एमबीए म्हणजे धर्मराजाचा रथच जणु, जमिनीला स्पर्श न करता दशांगुळे वरुन चालणारा. म्हणजे असं एमबीए न झालेल्यांना वाटतं. खरं तर एमबीए झालेल्यांनाही असंच वाटतं. पण राजाराम उर्फ आर आरला असं वाटत नाही. कारण तो या गोष्टीचा बहुदा नायक आहे. तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा खुप गरिबीतून एमबीए झालाय. पण तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा गाजर हलवा, मुली का पराठा असं खात नाही, उठसुठ तो मां असा टाहो फोडत आईला बिलगतही नाही, मात्र तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा फर्स्टक्लास फर्स्ट आलाय, तेही आय आय एम सारख्या प्रिमिअम बी-स्कुल मधून. त्याला कॅम्पसमधून उच्चकोटीची नौकरी लागूनही तो नम्र इ आहे. असं असलं की माणसाची मुल्य वगैरे उच्च आहेत असं म्हणण्याची पद्धत आहे. हल्ली नागरीकशास्त्रासारखं मुल्यशिक्षण वगैरे शिकवतात म्हणे आय आय एम मधे, स्कोरिंगला बरं असणार. चिकट साखरेवर घोंघावणारी माशी वरच्यावर टिपावी तसं मायकी फर्नांडोनामक इसमाने आर आरला कॅम्पसमधे वरच्यावर उचललं. मायकी फर्नांडो नावावरुन जरी गोव्याच्या किनारी फेणी रिचवणारा किडूकमिडूक माणूस वाटत असला तरी तो जगप्रसिद्ध वगैरे असतो. जगप्रसिद्ध माणसं उधारी बाकी असल्य...