अनुवाद ३: He Wishes for the Cloths of Heaven
विल्यम यीट्सची ही १८९९ मधली प्रसिद्ध कविता. ही कविता सिनेमा, टीव्ही मालिका आणि इतरही पुस्तकांमधून वापरली गेली आहे असं विकी सांगतं.
या कवितेचा अनुवाद करता करता मला एक सयामी कविता सुचली, यीट्सच्या कवितेची जुळी बहीणंच जणु. तिला नाही म्हणणं अशक्यच होतं म्हणून अनुवादाचा दुसरा भाग म्हणजे ती सयामी कविता. कृष्णाच्या नजरेतून यीट्सची कविता कशी दिसेल असं काहीसं त्या सयामी कवितेचं स्वरुप आहे.
Had I the heavens’ embroidered cloths,
Enwrought with golden and silver light,
The blue and the dim and the dark cloths
Of night and light and the half-light,
I would spread the cloths under your feet:
But I, being poor, have only my dreams;
I have spread my dreams under your feet;
Tread softly because you tread on my dreams
- William Butler Yeats
तेरे लिए सपनों की चादर बुनुं
प्रिय,
दैवदत्त एखादा शेला असता,
सोनेरी आणि चंदेरी प्रकाशलहरींनी विणलेला,
गर्द निळ्या, सावळ्या रंगाचा,
अंधाराची सळसळ, दिवसाचे लख्खं लावण्य आणि संध्याकाळचे बावरपण कोरलेला
तर
तुझ्यासाठी त्याच्या पायघड्याही घातल्या असत्या.
पण कफल्लक माणसाकडे फक्त स्वप्नं असतात....
जssरा जपून पाऊल टाक
प्रिय,
त्या कोवळ्या स्वप्नांची मलमल मी तुझ्यासाठी पसरवली आहे.
----सयामी कविता----
॥सत्यभामा॥
बयो,
तुझे चंचल पाऊल
पृथ्वीच्या अहंकारी टोकावर ठेवशील
तर कोण चकमक उडेल (आता स्त्रियांच्या मत्सराचे नवे दाखले नकोच आहेत मला)
हा माझा दैवदत्त शेला-
सोनेरी आणि चंदेरी प्रकाशलहरींनी विणलेला,
गर्द निळ्या, सावळ्या रंगाचा,
अंधाराची सळसळ, दिवसाचे लख्खं लावण्य आणि संध्याकाळचे बावरपण कोरलेला,
त्याच्याच
तुझ्यासाठी पायघड्या घालतो.
॥राधा॥
तुझ्या झिजलेल्या पावलांवर
कोणती नक्षी काढु राधे?
तुझ्या वाटेवर मी माझे श्यामल डोळे पसरेन
माझ्या स्वप्नांमधून मग तू चालत जाशील!!
Comments
Keep up the good work!
I'd love to read more from you.
I dabble at creative writing too but you're great. While reading one of your articles, I remembered VaPu!