The Pendulum Doesn't Arrive
कसलीच हालचाल नाही
अजिबात नाही
गळक्या झाडांचं पानही हलत नाहीये
रस्ताच्या मध्यभाग बसलेली गायही सुस्त पेंगुळलेली
नाही म्हणायला भर बाजारात अश्लीलपणे उभ्या असणाऱ्या
वॉचटॉवरचा लंबक तेव्हढा डावी- उजवीकडे झुलतो आहे
पण तो त्याच जागेवर कुढतोय असंही म्हणता येऊ शकतं - अगदीच शक्य आहे
आपण बुटांकडे बघायचं
आकाशाकडे बघितलेलंही चालतं
आकाश- राखाडी / बुट घट्ट
की बुट - राखाडी/ आकाश घट्ट?
मरु दे, कुणाला फ़रक पडणार आहे?
आपण इथेच उभं राहायचं - वाट बघायची
शू आल्यासारखे वजन या पायावरुन त्या पायावर करायचं
शबनम मधलं हस्तलिखीत काढून परत आत ठेवायचं
सालं काहीच बदलत नाही
शबनम शबनम राहाते
पाय कंबरेखाली लटकलेले राहतात
रस्तापण वाढ खुंटल्यासारखा जागीच रमतो
हे बेश्ट! आपल्यालाही कुठं जायचं माहीत नसतं
या रस्त्यावरुन कुणी गेलं तर काय होईल?
आपल्याला बकरीसारखं त्याच्या मागे मागे जाता येईल?
गेला बाजार कुणी बॉम्ब फोडला तर?
कुल्ले वर करुन पळावं वाटेल - बहुदा
त्या निमित्तानं का होईना
काही तरी हालचाल होईल
पण तसं वाटलंच नाही तर?
शंका आणि शक्यता फार वाढायच्या आत
इथून निघायला हवं
निदान कुणी चार प्रश्न विचारुन हकलून देईल ही एक भाबडी आशा
पण तोवर असं उभं राहावं लागणार
इन-केस हकललं तर जायचं म्हणजे तरी कुठे?
सगळीकडे तेच ड्यॅम बोर क्षितिज,
तंग हवा, धुळीचे पिवळे नारंगी कण,
मेट्रो, स्टेशनरी दुकान, अमृततुल्य चहा, रिळा,
फुकटचा थकवा च्यायला
इथेच थांबावं
तेच बरंय
जोवर रस्ता कुठेच जात नाही
तोवर इथेच थांबावं
Comments