"मंद्र"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो


परत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण लिहीलं कुणीच नाही, कधी प्रतिसादच मुळात शुन्य, कदाचित खो खोचे विषय चुकीचे असतील, कधी वेळेचा प्रश्न असतो..काहीही असो पण ब्लॉगची सध्याची परिस्थिती भीषण आहे हे खरं. पण काही लोकांना राष्ट्रभाषेत सांगायचं तर गुडदा इ इ असतो. म्हणून परत एकदा नवा खो खो सुरु करत आहे. खो वाचा, त्याहून महत्वाचं त्यावर प्रतिक्रिया द्या आणि अजून महत्वाचं म्हणजे सहभागी व्हा.

सोनुबाई आणि कथलाचा वाळा हा खो खो अश्या पुस्तकांकरिता आहे जे गाजले पण वाचल्यावर हातात भुक्कड काहीही आलं नाही. हा खो खो सुरु करताना काही साक्षात्कार झाले तेही सांगतो म्हणजे तुम्ही परत त्याच घोळात अडकणार नाहीत.

हा खो खो जेनरसाठी नाही. म्हणजे आपले नेहमीचे गिऱ्हाईक वपु घ्या आणि कल्हई काढा असं इथे अभिप्रेत नाही. वपु हा एक जेनर आहे, ज्यांना ते आवडतात, त्यांना ते आवडतात. किंवा सु.शि किंवा बाबा कदम हे कसे अभिजात नाहीत यासाठी हा खो खो नाही. तुमच्या नेहमीच्या आवडीच्या किंवा गाजलेल्या लेखकाचं एखादं उगाच गाजवलेल्या पुस्तकाचं खरं-खोटं करण्याचा हा खो खो आहे.

सुरु करताना मला वाटलं आपल्या हातात वॉशिंग्टनची कुऱ्हाडंच आलीए. पकड लेखक अन कर खलास. पण तसं झालं नाही.

श्रीमानयोगी, रणजीत देसाईंचं भलं थोरलं जाडजुड पुस्तक. लहानपणी पारायणं केली या पुस्तकाची आणि आता वाचायला गेलं की दंतकथा आणि इतिहास यांच्या गल्लतीची बखर वाचतोय की काय असं वाटायला लागतं. पण या पुस्तकावर नव्यानं लिहीण्याची गरजच नाही. कुरुंदकरकाकांची (हे कधीतरी निवांतात!) प्रस्तावना इतकी अगाध सुंदर आहे की त्या पुस्तकाचं उजवं-डावं तिथल्या तिथेच ठरतं. (आणि अर्थात मनोरंजक कादंबरी म्हणून त्या पुस्तकाचं मुल्य तसुभरही कमी होत नाही)

मग वाटलं विरधवल किंवा तत्सम, ज्या लहानपणी अंगावर रोमांच उभ्या करायच्या, त्या कादंबरीविषयी लिहावं. पण त्या कादंबऱ्यांनी मग कसलंच मनोरंजन केलं नाही? विरधवल तर चिंध्या होईपर्यंत वाचली. दोष पुस्तकाचा नाही. दोष एकदा गेलेला गाव परत येत नाही त्याचा आहे.

कविता? पा...प. कविता भोगायची असते आणि ते योग कधी येतील सांगता येत नाहीत. त्यामुळे अगदी खरे, सौमित्रपण वाचलेच म्हणायचे.


हे असं एकेक बाद करत असतानाच मला अपेक्षित सोनुबाई भेटल्या.


मु.पो. अक्षरधारा. पुस्तकांच्या दुकानात गेलं की तसं ही मला हरवायला होतं. अक्षरधारा "मॉल"मधे तर इंपलसिव्ह बाईंगला भयंकर स्कोप आहे; सारं नीटनेटकं आणि प्रसन्न!

निळसर मोरपंखी रंगाचं चांगलं पाच-साडेपाचशे पानाचं तरतरीत पुस्तक-"मंद्र". रंगसंगती बघून डोळे थुयथुयले म्हणेपर्यंत लेखक भैरप्पा आणि अनुवाद उमा कुलकर्णीं ही नावं वाचून झाली होती. हल्ली करमणुकीची पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची सवय गेलेली. पण "मंद्र" संगीताबद्दल आहे म्हटल्यावर पुस्तक विकत घेऊन टाकलं.


भैरप्पा म्हणजे वंशवृक्ष वगैरे सारखे दणकट पुस्तकं लिहीणारं कन्नड मधलं मोठं प्रस्थ. अगदी मराठी पुस्तकांच्या खपात देखिल त्यांची पुस्तकं अग्रभागी असतात म्हणे. असं असताना "मंद्र" मात्र साफ फसलं असं माझं वैयक्तिक मत.


"मंद्र" मोहनलाल नावाच्या कुण्या महान गायकाच्या आयुष्याचा सारांश आहे. मंद्र म्हणजे खालचा स्वर. असं गाणं गुढ, घाटदार आणि भरीव वाटतं. भल्या पहाटे अश्या स्वरांचा रियाज करावा असं म्हणतात. मोहनलाल नुसता महान गायकच नाही तर समर्थ गुरुही आहे. "मंद्र" कहाणी आहे मोहनलालच्या दोन प्रतिमांची; गायक मोहनलाल आणि वैयक्तिक जीवनातला मोहनलाल यांची. गायक मोहनलाल अत्यंत गरिबीतून प्रचंड परिश्रमाने वर येतो आणि जगप्रसिद्धही होतो. पण त्याचं खासगी जीवन म्हणजे शारीर वासनांची निव्वळ दलदल. शिष्य तयार करताना फक्त विद्यार्थिनीच घेणं आणि गुरुदक्षिणा म्हणून शरीराचा मोबदला मागणं ही मोहनलालची माणूस म्हणून लिंगपिसाटता, तर गायक म्हणून त्याच्या मते निव्वळ उर्जास्त्रोत. सबंध कादंबरीचं या एका वाक्यात वर्णन करता येऊ शकतं एव्हढाच या कादंबरीचा आवाका आहे. पुस्तक वाचताना एका सुप्रसिद्ध गायकाची वारंवार आठवण येत राहाते हा कदाचित योगायोग!


कलाकाराची कला आणि त्याचं खासगी जीवन, विशेषतः स्खलनशीलता, हा म्हटलं तर हजारो शेड्स असणाऱ्या रंगपेटीसारखा आकर्षक आणि त्याचवेळी डोळ्यात न भरणारा मोठा कॅनव्हास असा मामला आहे. पण सारी सिद्धता असूनही "मंद्र" तोल जाऊन तोंडावर साफ आपटते. असं का व्हावं याचं हे किंचित चिंतन.


कादंबरी या फॉर्मचे काही सहज ध्यानात आलेले गुणविशेष जेव्हा मी "मंद्र" सोबत ताडून पाहीले तेव्हा "मंद्र"चं कोतेपण ठळक होत गेलं.


कथेपेक्षा कादंबरीचा पट मोठा असतो. हा पट स्थळ, काळ, पात्रं, गुंतागुंत यांच्या परस्पर संबंधातून घडत जातो. हे म्हणजे थोडसं विलंबीत लयीत विस्तारानं राग मांडण्यासारखं आहे. मोहनलाल सोबत ही कादंबरी मुंबई, दिल्ली, बनारस, मध्यप्रदेश, अमेरिकेत जाते पण पट कुठेच विस्तारत नाही. याचं एक कारण म्हणजे भैरप्पांनी कसलीही गुंतागुंत कटाक्षानं टाळली आहे. २+२=४ असं साधं सुत्र मानवी जीवनात क्वचितच आढळतं. खरं तर धोकादायक बनु शकतील अशी अनेक वळणं या पुस्तकात आहेत (अमेरिकेत मोहनलाल आणि भुपाली, आणि मधुमिता किंवा दिल्लीत मनोहारीदेवी आणि गुरु, आणि मोहनलाल इ) पण भैरप्पांनी हे ताण-बिंदु इतके ढिले बांधले आहेत की त्यावर ही कादंबरी उभीच राहु शकत नाही. कादंबरीभर भैरप्पांनी अत्यंत सोईस्कर अशा पळवाटा, कधी गुरु-शिष्य परंपरा तर कधी कलावंताचा मनस्वीपणा या नावाखाली पेरल्या आहेत. थोडीशी वेगळ्या प्रकारची तुलना करायची तर हल्ली काही सिनेमे कायम परदेशस्थित भारतीय डोळ्यांसमोर ठेऊन बनवले जातात. अश्या सिनेमांमधे संस्कार, थोर भारतीय परंपरा, कुटुंब-कबिला, सण-सोहळे ठासून भरलेले असतात. हा कांदा सोलायचा नसतो कारण डोळ्यात पाणी येतं. पण कांद्याच्या प्रत्येक पाकळी आड अजून काही पाकळ्या आणि त्यांच्या आत परत काही पाकळ्या असतात हे सत्य सोईस्कररित्या दुर्लक्षिलं जातं. "मंद्र" ही अशी न सोललेल्या कांद्याची कादंबरी आहे.


कादंबरीला तोलणारं असं एक उघड किंवा सुप्त सुत्र असतं. अगदी शाम मनोहरांच्या असंबद्ध वाटु शकणाऱ्या (आणि ज्या की त्या नसतात!) कादंबऱ्यांमधेही हे सुत्र प्रखरतेनं जाणवतं. भैरप्पांनी या कादंबरीत अशी दोन सुत्रं वापरली आहेत; हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कलावंताचं खासगी किंवा जास्त ठळकपणे सांगायचं तर लैंगीक जीवन (वखवख हा शब्द जास्त योग्य आहे). पण कादंबरीभर कुठेही ही दोन्ही सुत्रं गुडघाभर पाण्याच्या पलीकडे पुर आणत नाहीत. भैरप्पांना स्वतःला रागदारी येते, "मंद्र" लिहीताना त्यांनी गणपती भटांसारख्या गायकाचं मार्गदर्शन घेतलं आहे. पण कादंबरीभर काही रागांची नावं, मंद्राच्या उपासनेचे थोडके उत्सव, मैफिलींची उडती वर्णनं या पलीकडे फारसं गाणं नाही. नाही म्हणायला त्याच त्या सात सुरातुन, बाविस श्रुतीतून हिंदुस्थानी संगीत कशी विविध रागनिर्मिती करते याचं काही वर्णन "मंद्र"मधे आलं आहे. आपलं शास्त्रीय संगीत हे बरंचसं ऍबस्ट्रॅक्ट पातळीवर असतं. त्याचं सुलभीकरण करणं किंवा त्या गुढतेची मिमांसा करणं किंवा त्याच्या छटा उलगडुन दाखवणं यापासून भैरप्पा सोईस्कररित्या पळ काढतात. मनोहारीदेवीच्या शास्त्रीय नृत्याला ’साथ’ म्हणून किंवा फार तर जुगलबंदी म्हणूनही एक थोर शास्त्रीय गायक ’बागेश्री’ ची मैफल करतो हे कल्पनातीत आहे. हे फार फार दुर्मिळ आहे. खरं म्हणजे (शास्त्रीय) नाच-गाणं यात बरंच काही कॉमन आहे. पण पारंपारीक मत असं की नृत्यकला ही गानकलेपेक्षा कनिष्ठ. नृत्य करमणुकी साठी वापरलं जातं तर श्रेष्ठ गान हे स्वांत-सुखाय असतं. गाताना गायकाला विविध साक्षात्कार होत जातात आणि म्हणून श्रोत्यांना ते दिसतात. श्रोत्यांसाठी म्हणून केलेले चमत्कार ही गाण्यात हलकी करमणुक मानली जाते. नृत्य ही जास्त दृश्यकला आहे, त्यात अनवटता, उलगडत जाणं, अर्थांच्या विविध छटा असं काही फारसं नाही. गाणं आणि चित्र यात संदिग्धतेला अनंत वाव आहे. त्यातून असंख्य अर्थ निघु शकतात म्हणून गाणं-चित्र मैफल ही गाणं-नृत्य मैफीलीपेक्षा जास्त नैसर्गिक असते. एव्हढा मोठा मुद्दा भैरप्पांकडून निसटतो हे मोठं आश्चर्यच आहे.

दुसरं आणि प्रचंड ठळक सुत्र भैरप्पा वापरतात ते म्हणजे मोहनलालचं लैंगिक जीवन. एखाद्या लेखकासाठी हे असलं सुत्र म्हणजे विविध शक्यता धांडोळण्याची उत्तम जागा. विशेषतः इंग्रजी वाङमयात या सुत्राभोवती मोठ्या प्रमाणात अभिजात साहीत्य निर्मिती झाली आहे. जयवंत दळवी, भाऊ पाध्ये इ लेखकांनी अत्यंत आक्रमकपणे लैंगिकतेचा वापर त्यांच्या कथा-कादंबऱ्यातुन केला आहे. रात्र काळी घागर काळी मधली लैंगिकता ही एखाद्या हिरव्याजर्द थंडगार सर्पासारखी मांड्य़ावरुन सरसरते. (खानोलकर काळाच्या कितीतरी पुढे असणारे शापीत होते हे परत परत जाणवत राहातं). तर आयवा मारु मधला वासनांचा लिंगपिसाट नाच मध्यमवर्गीय मुल्यांना उभा आडवा कापत जातो. तिथे वासना, वखवख ही केवळ शारीर भावना न राहता एक पात्र बनून जाते. अगदी जी.एं.च्या कथांमधूनही लैंगिकतेचा एक प्रखर अंडरकरंट प्रकर्षानं जाणवतो. या सगळ्या तुलनेत भैरप्पांचा मोहनलाल अत्यंत सामान्य वाटतो. त्यात धड श्रृंगार नाही, आक्रमकता नाही, प्रेम नाही. असलीच तर भयंकर अशी न भागणारी भुक आहे. अशी भुक जी एखाद्या दोन दिवसाच्या उपाशी भिकाऱ्यासमोर पंचपक्वान ठेवल्यावर त्याला जसं वाटेल तशी, अत्यंत सामान्य दर्जाची, भुक ज्यात पोट भरणं हीच प्राथमिकता असते. मोहनलाल वॉचमनची बायको, स्वतःची बायको, गाणारी वेश्या, स्वतःच्या शिष्या, विख्यात नर्तकी, विदेशी बाया सारख्याच उत्साहाने उपभोगतो. त्यात शरीराची भुक या आदीम भुके पलीकडे दुसरं काहीही नाही. जरी मोहनलालच्या मते शारीर संबंध ही त्याच्या गाण्यामागची उर्जा आहे तरी कादंबरीत मोहनलालला अश्या संबंधामधून मंद्र उलगडला आहे किंवा नव-निर्मिती झाली आहे असं ठळकपणे कुठेही स्पष्ट होत नाही.


कादंबरीला एक लय असते आणि पुर्ण कादंबरी कमी-अधीक प्रमाणात त्याच लयीभोवती आंदोलन पावते. अश्या मानसिक किंवा घटानात्मक आंदोलनांचा एक संथ पण सुस्पष्ट वाढत जाणारा कल्लोळ चांगल्या कादंबरीत दिसतो. सर्वसाधारणपणे आपण याला कादंबरीची भाजणी म्हणतो. ही चढती भाजणी कादंबरीला एका ध्येयापर्यंत, शेवटापर्यंत घेऊन जाते. दुर्दैवाने मोहनलाल-कलावंत आणि मोहनलाल-माणूस या लयीभोवती "मंद्र" आंदोलीत न होता (जे अपेक्षितही आहे) संगीत व्यवसाय या फुटकळ संकल्पनेभोवती "मंद्र" आकुंचन-प्रसरण पावते.


"तंतु", सार्थ" आणि "मंद्र" ही भैरप्पांची त्रिवेणी संगीताभोवती रुंजी घालते. पण "मंद्र"नं दिलेलं असमाधान इतपत मोठं आहे की कदाचित "तंतु" आणि "सार्थ" वाचवणारही नाही. हे सारं असुनही "मंद्र"चं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालय. भैरप्पांना अत्यंत मानाचा सरस्वती पुरस्कार ही "मंद्र"साठी मिळालाय. आणि "मंद्र"च्या संकल्पनेवर आधारीत एक संगीतिकाही बंगळुरात सादर झालीए.

असो. मोठ्यांचं सारं मोठंच असतं...अगदी त्यांच्या चुकादेखिल.



सोनुबाई आणि कथलाचा वाळा याचा पुढचा खो मेघनाला. चांगल्या ब्लॉगची परिस्थिती इतपत केविलवाणी झालीए की या खो भोवती कसलेही नियम तयार करण्याइतपतही हिंमत आता माझ्यात उरलेली नाही. तेव्हा ऑल युअर्स...



Comments

’मंद्र’ वाचली नाही ते बरंच केलं म्हणायचं. इतक्या जाडीचं पुस्तक वाचून इतकंच हाती लागलं असतं, तर मेजर चिडचिड झाली असती. नि वर त्या पुस्तकाला इतकी लोकमान्यता मिळाल्यावर तर...
अगदी असंच ’आवरण’बद्दल झालं होतं माझं.
मस्त आहे खो. ’वॉशिंग्टनची कुर्‍हाड’.... अगदी अगदी! घेते खो.
Mints! said…
Ideachi kalpana bhariye avadali. Kho majhyaparyant pochayachi vast pahate:)

Barrryyaach vakyannaa agadi agadi...
Samved said…
Meghana- there are so many books like this where you urgently need that ax. Pick it up quickly :)
Samved said…
Thanks Mints!मेघना, मिन्ट्सला खॊ दे गं लगेच...तू काय कुऱ्हाडीला धार काढून उभी वगैरे आहेस का?
Megha said…
my god samved kiti chaan parikshan lihila aahes...tu vikat ghetala aahes mhatalyavar next bhetit chalen...ha ha dadanpasun chorun vachleli samantanchi books aathavali...
घेतला तुझा खो! दमायला झालं!
Mints! said…
kurhaadeelaa dhaar :D

hope jaraa junyaa pustakanvar lihile taree chaalel ...
Samved said…
मेघा- आलीस की वाच आणि दहाच्या पुढे आकरावं पान वाचवलं तर सांग. लै हिंमत लागते असलं वाचायला :)
Samved said…
Thanks Meghana- You did it!
Samved said…
मिन्ट्स- कितीही जुनं असलं तरी चालेल. सिक्रेट सांगु का? मला तर एकदा शामच्या आईची पण आठवण आली...
Anonymous said…
या पुस्तकाबद्दल बातम्यांमध्ये वाचलं होतं आणि तुम्ही त्या पुस्तकाचे बातम्यांमध्ये झळकणे कसे योग्य होते हे सुस्पष्टीत केलेत, अगदी अगदी ही कादंबरीच जणू सांगतेय कि माझ्यात काय आहे, असे लिहिलेत आपण.. हा ब्लॉग मनाच्या खुपश्या जवळ आहे, पण त्याचा पाठपुरावा करता येत नसल्याने दूर जात असतो, संजीवित करता तुम्ही प्रत्येक पोस्टने..
Shraddha Bhowad said…
अरे, मी २०१० मध्ये ह्या कादंबरीवर आयुष्यातले २ दिवस खर्चले होते. केवळ कुठलंही पुस्तक अर्धवट सोडायचं नाही-कधीच, या स्वत:वरच घालून घातलेल्या नियमामुळे. तेव्हा मी तावातावाने काहीतरी लिहून पाठवलं होतं खरं. त्यात आपल्या छंदीफ़ंदीपणाला ऑरा देण्याकरता उभी केलेली ही भाकडकथा आहे असं म्हटल्याचं देखील आठव्तंय.

मोहनलालच्या ऊतू जाणारया लस्ट चा आगापीछा लागत नाही, तो म्हणे त्याला साक्षात्कार होतो, एव्हढा की एखाद्या वृद्धेला तो कल्पनेत भोगल्याशिवाय सोडत नाही. सगळीच पात्रं अशी कमरेखालच्या भुका अनावर झाल्यासारखी ल्हा ल्हा का करतायेत हे काही कळलंच नाही.’कलेसाठी समर्पण’ हा मधूचा स्टॅंड पटला तर तिचं विक्रमशी लग्न करणं कळत नाही आणि नंतर समर्पण वगैरे को मारो गोली करत ती नवं आयुष्य सुरु करते तेव्हाही त्या आयुष्यातील मोहनलालची ढवळाढवळ ती का खपवून घेते हे ही कळत नाही. प्रत्येक पात्र त्याच त्याच त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करताना दिसतंय, एव्हढं की मला काहीतरी फ़ेकून मारावंसं वाटायला लागलं. आणि त्या प्रत्येक चुकीवर तो कलाकार असल्याचं आणि त्याच्या सो-कॉल्ड गरजांचं आवरण, खासा न्याय वाटलेला मला. भैरप्पांच्या नायिका फ़ेमिनिस्ट आहेत असा कुप्रचार मी ऐकलेला आहे. पण त्यांची प्रत्येक नायिका अशी ना तशी directly/indirectly पुरुषावर अवलंबून आयुष्यात ड्रास्टीक बदल घडवून आणताना दिसली. त्यामुळे ती independent तर नाहीच, feminist त्याहून नाही.

हुश्श! किती बरं वाटलं मला. :D
Samved said…
दुरीत- धन्यवाद- सर्वच गोष्टींसाठी. संजीवित वगैरे जरा जास्त होतय (हनुमान झाल्यासारखं वाटलं) पण भा.पो.
Samved said…
श्रद्धा- तुझी कॉमेन्ट वाचून हा पोस्ट तू केला असतास तर काय भादरली असतीस याची कल्पना देखिल बहारदार आहे!! एकूणात पुस्तक साफ गंडलय हे माझं म्हणणं अजूनही काहींना पटलय हे वाचून बरं वाटलं. काही लिहीणार का? हा पुणेरी आग्रह नाही ;)
काय गं श्रद्धा, एवढाल्या कमेंटा लिहायला वेळ आहे. पोस्ट लिही की मग असंच एखादं बिनपाण्याचं. भाव खातेस का?
Shraddha Bhowad said…
नाही गड्या, मेघनाने विचारलं होतं पण सध्या माझी सॉलिड ’लागलेली’ आहे त्यामुळे माझ्या साहित्यिक आणि साहित्यबाह्य सर्जनशीलतेचा आवाका ’कोट्स’ पाडण्याइतपतच उरलाय, तेवढ्यानेही गळून जायला होतं, घे! :D हा सात्विक संताप होता, त्याला कसली घंटा सर्जनशीलता (आपली creativity, analysis वगैरे वगैरे :D ) लागत नाही. So, I threw up. Felt better.
एक महिना थांब, मग रोज खो दिलास तरी घेईन.
Anonymous said…
मी दिलेल्या खो चा दुवा इथे वाचकांसाठी देतोय.. पुस्तकाचे ऑपरेशन
http://karadyaachhata.blogspot.in/2012/07/blog-post.html
खरंच खूप आवडला हा "खो" प्रपंच....!! आतापर्यंत आवडलेल्या पुस्तकांबद्दल भरभरून वाचलं होतं.. पण आता न आवडलेल्या पुस्तकालाही भादरता येणार ह्या विचाराने गुदगुदल्या झाल्याच... :P माझे हर्षदा्ला धन्यवाद... :)
Samved said…
Thanks Chaitali. Yea, it's true that we do not like too many books but we may or may not really think of reasons for disliking. This is platform to do so. So charge up yourself and just do it
Anonymous said…
It's nevertheless time to congratulate you. I can't take this enjoyably without you.

Thanks for encouraging.. (http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=240865:2012-07-29-16-04-43&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408 )
Harshada Vinaya said…
Hey..Samvad.. I had read 'Tya Varshi' 3 years back and it is one of the books I purchased (still possess) in my pocket-money days!! ;) I mean I read it after my class XII.. felt great to read the name by you.. I have insisted (even to a Non-marathi friend) to read that book.. Shanta Gokhle created wonder with that.. It is so abstract still too intact by a delicate thread..

See, I impulsively came here on your blog and wrote this all- Hence proved that I just love the book. :P Hehe
Unknown said…
@samved आपण सुरू केलेला 'खो' चा खेळ आवडला. प्रत्यक खो बरोबर एकेक खेळाडू - अकारण नावाजलेले पुस्तक कटाप ! मी मात्र प्रसिद्धिच्या लाटेबरोबर आलेल्या कल्पनांना खो देतो. हर्षदाने दिल्येल्या 'खो'ला प्रतिसाद दिला त्याचा दुवा पहा : < http://remichimarathiboli.blogspot.in/2012/08/blog-post.html > बाकी सर्व वाचकांच्या स्वाधीन!
Prajakta said…
This comment has been removed by the author.
पोस्ट खूप आवडली पण ह्यात "श्यामची आई" चा उल्लेख वाचून कसंसंच झालं. प्रतिक्रिया व्यक्तीसापेक्ष असतात, म्हणून काही आपण समीक्षा करायचे थांबत नाही, आणि त्यानंतरच्या चर्चेतच तर खरी गम्मत असते, म्हणून, "श्यामची आई" वर कुऱ्हाड का चालवायची आहे, ते वाचायला आवडेल. त्यातले संदर्भ/संघर्ष कालबाह्य झाले म्हणून, की इतकी भावूकता खोटी वाटते म्हणून? मला तर ते पुस्तक वाचल्यावर मनातली सगळी किल्मिषं धुतली जातात असं वाटत. आता कोणी इतकं विनयाने, तरी इतकं समरसून लिहू तरी शकतं का? गतकाळच्या त्या साधेपणासाठी मला ते पुन्हापुन्हा वाचावंसं वाटतं, त्यातल्या मूल्यांवर लेखकाचा किती विश्वास असावा, की आपल्यालाही ते दोन क्षणांसाठी आपलं वागणं तपासून पहायला लावतात.
Anonymous said…
ह्या मागच्या चित्राबद्दल ऐकायला आवडेल..प्लीज..
Samved said…
Vishakha- I am not sure how relevent Shyamchi Aai today is. Yes, basic values are still intact but as a novel, I won't be able to rate it much. Whatever Nemade said about Shyamchi Aai was to create more sensation than anything else

Samved
Samved said…
Durit- This painting is associated with Poet as a theme. I was exploring something and suddenly hit upon this. I am not sure about painter though..
Vidya Bhutkar said…
Very nice post Samved. Meghanachi post adhi vachli hoti mag ithe aale. Parikshan aavadale. Me gelya kityket divasat kahi pustak vachle nahiye. Pan Chetan Bhagat ch 'Revolution 2020' vachla ani barech vichar manat aale. Ek kadambari vachlyach samadhan milala nahi. Ani shivay ha lihitoy tar mi hi lihu shakte asli pustaka asha ugach over confidence pan aala. :D arthat lihitana ta-ta-pa-pa jhali pan pustak tu mhantos yach category madhle hote ha main mudda. :)

-Vidya.
D said…
१. आवरण - एस एल भैरप्पा
२. पानिपत - विश्वास पाटील
३. काचवेल - आनंद यादव
४. बटाट्याची चाळ
5. Three Mistakes of my life