हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin'



...
 
झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्त तेव्हा तिथे असतो; उदा. शाळा सुरु होण्यावेळी ’उन्हाळ्याच्या सुट्टीतला माझा छंद’ टाईप विषयावर निबंध, पाढे-वर्ग-वर्गमुळं यांच्या दुःखद उजळण्या वगैरे वगैरे.

कु. सोमेश (नुक्तेच नववी ब) शाळा सुरु होण्या आधी अश्याच काही नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यात मग्न होता. "सोमेश" अशी मधूर हाक दुसऱ्यांदा येऊनही त्यानं दुर्लक्ष केलं कारण शाळेच्या नव्या गणवेशाची निळ्या रंगाची चड्डी अंगावर कशी दिसते याचं निरिक्षण करण्यात तो गुंग होता. त्याला बऱ्याच चिंता पडल्या होत्या उदा. पायांवरची नव्याने उगवलेली लोकर निळ्या रंगाची चड्डी झाकणार नसते वगैरे. हल्ली सोमेशला अश्या चिंता आणि सोबतच हळव्या कविता वगैरे सुचतात-

डार्क निळे आकाश

सागर फेन्ट निळा

निळ्या चड्डीत

सोम्या नादखुळा

(आपणही ’तुक्या म्हणे’ सारखं ’सोम्या म्हणे’ असा कवि व्हावं का? सोम्यानं लख्ख विचार केला)



"सोम्या...."

या हाकेत मघासारखी पुंडलिकाची आर्तता नव्हती, शिवाय आवाजाचा उगम कुण्या पुरुषाचं स्वरयंत्र होतं, ही सगळी गणितं सेकदांच्या शतांशात करत सोमेशच्या मेंदूनं सोमेशच्या शरीराला योग्य त्या आज्ञा दिल्या आणि सोमेशचं शरीर तात्काळ खालच्या मजल्यावर आवाजाच्या उगमासमोर उभं राहिलं.

"ब्याग भरत होतो, तात" सोमेशनं पुटपुटतं स्पष्टीकरण दिलं.

जुने मराठी सिनेमे बघून संस्कार झाल्यागत सोमेशच्या आईनं झट्कन त्याला आपल्याकडे ओढला आणि म्हणाली "बघितलसं का आपल्याकडे कोण आलय? स्वाती आत्या आठवते नां तुला?" सोमेशला अशी कुठलीही आत्या आठवत नसल्यानं तो जास्तच जोरात होकारार्थी मान हलवतो.

"आणि हा रणवीर. हा आपल्याच शाळेत असणारै, तुझ्याच वर्गात" वसंतराव उर्फ तात उद्गारले. वसंतराव आणि सोमेश एकाच शाळेत असल्यानं आपली शाळा हे संबोधन योग्यच होतं.

रणवीर असं तद्दन फिल्मी नाव असलेला मुलगा सावळासा पण तरतरीत होता. त्यानं हसून सोमेशशी हात मिळवला. त्याच्या एका कानात सोन्याचं निस्तेज वळं होतं. "आणि ही माझी सुनिला दिदी" रणवीरनं त्या सबंध धांदरट खोलीत विसंगत दिसणाऱ्या सुंदर मुलीची ओळख सांगीतली. काही मुली सुंदर असतात, काही मुली कुठल्याशा वयात सुंदर दिसतात. सुनिला नक्की कुठल्या प्रकारात मोडते हे कळण्याचं सोमेशचं अजून वय नसतं. पण पारंपारिक शहाणपणातून तो आपली नजर फार काळ सुनिला ’दिदी"वर रेंगाळु देत नाही. पारंपारिक शहाणपणातून सोमेशची आई सुनिला आणि तिच्या आईला स्वयंपाकघरात घेऊन जाते. रिकाम्या खोलीत वसंतराव पारंपारिक सुस्कारा टाकतात. स्वाती त्यांची दूरची बहीण असते. प्रतापदाजींची बदली गुजरातेत झाल्यानं स्वाती आणि दोन पोरं मुंबईहून पुढच्या शिक्षणासाठी वसंतरावांच्या गावात आलेले असतात.

" तू तुझ्या पप्पांना काय बोलतोस?" रणवीरनं सोमेशच्या खोलीत आल्या आल्या विचारलं.

"तात" सोमेशनं ओशाळवाण्या आवाजात सांगीतलं

"म्हणजे मी पप्पांना पॉप्स म्हणतो तसं तू तात्यांना तात म्हणतोस?" रणवीरचे गावाकडच्या मुलांबद्दलचे ग्रह तारे जवळ जवळ पक्केच झाले होते.

"नाय रे" घाई घाईनं सोमेशनं स्पष्टीकरण दिलं "तात म्हणजे संस्कृत मध्ये वडील, ते शाळेत संस्कृत शिकवतात म्हणून..."

वयात येणाऱ्या मुलांना बाप या विषयात इतकंच कुतूहल असतं.

बाकी शाळा, शाळेतली मारहाण, शाळेतला स्त्री वर्ग इत्यादी विषयांवर चर्चा करुन रणवीर समाधानानं घरी परतला.

॥ हमामा रे पोरा हमामा रे हमामा घालितां ठकलें पोर करी येरझार चौर्‍याशीची


सोमेशच्या घरापासून रणवीरचं घर लांब होतं पण तात की लात पडल्यानं तो सायकल हाकत रणवीरच्या घरी आला. स्वाती आत्यानं त्याला ब्रेडचा उपमा देऊन रणवीरच्या खोलीत पाठवलं. रणवीर आणि सुनिला दिदीची खोली एकच होती. खोलीत इंग्रज दिसणाऱ्या काही पातळ लोकांचे पोस्टर होते. सोमेशला ते ओळखु येत नाहीत. ते सगळे बाप्ये असल्यानं बहुदा सुनिलानं लावलेले असावेत. एका कोपऱ्यात लाल फेरारीचा पेप्रात आलेला काळा-पांढरा फोटो होता. तो बहुदा रणवीरनं लावलेला असतो. सोमेशला तो ओळखु येतो.

"रणवीर येईल, तू बैस त्या पलंगावर" कोरड्या आवाजात सुनिला दिदीनं फर्मावलं "आणि तो ब्रेडचा चुराडा सांडु नकोस हां."

बर्म्युडा-टी शर्ट घालून स्वतःशीच मंद हसणारी सुनिला दिदी , खोलीतला डिओचा मंद सुगंध या सगळ्या वातावरणार आपण मंद दिसतोय असं वाटू नये म्हणून सोमेशनं खणखणीत आवाजात विचारलं "तू फुड टेक्नोलॉजी शिकते काय?". सोमेश अगदी शॅरलॉक होम्स नसला तरी सुनिलाच्या पलंगभर पसरलेली फुड टेक्नोलॉजीची पुस्तकं त्याला नक्कीच दिसु शकतात.

"हो" सुनिलानं पुस्तकातून मुंडक न काढता उत्तर दिलं.

"मला पण खायला खुप आवडतं" सोमेशनं प्रांजळपणे सांगितलं "मी चिकण, मटण, बैदा सगळं खातो. मला गावातले सगळे हॉटेलं पण माहीतै. मला फिशचे हॉटेलपण माहीतै"

सुनिलाला गंमत वाटते. ती उठून सोमेशच्या शेजारी येऊन बसते. सोमेशला मोराच्या भरगच्च पिसाऱ्याखाली गुदमरल्यासारखं अस्वस्थ व्हायला होतं.

"आम्ही आमच्या कॉलेजमधे खुप डेन्जर डिशेस बनवतो. खाणार का?" सुनिलाला सोमेशची गंमत करायची लहर येते

सोमेशला बर्म्युडा-टी शर्ट कडे न बघणं अशक्य झालं तसा तो उठून उभा राहिला आणि पलंगाच्या काठाला धरुन त्यानं जमेल तितक्या निरागसपणे विचारलं "मास्टरशेफ मध्ये करतात तसल्या?"

सुनिलाचं फुटून फुटून हसणं ऎकून स्वातीआत्या खोलीत आली आणि विनाकारण हसत विचारलं "काय बेत शिजतोय छोट्या दादा सोबत?"

(’यक्स’ सुनिलानं लख्ख विचार केला ’एक्दम बॅकवर्ड!’)

(’बेक्कार’ सोमेशनं लख्ख विचार केला ’छोटा दादा?’)

दिवस-दुसरा

रणवीरच्या घरी जायचं म्हणून सोमेशनं नीटस तेल लावून, नीटस पॉन्डस लावून, पिवळा शर्ट जिन्सच्या पॅन्टमध्ये खोचला. दारातच सुनिला दिदी बघून त्याला नीटस दिसत असल्याचं फारच बरं वाटलं.

दिवस-तिसरा

रणवीरच्या घरी जायचं म्हणून सोमेशनं नीटस तेल लावून, नीटस पॉन्डस लावून, गुलाबी शर्ट जिन्सच्या पॅन्टमध्ये खोचला. दारातच सुनिला दिदी बघून त्याला नीटस दिसत असल्याचं फारच बरं वाटलं.

दिवस-कितवा तरी

रणवीरच्या घरी जायचं म्हणून सोमेशनं नीटस तेल लावून, नीटस पॉन्डस लावून, कोणतातरी शर्ट कोणत्यातरी पॅन्टमध्ये खोचला. दारातच सुनिला दिदी बघून त्याला नीटस दिसत असल्याचं फारच बरं वाटलं.

"हल्ली चिरंजीव घरी नसतात" वसंतरावांनी पेपर मधून डोकं न काढता चंद्रकांत गोखले टाईप प्रश्न विचारला.

"बघावं तेव्हा रणवीरच्या घरी पडीक असतो" टिव्ही वरची नजर न हलु देता सुधाबाईंनी उत्तर दिलं.

"हं"

"हं"
॥ दुसर्‍या पहारा महा आनंदें हमामा घाली छंदछंदें दिस वाडे तों गोड वाटे परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥
शाळा सुरु झाल्यावर रितसर सर्व गुरुजनांनी रणवीरच्या कानातलं वळं ही भिकबाळी नसून नवसाचं वळं आहे याची खात्री करुन घेतली आणि त्याच्या धार्मिक आस्थेचं मनोमन कौतूक केलं.


शाळा सुरु झाल्यावर रितसर सर्व मुलांनी रणवीरच्या कानातलं वळं ही भिकबाळी नसून फ्याशन आहे याची खात्री करुन घेतली आणि त्याच्या फ्याशन सेन्सचं मनोमन कौतूक केलं.

रणवीर शाळेत गिअरच्या सायकलनं येतो.

रणवीर रोज बुट पॉलीश करतो.

रणवीरकडे वट्ट पन्नास रुपये असतात.

रणवीरच्या वह्यांवर डब्लूडब्लूएफचे पैलवान असतात.

रणवीर बॉल बास्केटात टाकतो.

रणवीर डब्यात सॅन्डवीच आणतो.

रणवीरचं नाव रणवीर होतं!

पृथ्वी कुणाभोवती का फिरेना, सोमेशचा वर्ग रणवीरभोवती फिरायचा.

शाळेतून घरी जाताना एकदा रणवीरनं सायकल चढावावर थांबवली.

"दमलास कां बे?" सोमेशनं सायकलच्या दांड्यावरुन एक पाय खाली सोडत विचारलं "गेर टाकून बघ नां"

"तू जरा हेकण्या आहेस का रे?" रणवीरनं बेदम वैतागून विचारलं "तिकडं बघ, महोक येतेय"

महोक येतेय म्हणून आपण का थांबायचं हे सोमेशला नेमकं कळत नाही. ’इथेच आहे भलती मेख, वर्गमुळात वजा एक’ असली गणितं रणवीरलाही येत नसल्यानं त्यालाही आपण का थांबायचं कळत नाही. त्यानं सुस्कारा सोडला आणि सायकल ढकलली.

हे असं फार काळ चालणार नसतं. शाळा सुटल्यावर एक दिवस सावकाश रणवीर महोकच्या मागे मागे गेला आणि तिचं घर शोधून काढलं.

दिवस- पहीला

रणवीरनं पाणी लावून केस पोमेड केल्यासारखे मागे वळवले आणि सोमेश सोबत सायकवरुन गावातल्या अनोळखी गल्ल्यांमधून चकरा मारल्या.

दिवस- दुसरा

रणवीरनं पाणी लावून केस पोमेड केल्यासारखे मागे वळवले, पुम्माचे लाल बूट घातले आणि सोमेश सोबत सायकवरुन गावातल्या अनोळखी गल्ल्यांमधून चकरा मारल्या.

दिवस- तिसरा आणि रोज

रणवीरनं पाणी लावून केस पोमेड केल्यासारखे मागे वळवले, पुम्माचे लाल बूट घातले,डोळ्यांवर पप्पांनी टाकून दिलेला मोठ्या फ्रेमचा रेबॉनचा गॉगल लावला आणि सोमेश सोबत सायकवरुन गावातल्या अनोळखी गल्ल्यांमधून चकरा मारल्या.

"हे महोकचं घर" बार्कोसनामातला एखादा गुप्त पत्ता सांगावा तसं आठवड्याभरानं रणवीरनं सोमेशला त्या अनोळखी गल्ल्यांमधलं रहस्य सांगीतलं.

"तीच आपली फ्लेम" रणवीरनं सायकलच्या दांड्यावर महेश कोठारे सारखा हात आपटला. "महोक?" सोमेशचं तोंड किती तरी वेळ उघडं राहीलं. ’महोक...’ रणवीर किती तरी वेळ त्याचा फॅन्टस्या सांगत बसल्या.


महोक पाण्यावरची नक्षी,

गळ्यामधे गाता पक्षी

महोक सुगंधी गुलबक्षी,

बेभान नदी वाहाते वक्षी

’रणवीरचं वेड्यासारखं घराभोवती घुटमळणं, सतत काही बोलण्याचं निमित्त शोधणं- हे सारं असं असतं? प्रेम?’ सोमेशनं सायकल ढकलत ढकलत विचार केला ’प्रेम?? आणि आपण रणवीरच्या घरी सतत जातो ते? सुनिलादिदी भेटली नाही की आपल्याला धसल्यासारखं होतं ते?’ सोमेशनं सायकलचा ब्रेक आवळला "नाही...हे साफ चुक असणार..सुनिलादिदीला आपण दिदी म्हणतो, ती आपल्याहून मोठी आहे...हे वैझाड चुक आहे. नक्की चुकच आहे नां? मग उद्या पासून रणवीरकडे जायचं नाही? पण मग सुनिलादिदी भेटणार नाही? किती बोर होईल....तसं काही नसतं, आपण रोजच्या सारखंच जायचं!’ सोमेशनं समाधानानं सुस्कारा सोडला.

 
॥ चौथ्या पहारा हमामा घालिसी कांपविसी हातपाय सुर्‍यापाटिलाचा पोर यम त्याचे पडलीस डाईं
 


"तुला आयरक्ताची शप्पत" रणवीरनं सोमेशला धर्मसंकटात टाकलं...

"महोक" सोमेशनं अनोळखी आवाजात हाक मारली पण ती कदाचित त्याच्या घश्यातून बाहेरच पडली नाही कारण महोकनं वळून सुद्धा बघितलं नाही.सोमेशनं रुमालानं खसाखसा घाम पुसला, कबड्डी खेळताना घेतात तसा छातीच्या भात्यात भरपूर दम भरुन घेतला आणि "म..हो..क" अशी हाक दिली. महोक मागे वळली तसं सोमेशला जमीन फाटून आपण तीत गडप व्हावं वाटलं.

"तुला रणवीर माहीतै नां? त्याला तुला बोलायचय, तो म्हणाला फ्रेन्डशीप करायचीय." सोमेशनं आठवलं तेव्हढं भाषण कसंबसं ओकलं. रणवीरनं त्याला सायकलींग, कार रेसिंग, ड्रम्स, फुटबॉल, ब्राऊन बेल्ट या सगळ्या बद्दल बोलायसाठी बजावलेलं असतं पण ऎनवेळी सोमेश त्या सगळ्याचा गोपाळकाला करतो.

"फक ऑफ" महोकनं चेहऱ्यावरची रेष न हलवता उत्तर दिलं आणि काहीच ऎकु न आल्यागत सोमेशनं उत्साहपुर्वक निश्वास सोडला. "मग मी काय सांगु रणवीरला?" त्यानं चिकाटीनं विचारलं.

"एकाकिनी भवितुमिच्छामि" स्त्रीयांची विनोदबुद्धी कधी उफाळुन येईल सांगता येत नाही "निरोप संस्कृतमधून दिलेला कळेल नां त्याला?" महोकनं धमकीवजा दिलेला निरोप सोमेशला नेमका कळतो. रणवीर तरीही शनीवारी मारुतीला माऱाव्यात तितक्या ईमानदारीत महोकच्या गल्लीतून फेऱ्या मारत राहातो. महोकच्या संस्कृत निरोपाचं त्यानं केलेलं ’एकाकी मुलीला माझी ईच्छा’ हे भाषांतर काही प्युअरिस्ट सोमेशला पटत नाही.


"ए बारक्या" कुणी तरी सायकल मागे खेचली म्हणून सोमेश सटपटला; घोडा असता तर मागच्या दोन पायांवर ’ह्यंह्यंह्यंह्यं’ करत स्टंटला असता. तोंडभर मुरुमाचे डाग, गुटक्याचा सुगंधी दरवळ, तेलाचं तोंडही न पाहिलेले केस, रंगपार शर्ट असं एक उमदं व्यक्तिमत्व सोमेशच्या मागे उभं होतं.

"काय नाव है रे तुजं?" उ.व्य. नं विचारलं.

"सोमेश....का? काय झालं हो?"

उ.व्य. चा हात सळसळला खरा पण त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या मुलानं त्याला रोखलं. तो बराच सभ्य दिसत होता; सोनेरी काड्यांचा चष्मा, फिकट गुलाबी शर्ट, त्यावर कसलीशी एम्ब्रॉरयडरी इ.इ. . "तू संस्कृतच्या सरांचा मुलगा नां रे?" स.मु. ने विचारलं. सोमेशनं न समजून मान हलवली. स.मु. नं उ.व्य. ला डोळा मारला पण ते सोमेशला कळणार नसतं.

"तुझ्याकडे गिअरची सायकल आहे म्हणे"

"नाही, माझ्याकडे नाही. तो माझा मित्र आहे, रणवीर, त्याच्याकडे आहे"

"मला पण घ्यायचीय, एकदा चालवून बघायचीयै. उद्या सांगतोस का त्याला कॉर्पोरेशनच्या ग्राऊंडवर यायला"

कॉर्पोरेशनचं ग्राऊंड थोर मोठं होतं आणि त्याच्या काठावर पाण्याचा मोठा टॅन्क होता. स.मु., उ.व्य. आणि नारळासारखं उभं तोंड असलेला अजून एक मुलगा त्या टॅन्कावर बसून होते. रणवीरनं सायकल घासूनपुसून आणली होती. रणवीरला पाहून टॅन्कावरच्या मंडळींनी न दिसणारा ईलेक्ट्रॉनिक सिग्नल पास करावा तसं काहीतरी केलं.

’कड्’ किंवा ’काड्’ किंवा ’फाड्’

जो आवाज झाला त्याचं काहीसं वर्णन असं करता येईल.

रणवीरच्या सावळ्या गालावर पाच पांडव स्पष्ट दिसत होते.

"ए सोमेस, तू इथून सरळ घरी जायाचं हं. ईकडे तिकडे बघायचं नाही, कुणाला काही बोलायचं नाही" उ.व्य.नी त्याच्या खासगी आवाजात सांगीतलं ते ऎकून सोमेशच्या पोटात जोरदार मुरडा आला. काही तरी भलतचं सुरु झालयं आणि आपण काहीही करु शकत नाही याच्या फुद्दूसर जाणीवेनं त्यानं सायकल उलटी पळवली.

मॅचमध्ये रिप्ले दाखवतात तसं ’कड्’ किंवा ’काड्’ किंवा ’फाड्’ यापैकी एक आवाज परतून आला. रणवीरच्या कानातल्या निस्तेज सोन्याच्या वळाभोवती काळसर लाल रंगाची एक ढब्बु रेष उगवून आली.

"तुला फ्रेन्शसीप करायची का? मं आमच्याशी कर नां" उ.व्य. नी मिटींगचा नेमका अजेन्डा आत्ता सांगीतला. फावल्या वेळात नारळासारखं उभं तोंड असलेल्या मुलानं रणवीरच्या सायकलचे गिअर उचकटले, चेन उकलून ठेवली, ब्रेकच्या वायरी विश्वाइतक्या गुंतागुंतीच्या करुन ठेवल्या आणि सरतेशेवटी सिट निघत नाही या विफल जाणीवेतून रणवीरच्या डोक्यात टपली मारली.

"हा महोकचा कज्जीन" उ.व्य. नं स.मु.ची ओळख करुन दिली "तिच्याच बंगल्याशेजारी राहातो. तो तुला रोज बगतो, रेबॅन घालून. तू पुन्न्यांदा त्या गल्लीत दिसला नां सायकल सारखा उकलून ठेवनार" उ.व्य.ला अजून बरंच बोलायचं असतं पण त्याला सुचत नाही. शिवाय स.मु. अस्वस्थ होऊन ’चला आता निघा’ असं सारखं खुणावत असतो.

"बघून घेईन" तिन्ही गुंडे लांब गेल्याची खात्री झाल्यावर रणवीरनं स्वगत म्हटलं. स्वाभिमान आणि सायकलचे विस्कटलेले भाग जमा करुन तो निघाला तर अंधारातून सोमेश प्रकट झाला. "सॉरी यार, मला हे असलं होतं हे वाटलंच नाही" त्याच्या आवाजातला कंप अजून गेलेला नसतो.

"भिक्कुर्डा आहे तू" रणवीरच्या आवाजात ठोस कडवटपणा भरलेला असतो " भिक्कुर्डा, ढुंगणाला पाय लावून पळालास. दोस्तीत गद्दारी केलीस. आता सगळं फिनीश...सगळं फिनीश आपल्यात"

शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत रणवीर अंधारात निघून गेला.

’फिनीश?’ सोमेशला दोस्तीखात्यात वाईट वाटतं

तापल्या तेलात मोहरी टाकण्याचा शहाणपणा सोमेश करत नाही. तो दोन दिवसांनी रणवीरच्या घरी जातो.

"कुठे होतास रे दोन दिवस? आणि हा रणवीर कुठं पडला ते सांगायला तयार नाही. तू नव्हतास का सोबत?"

"नाही आत्या"
"कुठे होतास रे दोन दिवस? रणवीरला कुणी पिटला का? पोरीचं लफडं का? तो काही सांगायला तयार नाही. तू नव्हतास का सोबत?"

"नाही सुनिलादिदी"

" " (तुझ्या फ्लेमनं गद्दारी करुन तुझ्यावर गुंडे घातले की कळेल. आयरक्ताची शप्पत, आत लागलेलं जास्त दुखतै)


" " (खतरनाक...डोळा काळा, निळा की जांभळा? अर्रर्र)

॥ हमामा घालितां भ्याला तुका त्यानें सांडिली गड्याची सोई ॥

Comments

खणखणीत. पिसाऱ्यापासून फुद्दूसरपर्यंत अनेक प्रतिमा आणि विशेषणं आदळली, भिडली, घुसली!
Samved said…
धन्यवाद म्याडम! अजून लिहायला पाहिजे होतं असं नंतर वाटलं पण ठीकै
Samved said…
श्रेय नामावली राहिली-

No, everybody's gotta learn, nobody's born knowin'-- By Harper Lee from To kill a mockingbird

हमामा रे पोरा हमामा - तुकाराम बोल्होबा अंबिले सर
mad-z said…
बाबो ... भलतच भारी . कॉलेज आठवून ऱ्हायलं न बे .