भिन्न षड्ज

हल्ली अचानक चांगलं घडण्यावर फारसा विश्वास उरलेला नाही. चांगलं घडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि याउपरही काही बरं घडेल याची खात्री कमीच. पण तसं अचानक घडलं खरं. कोऱ्या मनानं क्रॉसवर्डमधे हिंडत असताना सवयीनं एक चक्कर सीड्यांमधून मारली. गेली कित्येक वर्षं एकही सीडी विकली न गेल्यासारखा तो सेक्शन. तेच ते अगम्य इंग्रजी आल्बम, जुनेच जसराज, भिमसेन, तडकामारु पण त्यातल्यात्यात खपावु रिमिक्स आल्बम वगैरे वगैरे. मला इथून हिंडताना शेवाळल्यासारखं वाटतं. तरीही आशाळभुतपणे मी काही वेगळं मिळेल म्हणून चौकस डोळे फिरवले. "भिन्न षड्ज". मी घाईघाईनं सीडी उचलली. एकच होती. कुणी हिसकावुन घेतली तर? नकळत सीडीवरची पकड घट्ट झाली. सीडीत काय आहे हे माहीत असतानाही परत एकदा कव्हर वाचून काढताना आजि म्या ब्रम्ह पाहीलेची अनुभुती आली.
खरं म्हणजे मी स्वतःपुरत्या काही चौकटी आखलेल्या आहेत. ब्लॉगवर आवडती सार्वजनिक माणसं आणायची नाहीत हा त्यातला एक महत्वाचा नियम. ब्लॉगवर कविता पिटायच्या नाहीत हाही एक समजुतदार नियम. पण बऱ्याचदा हव्यासापोटी हे नियम मोडले गेले. आतली गाठ नियमांपेक्षा मोठी ठरली.
भिन्न षड्ज तर नियमांपलीकडे जाणाऱ्या माणसाचा सिनेमा. म्हणून परत एकदा नियम बाजुला ठेवून मी लिहायला बसलोय. हा खरं तर विरोधाभास आहे. बाईंना एकुणात शब्द खटकतात. त्यांना स्वरांनीच सगळं सांगायचं असतं. कितीतरी वेळा हे ऎकलय मी. आणि परत शब्दच वापरुन सगळं लिहीतोय मी. दुसरा गोंधळ, जवळची किंवा जवळीक दाखवणारी माणसं त्यांना ताई- किशोरीताई म्हणतात. मी अगदी जन्मल्यापासून नाही तरी आठवतं तेव्हापासून त्यांना बाईच म्हणतो म्हणजे बाई अगदी आग्यावेताळ आहेत हां किंवा बाईंनी आज कत्ल केला असं. गोंधळागोंधळात मेंदु अजून थोडा सुरकुतला.
अमोल पालेकरांनी आयुष्यात अनेक धाडसी कामं केलीत, बादल सरकार महोत्सव त्यातलंच एक महत्वाचं. पण किशोरी आमोणकरांवर डॉक्युमेंटरी करणं हे जीवावर बेतु शकणारं काम. बाईंचे मुड्स सांभाळणं हा मोठा धोका झालाच पण त्याहूनही धोकादायक म्हणजे बाईंच्या अलौकीक गाण्याचं, त्यांच्या वेगळेपणाचं नेमकं संक्षिप्तीकरण करुन ते लोकांसमोर ठेवणं. पण पालेकरांनी हे काम केलं, बऱ्या प्रमाणात यशस्वीरित्या केलं.
बाईंच्या गाण्यातलं वेगळेपण फार सुंदररित्या त्यांनी स्वतः तर सांगीतलं आहेच पण गंमत म्हणजे शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन यांनीही जवळ जवळ ते तसंच पकडलय. बाई म्हणतात, मी गाताना गाण्यातला भाव होऊन जाते! कुणी गाताना असं गाणंच होऊन जात असेल तर बाई, तुम्ही त्रासदायक अ-तरल महाभागांवर खुशाल ओरडा. या डॉक्युमेंटरीचा एक चांगला गुण म्हणजे इथे पिसाटलेला निवेदक नाही. बहुतेक वेळ बाई बोलतात किंवा इतर सहकलाकार. बाईंना तापट म्हणणाऱ्यांना बाईंच एक वेगळंच रुप या फिल्म मधे बघायला मिळतं जेव्हा त्या मोगुबाईंबद्दल बोलतात. आईनं मला शिकवलं असतं तर मी आज कुठे असते असा सवाल बाईंच्या तोंडून ऎकायला मिळाला, तेव्हा गरगरायला झालं. बाईंची मी स्वतः विकत घेऊन ऎकलेली पहीली कॅसेट म्हणजे हंसध्वनी. एखाद्या रागाचा इतका सुंदर विस्तार फार विचारी गायकालाच करता येतो असं माझं तेव्हाचं प्राथमिक मत जेव्हा मी आज बाईंच्या या वाक्याशी ताडून बघतो तेव्हा तापट बाई खऱ्या की गुरुभक्त शिष्या बाई खऱ्या हाच प्रश्न उरतो. इथे नकळत लता-माई दुकलीशी तुलना झाली. बाईंचा आवाज गेला तेव्हाची परिस्थिती बाईंच्या मुलांनी सांगीतली आहे. दहा वर्ष- न गाता- शक्यय? बाईंनी तत्व सोपं केलं, मी आतल्या आत गात होते! डिट्टो कुमार!! दिशा असली की प्रवासाला शिस्त राहाते खरंय पण मुळात प्रवासातच जर हरखुन जाता येत असेल तर कुठं जायचयं कितपत महत्वाचं मानायचं? एखाद्या गुढ कोड्याचा उलगडा व्हावा तश्या बाई उलगडत जातात. बाईंवर घराण्याची परंपरा मोडल्याचा आरोप होतो. मला स्वतःला कुणा क्रिएटीव्ह माणसानं नियम वगैरे तोडला की प्रचंड आनंद होतो. आता नक्कीच नवं काही तरी होण्याची एक शक्यता तिथे जन्माला आलेली असते. कुमारांनी बऱ्याच चौकटी पारच मोडून टाकल्या. बाईंनी तेव्हढी नासधुस केली नाही याच उलट मला वाईटंच वाटतं. कुणाला घराण्याला बांधीलच आलापी ऎकायच्या असतील तर आद्य-पुरुषाच्या रेकॉर्डच ऎका. एकच राग जेव्हा गायक वेगवेगळ्या मैफिलीत गातो, तेव्हा प्रत्येक वेळी ती नव-निर्मीती असते हे हिंदुस्थानी गान परंपरेचं वैशिष्ट्य. दोन स्वरांमधलं अवकाश कसं पेलायचं, स्वरांना आकार कसा द्यायचा यावर विचारी गायक जेव्हा चिंतन करतो, तेव्हाच नवं काहीतरी निर्माण होतं. झापडबाज समिक्षकांना देव क्षमा करो!
अगदी भाबडेपणे सांगायचं तर अमोल पालेकर आणि संध्या गोखलेंनी फार पुण्याचं काम केलय. उच्च निर्मितीमुल्य, नेमका फोकस, फापटपसाऱ्याला चाट, दुर्मिळ क्लिप्स, नेमकेपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सव्वा तास शब्दांपलीकडच्या गाण्याचं तत्वज्ञान आणि ते मांडणारी तत्ववेत्ती!
तरीही...
पालेकरांनी काही गोष्टी करायलाच हव्या होत्या...
बाईंनी त्यांच्या पुस्तकात राग-विचार मांडला आहे. स्वराचा उगम, त्याचं वैशिष्ट, प्राचीन परंपरा इ. बाईंनी थोडं ते इथं सोपं करुन सांगीतलं असतं तर ....
बाईंनी काही भजनं फार सुंदर म्हटली आहेत विशेषतः मीरेची. त्या आर्ततेमागे बाईंचं आत्मा-परमात्मा असं काहीसं तत्व आहे. ते स्वतः बाई सांगत्या तर...
बाईंनी काही वर्कशॉप्स केली होती. त्याचे काही तुकडे फिल्म मधे आहेत. पण या वर्कशॉप क्लीप्स निवांत मिळत्या तर....
बाई कश्या शिकल्या याबद्दल थोडक्यात उल्लेख आलाय. पण त्या शिक्षणावर बाईंनी कसा विचार केला आणि बाई इतरांच्या पन्नास पावलं पुढे कश्या गेल्या कळतं तर...
फिल्म सव्वा तासा ऎवजी अजून मोठी असती तर............

काही लोक समाधानी नसतात हेच खरं. पण ते किती बरंय!

Comments

Shraddha Bhowad said…
संवेद,
एकदम स्पॉट ऑन पोस्ट. मनापासून लिहीलेलं म्हणून तात्काळ आवडून गेलेलं.
मी किशोरी आमोणकरांबद्दल खूप ऐकलेलं आहे, त्यांच्या अहंमन्य स्वभावाबद्दल, त्यांच्या मूडस मधल्या अप्स ऍंड डाऊन्स बद्दल, त्यांच्या तरुण दिसण्याबद्दलच्या ऑब्सेशनबद्दल. कलाकाराबद्दल अशा वदंता फ़ार असतात, का काही कळत नाही. आणि फ़्रॅंकली, कलाकार म्हटला की त्याने अमुक ठमुक रित्या वागलं पाहिजे, तिरसटच असलं पाहिजे पण असं असलं तरी त्याला सर्व माफ़ असावं हा फ़ंडाच मला मुळी पटत नाही. आणि वर जे म्हटलंय ते सर्वकाही म्हणजे किशोरी आमोणकर असा ग्रह करुन देण्यात मी वाचलेल्या बरयाच लिखाणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या माझ्या मनात त्यांची जी काही प्रतिमा आहे त्याला काळी किनारच जास्त आहे. अर्थात हे सारं कलाकाराची कला सोडून बाकीचं सगळं होतंय. पण तरीही.
असो, मी मिळवुन बघेन ’भिन्न षड्ज’. तू बाय एनि चान्स ’सिलेक्टीव्ह मेमरीज’ वाचलं आहेस का डे चं? तिनं तिला सोयीचं तेव्हढंच लिहीलं आहे तरी त्यात किशोरी आमोणकरांवर टिप्पणी आहेच.
मला फ़ारा वर्षांपासून ’बाबुल मोरा नैहर’ हे सैगलचं गाणं ऐकायचं होतं, ते ऐकलं आणि माझा प्रचंड भ्रमनिरास झाला. मला चढलंच नाही ते गाणं. ’सहेला रे’ चा आवर्जून उल्लेख अगदी ’बाबुल मोरा’ सारखाच होतो, फ़ार उत्सुकताही आहे ऐकण्याची पण ’सहेला रे’ चा पण बाबुल मोरा होऊन जाईल अशी फ़ार भीती वाटते बघ. :(
Samved said…
आणि तुझी कॉमेन्टही मनापासून आलेली दिसतेय...थॅन्क्स! कलाकारांबद्दल वंदता का असतात? कदाचित ग्लॅमर, कदाचित कलेची धुंदी, कदाचित एकटेपणा, कदाचित टोकाची प्रतिभा??? सामान्यांच्या फुटपट्या त्यांना लावाव्यात का हाही प्रश्न आहेच. कुणी ठरवुन विक्षिप्त वागत असेल तर मात्र पारंच माती. एक सुप्रसिद्ध समिक्षक म्हणे येता जाता सुनेला भॉ..करायचे. अश्या नरांना मोजून माराव्या! कलाकारांची कला उपभोगावी. कुणाचे पाय मातीचे किंवा शेणाचे निघतील सांगता येत नाही.
बाईंबद्दल बऱ्याच वंदता आहेत. काही खऱ्याही आहेत. देविदास बागुलांना फोटो वरुन लय वाईट अनुभव आलेला. पण त्यांनं त्यांचं गाणं छोटं होत नाही. याचं दुसरं टोक सांगतो. एकदा म्हणे त्यांचं अंबेजोगाईत गाणं होतं. त्या गावात एक सुंद्री वाजवणारा म्हातारा होता, कंट्रीसाईड-आर्टीस्ट!. बाईंना कुठून माहीत नाही पण तो माहीत होता. अंबेजोगाईची मैफल बाईंनी त्या म्हाताऱ्यासाठी केली!
मी ’सिलेक्टीव्ह मेमरीज’ नाही वाचलं. बरंय का?
सहेला रे ऎक. मी वैयक्तीक जामीन राहातो- तुला गाणं आवडेलच!!
Keshav said…
संवेद,

भिन्न षट्ज ची लिंक एका मित्राकडून आली. मागे याबद्दल पेपरात वाचल्यावर त्याचं पुढे काय झालं याची उत्सुकता होतीच. तुमच्या ब्लॉगवर त्याविषयी वाचलं. आता सीडी बघण्याची आस लागून राहिलीये. किशोरीताईंच्या गाण्यातला आनंद बरेच घेतात. पण त्यांच्यात जे काही विशेष, असामान्य असे आहे ते किती जणांना जाणवते कुणास ठाऊक!
तुमची लिहिण्याची स्टाईल 'मनस्वी' आहे. लेखन आवडलं.
Sachin said…
"ख्याल दर्पण" नावाची एक सुंदर डॉक्यु पाहायला मिळाली कोल्हापुरात, Torrent मिळाला आहे पण सीडिंग पडत नाहीये. शास्त्रीय संगीतावरची म्हणून ती आठवली. विषय वेगळा आहे पण तीत मुद्रा, हातवारे, घराणे वगैरेत अडकलेल्या काही परंपरांवर प्रश्न होते.
कलावंताच्या अश्या वागण्यामागे काहीतरी सूक्ष्म complex असावा. टोकाची प्रतिभा साधना केलेल्या या लोकांमध्ये काही लसावि निघतोच. या साधनेची जाणीव त्यांना जेव्हा होत असते तेव्हा नक्की वेगळेपण वाटत असावे. असो.
मला अजून एक विचारायचे आहे. मिथिला गोडघाटे अस्तित्वात आहेत काय?
Samved said…
केशव, मनःपुर्वक धन्यवाद. सीडी संग्रही ठेवावी अशी आहे.
सचिन, ख्याल दर्पण बद्दल कधी ऎकलं नव्हतं. जरा कोलंबसगिरी करायला हवी. या आणि वैती वरच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हल्ली कुणी लिहीत नाही हे उघडच आहे पण कुणी वाचतं का या बद्दलही शंकाच येत होती. या कॉमेन्टमुळे निदान ती शंका तरी दुर झाली :)
मिथीला गोडघाटे! नाही, काही कल्पना नाही. पण चिरंजॊव गोडघाटे बहुदा पुण्यात असावेत असं ऎकिवात होतं
लेख छान!

@ श्रद्धा भोवड : "बाबुल मोरा" बाईंच्यापण आवाजात आहे. पं.चौरसिया आणि बाई अशी जुगलबंदी. ती बघा ऐकून. ती चढेल कदाचित.. :)
लेख छान!

@ श्रद्धा भोवड : "बाबुल मोरा" बाईंच्यापण आवाजात आहे. पं.चौरसिया आणि बाई अशी जुगलबंदी. ती बघा ऐकून. ती चढेल कदाचित.. :)
Ashwin said…
संवेद,
छानच आहे पोस्ट. किशोरीबाईंना 'ताई' म्हटलं की आपण उगीच आगाऊपणा करत आहोत असं वाटतं. :) गायिकेला 'बाई' आणि गायकाला 'बुवा' म्हणायची पुराने ज़माने की रीतच मस्त आहे!
किशोरीबाईंची विचारप्रक्रिया आणि तिचं वेगळेपण दाखवण्यात ही फिल्म कुठेतरी कमी पडते असं फार वाटतं. बाई कशा शिकल्या यावरपण अजून भर दिला असता तरी चाललं असतं.
या फिल्मच्या निमित्ताने किशोरीबाईंनी एक अप्रतिम मैफल केली आहे. 'बधावा' या नावाने तिची DVD केली आहे. कधी मिळाली तर नक्की बघा. हुसेनी तोडी आणि देवगिरी बिलावल केवळ अप्रतिम! जयपूर-अत्रौली घराण्याची गायकी ऐकायची असेल तर ही DVD ऐकावी.
असो.
Good one. Liked it. I will want to listen to her more now.

Blogged about it here - http://iforeye.blogspot.com/2013/12/bhinna-shadja.html
Samved said…
Thanks Priyaranjan!