आयवा मारु

"कोणे एकेकाळी" असं म्हणण्याइतपत जुनी गोष्टं नाही ही. सत्तरीच्या आसपास आयवा मारु नावाचं एक मालवाहु जहाज प्रवासाला निघालं. कोणत्याही जहाजाला असतो, तसं आयवा मारुला पण एक कॅप्टन होता, फर्स्ट मेट, सेकंड मेट, थर्ड मेट होता, चीफ ऑफिसर, सुकाण्या, कुकही होता. या सारया मुरलेल्या खलाश्यांना समुद्राची, त्याच्या वादळांची सवय होती. पण एक वादळ त्यांच्या सोबतच प्रवासाला निघालं होतं ते जरा निराळं होतं. आयवा मारुवर राहणारया या वादळाने आणखी वादळे निर्माण केली आणि आयवा मारुचा तळ ढवळुन निघाला. आयवा मारुवरच्या माणसांच्याच काय पण प्रत्यक्ष आयवा मारुच्याही इच्छा, वासना, आशा जागृत व्हाव्यात असं भीषण वादळ. एम. टी आयवा मारु ही त्याचीच गोष्ट.

*******************************************************

अश्रूंच्या उंच सावल्या कलंडतात तिच्या बिलोरी डोळ्यांत
आक्रोशत ओलांडतात अक्षांश आग लागलेले राजहंस
आणि तिच्या गिरकीची शैली उगवते भूमितीत दिक्काल

अचानक पडतो एक क्ष-किरणांचा झोत अंगावर
आणि तिच्या शरीराचें शुभ्र यंत्र होते पारदर्शक
पेटलेल्या कंबरेभोवती तिच्या विस्कटतात छाया
किंचाळतात नीरवपणे स्तब्धतेत वाहणारया तिच्या बाहुंच्या नद्या


विलंबीत लयीसारखी थरथरली ओरायनची पोलादी काया, त्याच्या एका स्पर्शापायी. नाव बदललं म्हणून जुनी ओळख पुसता येतेच असं नाही आणि ती तर स्त्री. जन्मोजन्मींची गुपीते गुणसुत्रांच्या कालकुपीत बंद करुन पिढ्यानपिढ्या वागवित नेणारया तिला, एक नाव बदलण्याने असा कितीसा फरक पडणार होता? आज तिचे नाव आयवा मारु आहे, उद्या अजून काही असेल. नावांचे संदर्भ तात्कालिक, प्राणाहुन प्रिय सखा भेटण्याचे गारुड तेव्हढे खरे.

तो आला तसा मागोमाग गन स्लिंगर आला, रॉस आला, डालीझे, बोसन आणि हो, सेनगुप्ता ही आला. एका घटनाचक्राचे सारेच तुकडे कालाच्या प्रवाहात फिरत फिरत आज परत एकत्र आले आहेत. पण चक्र ज्या बिंदु भोवती फिरतं तो आता एक उरला नाहीये. एवंम इंद्रजीत..अमल, विमल, कमल आणि इंद्रजीत. ऍना, मिसेस सेनगुप्ता, उज्वला आणि आयवा मारु... चक्र ज्या बिंदुभोवती फिरणार त्याची जीत.

उज्वला... तिच्या डोळ्यात आग लागलेल्या समुद्राची धग आहे, म्हातारया बोसनने पहील्या छुट वाचलं तिला. जहाजाचा सवतीमत्सर जागा होऊ नये म्हणून बाईला जहाजावर न येऊ देण्याचा जुना प्रघात दिपकने मोडला आणि आत्मविनाशाचे एक नवेच पर्व सुरु झाले. अलाहाबादच्या घाटावरुन आयवा मारुच्या डेकपर्यंत, देहाच्या बोलीवर तरंगत आली उज्वला. स्पर्शाची बेभान बोली तिच्या उमलत्या देहाला जशी उमगली, तशी तिचा देहच वाचण्याची विकृत उर्मी तिच्या सख्या बापात जागी झाली. आणि आता ती उभी आहे आयवा मारुच्या विशाल डेकवर. डोळ्यांनीच निर्वस्त्र करु पाहाणारया खलाशांच्या भुकेल्या नजरेत, त्याची एकच सौम्य नजर तिला ओळखता आली आणि मनोमन ती त्याची कृष्णसखी झाली. दिपकला गैर वाटण्यासारखं त्यात काहीच नव्हतं कारण त्या जहाजावार त्याच्या शिवाय त्या दोघांचही सख्खं असं कोणीच नव्हतं. दिपकला तिचे रुढीबंद डोळे नव्याने कोरायचे होते. त्याच्या जून डोळ्यांना तिच्या परंपरागत आत्म्यामागचे फक्त कोवळे शरीरच दिसत होते. "तिने पुसले पुसले, पुरुषाचे गणगोत/गणगोत कसं बाई, सारी शिताचीच भुतं." दिपकच्या स्पर्शातला निबरपणा तिला तिच्या वडीलांच्या स्पर्शाची आठवण करुन द्यायचा. वासनांचे नंगे नाच अजून सुरु व्हायचेच होते की सेनगुप्ताचं ते तसं झालं. सेनगुप्ता, उज्वलाला तिच्या भावागत वाटायचा.

समीर सेनगुप्ताचं उरलसुरलं सामान न्यायला त्याची आई आली होती, मिसेस सेनगुप्ता. तिचे धागेही समुद्राशी तटतटून जोडले-मोडलेले. एका शापवाणी प्रमाणे ओतले तिने तिचे शब्द चीफ पॅट्र्किच्या थरथरत्या शरीरात "काळाच्या पुढे डोकावलास तर स्वतःच्याही अस्तित्वाचा शेवट दिसेल तुला." अनुभवी रॉसलाही जे ऎकु आलं नाही त्याचे भोगवटे मात्र वाट्याला आले उज्वलाच्या.

ज्वाला, ज्वालाच म्हणूया तिला. बोसन म्हणाला तसं डोळ्यात आग असणारी ज्वाला. दिपक मधल्या गन स्लिंगरनं तिच्यातली उज्वला कधीचीच संपवली होती. आता उरली ती फक्त ज्वाला. दिसेल ते शरीर भोगूनही रिती रितीशी ज्वाला. हाकेला धावून येणारा सेनगुप्ता संपला आणि तिचा सखा निती-अनिती, नातेसंबंध यांच्या चक्रव्युहात अडकला तसे तिने लाजेच्या, आत्मसन्मानाच्या सारया रिती गुंडाळून ठेवल्या आणि ती फक्त ज्वालाच उरली. जर ऍना आयवा मारुवर आली नसती तर ज्वालाच्या वासनांध देहानं तिच्या सख्याचाही बळी घेतला असता?

प्रश्नचिन्हाआड दडण्याइतकी ऍना बॅसिलिनो कमकुवत नव्हतीच कधी. तिनं फक्त वाट पाहीली त्याची, अखेर पर्यंत वाट. एका निमित्तासारखं तिने त्याच्यावर लुटवलेला देह, त्याचे पुढचे प्रवास तगवायला पुरेसा होता. प्रेम अजून वेगळं असतं? ज्वालाच्या आव्हान शरीराचे मोह तटवायला पुरेसे असतीलही ऍनाचे स्पर्श, पण जिच्या साक्षीने हे सारेच खेळ सुरु होते त्या आयवा मारुचे काय?

एम. टी. आयवा मारु, आठ्ठेचाळीस टनांच धुड, वय वर्ष अवघं तीस, म्हणजे तरुणच म्हणायचं. रॉसच्या, कॅप्टन रॉसच्या वेडापोटी आयवा मारु समुद्रात उतरली होती, तिच्या मोडक्या तोडक्या संसारासहीत. मग काय झालं? शेवटी हे असं का झालं? रॉस म्हणतो तसं "पोलादाला जान नसते. पोलाद वितळवणारया ज्वालांनाही जाण नसते; पण त्या ज्वालांची धग सहन करत पोलादाला आकार देणारया माणसाच्या भावना त्याच्या मजबुत हातांतुन पोलादात मिसळतात. त्या पोलादी पिंजरयात अडकलेल्या माणसांच्या इच्छा पोलादाला आकांक्षा देतात. तिच्यात जीव ओततात. सागराशी झगडत, उन्हात करपताना, पावसात भिजताना निसर्गातील महाभुतं तिचे व्यक्तिमत्व घडवतात. ती ह्ळूहळू श्वासोच्छ्वास करायला लागते. तिच्याही मनात जगण्याची इच्छा जन्म घेते. माणसांच्या संगतीची आवड निर्माण होते. यु विल नॉट बिलिव्ह, पण स्वतःची माणसं ती स्वतः निवडते. जगाच्या कानाकोपरयातून त्यांना खेचून आणते. आपल्यासारखी."

आयवा मारुने खरंच कुणाला बोलावलं होतं आणि कोण उपरयागत आलं होतं? काही जुन्या रिती मोडल्या की काही नवे शाप खरे ठरले? विनाशचक्राला गती नक्की कुठे मिळाली ठरवणं खरंच कठीण आहे.

या सारया खेळात अज्ञाताला सामोरा जाणारा 'तो', सामंत, मात्र कधीचाच पुढच्या प्रवासाला निघालेला असतो.

************************************************

"एम. टी. आयवा मारु" कधी तरी नव्वदीच्या सुमाराला प्रकाशित झालं. घरी कुणी वाचायच्या आत मी ते पुस्तक वाचलं म्हणून मला ते त्या वयात वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक आणि अनंत सामंत तेव्हा पासून मानगुटीवर बसले ते आजतागायत. असंख्य संदर्भात ते पुस्तक मनावर ओरखडे उमटवत राहीलं. समुद्रागमन हिंदु धर्मात निषिद्ध त्यामुळे मराठी माणसासाठी समुद्र फक्त पुळणीवरच भेटत राहीलेला. रणांगण कदाचित समुद्राच्या पार्श्वभुमीवरचं पहीलं मराठी पुस्तक असावं. पण आयवा मारुत भेटणारा समुद्र निराळाच. इथे समुद्राचं, जहाजाचं कॅनव्हस नाही तर ती त्या गोष्टीतली मुख्य पात्रं आहेत. अंगावर येणारे शारीर उल्लेख, शरीरसुखाचे रासवट प्रसंग, त्याहुनही रासवट खलाश्यांचं जगणं, आणि ज्वालाच्या बाईपणाचे सोहळे. Celebrations, afflicts of womanhood were never so explicit in Marathi. किती वर्ष झाली पण ज्वाला असंख्य रुपात भेटत राहीली, कविता, डायरी आणि आता ब्लॉग. अभिजित आणि मेघनानं परत एकदा अनंत सामंताची आणि आयवा मारुची आठवण करुन दिली. त्रासाबद्दल आभार.

***********************************************

सुरुवातीची कविता, दिलीप चित्र्यांची "नर्तकी"

Comments

Abhijit Bathe said…
काही वर्षांपुर्वी सांमंतांशी बोललो - आयवा मारु आणि इतर काही गोष्टींबद्दल. त्याची एक गोष्ट लिहायला पाहिजे.

आयवा मारु भन्नाट आहे वगैरे ठीक, झपाटुन टाकते वगैरेही मान्य, पण दुसर्यांदा वाचताना....

मागच्यावेळी भारतातुन येताना विकत वगैरे आणली - पण मागचे काही दिवस वाचवत नाहिए. अर्थात कादंबरीचा दोष नाही त्यात, शिवाय मध्येच कुठलंही पान उघडुन वाचायला सुरुवात करण्यासारखीही कादंबरी नाहिए ती, पण तरिही....

तु मात्र ’मारु’ प्रेम टिकवुन ठेवलेलं दिसतंय! मी काय माहित काय लिहिलं असतं त्यावर - एवढं नसतं लिहिलं मात्र.
पुन्हा घरी परतण्याचा प्रयत्न करू नये हेच खरे. नशीब असेल तर (की नसेल तर म्हणू?), हाती तितकाच मोठा आनंद लागतोही. पण तशी खात्री कसलीच नव्हे. माझ्यापुरते म्हणशील तर, 'आयवा मारू' अप्रतिम खरीच. पण तिच्यामधे मिथकांसारखी नवे अर्थ जागवण्याची ताकद नाही, हे स्वीकारले आहे मी.
बाय दी वे, तुझे 'आभार' मानू?!
नको. त्यापेक्षा आभारादाखल नवी भुणभुण करते. मिथकांबद्दल लिही ना.
Megha said…
zalay changala....pan tuzyakadun ajun jasti changlyachi apeksha hoti he hi titkach khara.....
tula jasa he pustak laukar vachayala milala tasa mala avirat....samant yancha ch.dadani lapaun thevala hota mala itakya laukar vachayala denyachi tyanchi ichcha navati...pan mi detective giri karun vachlach.samantanchi pustaka zapatun taktat hech khara.