Friday, April 23, 2010

गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी

बयो, चाफ्याचं वेडं मोठं जीवघेणं. मणीदार सर्पाला ही सुटत नाही सुगंधाची चटक आणि तुझं वय हे असं, बेभान. म्हणालीस, पापण्यांवर तोलेन वरचेवर एखादं फुल, अस्पर्श, म्हणजे स्वप्नही भारलेलं सुगंधी पडेल. होतं असं? पडतात अशी ठरवुन स्वप्न? तुझ्या स्वप्नात चाफा, चाफ्याच्या स्वप्नात तू. परत चाफा, परत तू. आणि मग लहान लहान होत तुमच्या प्रतिमा एक होऊन जातील. तू चाफा-चाफा म्हणजेच तू.

चाफ्याचं झाडं ही जरा अल्लडच. पानांचे बहर जेमतेम येताहेत तोवर टच्च गर्भार कळ्यांचे ऋतु पानांआडून बेबंद उलगडुही लागले. पानांची नवथर नवलाई निरखावी की कळ्यांचे गर्भार सोस जपावेत हा मोठा जीवघेणा प्रश्न. पानांवरच्या रेषांत भविष्य बघून तू म्हणालीस, कळ्यांना जपायला हवं. सावल्यांच्या दीर्घ साजणवेळी वाऱ्यावर वाहून आले असतील निळावंतीचे काही शब्द कानी, झाडांना तुझी भाषा समजते. पानांच्या कोषात कळ्यांचे संभ्रम दडून गेले.

सुर्य कलथुन जाण्याआधी आमरशी रंगाचा पट्टा ओढतो तरी कळ्या शहारत नाहीत. वाऱ्याच्या भुलीला फशी पडून त्या गंधही उधळत नाहीत. उत्कट डोळ्यांनी पाहात राहातेस तू गुणसुत्रांची मायावी मांडणी. फुलांवर इतका लळा लावु नये कधी मुली. मोह, क्षणभंगुरता आणि निर्मिती यांच्या विलक्षण त्रिमितीत अडकली असते त्यांची नियती. आणि बंदिस्त आकृत्यांमधे जगणारी माणसं आपण, चार टिंबांच्या चौकोनात किंवा अनंत बिंदुंच्या वर्तुळात. थोडं वेडं असावं लागतं माणसाला, गच्च आवाजात म्हणतेस तू, The neighbors do not yet suspect! The woods exchange a smile!

कळ्यांना फुलायला शिळी निमित्ते नकोच होती. ऋतुंचे चक्र हा उधळण रोखण्याचा फ SS क्त बहाणा. आणि आता तू देहातीत स्पर्शांनी उलगडते आहेस कळ्यांची स्वप्नलिपी.

स्पर्श म्हणजे मुळमाया. स्पर्श म्हणजे अद्वैत भाषा. स्वतःच्याही नकळत चाफा तुझ्याच दिठीत फुलत गेला.

मुळांना असु नये प्रकाशाचं वेड. त्यांनी मातीत पाय रोवून उभं राहावं शाश्वत असं काहीच नसणाऱ्या सत्यासारखं. क्षणभर चाफा सारंच विसरला. क्षणभर मग तू ही डोळे मिटले.

तू चाफ्यात अन् चाफा तुझ्यात रुजून गेला.

Saturday, April 3, 2010

बाष्कळ नोंदी

शप्पत- करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा. हाताच्या बोटांचा हा क्रम ग्राह्य धरला तर चाफेकळी आणि अंगठा यांच्या चिमटीत (स्वतःचा) कंठ पकडला की होते शप्पत. काही भाषाप्रभुंना हा शब्द शपथ असाही आवडतो पण शप्पतची परिणामकारकता शपथला नाही. शप्पत हे एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला खात्री देण्याचं हुकुमी शस्त्र आहे. म्हणजे कसं की ’गोजमगुंडेबाई त्यांच्या घरात चेंडु गेला की विळीवर चिरुनच ठेवतात, तुझी शप्पत’ असं, यावर अपील नाही. प्रसंगी तो चेंडु विळीवर गळा कापून जीव देईल पण शप्पत खोटी जाऊ देणार नाही असलं भारी. शप्पत घेण्याच्या तीन पायऱ्या असतात; तुझी शप्पत, आई शप्पत आणि देवा शप्पत. कुणी खोटी शप्पत घेत असेल तर ज्याची शप्पत घेतली तो मेलाच समजायचं. फारसे बरे संबंध नसताना कुणी तुझी शप्पत म्हणालं की उतारा म्हणून डोक्यावर हात ठेवावा, शप्पत लागत नाही. परिणामी तुम्ही जिवंत राहाता. अश्यावेळी खरं खोटं करायचं झाल्यास घे आई शप्पत अशी गुगली तुम्ही टाकु शकता.पाच मिनीटं- हे वेळ मोजायचं सर्वात छोटं परिमाण असे. इकडुन अमेरिकेला विमानानं जायला पाच मिनीटं लागतात असं काही तज्ञ मुलं छातीठोकपणे सांगत तेव्हा बाकीची मुलं तोंड उघडं टाकून हे सत्य ऎकत. थोडी मोठी मुलं साडेतीन वाजून पाच मिनीटं झाली किंवा पावणे दोनला पाच कमी असाही वेळ सांगत. काही मोठी माणसं कुणाला सारुन जायचं असेल तर एस्क्युज मी च्या चालीवर एक मिनीट हं असं ही म्हणतात. सगळ्याची गोळाबेरीज एकच.अमेरिकेचा राष्ट्र्पती- हा जगातला सगळ्यात डेन्जरस माणूस. अमेरिकेकडे ऍटम्बॉम्ब असून एक बटण दाबलं की ते सगळे उडु शकतात. ते बटण नेमकं अमेरिकेच्या राष्ट्र्पतीच्या पलंगाच्या बाजुला असतं म्हणजे कसं की अचानक युद्ध सुरु झालं तर कधी ही ते बटण दाबणं सोईचं. चुकून कधी या माणसाचा हात झोपेत त्या बटणावर पडला तर? या कल्पनेनं मुलांचा नुस्ता थरकाप उडे. काही मुले चेहऱ्यावर बेफीकीर भाव आणून गळ्यातल्या बाप्पाच्या पदकावरुन चोरुन हात फिरवीत तर काही थोडी मोठी मुले आपल्या बाजुने युअस्सार आहे नां अशी अगम्य खात्री देत. एरव्ही दिवाळीच्या फटाक्यांना घाबरणाऱ्या पोरी मात्र अमेरिकेच्या राष्ट्र्पतीला आणि त्याच्या ऍटम्बॉम्बला घाबरत नसत.टॅम्प्लीज- टॅम्प्लीज हा मराठीतलाच शब्द आहे या बद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. याचाच एक अपभ्रंश इंग्रजीत आहे असं मोठी मुलं सांगत; खरं खोटं मारुतीला माहीत. अंगठयाच्या बाजुचं बोटं पेरांमधुन वाकवायचं आणि (आपल्याच) ओठांवर टेकवुन टॅम्प्लीज म्हटलं की ऎन खेळात थांबण्याची मुभा. खेळता खेळता पाणी प्यायचंय, आई बोलावतेय, नं १/नं २ काहीही झालं की मिटा बोट आणि घाला टॅम्प्लीज. काही वाह्यात मुली लंगडी खेळताना टॅम्प्लीज घेऊन सरळ चालत कुणाजवळ तरी येऊन थांबत आणि अचानक सुटली म्हणत पाय वर करुन बाजुच्याला आऊट करुन टाकत. अश्या वागण्याने टॅम्प्लीज पातळ होते.नवनीत- लेखक श्री नवनीत हा माणुस भारीच असणार! नाहीतर एकच माणुस कसा काय चित्रकला ते गणित या सगळ्या विषयांवर पुस्तक लिहीणार? याला एक भाऊ ही असतो. तो ही दिसेल त्या विषयावर पुस्तक लिहीत सुटतो. त्याचं नाव लेखक श्री विकास. बहुदा त्यांचं आडनाव मजेदार घाणेरडं असणार म्हणूनच ते लावत नसणार. लेखक श्री नवनीत यांच गाईड म्हणून पुस्तक असतं. अभ्यास न येणारी ढ मुलं त्यातून घोकंपट्टी करुन परिक्षा पास होत. घरात गाईड बाळगणं हे लाजीरवाणं असं म्हणण्याची पद्धत होती.लोणचं, सांडगे, पापड- हे पदार्थ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे खुप साऱ्या मावश्या, काकवा आणि आज्या. उपघटक अर्थात त्यांची डझन-अर्धा डझन मुलं आणि पळापळ करणारा एखादा काका किंवा मामा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे लख्खं ऊन येणारी गच्ची. मुंबैत बेडेकर नावाच्या कुण्या भल्या माणसाची भारी गच्ची असल्याने, तिथल्या सगळ्या मंडळींसाठी तोच लोणचं घालतो असं मोठी मुलं म्हणत. एरव्ही ब्येष्ट स्वयंपाक करणाऱ्या आयांना लोणंच मुरायच्या आधीच चांगलं लागत हे का कोण जाणे कधीच कळत नसतं. पापड आणि सांडग्यांच तसंच. ते अर्धेकच्चे असतानाच खावे असा मुलांचा चोरटा नियम होत. त्यांचा वरचा वाळत आलेला पदर मोडला की आतला अर्धवट ओला चिक ब्येष्ट लागतोतुळशीची पानं- गोड, तिखट, खारट, तुरट अशी कुठलीच ठराविक चव नसणारी तुळशीची पानं एरव्ही बकरीदेखिल खाणार नाही. पण परिक्षा आली की पोरं झोंबाझोंबी करुन तुळस ओरबाडायचे. लिहीता लिहीता काही विसरलं की एखादं पानं खावं म्हणजे विसरलेलं आठवतं असं मोठी मुलं म्हणत. परिक्षा म्हटलं की पोरांसोबत तुळशीच्या अंगावर देखिल काटा यायचा. एरव्ही दिवाळीतले उरलेले फटाके उडवायचा मुहुर्त म्हणजे तुळशीचं लग्न हाच काय तो उद्योगजंगलचा राजा टारजन- मर्दाचा पवाडा मर्दानंच ऎकावा. टारजनची गोष्ट ऎकून झाडावरुन उडी न माराल तर थुत! ओ ओ ओ SSSआरोळी ठोकली की भलभलत्या उंचाड भिंतींवरुन अल्लाद उडी मारता यायची. पानांची शर्ट चड्डी करायची कितीही इच्छा असली तरी मोठं कुणी ते गंभीरपणे घ्यायचे नाहीत.श्यामची आई- हे म्हणजे एकदम भारी काम. पुस्तकातला कांदाच की. सोललं की पाणी आलंच म्हणा. पुस्तक आईवर असलं तरी श्यामचं नाव घेऊन पोरांचा उद्धार करायची ब्येष्ट तरतुद. छोटी पोरं श्यामवर डाऊट खाऊन असायची तर मोठी पोर खुन्नस. झापऱ्या पोरींना मात्र श्याम फार आवडे