पाऊस
सगळ्या आकाशवाण्यातून (आकाशातला वाणी नव्हे तर आकाशवाणीचं अनेकवचन)सुखरुपपणे पार पडत एकदाचा पाऊस आला. नेहमी प्रमाणे मुंबईला पुर आलाय, झोपड्या वाहून काही लोक मेलेत, निर्लज्जासारखे आपले नेते त्यासाठी कोण जबाबदार आहेत त्यांची जंत्री टीव्ही समोर वाचताहेत, पेपरवाले पिक्चरमधला पाऊस या नावाखाली कित्येक वर्षे राज-नर्गिस आणि टिपटिप बरसा पानी वाली रविना छापताहेत. पण पाऊस काय हा एव्हढाच असतो? अरे हट्ट! ते वेडपट डबडं बंद करा आणि डोळे मिटा आणि शाळेत कधीतरी शिकलेली बालकवींची "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे" आठवा. सोनलच्या मित्रानी लोणावळा फिरवला होता आम्हाला. तो तिथलाच त्यामुळे "नेहमीचंच सुप्रसिद्ध" टाळून त्यानी आम्हाला कुठेतरी दूर नेलं होतं, लोकांच्या पुरापासून लांब. खच्चून पसरलेलं मैदान, त्यावर सुखासीन लोळलेलं गवत, मधूनच झिरपणारा पाऊस, कधी डोळा चुकवून येणारं ऊन..असं वाटलं ठोमरेसाहेब इथेच कुठेतरी कोपरयात बसून श्रावणमासी लिहीत असतील. एका बाजूला कडेलोटासारखा डॅममधून ओतलं जाणारं पाणी आणि दुसरया बाजूला कवितेसारखं किंचित उलगडल्या सार...