Tuesday, June 26, 2007

पाऊस

सगळ्या आकाशवाण्यातून (आकाशातला वाणी नव्हे तर आकाशवाणीचं अनेकवचन)सुखरुपपणे पार पडत एकदाचा पाऊस आला. नेहमी प्रमाणे मुंबईला पुर आलाय, झोपड्या वाहून काही लोक मेलेत, निर्लज्जासारखे आपले नेते त्यासाठी कोण जबाबदार आहेत त्यांची जंत्री टीव्ही समोर वाचताहेत, पेपरवाले पिक्चरमधला पाऊस या नावाखाली कित्येक वर्षे राज-नर्गिस आणि टिपटिप बरसा पानी वाली रविना छापताहेत.

पण पाऊस काय हा एव्हढाच असतो? अरे हट्ट! ते वेडपट डबडं बंद करा आणि डोळे मिटा आणि शाळेत कधीतरी शिकलेली बालकवींची
"श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे" आठवा.

सोनलच्या मित्रानी लोणावळा फिरवला होता आम्हाला. तो तिथलाच त्यामुळे "नेहमीचंच सुप्रसिद्ध" टाळून त्यानी आम्हाला कुठेतरी दूर नेलं होतं, लोकांच्या पुरापासून लांब. खच्चून पसरलेलं मैदान, त्यावर सुखासीन लोळलेलं गवत, मधूनच झिरपणारा पाऊस, कधी डोळा चुकवून येणारं ऊन..असं वाटलं ठोमरेसाहेब इथेच कुठेतरी कोपरयात बसून श्रावणमासी लिहीत असतील. एका बाजूला कडेलोटासारखा डॅममधून ओतलं जाणारं पाणी आणि दुसरया बाजूला कवितेसारखं किंचित उलगडल्या सारखं वाटून-न-वाटल्यासाखं पावसाचं पाणी. निळ्या छत्रीवाल्याची करामत खरच अजीब आहे. पाऊस असा की कोणाच्या डोळ्यातलं पाणी विरघळून पण कुणाला कळूच नये.

सगळ्यात पहिल्यांदा ज्या कविता आपण शिकतो त्यात default "येरे येरे पावसा" असतेच. आजकाल जो प्रमाणाबाहेर पाऊस पडतोय त्याचं सारं खापर आमच्या-आपल्या पिढीवर. पावसाला इतके खोटे पैसे आपण चारले होते की "पाऊस आला मोठा" हे त्याचं resultant आज खरं होताना दिसतयं!! पावसाळ्याच्या अनेक तयारयांपैकी उन्हाळ्याचा सुट्टीत मुंबईहून येताना रेनकोट घेऊन येणे हा एक लहानपणीचा ठरलेला होता. केशवराजच्या आख्या इतिहासात रेनकोट घेऊन येणारा कदाचित मीच पहीला असेन. लातूरचा पाऊस तो काय..मिणमिणा..पण आख्ख माणूस भिजवला नाही तरी दप्तर भिजवण्याचं सामर्थ त्यात नक्कीच होतं. रेनकोटच्या आत दप्तर लपवून पळत पळत किंवा सायकलवर टांग मारुन घर गाठायचं आणि इतकं करुनही पुस्तक वह्या भिजल्यातर तव्यावर त्या "भाजायच्या"

लातूरच्या अशक्त पावसानंतर बरयाच वर्षांनी मुंबईत पावसांनी त्याचे "गट्स" दाखवले. फर्स्टक्लासचा पास काढून मी बोरीवलीला तिथूनच सुटणारी लोकल पकडून अंधेरीत उतरायचो आणि येताना अंधेरीहून बसनी यायचो. मी हाडाचा मुंबईकर नसल्याचा आणि उभ्या जन्मात कधी बनू शकणार नसल्याचा तो एक पुरावा होता. तर त्या दिवशी सकाळपासूनच पावसाची झड लागलेली. "अंधार असा घनभारी" कशाला म्हणतात ते प्रत्ययाला येत होते आणि मी ४ वाजता अंधेरीला पोचलो. रोजचा रस्ता म्हणजे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एक अजागळ पुल होता. रिक्षातून उतरल्यावर बरयाच वेळ लेदरचे बुट वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाणीच जेव्हा गुढघ्या पर्यंत आलं तेव्हा सारा फोलपणा लक्षात आला. अजागळ पुलापाशी माणसांची झोंबी उडाली होती. एकमेकांचा हात धरुन लोक लगदा तुडवीत पुलापर्यंत पोचत होती. "हात का धरायचा?" मनातलं ऎकु आल्यासारखं एका खानदानी मुंबैकरानं आरोळी ठोकली "संभालके भाय...हात छुटा तो सिद्दा बांद्राके खाडीमे.." "च्यामायला...गटार thru' खाडी म्हटलं की पोहण्याचं कामच नाही" पोहता येत नाही त्याचा आज त्याचा अस्सा आनंद झाला!! पश्चिमेला पोचल्यावर लक्षात आलं की नेहमीप्रमाणेच लोकल बंद पडल्यामुळे रोडवर लोगोंका सागर उमड आया था. एकही बस थांबायला तयार नव्हती. असं वाटलं जुहुपर्यंत उलट जावं आणि तिथून त्याच बशीत बसून यावं. पण पावसाची झोंबाझोंबी बघून हिंमत झाली नाही. थोडं उलटं जाऊन पळतपळत एक बस पकडली. बस खचाखच भरली होती. कंडक्टरनं आरोळी ठोकली "दारात उभ्या असलेल्या लोकांनी बघून घ्यायचं की अजून कुणी चढत नाहीये नाहीतर बस बंद पडेल" ४० मिनीटांचा रस्ता त्या दिवशी ४ तासात "कटला". दुसरया दिवशी लोकांचे जागोजागी अडकलेल्या लोकांचे फोटो बघीतले आणि मलाच माझ्या धाडसाचं कौतुक वाटलं (अजून कुणाला कश्याला डोंबल्याला वाटेल?)

पावसाचे संदर्भ गुढ आणि कधी उदासही. सिग्नलवर भीक मारणारी छोटी मुलगी परवाच्या पावसात उघडी कुडकुडत होती. हिला पैसे द्यावे तर भिक मागण्याला उत्तेजन दिल्यासारखं होईल की कसं या टिपीकल मीडलक्लास डायलिमात असतानाच सिग्नल सुटला. हीटर लावून मी रॅट रेस मधे गाडी दामटली खरी पण त्या दिवशीचा पाऊस काही तरी उसवून गेला.

पावसाचे काही संदर्भ अबोलही.

सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुध्द
डोळ्यातुनी हासला..

Thursday, June 21, 2007

महिलामंडळ उर्फ लोबागंटि

हात चालू राहाण्यासाठी लिहीलेला हा blog आहे. ...
*********************************************************************

नवी शाळा बघून माझ्या तोंडातून फास्टर फेणे सारखा "टॉक्क्क" आवाज निघाला असणार! वय वर्षे ३-४ असताना दादांनी मला दुसरया एका शाळेतून आणून इथे transplant केला होता. चौथीयत्तेत असणारया ताईच्या जीवावर मी दिवारच्या बच्चनसारखी महिलामंडळ उर्फ लोबागंटि असं विचित्र नाव असणारया शाळेत एंट्री मारली. "महिलामंडळ" कारण ही शाळा बायकांनी चालवली होती आणि बालवाडीनंतरच्या शाळेचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं होतं तर थोडक्यात "महिलामंडळ उर्फ लोबागंटि." शाळेचं location amazing होतं. एका बाजूला उन्हाळ्यात शेवाळून वास मारणारं तळं आणि दुसरया बाजूला वडारवाडी!! शाळेत "बालकांना" रोज फुकट खाऊ मिळत असल्याने बाजूच्या वाडीतली बरीच "बालकं" शाळेत यायची. पुढे २-३ वर्षांनी कळाल की ही अजाण बालकं ५-१० पैशाच्या गोळ्यांच्या बदल्यात शाळेत येणारया मुलांच्या मागे on demand कुत्री वगैरे लावू शकतात. सुपारी घेणे ही संज्ञा फार पुढे ऎकिवात आली!! तर अशी ही त्यामुळे शाळा बरयापैकी Black&White दिसायची.("सावळा" हा शुद्ध काळा असणारया मुलाला त्याची आई मातृप्रेमापोटी जसा वर्णन करते तो रंगं). सायकलरिक्षाने (माणूस ओढतो ती रिक्षा) येणारी फक्त आमचीच टोळी असल्याने नैसर्गीकपणे येणारया माजासहीत मी लवकरच एक त्यातला त्यात गोरा दिसणारा गडी शोधून त्याच्या शेजारी मांड ठोकली. "माझं नावं मिनु. माझी आई याच शाळेत शिकवते" अत्यंत खाजगी माहीती सांगावी तश्या अविर्भावात गोरया मुलाने त्याचे credentials जाहीर केले. "माझं नावं अमुकतमुक. माझे आई-बाबा पण शिकवतात. ते कॉलेजमधे मोठ्या मुलांना शिकवतात" मी पण माहीतीचं आदानप्रदान केलं. एकूणात आमची गट्टी जमली. माझा वर्ग संपला की (एकच रिक्शा असल्याने) मी ताईच्या वर्गात जाऊन बसायचो (शाळा तेव्हा ह्युमन होत्या!). थोड्याच दिवसात शर्टची कॉलर खाण्यामुळे आणि सतत एक ढगांचं चित्र असणारा शर्ट घालण्यामुळे लवकरच माझं अनुक्रमे उंदीरमामा आणि ढग अशी नामकरण झाली.
इथे बघावं ते नवलंच! पंडीतबाई नावाच्या बाई ख्र्रीश्चन होत्या. अरेच्या, असेही लोक असतात? आणि ते आपल्यासारखेच दिसतात? आणि यांची दिवाळी ख्र्रिसमस नावाच्या दिवशी असते आणि ते केक खातात. केक!!!! मला तर हे सगळं बघून एटू लोकांच्या देशात आल्यासारखच वाटलं. एटूंच्या देशात नेणारी अजून एक गोष्ट होती ती म्हणजे आमचा रिक्षावाला, मछ्चिंद्र!! ढम्म काळा. आमच्या गॅन्गला हा गाणी शिकवत न्यायचा. एका रिक्षात बोटभर उंचीची पोरं गळा ताणून रस्त्यावरुन "देहाची तिजोरी" म्हणत चाललेत!!! वा!! क्या सीन होगा!! एक दिवसं हा हिरा थोडे पैसे उधार घेऊन अदृश्य झाला आणि त्याच्या जागी प्रेमकुमार नावाचा चकणा रिक्षावाला आला. मछ्चिंद्र्च्या जाण्याचं दुःख पचवून आम्ही प्रेमकुमार बरोबर दोस्ती केली.
शाळा एकदम मस्त होती. कधी इथे बेडकांचा पाऊस पडायचा तर कधी टण्या पोर्गा आणि लंबुडी पोर्गी यांची कुस्ती व्हायची. शाळते प्रोजेक्ट्सची मारामारी नसायची त्यामुळे आम्ही अणि आईबाप खुष असायचो. अभय ये. घर बघ. कमळ दगड घे (डोक्यात घाल..). असले धडे असायचे. शाळेत फक्त पाटी न्यायची असायची. मोहरीर गुर्जींनी ती आमच्या डोक्यात घालून फोडली नसेल तर ती आम्ही न्यायचो. सतरंजीवर बसून शाळा शिकायचो. स्लीपर हरवते म्हणून बहुतेकजण नागव्या पायांनीच शाळेत यायचे (रिक्षाचा माज!! पण खाली पाय उघडेच). शाळेला गणवेष होता; काळी चड्डी आणि पांढरा शर्ट. तो घालणारा फक्त मी एकटाच असेन पण कोणाला ना खेद-ना खंत. कारण आमचं आमच्या शाळेवर विलक्षण प्रेम होतं- आहे. बालवाडी ते चौथी पर्यंतच्या संस्कारक्षम वयात या शाळेने कसलाही आव न आणता आमच्या वर जे संस्कार केले ते आम्हाला आयुष्यभर पुरले. तिथे मिळालेले मित्रही आयुष्यभर पुरले. आता संस्काराचं वय गेलं. निबर झालेल्या मनानं आता याच गोष्टीचा दुसरा पार्ट सुरु झाला आहे.
टॉक्क्क...प्रत्युषच्या admission साठी बालशिक्षणला गेल्यावर तिथलं प्रचंड मोठ्ठ मैदान बघून माझी तशीच reaction झाली. पुण्यनगरीत मुलांसाठी हे एवढं ग्राऊंड म्हणजे सुखाची परिसीमा झाली. एकूण ११ चकरा, कल्याणी आणि मी यांनी प्रत्येकी एक निबंध आणि दोघात मिळून एक चर्चा असं सगळं पार पडल्यावर शेवटी प्रत्युष चांगल्या घरात पडला. शाळा सुरु होण्या आधी परत एक मिटींग होती. तिथल्या टिचर्सनी छोटी छोटी नाटुकली करुन दाखवली. पालकांनी कसं वागावं, काय करुन घ्यावं याची ती एक झलक होती. शाळेतच स्कुलबॅग (दप्तर नव्हे) मिळाली. अश्यारितीने सुंदरसा गणवेष, पायात कॅनव्हासचे बुट, हातात स्कुलबॅग अश्या तयारीत लोबागंटिचा उत्तरार्ध सुरु झालेला आहे.

Wednesday, June 6, 2007

अर्धा माझा भास..अर्ध सत्य तुझे..त्याच्या साठी ओझे आभाळाचे

प्रिय ग्रेस,

"संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचतोय सध्या. अत्यंत अभिरुचीहीन कव्हर केलय तुमच्या पुस्तकाचं, मनापासून वाईट वाटलं. असं या आधीतरी कधीच झालं नव्हतं, मग आत्ताच का? पुस्तक जुनं वाटावं किंवा स्वस्तातलं वाटावं इतकं कव्हर टाकाऊ? सुभाष नेहमीच तुम्हाला "वाचतो", मग हा त्याचा प्रयोग म्हणायचा की काय? तसं असेल तर फसला असं वाटतय. सामनातल्या तुमच्या लेखमालेचं पुस्तक म्ह्टल्यावर जरा धास्ती होतीच. तुम्ही काही "लिही" म्हटलं की लिहीणारया पंथातले नव्हे. त्यात या कव्हरची भर. अजून पुस्तक वाचतोच आहे आणि अजूनतरी कुठेच शॉक लागलेला नाही. "मृगजळाचे बांधकाम" सुरुवातीपासूनच जड गेलं. करायचं म्हणून अवघड केल्यासारखं! हेही त्या पंथातलं असतं तर मात्र एक आत्मीक मैत्र मिटल्याचं दुःख झालं असतं.

तुमच्या कविता मी कधीच एका बैठकीत वाचत नाही; नाही सहन होत मला. अंगात भिनण्या आधी स्वःतच अलिप्त होते ती. तुमच्या भाषेत सांगायचं तर "दुःख टेकण्यापुरती संदीग्ध." तुमचा संदर्भ तिथेच संपतो, सीतेच्या जनकासारखा. किंवा तुमच्या आणि जीएंच्या झाल्यानझाल्या भेटीसारखा. तिथून पुढे ती कविता तुमची असेल तर नाही भेटावं वाटत मला. हे सारं काय आहे? कशासाठी आहे? "पाठशिवणीचा खेळ पोटशिवणीच्या साठी..."

समिक्षा का करावी? करावी का? ज्याचा त्याचा प्रश्न. आपलं लिहीणं झालं की आपण तुटून जावं. तुमच्या कवितांचं आम्ही काय करावं? कसं तपासावं एकेक अंग? तुमच्या वैयक्तीक आयुष्याशी सांगड घालून? की भाषेचा एकेक कोपरा तासून? परत तिथेही तुमचा आणि माझा सारखाच अट्टहास आहेच की " You can take off my cloths, but you can't make me naked." तुम्ही म्हणता तसं लोकं तुमच्या कवितेविषयी कमी बोलतात आणि त्याच्या परिणामाविषयी जास्त बोलतात. मी काय करतो? मला तर तुमची कविता अचानक भेटते, जाणवते. कुणी विचारलं तर काय सांगु तिचे अर्थ?
"मोडूनी परतीच्या वाटा
आलो तोडूनी माळं
देशील कारे गोंदून
मज कोरे आहे भाळं"

मीही आता कोणाला काही सांगत नाही. पण एखादा क्षण बेसावध असतो जशी "साजणवेळा." जसं गाणं तशी कविता; वेगळी करताच येत नाहीत मला. त्वचा सोलून आतला आत्मा शोधू पाहाणारा मुकुंदचा आवाज आणि "पुरातून येती तुझे पाय ओले"ची मोडकांनी बांधलेली अप्रतिम कॉंम्पोझीशन. थकायला होतं मला शब्द-अर्थ-सत्य यांच्या इतक्या जवळ जाऊन.

तुमच्या सारखीच मलाही प्रिय ते ते नाकारण्याची सवय आहे ग्रेस! कधी ते हरवण्याची भिती असते म्हणून तर कधी त्याची सवय होईल या धास्तीने. तुमच्या सावलीला नाकारता आलं नाही म्हणून मी माझे लिहीते हात कलम केले. घाबरु नका, रुढार्थाने नव्हे. मला माझी ओळख गमवायची नव्हती, सत्व गमावलेली कलाकृती तुम्हालाही आवडली नसतीच नां?

"...
मी असममित शरीराचा-
ढासळतात माझे तोल तू
असण्याच्या प्रत्येक शक्यतेवर;
पण आत्म्याची शालीन
छंदबध्दता कधी मोडलीच नाही,
जसा जपावा प्रत्येकानेच
आपापला अवकाश.
अवघड असतात नेहमीच वागवणं निर्वासितासारखे
या शरीराचे साज
आणि आकृतीबंधातून तुला शोधायचे
सराईत छंद.
देहवाती भोवती काजळी धरणं
म्हणजे निर्वात काळसरपणात कोंडून जाणं
शोधूनही सापडत नाहीत आता
पारदर्शक मनाचे ढवळलेले तळं"

कविता पोस्ट करायची नाही असं सांगीतलेलं असतानाही तुमच्या साठी हा अपवाद.

--संवेद

Tuesday, June 5, 2007

ये क्या जगह है दोस्तों...

च्यायला सगळच भोसडलेलं आहे. ऑफीसची अंतहीन कामं, एका apprisal cycle चा अंत होण्या आधी दुसरं सुरु ही झालं.. स्कोरकार्ड, रिव्हू, नवे नवे initiatives, स्वःतच्या शेपटी भोवती गोल फिरणारया कुत्र्यासारखं attrition आणि recruitment.

निवांत पेपर वाचावा तर राजस्थानातले reservation वाले दंगे. कॉंग्रेस आणि फडतूस अर्जुन आणि विपी या दोन शिंगाच्या जनावरांनी लावलेल्या आगी.

टीव्हीवर सतत गाण्याच्या स्पर्धा. डोळे आणि नरडं ताणून ओरडणारा हिमेश उर्फ टोपी. गाण्यातलं काहीही कळत नसणारी अलिशा, सगळच गोड मानून घेणारा उदीत आणि चिरकणारी टाळकी. तिसरीकडे मिचमिच्या डोळ्यांचा शान अजून डोळे बारीक करून गेल्या कित्येक शो मधे रिपीट केलेला लाल टी शर्ट घालून अमूलचं दूध पितोय.

रस्त्यावरचा महाभयंकर traffic jam आणि कुठलासा दादा-नाना-आण्णा निवडून आल्यानं "इथून धक्का तिथून धक्का मारतोस का?" ची सुरेल आरोळी. गणपती, अण्णा भाऊ ची जयंती-मयंती या सगळ्यांशी indifferent ऊषा मंगेशकर लाऊडस्पिकरच्या उंच भिंतीवर उभारुन झोकात "मुंगळा मुंगळा मै गुड की.." गाते आहे.

रस्ते पावसाळ्यात फाटणार याची झलक दिसायला लागलीय...सालं सगळंच कसं भोसडलेलं आहे इथे?

सीने में जलन आंखों में तुफ़ान सा क्यों हैं ?
इस शहर में हर शक्स परेशान सा क्यों हैं ?

दिल हैं तो, धडकने का बहाना कोई ढूंन्ढे
पत्थर की तरह बेहीस-ओ-बेजान सा क्यों हैं ?

तनहाई की ये कौनसी, मन्ज़िल हैं रफ़ीकों
ता-हद्द-ये-नजर एक बयाबान सा क्यों हैं ?

क्या कोई नयी बात नजर आती हैं हम में
आईना हमें देख के हैरान सा क्यों हैं ?