Search This Blog

Powered by Blogger.

Pages

संदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...

Featured Post

हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin' ...   झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...

Tuesday, July 2, 2013

मुलीचे दत्तक विधान


॥ विधान १॥

ऋतुपर्ण झाडांच्या पानांमध्येच असतो पाऊस. निमित्तांचे ओलावे घेऊन गंधमग्न धारा झरझर झरतात तेव्हा झाडांचे डोळे झिम्मड होतात. पापण्या बनून पानेही समंजसपणे पावसाळ्यात आतला पाऊस मिसळून टाकतात. एका स्वरावलीवर हलकेच दुसरी स्वरावली चढवावी आणि आत्मसमर्पणाला लिरिकल सुसाईडची नवी परिणामे द्यावी तसे झाडांचे वागणे. नैमित्तिक बांधिलकी पल्याड जाऊन जंगल न्याहाळावे तर झाडे कलमही होतात अंगाखांद्यावर. आपल्या बाहेर जंगल असते आणि आता आतही. पण झाडांसारखे निश्चल नार्सिस्ट उभे ठाकू शकत नाही आपण अनंत काळ. तळपायावरचा तीळ भोवऱ्यात गरगरण्याआधी मला या जंगलातून निर्वासित व्हायचं असतं.

मुलींनो, आपली ओळख नेमकी तिथली...

माझ्या हाडांच्या प्रस्तरावरचे सारे संदर्भ पानांमधून झुळझुळणाऱ्या आदी संगीताचे, आकाशी मौनाच्या भाषेचे, नदीच्या निळसर अवतरणाचे. पण किती अनोळखी तुमच्या जगतातील अर्वाचिन लिपी ... शब्द शब्द अब्द अर्थ, प्रकांड विरामचिन्हे अन शुन्य निरर्थ. अंब, हाताला धरुन धान्याच्या राशीत रेखविलीस मुळाक्षरे, उरफाट्या गणितांची पाखरे, साक्षर माझे दिवस-साक्षर माझ्या रात्री.

संथपणे कागदासारखे निरक्षर माझे अर्थ शब्दसंभ्रमात साकाळत गेले.

गुणसुत्रांच्या विस्ताराची कोण ही मायावी रित. एक गुंफण उकलली की ललाटरेघांची नक्षी बदलते. एक गुंफण उकलली की ब्र-भाष्य बदलते. मिस्रच्या पिरॅमिडमध्ये सावल्यांना पुरण्याचा प्राचीन अघोर ठाऊक आहे तुम्हाला? माझ्या कवितेतील संदिग्धता मात्र मी कुणालाच आंदण देऊ शकत नाही.

प्रल्हाद मुहुर्तावर मला ऋतुपर्ण झाडांचे जंगल आठवते आणि आठवतो मायबायांनों तुम्ही भेटण्या आधीचा स्वतःचाच चेहरा. आठवत राहातात झाडांच्या अखंड लिरिकल सुसाईड आणि निर्वासित पक्ष्यांनी पुसून टाकलेल्या पाऊलखुणा. इथून परतणे नाही..आता...तिथे परतणे नाही.

समजुतदारपणे मी जुन्या ऋतुंचे एक वतन तुमच्या नावे करुन टाकतो

"तुझे हात हाती घेऊन पुन्हा मी इथे आलो तर

सारे आरसे तय्यार.

चल ओढ त्यावर कापड

आणि मी जमिनीवर गुडघे टेकून

देईन कन्फेशन"


॥विधान २॥

मुली, तुझ्या नात्यांची बांधणी करताना स्वतःच्या कोसळण्याच्या शक्यतांची गणिते मी मांडु शकत नाही. भातुकलीच्या खेळात जिथे प्रौढत्वाची बीजे अनावरपणे रुजवली जातात, तिथे तू चिमखड्या बाहुलीची भुमिका हक्काने मागून घेतलीस आणि मी तुझ्या दत्तक बापाची. शब्ददुष्ट नोंदींपलीकडे पाऊल ठेवताना, क्षणभर काचेच्या तंतूंची त्रैराशिके थरथरली खरी पण नात्याच्या कवळेपणाची भुल मलाही पडलीच.


मुलीचे सारेच निराळे...

तिला ओळखता येतात सात रंगापल्याडच्या असंख्य शक्यता

अन वाचता येतात शब्द-सळसळीमागच्या अत्यर्क घडामोडी.

गाणे आले नाही तरी चुकत नाही तिचे तालाचे गणित.

मुलीचे तसेही निराळेच...

तिच्या दत्तकपणाला वयाचे बंधन नाही.

आणि तिला कच्च्या आभाळाचा एखादा तुकडाही पुरेसा असतो नात्यातली संदिग्धता टेकवण्यापुरता.

जोकास्टीयन ब्रोशच्या बागा कधीच उद्धवस्त झाल्या असतात.

मुली, डोळ्यांच्या नितळ डोहांमध्ये पापमुक्तीच्या प्रार्थना आणि तळहातावर आपल्या हस्तरेषांचे प्रत्यारोपण करता येऊ शकते तिथेच आपल्या दत्तकपणाच्या खुणा शोध.