Posts

Showing posts from 2017

बैरागी

Image
तू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना   कधी डोळ्यांनी आरपार बघताना अडखळे पाय निघताना तू पुरलेल्या कविता तो गातांना झाडात दिसे रडताना

Portrait of three cities

शहर-१ पिवळ्या करड्य़ा रंगांच्या छटांत गुरफटून झोपलेलं शहर अरुंद रस्त्यांवर मिचमिचणाऱ्या ट्युबलाईट आणि जवळच्या शेताच्या बांधावर कोसळणारं क्षितीज धुळीने मिटमिटलेली झाडांची पाने भद्र स्वरांच्या अवचित लडी नाक्यावरती शिळ्या पोरांच्या बाताड्या आणि कोरड्याढाण नळातून सूं सूं वाहाणारी हवा रुजू घातल्यासारखी माणसे पाय फुटताच इथून स्थलांतरीत होतात शहर- २ साऱ्या शहराला कवेत घेऊ पाहाणारा व्हाईट नॉईज विरत जातात त्यात बेबंद गाड्यांचे निर्बुद्ध आवाज आणि बुद्धाच्या ओठांवरचं धुसर स्मित चव गेलेल्या जीभेची माणसं शहरभर पसरलेल्या थडग्यांतून आपल्या संस्कृतीचे नेमके अवशेष शोधू पाहातात आणि चकवा लागल्यागत फिरुन फिरुन परत आपल्याच घरी जातात कारखान्यांचे कर्मठ भोंगे गोठवत राहातात शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया बॅकप म्हणून तरीही शहराभोवती उभी केली असतात बिनचेहऱ्याची महाद्वारे स्थलांतरीत माणसे रक्तबंबाळ पायांवर तीळ उमलताच धावत सुटतात बा हे र च्या दि शे ने शहर-३   सारे ऋतु एकच गंध पांघरुन उभे असणारे शहर अश्वत्थाम्यासारखे ...

जगावेगळी बाई

देखण्या बायांना कळत नाही माझ्यात असं काय निराळं आहे. तसं बघाल तर, मला कोणी गो..ड नाही म्हणणार आणि हो, बेतलेल्या शरीराच्या चमकदार ठक्यांसारखी मी आखीवरेखीव देखिल  नाही. पण माझं शरीर- माझे नियम शंकासुरांनो ध्यानात ठेवा कायम. खोटं वाटतयं? माझ्या मर्जीवरच झुलतो माझ्या कंबरेचा झोका चाली मधला तोरा आणि ओठांवरचा धोका. शहाणी ती बाय मी आहेच जगावेगळी. तुमच्या वर्तुळात बिंधास मी घुसते तेव्हा मधमाश्यांसारखे फेर धरतात पुरुष माझ्याभोवती, कुणी विस्फारल्या डोळ्यांनी नकळत उभं राहातं तर कुणी उंच खुर्चीतून गुडघ्यांवर  कोसळतं . ही जादू माझ्या चमकदार डोळ्यांची ही जादू माझ्या खळखळून हसण्याची ही जादू बिनतोड माझ्या ठुमक्याची आणि आनंदानी थिरकणाऱ्या माझ्या पायांची. कारण शहाणी ती बाय मी आहेच जगावेगळी. पुरुषांना प्रयत्न करुनही कळत नाही नेमकं काय वेगळं आहे माझ्यात. देहदार पदर काही उलगडून दाखवते तरीही काही शिरत नाही त्यांच्या सनातन डोक्यात. खुळ्यांनो, तुमच्या चौकटीबाहेर आहे माझं देहभान जे वाहातं पाठीच्या खोल पन्हाळीतून सांडतं आश्वासक हसण्यातून कधी हिंदोळतं स्तनांच्या...

सिद्धार्थ कवडीवाले , हल्ली फार डेंजर असतं

हल्ली फार डेंजर असतं निळ्या रंगाची बंदूक घेऊन गढूळलेल्या डोळ्यांचा माणूस सतत आपल्या पाळतीवर असतो टू कीप डॉक्टर अवे म्हणून जराशी हिमालयन सफरचंदे झूम बराबर झूम च्या  आनंदी  तालावर नाचवावीत डोक्यावर तर निळ्या बंदुकीचं टारगट तोंड वळलेलं दिसतं आपल्याच मोहरलेल्या डोक्याकडे काचपेट्यांच्या शीतल मायेतून अंधाऱ्या ओव्हरब्रिज कडे जाताना गॉशियन आकारातल्या भीतीला दटावण्यासाठी आपण जेव्हा करत असतो भीमरूपी महारुद्राचं आणि अनोव्हीय नियमांचं फ्युजन, पहाऱ्यावर असतेच रोखून पाहणाऱ्या गढूळलेल्या डोळ्यांची जोडी शुन्य-एक-शुन्य-एक-शुन्य-एक-शुन्य-एक स्वरांचा तीव्र निषाद लावलेल्या पावसाचा फायदा घेऊन आपण गर्दीत मिसळू पाहतो तोंडाला पाने पुसणाऱ्या माणसांच्या तेव्हा शेजारून जाणारा कुणी गुणगुणत जातो गर्दीत गारद्यांच्या.. आणि बंदुकीची निळसर नळी बोटांना हलकेच दंश करून अदृश्य होते हल्ली फार डेंजर असतं माणसांची सर्वत्र झडती घ्यायला हवी असं म्हणत आपण खसाखसा चेहरा पुसत आरसा बघतो आणि कंबरेला खोचलेली निळ्या रंगाची बंदूक मेजावर ठेवून झोपायला जातो

उसंत नसलेल्या वर्तमानाच्या कथा

Image
कविता आणि कादंबरी या साहित्य प्रकारांना त्यांच्या अंगभुत रचनेमुळे मांडणीच्या ठाशीवतेपासून   एक प्रकारचे संरक्षण लाभलेले असते. झाडांतून दुपारच्या प्रहरी झरणाऱ्या कवडश्यांच्या साऊलखुणांभोवती चौकट आखता येऊ शकते पण त्या चौकटीच्या आत काय घडेल याला मर्यादा नाहीत. कुठल्याही कादंबरीच्या मांडणीत पात्रे , त्यांचे परस्परांशी संबंध , त्या पात्रांमागचा भुगोल , काळाची रचना आणि अशी अनेक टोके तर असतातच शिवाय त्या टोकांना जोडू पाहाणाऱ्या असंख्य प्रवाहांच्या शक्यताही त्या कादंबरीची मांडण ठरविते. कवितेच्या बाबतीत बोलायचे तर तिच्या मांडणीचे अवकाश मर्यादित असले तरी शब्दकळा , छंद , संदिग्धता , उपमा , उत्प्रेक्षा , कविचे वैयक्तिक भाष्य यांच्या मदतीने कवी कवितेची मांडण लवचिक ठेवू शकतो. कथेला हे स्वातंत्र्य नाही. कविता आणि कादंबरी यांच्या तुलनेत कथेचे प्रतल मर्यादित असते आणि त्याचमुळेच तिची रचना नेमकी असावी लागते. लेखाच्या सुरुवातीलाच हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे प्रणव सखदेव-कवी ते प्रणव सखदेव-कथाकार म्हणून मांडणीच्या या आव्हानाला कसा सामोरा जातो हा माझ्यापुरता थोडासा कुतुहलाचा विषय होता. २०१६ मध्ये...

हे राम...विराम "?;.’

आटपाट नगर होतं सुरुवात  वाचून गोष्ट वाचणं बंद कराल तर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप क्षणोक्षणी  तरलावस्थेत जाऊन तुम्हाला त्याच्या पायावर लोळण घ्यायला भाग पाडेल डी-धमक्या म्हणजे डिजीटल-धमक्यांचा तुमच्यावर परिणाम होतोय असं समजून पुढे चला हं तर आटपाट नगर होतं आणि म्हणजेच जुना काळ होता असं नव्हे या गोष्टीत आपण काळाचा एक आडवा काप काढला आहे म्हणजे कसं की काळाचे उभे कप्पे असतात जसं की अठरावं शतकं किंवा एकविसावं शतकं वगैरे वगैरे पण काळाचा आडवा काप काढला की कुठल्याही काळातल्या कुठच्याही घटना आपण एका प्रतलात आणू शकतो उदाहरणार्थ प्रभु रामचंद्र (जुना काळ) विमानाने (नवा काळ) लंकेला गेले किंवा सुवर्णलंकारांकीत नगरसेवकाची (नवा काळ) पुस्तकतुला (जुना काळ) वगैरे तुमचा काल-अवकाश अश्या संकल्पनांचा अभ्यास नसणारच तर आता या उदाहरणांवरुन तुम्हाला काळाचा आडवा काप म्हणजे काय याचा अंदाज आला असेल असो तर आटपाट नगरात वसंत मंगेश गोडघाटे नावाचा राजा होता आणि महत्वाचं म्हणजे तो पार्टटाईम कवीदेखिल होता म्हणजेच वमंगो राजा भावनाप्रधान वगैरे असतो भावनाप्रधान कलावंत आणि राजा या डेडली कॉम्बिनेशनवर संशय असणाऱ्या पापी लो...