मोरल ऑफ द स्टोरी?
मॅन्चेस्टरच्या एका शांत कोपरयात त्याहूनही शांत असं ते छोटंस रेस्तॉंरॉ होतं. वेगात बुडणारया ब्रिटीश परंपरेच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक. रेस्तॉंरॉचं नाव टी-क्लब असलं तरी चार रिकामटेकडी म्हातारी सोडली तर तिथे क्वचितच कुणी दिसायचं. अर्थात कुणी यावं असं तिथं काही नव्हतंच. सजावटीच्या नावाखाली कधी काळी तेलपाणी झालेलं जुनाट लाकडी छत, त्यावर कोरलेली रेशीम काढण्याच्या मॅन्चेस्टरच्या जुन्या प्रथेची आताच अर्वाचिन भासणारी चित्रं, पायाखाली करकरणारं लाकडी फ्लोरिंग आणि टेबलावर छोट्या चौकानाचौकानांचं डिजाईन असणारं टेबलक्लॉथ या पलीकडे तिथे आणखी काही ही नव्हतं. पेप्सी, कोक, कॉफी, बर्गरवर वाढणारया नव्या पिढीला तिथे मिळणारया कुकीज आणि चहात कणभरही स्वारस्य नव्हतं. किंचित बहीरा, बराचसा विक्षिप्त आणि अस्सल शिष्ट इंग्रज म्हातारा तो टी-क्लब चालवायचा. दिवसभरात मोजून १५-२० लोक तिथे यायचे तरी म्हातारयाचं बरं चालायचं. आलेल्या लोकांना न हसता अभिवादन करण्याचा त्याचा रोजचा शिरस्ता मोडायचा तो फक्त महीन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा त्या चार व्यक्ती एकत्र यायच्या तेव्हाच. त्याला कारणही तसंच होतं. ती चारही टाळकी अस्सल ...