अवस्थ तरी आपण आखलेल्या वर्तुळाविषयी अश्वस्त भाव देहबोलीतून सहज दाखवत राहाते.

गाणं संपतं ते परत मेरी जां..च्या अवीट सुंदर समेवर. फक्त यावेळी भर पडली असते ती गीता दत्तच्या लाडीक हसण्याची...


------**********------

आपण असंख्य गाणी ऎकतो. काही बकवास असतात, काही ऑल टाईम ग्रेट असतात, तर काही क्षणिक लाडके असतात. यातही परत काही कायम काळजाच्याजवळ असतात ते विशिष्ट "चौकटीं"मुळे. ही चौकट म्हणजे ठराविक संगीतकार, गीतकार आणि /किंवा गायक-गायिका इ इ यांची युती. हा खो खो सुरु करतोय तो अश्या गाण्यांसाठी जी तुमच्या लाडक्या चौकटीबाहेरची आहेत पण तुम्हाला जवळची आहेत. खो कुणाला द्यायचा, किती जणांना द्यायचा असा काही नियम नाही. शक्यतो एकाच गाण्याविषयी लिहीलेलं बरं आणि गाणं नवं की जुनं, गाजलेलं की न ऎकलेलं असली बंधनं नाहीत. एकच प्रामाणिकपणा स्वतःशी बाळगायचा तो म्हणजे आपली चौकट स्वतःच ठरवायची आणि त्याबाहेरचं गाणं निवडायचं.

Comments

Samved said…
माझा खो ट्युलिपला...
Samved said…
माझा खो ट्युलिपला...
Megha said…
my favorite singer and my favorite song too samved!!!
Tulip said…
वाह.. कय सुंदर लिहिल आहेस तु संवेद! माझं अत्यंत आवडतं गाणं. जां हा शब्द किती वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला आहे यात.

खो बद्दल धन्यवाद. प्रयत्न करते लिहायचा.
Samved said…
Thanks Tulip! Waiting eagerly for your selection of song and your take on it!
हिंदी/उर्दुला जो लहेजा आहे, जी आदब आहे, जे वजन आहे ते >>>> 100%

छान लिहिलं आहेस. हे माझं अ-त्यं-त आवडतं गाणं. त्यामुळे तुझी पोस्ट पहिल्यांदा अधाशासारखी वाचली. दुसर्‍याने जरा निवांत. आज कमेंट द्यायची म्हणून पुन्हा :)

गाणं पडद्यावर सुद्धा इतकं सुंदर साकारलय की प्रत्येक वेळी जास्त बघावं की जास्त ऐकावं अशा संभ्रमात पडायला होतं.

पुन्हा एकदा, सुंदर पोस्ट !!!
Samved said…
thanks Trupti. I am sure there will be hardly anyone who doesn't like this song
Anonymous said…
sundar...
Samved said…
मेघा, यशोधरा, सोनल- थॅन्क्स. मुळातच जे सुंदर आहे त्या बद्दल चांगलं लिहीणं किंचित सोप्पं असावं असं वाटतय :)
kshipra said…
माझं अत्यंत आवडतं गाणं. पण असं मला लिहीता नसत आलं. मस्त लिहीलं आहेस.
kshipra said…
माझं अत्यंत आवडतं गाणं. पण असं मला लिहीता नसत आलं. मस्त लिहीलं आहेस.
अहा! मला असं ओळीओळीवर नकसकाम करत लिहिलेलं हल्ली जरा कमी आवडतं... पण, तर्री! बादवे, कनु रॉय हा इसम म्हणे रस्त्यावर गाणं गात असे. दिग्दर्शकाकडे बजेट कमी असल्यामुळे त्याने या गुणी इसमाला हुडकलं आणि त्यानेही पठ्ठ्याने अत्यंत कमी वाद्यांत आणि जवळजवळ शून्य बजेटात ही गाणी करून दिली. म्हणे...