Thursday, November 8, 2012

रेषेवरची अक्षरे-5

यंदा दिवाळीच्या आधी "रेषेवरची अक्षरे"चा अंक प्रकाशित करणं जमलंच. स्काईप, फाईल क्रॅशेस, चर्चा, असंख्य ब्लॉग यांचा लसावी म्हणजे यंदाचा अंक.


वाचा-इतरांना वाचवा- आणि कसा वाटला हे नक्की नक्की नक्की कळवाhttp://reshakshare.blogspot.in/

Friday, September 14, 2012

फट्! म्हणता कविता झाली

झाडे दिसताच
                                       चिमणी झाली
पाणी दिसताच
                                   गाणी झाली
शब्द मिळताच
                                     शहाणी झाली
फट्! म्हणता कविता झाली

चंद्र कोरताच
                               रात्र झाली
धुक्यामधून
                                    भ्रमिष्ट झाली
मी म्हणताच
                                  विश्व झाली
फट्! म्हणता कविता झाली

वही बुडवताच
                              गाथा झाली
कोरे पाणी
                                निळी झिलाई
अर्थ नुरताच
                            सार्थ झाली
फट्! म्हणता कविता झाली

Saturday, June 23, 2012

"मंद्र"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो


परत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण लिहीलं कुणीच नाही, कधी प्रतिसादच मुळात शुन्य, कदाचित खो खोचे विषय चुकीचे असतील, कधी वेळेचा प्रश्न असतो..काहीही असो पण ब्लॉगची सध्याची परिस्थिती भीषण आहे हे खरं. पण काही लोकांना राष्ट्रभाषेत सांगायचं तर गुडदा इ इ असतो. म्हणून परत एकदा नवा खो खो सुरु करत आहे. खो वाचा, त्याहून महत्वाचं त्यावर प्रतिक्रिया द्या आणि अजून महत्वाचं म्हणजे सहभागी व्हा.

सोनुबाई आणि कथलाचा वाळा हा खो खो अश्या पुस्तकांकरिता आहे जे गाजले पण वाचल्यावर हातात भुक्कड काहीही आलं नाही. हा खो खो सुरु करताना काही साक्षात्कार झाले तेही सांगतो म्हणजे तुम्ही परत त्याच घोळात अडकणार नाहीत.

हा खो खो जेनरसाठी नाही. म्हणजे आपले नेहमीचे गिऱ्हाईक वपु घ्या आणि कल्हई काढा असं इथे अभिप्रेत नाही. वपु हा एक जेनर आहे, ज्यांना ते आवडतात, त्यांना ते आवडतात. किंवा सु.शि किंवा बाबा कदम हे कसे अभिजात नाहीत यासाठी हा खो खो नाही. तुमच्या नेहमीच्या आवडीच्या किंवा गाजलेल्या लेखकाचं एखादं उगाच गाजवलेल्या पुस्तकाचं खरं-खोटं करण्याचा हा खो खो आहे.

सुरु करताना मला वाटलं आपल्या हातात वॉशिंग्टनची कुऱ्हाडंच आलीए. पकड लेखक अन कर खलास. पण तसं झालं नाही.

श्रीमानयोगी, रणजीत देसाईंचं भलं थोरलं जाडजुड पुस्तक. लहानपणी पारायणं केली या पुस्तकाची आणि आता वाचायला गेलं की दंतकथा आणि इतिहास यांच्या गल्लतीची बखर वाचतोय की काय असं वाटायला लागतं. पण या पुस्तकावर नव्यानं लिहीण्याची गरजच नाही. कुरुंदकरकाकांची (हे कधीतरी निवांतात!) प्रस्तावना इतकी अगाध सुंदर आहे की त्या पुस्तकाचं उजवं-डावं तिथल्या तिथेच ठरतं. (आणि अर्थात मनोरंजक कादंबरी म्हणून त्या पुस्तकाचं मुल्य तसुभरही कमी होत नाही)

मग वाटलं विरधवल किंवा तत्सम, ज्या लहानपणी अंगावर रोमांच उभ्या करायच्या, त्या कादंबरीविषयी लिहावं. पण त्या कादंबऱ्यांनी मग कसलंच मनोरंजन केलं नाही? विरधवल तर चिंध्या होईपर्यंत वाचली. दोष पुस्तकाचा नाही. दोष एकदा गेलेला गाव परत येत नाही त्याचा आहे.

कविता? पा...प. कविता भोगायची असते आणि ते योग कधी येतील सांगता येत नाहीत. त्यामुळे अगदी खरे, सौमित्रपण वाचलेच म्हणायचे.


हे असं एकेक बाद करत असतानाच मला अपेक्षित सोनुबाई भेटल्या.


मु.पो. अक्षरधारा. पुस्तकांच्या दुकानात गेलं की तसं ही मला हरवायला होतं. अक्षरधारा "मॉल"मधे तर इंपलसिव्ह बाईंगला भयंकर स्कोप आहे; सारं नीटनेटकं आणि प्रसन्न!

निळसर मोरपंखी रंगाचं चांगलं पाच-साडेपाचशे पानाचं तरतरीत पुस्तक-"मंद्र". रंगसंगती बघून डोळे थुयथुयले म्हणेपर्यंत लेखक भैरप्पा आणि अनुवाद उमा कुलकर्णीं ही नावं वाचून झाली होती. हल्ली करमणुकीची पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची सवय गेलेली. पण "मंद्र" संगीताबद्दल आहे म्हटल्यावर पुस्तक विकत घेऊन टाकलं.


भैरप्पा म्हणजे वंशवृक्ष वगैरे सारखे दणकट पुस्तकं लिहीणारं कन्नड मधलं मोठं प्रस्थ. अगदी मराठी पुस्तकांच्या खपात देखिल त्यांची पुस्तकं अग्रभागी असतात म्हणे. असं असताना "मंद्र" मात्र साफ फसलं असं माझं वैयक्तिक मत.


"मंद्र" मोहनलाल नावाच्या कुण्या महान गायकाच्या आयुष्याचा सारांश आहे. मंद्र म्हणजे खालचा स्वर. असं गाणं गुढ, घाटदार आणि भरीव वाटतं. भल्या पहाटे अश्या स्वरांचा रियाज करावा असं म्हणतात. मोहनलाल नुसता महान गायकच नाही तर समर्थ गुरुही आहे. "मंद्र" कहाणी आहे मोहनलालच्या दोन प्रतिमांची; गायक मोहनलाल आणि वैयक्तिक जीवनातला मोहनलाल यांची. गायक मोहनलाल अत्यंत गरिबीतून प्रचंड परिश्रमाने वर येतो आणि जगप्रसिद्धही होतो. पण त्याचं खासगी जीवन म्हणजे शारीर वासनांची निव्वळ दलदल. शिष्य तयार करताना फक्त विद्यार्थिनीच घेणं आणि गुरुदक्षिणा म्हणून शरीराचा मोबदला मागणं ही मोहनलालची माणूस म्हणून लिंगपिसाटता, तर गायक म्हणून त्याच्या मते निव्वळ उर्जास्त्रोत. सबंध कादंबरीचं या एका वाक्यात वर्णन करता येऊ शकतं एव्हढाच या कादंबरीचा आवाका आहे. पुस्तक वाचताना एका सुप्रसिद्ध गायकाची वारंवार आठवण येत राहाते हा कदाचित योगायोग!


कलाकाराची कला आणि त्याचं खासगी जीवन, विशेषतः स्खलनशीलता, हा म्हटलं तर हजारो शेड्स असणाऱ्या रंगपेटीसारखा आकर्षक आणि त्याचवेळी डोळ्यात न भरणारा मोठा कॅनव्हास असा मामला आहे. पण सारी सिद्धता असूनही "मंद्र" तोल जाऊन तोंडावर साफ आपटते. असं का व्हावं याचं हे किंचित चिंतन.


कादंबरी या फॉर्मचे काही सहज ध्यानात आलेले गुणविशेष जेव्हा मी "मंद्र" सोबत ताडून पाहीले तेव्हा "मंद्र"चं कोतेपण ठळक होत गेलं.


कथेपेक्षा कादंबरीचा पट मोठा असतो. हा पट स्थळ, काळ, पात्रं, गुंतागुंत यांच्या परस्पर संबंधातून घडत जातो. हे म्हणजे थोडसं विलंबीत लयीत विस्तारानं राग मांडण्यासारखं आहे. मोहनलाल सोबत ही कादंबरी मुंबई, दिल्ली, बनारस, मध्यप्रदेश, अमेरिकेत जाते पण पट कुठेच विस्तारत नाही. याचं एक कारण म्हणजे भैरप्पांनी कसलीही गुंतागुंत कटाक्षानं टाळली आहे. २+२=४ असं साधं सुत्र मानवी जीवनात क्वचितच आढळतं. खरं तर धोकादायक बनु शकतील अशी अनेक वळणं या पुस्तकात आहेत (अमेरिकेत मोहनलाल आणि भुपाली, आणि मधुमिता किंवा दिल्लीत मनोहारीदेवी आणि गुरु, आणि मोहनलाल इ) पण भैरप्पांनी हे ताण-बिंदु इतके ढिले बांधले आहेत की त्यावर ही कादंबरी उभीच राहु शकत नाही. कादंबरीभर भैरप्पांनी अत्यंत सोईस्कर अशा पळवाटा, कधी गुरु-शिष्य परंपरा तर कधी कलावंताचा मनस्वीपणा या नावाखाली पेरल्या आहेत. थोडीशी वेगळ्या प्रकारची तुलना करायची तर हल्ली काही सिनेमे कायम परदेशस्थित भारतीय डोळ्यांसमोर ठेऊन बनवले जातात. अश्या सिनेमांमधे संस्कार, थोर भारतीय परंपरा, कुटुंब-कबिला, सण-सोहळे ठासून भरलेले असतात. हा कांदा सोलायचा नसतो कारण डोळ्यात पाणी येतं. पण कांद्याच्या प्रत्येक पाकळी आड अजून काही पाकळ्या आणि त्यांच्या आत परत काही पाकळ्या असतात हे सत्य सोईस्कररित्या दुर्लक्षिलं जातं. "मंद्र" ही अशी न सोललेल्या कांद्याची कादंबरी आहे.


कादंबरीला तोलणारं असं एक उघड किंवा सुप्त सुत्र असतं. अगदी शाम मनोहरांच्या असंबद्ध वाटु शकणाऱ्या (आणि ज्या की त्या नसतात!) कादंबऱ्यांमधेही हे सुत्र प्रखरतेनं जाणवतं. भैरप्पांनी या कादंबरीत अशी दोन सुत्रं वापरली आहेत; हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कलावंताचं खासगी किंवा जास्त ठळकपणे सांगायचं तर लैंगीक जीवन (वखवख हा शब्द जास्त योग्य आहे). पण कादंबरीभर कुठेही ही दोन्ही सुत्रं गुडघाभर पाण्याच्या पलीकडे पुर आणत नाहीत. भैरप्पांना स्वतःला रागदारी येते, "मंद्र" लिहीताना त्यांनी गणपती भटांसारख्या गायकाचं मार्गदर्शन घेतलं आहे. पण कादंबरीभर काही रागांची नावं, मंद्राच्या उपासनेचे थोडके उत्सव, मैफिलींची उडती वर्णनं या पलीकडे फारसं गाणं नाही. नाही म्हणायला त्याच त्या सात सुरातुन, बाविस श्रुतीतून हिंदुस्थानी संगीत कशी विविध रागनिर्मिती करते याचं काही वर्णन "मंद्र"मधे आलं आहे. आपलं शास्त्रीय संगीत हे बरंचसं ऍबस्ट्रॅक्ट पातळीवर असतं. त्याचं सुलभीकरण करणं किंवा त्या गुढतेची मिमांसा करणं किंवा त्याच्या छटा उलगडुन दाखवणं यापासून भैरप्पा सोईस्कररित्या पळ काढतात. मनोहारीदेवीच्या शास्त्रीय नृत्याला ’साथ’ म्हणून किंवा फार तर जुगलबंदी म्हणूनही एक थोर शास्त्रीय गायक ’बागेश्री’ ची मैफल करतो हे कल्पनातीत आहे. हे फार फार दुर्मिळ आहे. खरं म्हणजे (शास्त्रीय) नाच-गाणं यात बरंच काही कॉमन आहे. पण पारंपारीक मत असं की नृत्यकला ही गानकलेपेक्षा कनिष्ठ. नृत्य करमणुकी साठी वापरलं जातं तर श्रेष्ठ गान हे स्वांत-सुखाय असतं. गाताना गायकाला विविध साक्षात्कार होत जातात आणि म्हणून श्रोत्यांना ते दिसतात. श्रोत्यांसाठी म्हणून केलेले चमत्कार ही गाण्यात हलकी करमणुक मानली जाते. नृत्य ही जास्त दृश्यकला आहे, त्यात अनवटता, उलगडत जाणं, अर्थांच्या विविध छटा असं काही फारसं नाही. गाणं आणि चित्र यात संदिग्धतेला अनंत वाव आहे. त्यातून असंख्य अर्थ निघु शकतात म्हणून गाणं-चित्र मैफल ही गाणं-नृत्य मैफीलीपेक्षा जास्त नैसर्गिक असते. एव्हढा मोठा मुद्दा भैरप्पांकडून निसटतो हे मोठं आश्चर्यच आहे.

दुसरं आणि प्रचंड ठळक सुत्र भैरप्पा वापरतात ते म्हणजे मोहनलालचं लैंगिक जीवन. एखाद्या लेखकासाठी हे असलं सुत्र म्हणजे विविध शक्यता धांडोळण्याची उत्तम जागा. विशेषतः इंग्रजी वाङमयात या सुत्राभोवती मोठ्या प्रमाणात अभिजात साहीत्य निर्मिती झाली आहे. जयवंत दळवी, भाऊ पाध्ये इ लेखकांनी अत्यंत आक्रमकपणे लैंगिकतेचा वापर त्यांच्या कथा-कादंबऱ्यातुन केला आहे. रात्र काळी घागर काळी मधली लैंगिकता ही एखाद्या हिरव्याजर्द थंडगार सर्पासारखी मांड्य़ावरुन सरसरते. (खानोलकर काळाच्या कितीतरी पुढे असणारे शापीत होते हे परत परत जाणवत राहातं). तर आयवा मारु मधला वासनांचा लिंगपिसाट नाच मध्यमवर्गीय मुल्यांना उभा आडवा कापत जातो. तिथे वासना, वखवख ही केवळ शारीर भावना न राहता एक पात्र बनून जाते. अगदी जी.एं.च्या कथांमधूनही लैंगिकतेचा एक प्रखर अंडरकरंट प्रकर्षानं जाणवतो. या सगळ्या तुलनेत भैरप्पांचा मोहनलाल अत्यंत सामान्य वाटतो. त्यात धड श्रृंगार नाही, आक्रमकता नाही, प्रेम नाही. असलीच तर भयंकर अशी न भागणारी भुक आहे. अशी भुक जी एखाद्या दोन दिवसाच्या उपाशी भिकाऱ्यासमोर पंचपक्वान ठेवल्यावर त्याला जसं वाटेल तशी, अत्यंत सामान्य दर्जाची, भुक ज्यात पोट भरणं हीच प्राथमिकता असते. मोहनलाल वॉचमनची बायको, स्वतःची बायको, गाणारी वेश्या, स्वतःच्या शिष्या, विख्यात नर्तकी, विदेशी बाया सारख्याच उत्साहाने उपभोगतो. त्यात शरीराची भुक या आदीम भुके पलीकडे दुसरं काहीही नाही. जरी मोहनलालच्या मते शारीर संबंध ही त्याच्या गाण्यामागची उर्जा आहे तरी कादंबरीत मोहनलालला अश्या संबंधामधून मंद्र उलगडला आहे किंवा नव-निर्मिती झाली आहे असं ठळकपणे कुठेही स्पष्ट होत नाही.


कादंबरीला एक लय असते आणि पुर्ण कादंबरी कमी-अधीक प्रमाणात त्याच लयीभोवती आंदोलन पावते. अश्या मानसिक किंवा घटानात्मक आंदोलनांचा एक संथ पण सुस्पष्ट वाढत जाणारा कल्लोळ चांगल्या कादंबरीत दिसतो. सर्वसाधारणपणे आपण याला कादंबरीची भाजणी म्हणतो. ही चढती भाजणी कादंबरीला एका ध्येयापर्यंत, शेवटापर्यंत घेऊन जाते. दुर्दैवाने मोहनलाल-कलावंत आणि मोहनलाल-माणूस या लयीभोवती "मंद्र" आंदोलीत न होता (जे अपेक्षितही आहे) संगीत व्यवसाय या फुटकळ संकल्पनेभोवती "मंद्र" आकुंचन-प्रसरण पावते.


"तंतु", सार्थ" आणि "मंद्र" ही भैरप्पांची त्रिवेणी संगीताभोवती रुंजी घालते. पण "मंद्र"नं दिलेलं असमाधान इतपत मोठं आहे की कदाचित "तंतु" आणि "सार्थ" वाचवणारही नाही. हे सारं असुनही "मंद्र"चं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालय. भैरप्पांना अत्यंत मानाचा सरस्वती पुरस्कार ही "मंद्र"साठी मिळालाय. आणि "मंद्र"च्या संकल्पनेवर आधारीत एक संगीतिकाही बंगळुरात सादर झालीए.

असो. मोठ्यांचं सारं मोठंच असतं...अगदी त्यांच्या चुकादेखिल.सोनुबाई आणि कथलाचा वाळा याचा पुढचा खो मेघनाला. चांगल्या ब्लॉगची परिस्थिती इतपत केविलवाणी झालीए की या खो भोवती कसलेही नियम तयार करण्याइतपतही हिंमत आता माझ्यात उरलेली नाही. तेव्हा ऑल युअर्स...Monday, June 11, 2012

मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (2)


..."नवीन येणाऱ्यात नुस्ता पुष्कर नव्हता. त्याच्या मागोमाग आठवड्याभरात वि.. सहमोरे सर पण आले, भुगोल शिकवायला."....

वि.रं नी पहील्याच तासाला येताना जगाचा थोर मोठा नकाशा आणला.
"अय्या, सरांपेक्षा नकाशाची पुंगळीच जास्त उंचै" चिमणी पुटपुटली
चिमणीचं पुटपुटणं बाजाच्या पेटीच्या भाषेत बोलायचं तर सर्वसाधारण वरच्या पट्टीत असतं.
वि.रं गर्रकन वळले आणि खडुचा एक ढेलपा त्यांनी उभ्या जागून चिमणीला फेकून मारला. खडू मिसाईल भिरभिरत रस्ता चुकून मिस वनच्या चष्म्यावर ताडकन आपटलं. शंकरानं मदनाला बाण लागल्यावर जसं नजरेनंच जाळून मारलं, अगदी डिट्टो तोच लुक मिस वननं वि.रं ना दिला.
वि.र सॉरी म्हणतील अश्या आशेनं किंचित तक्रारवजा सुरात मंजु म्हणाली "सर, खडु मला लागला"नाव काय तुझं?"
चढ्या स्वरात वि.रं चा प्रश्न.मिस मंजु पाटील" मंजुच्या या मिस प्रकरणामुळेच बियाण्यानं तिचं नाव मिस वन ठेवलं होतं.मिस?"
वि.रं चा स्वर कडसर झाला "मातृभाषेत कुमारी असं म्हणतात पाटलीणबाई. आणि लागला खडु तर काय झालं? तुझे आणि या वर्गातल्या सगळ्यांचे गुण चांगले माहीत आहेत मला"
उरलेला तास तंग हवेत कसाबसा संपला पण मुलं जरा गंभीर झाली होती. आप्पासाहेब वयाच्या या वळणावर आलेल्या मुलांशी नेहमीच अहो-जाहो बोलायचे. बरेचसे इतर शिक्षकही अगदी अहो-जाहो नाही केलं तरी मुलांशी आब राखून बोलायचे. मुख्याध्यापिका असणाऱ्या दातेबाई वेळोवेळी मिटींग्स, वर्कशॉप मधून वयात येणाऱ्या मुलांमधल्या शारीरीक आणि मानसिक बदलांचा आणि त्यांच्याशी कसं वागायचं यावर चर्चा करायच्या. या सगळ्या पार्श्वभुमीवर वि.रंच वागणं थोडं खटकलंच.
मधल्या सुटीनंतर बहुदा वि.रंचा तास असायचा. येता जाता आप्पासाहेब बघायचे, कायम चार आठ मुलं शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभी असायची. त्यांनी एकदा वि.रंना सांगून बघण्याचा प्रयत्न केला पण ताजे ताजे शिक्षक झालेले वि.. वस्सकन आप्पासाहेबांच्याच अंगावर धावून आले. तेव्हापासून आप्पासाहेबांनी वि.रंच्या नावानं तौबा केली.

पहील्या चाचणीनंतर मुलं विरुद्ध वि.. हा सामना अधिकृतच झाला.
डब्बल भिंग्याला भुगोलात विसापैकी फक्त बारा मार्क पडले तेव्हा त्याच्यासोबत आख्खा वर्गही चक्रावला. त्याचे निदान चार मार्क तर व्याकरण, विरामचिन्हे यातच गेले होते.
"पण सर भुगोलाच्या पेपरमधे स्वल्पविराम नाही दिला म्हणून तुम्ही मार्क काटले?" डब्बल भिंग्याच्या आवाजात तक्रारीचा सुर जास्त होता की आश्चर्याचा सांगणं कठीण होतं "आणि हे बघा, नकाशात मी डब्लीन बरोबर दाखवलय तरी तुम्ही शुन्य मार्क दिलेत?"
डब्बल भिंग्याच्या नाचऱ्या हातातलं पुस्तक टेबलवर ठेवत वि.रंनी फुटपट्टी काढली. "हे बघ, आपल्या पुस्तकात या बिंदुपासून डब्लीन ३.३ मिमी आहे. तुझ्या नकाशात ते ५.७ मिमीवर आलय.
"पण सर" नेहमीच्या प्रथेप्रमाणं आधी पुष्करचं पोट आणि नंतर उरलेला पुष्कर वि.रंच्या टेबलापाशी पोचला "पुस्तकातल्या नकाशाचा आकार आणि पेपरमधल्या नकाशाचा आकार यात फरक आहे सर. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं इथलं आणि तिथलं अंतर कसं कंपेअर करणार? हे बघा मी दाखवतो.."
वरिष्ठांना आडवं जाऊ नये अशी कोणत्या तरी भाषेत म्हण असण्याची दाट शक्यता आहे. पण पुष्करनं अजाणतेपणी ते केलं. आणि त्यात भर म्हणून वि.रंच्या हातून पुस्तक जवळ जवळ हिसकावून घेताना त्यानं ते टरकावलं देखिल.
वि.. त्या मिनीटाला एखाद्या चिमटण्या काळ्या वांग्यासारखे जांभळे पडले.
"सर, चुकून..." पुष्करला इंट्युशन की काय म्हणतात ते झालं.
वि.. पुढची काही मिनीटं अत्यंत खुनशीपणे फळ्यावरचा भला मोठ्ठा गोल खडुनं रंगवत होते.
"हा गोल आता नाकानं पुस" वि.रं नी पुष्करला दफा ३०२ सुनवली. ’यांना मारायचही नाही म्हणे. टोणगे कुठचे!’ वि.र मनाशी पुटपुटले.
प्रचंड अविश्वासानं पुष्करनं वि., फळा आणि वर्गाकडे बघितलं "सर, मी ते पान चिकटवुन देतो. हवं तर नवीन पुस्तक आणून देतो"
कुठल्याशा बुकडेपोवाल्यानं फुकट दिलेलं पुस्तक फाटल्याचा राग जास्त येतोय की पुष्करच्या ऑफरचा ते वि.रंना समजत नव्हतं.
वर्गाबाहेर रुतलेले आप्पासाहेब आणि दातेबाई गुपचुप टीचररुमकडे निघून गेले.
"उद्यापासून माझ्या वर्गात बसु नकोस" वि.रंनी राग गिळत निर्णय दिला.
"अय्या, याला काही अर्थै का?" चिमणी नेहमीच्या आवाजात पुटपुटली "फ्फीया देऊन येतो आम्ही. आमचं काय ईबीसी नै"
गरज पडली की आठवी ड चा वर्ग लिंगभेद विसरुन सण्णकुन एकत्र येतोच.
वि.रंनी उसवलेला तास कसाबसा आवरुन टाकला.

मधल्या सुट्टीत मुलं वर्गात डब्बा खायची पण पुष्कर आल्यापासून काळा पहाड आणि कंपनी त्याच्या घरी जाऊन डब्बा खायला लागली. पुष्करची आई पोरांना लिंबुटिंबु काहीबाही देत राहायची. शाळेला घर जवळ असल्यानं डब्बा खाऊनही गप्पा टाकायला वेळ मिळायचा तरीही हाशहुश्य करतच मुलं पाचव्या तासाला वर्गात घुसायची. मुली अर्थातच आणि नेहमी प्रमाणेच मुलांहुन हुशार. गपागपा डब्बा खाऊन मधल्या मोठ्या ग्राउंडावर कालच्या टीव्ही सिरीअलची मधल्या म्युजीकसहीत गोष्ट सांगायचं त्यांचं काम तन्मयतेनं चालायचं.
शाळेची इमारत आयताकृती होती. लांबीच्या एका टोकाला टीचररुम होती तर दुसऱ्या टोकाला आठवी ड चा वर्ग. आठवी ड पासून आयताचा कर्ण काढला तर कर्णाच्या दुसऱ्या टोकाला शाळेचं प्रवेशद्वार होतं. आयताच्या लांबी-रुंदीवर विविध खोल्या होत्या तर क्षेत्रफळभर मैदान पसरलं होतं
दुसऱ्या दिवशी मधली सुट्टी संपल्याची घंटा वाजली तसं दबा धरुन बसलेले वि.. वर्गाकडे पळत सुटले. वि.. वर्गात पोचले तेव्हा जेमतेम बारा पंधरा पोरं वर्गात होती. उशीरा पोचलेली चाळीसेक पोरं वि.रंनी शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभी ठेवली.
हा प्रकार दोनचार दिवस घडल्यावर पोरांनी ठरवलं की काही झालं तरी आता वि.रंच्या आधी वर्गात शिरायचं.
हातात फाटलेलं पुस्तक घेऊन वि.. त्याही दिवशी टीचररुमच्या दारात जवळजवळ पळण्याच्या पोझ मधे होते. ग्राउंडच्या कर्णाच्या टोकावर मुलं जेवण आटोपून पोचतच आली होती. मुली कसलासा सद्गुरुंचा आदेश आल्यागत जेवण होऊनही वर्गाच्या दाराजवळच रेंगाळत होत्या.
रणांगणावर हल्लाअसा आदेश आला की तोफगोळे जसे सटासट सुटतात तसं घंटा झाली की टीचररुमच्या सीमेवरुन वि.. पळत सुटले, मैदानातून मुलं धावत सुटली आणि वर्गाच्या दाराशी मुलींनी एकच काला केला.
वि.. दारातून आत घुसताना दोनेक मुलं त्यांना धक्का देऊनही आत गेले. बाजीप्रभुच्या आवेशात वि.रंनी दरवाजाच्या खिंडीवर हात रोवून मुलांना रोकण्याचा प्रयत्न केला पण पुष्करच्या पोटापुढे त्यांची एक चालली नाही. गड पडला,वि.. आत ढकलेले गेले आणि त्या हातघाईच्या लढाईला टर्रर्र असं एक अनपेक्षित पार्श्वसंगीत मिळालं आणि काही सेकंदांकरता काळ थांबला की काय म्हणतात तसं झालं.
"माझी चप्पल...माझी चप्पल" कपाळावरच्या कुंकवाला धक्का लागल्यासारखा वि.रंचा आक्रोश काही सेकंदात निश्चयी क्रोधात परावर्तीत झाला. दाराबाहेर काळा पहाड, डब्बल भिंग्या, चिमणी, थरकाप, बियाणी आणि अजून दहाएक मुलं उभी होती. दाराच्या चौकटीवर नरसिंहासारखे वि.र उभे होते आणि हातात अंगठा तुटलेली चप्पल..
"आत या" वि.रंचा आवाज मुठबंद रागासारखा कमी शब्दांमधे कॉन्सन्ट्रेटेड झाला होता "आत्ता धक्काबुक्की करुन कोण कोण आत आले ते सगळे उभे राहा"वर्ग सुन्न झाला.
एकेक करत पाचसहा मुलं उभी राहीली.
"पुष्कर?" वि.रंच्या आवाजाला गर्जनेचे झालर होती.
"सर, माझं पोट वर्गाच्या आत पोचलं होतं, म्हणजे मी वर्गात वेळेत पोचलो होतो" पुष्करच्या युक्तीवादावर कणभरसुद्धा हसु सांडलं नाही.
वि.रंनी पुष्करचं बकोटं धरुन त्याला द्रौपदीसारखं जवळजवळ फरफटतंच बियाण्याच्या बाजुला उभं केलं आणि क्षणार्धात नकाशाच्या पुंगळीखालचा लाकडी दांडु फर्रर्र करुन ओढून काढला.

"हात पुढं कर" चिमणीकडे वळून त्यांनी दांडु सण्णकन खाली आणला. चिमणीचा जीव साकाळला
"बेशरम कुठ्चे, गुरुजनांचा आदर कसा करायचा माहीत नाही आणि हे म्हणे आठवीत आलेत" वि.रंच उघड स्वगत.
चिमणीनं डोळ्यातलं पाणी निग्रहानं परतवलं आणि दुसरा हात पुढे केला.
सुडदार नागांचं डसणं एखाद्या व्यसनासारखं असतं. एकातुन दुसरं उमलावं तशी हिंसेची वर्तुळं अनंतपणे उमलत राहीली.
वि.रंनी बेभानपणे मुलांच्या उलट्या-सुलट्या हातावर दांड्यानी रट्टे मारले. पुष्कर, डब्बल भिंग्यांनी मारापाई हातांची होणारी आग शमावी म्हणून हात मागे घेतले तर वि.रंनी पोटरीवर सपासप वार केले. काळा पहाडच्या कमावलेल्या अंगावर जेव्हा लाकडी दांडु काड्कन मोडला तेव्हा मुलांच्या अंगाइतकेच त्यांच्या डोळ्यातही नक्षत्रांचे लालसर वेल टरारुन फुलले. दांडु मोडला तसा वि.रंनी बियाण्याच्या शैलीदार केसांना पकडुन त्याला भिंतीवर ढकलुन दिलं.
स्वतःचा आब आणि अंतर राखुन असणारी मंजु मात्र त्या मिनीटाला ऊठली. बंड करणाऱ्या शिपायांना एक सामुहीक उर्मी बांधून ठेवते. मंजु पाठोपाठ थरकाप कुणी न सांगताच उठली आणि वर्गाबाहेर जायला निघाली. लंगडत, डोळ्यातलं पाणी मागे सारत, अपमानाचे तीव्र पडसाद मनात साठवत बराचसा वर्ग खोली बाहेर पडला.
"मी म्हणते आत्ता मुलांची मेडीकल करा" महाजन बाईंनी चिमणीसमोरच आप्पासाहेबांना खडा सवाल टाकला. दातेबाई नसताना आप्पासाहेबांवर हे धर्मसंकट शेकलं होतं. मुलांसोबत धीर देत पुष्करची आई उभी होती. प्रकरण पेटणार ओळखुन आप्पासाहेबांनी दोन दिवस मागून घेतले.

संध्याकाळच्या धुसर उजेडात मुलं शाळेबाहेरच्या ग्राउंडवर बसून चर्चा करत होती.
"मी वड्डरवाडीतून पोरं घेऊन येतो. पाच-पाच रुपयात पोरं येतात. शाळा सुटली की धरतील मास्तराला आणि गपागप हाणतील" काळा पहाड संतापानं नुस्ता धगधगत होता.
"विष घालायला पायजेल" फुल्या फुल्या तोंडातच गिळत बियाणी बोल्ला.
"आपल्याकडे हर्क्युलस सायकलै" डब्बल भिंग्या बेअकल्यासारखा बावळट्ट आयड्या देतो "सरांच्या बियसेला ठोकला नां तर नळकांड वाकडं व्हायचं. परमनंट! मग बसा बोंबलत"
"कुणी काही केलं नाही" पुष्कर टम्मं फुगलेल्या पोटरीवरुन हात फिरवत भीषण आवाजात म्हणाला "तर उद्या मी त्याला पप्पांच्या गाडीखाली क्रश करेन. एकेक हाड मोडेपर्यंत अंगावरुन गाडी फिरवत राहीन-मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे..."

त्याच संध्याकाळी आप्पासाहेब, राठौरसर आणि महाजनबाई यांनीही चर्चेचं गुऱ्हाळ लावलं होतं.
चिंताक्रांत स्वरात आप्पासाहेब म्हणाले "काही कळत नाही बुवा हा वि.. एव्हढा संतापी का आहे ते! वयात आलेल्या मुलांना असं वाकडंतिकडं मारायचं म्हणजे...कठीणचै"
"नक्की घरी प्रॉब्लेम असणार सर" महाजनबाई अनुभवाची झालर लावून अंदाज बांधतात "त्यांचे वडील किंवा आई संतापी असणार बघा. संतापी म्हणजे महासंतापी, जमदग्नीच म्हणा नां. काय हो राठौरसर, तुम्हाला काय वाटत?"
"छे छे" ओसांडणारा मुखरस सांभाळत राठौरसर म्हणाले "मी पण हाणतो पोरांना, अगदी पोरींच्या पाठीत पण गुच्चे घालतो. पण म्हणून काय मी संतापी झालो काय? आमचे मायबाप पण एक्दम सरळ. अहो पोरं चुकली की होतं असं कधी कधी. उगीच याची साल त्याला लावु नका"
"असं कसं म्हणता सर?" महाजनबाई उसळुन म्हणाल्या "आता आमची सावली त्याच वर्गात आहे. मस्तीखोर आहे, सगळ्या सरा-बाईंच्या नकला करते, वि.रंची तर सुरेखच करते, तुम्ही पाहीलत की त्या दिवशी आमच्या घरी. म्हणून आता तिला मारायची का? का हो आप्पासाहेब?"
"खरय" आप्पासाहेब म्हणाले " मागे तुम्ही मला बियाणीच्या केसबद्दल सांगीतलत. तुमचं त्याला तेव्हा शिक्षा करणं योग्यच होतं. पण म्हणून मी त्याला उठसुठ झोडायचं का? पोराचे गणितातले मार्क बघा, पैकीच्या पैकी. मी तुम्हाला मंजु पाटील, मोहन साळेकर बद्दल सांगीतलं. ती पोरं मला मोकळेपणानं सगळं सांगतात, त्यांनी वि.रंच्या काढलेल्या अभ्यासु खोड्यापण. म्हणून मी त्यांना तुडवुन काढायचं का? उद्याची मेरिटची पोरं आहेत ती. त्यांच्या व्रात्यपणात त्रास देण्यापेक्षा धिटाई, नवीन काही करुन बघण्याची उर्मी जास्त आहे. वि.र एकदम स्पोर्ट नाहीत हेच खरंय. हे काही तरी वेगळंच आहे"
"थोडा माझाच गाढवपणा झाला म्हणायचा" अपराधी आवाजात राठौरसर म्हणाले "मीच आपलं वि..ला बसायलाबोलावलं होतं दोन-पाचवेळा. म्हटलं नवीन नवीन झालेलं मास्तरै. ’बसलंकी कसं ओळखही होती आणि कोण पोरं कशी आह्ते, किती वांड आहेत तेही कानावर घालता येतं. पण हे सगळं इतकं सिरिअसली घेईल कुणाला माहीत होतं"

आप्पासाहेब आणि महाजनबाई आवाक होऊन राठौरसरांकडे पाहात राहीले.

घरी आल्यावर डब्बल भिंग्याला राहून राहून भेदरल्यासारखं होत होतं. हे नक्की झालेल्या प्रकारामुळे की पुष्करच्या प्रतिज्ञेमुळं होतय कळेनासं झाल्यावर मात्र त्यानं आत्तापर्यंत जे कधीच केलं नव्हतं ते करायचं ठरवलं. रात्री उशीराचं सायकलवर टांग मारुन तो मिस वनच्या घरी निघाला.

'आता आम्हाला शिकवायला तुम्हाला आता कितपत आवडेल कल्पना नाही पण कुठल्याही छोट्या मोठ्या कारणावरुन आमचा जीव धोक्यात घालण्याची आमची इच्छा नाही. गुरुर ब्रम्हा। गुरुर विष्णु... ’ असं काहीसं निवेदन वर्गात ठेवून काळा पहाडनं शक्ती लावून आख्खा वर्ग बाहेर काढला. श्लोकाची आयडीया त्याला फारशी आवडली नव्हती पण मिस वन पुढे त्याचं काही एक चाललं नाही. ’वक्रुत्वचांगलं असल्यानं ती निवेदनही चांगलंच लिहील असं डब्बल भिंग्यानं त्याला खात्रीशीर पटवलं होतं. शिवाय ही अहिंसक आयडीयापण तिचीच होती.

वि.. वर्गात आले, त्यांनी टेबलावर ठेवलेलं निवेदन वाचलं आणि शिकवायला सुरु केलं.दुसऱ्याही दिवशी वि.. वर्गात आले आणि रिकाम्या वर्गाला शिकवायला सुरु केलं पण त्यांना आज जरा विचित्रच वाटलं. उद्या जर आपण रिकाम्या वर्गात मनाशीच असं बडबडताना दिसु तर आपल्याला वेड लागलं ही अफवा शाळेत पसरायला वेळ लागणार नाही असं त्यांना घट्टच वाटलं.
तिसऱ्या दिवशीपासून वि.रंनी वर्गावर येणं बंद केलं.
पुढच्या चारेक दिवसात दातेबाईंनी सगळ्या प्रकरणाची नीट चौकशी केली. मुलांशी, पालकांशी, सहशिक्षकांशी बोलून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवलं.
दुसऱ्या गावी असणाऱ्या शाळेच्या शाखेत वि.रंची बदली झाली.
बियाणी, पुष्कर यांची आठवी ड मधून दुसऱ्या तुकडीत बदली झाली.
मुलांना आणि पालकांना कडक समज देऊन दातेबाईंनी या प्रकरणावर पडदा पाडला.आठवड्याभरात राठौरसरांनी परगावच्या शाखेत शिकवणाऱ्या आपल्या मेव्हणीचा कौटुंबीक कारणावरुन बदलीची विनंती करणारा अर्ज दातेबाईंना दिला.
गंमत म्हणजे राठौरसरांची मेव्हणीपण भुगोलच शिकवायची.

Thursday, June 7, 2012

मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (1)

यत्ता आठवी म्हणजे कंच चिंच. कुमार बियाणीनं शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्याभरात आपण माजावर आल्याचा दाखला दिला. त्यानं कुमारी लाहोटीच्या सायकलवर खडुनं आरपार बाण गेलेलं दिल चितारलं आणि सोबत किडमिड्या अक्षरात एक चिठ्ठी. कुमार बियाणी जात, धर्म, सांस्कृतीक आणि त्याहुन महत्वाचं आर्थिक, सामाजीक इ इ सारं सारं अभ्यासुन कुमारी लाहोटीच्या प्रेमात पडला होता. पण हाय रे किस्मत. आदीम काळापासून प्यार का दुश्मन जमाना. अकबरानं जसं अनारकलीला भिंतीत चिणून सलीमच्या प्रेमाचा निक्काल लावला तस्स्संच खेळ शिकवणाऱ्या राठौर सरांनी काडीमात्र बियाण्याला आपल्या साडेसहा फुटी विशाल देहानं ढकलत ढकलत भिंतीच्या एका कोपऱ़्यात जवळ जवळ चिणलाच. ते विस्मयकारी, अभद्र विनोदी, भितीदायक इ इ दृश्य बघून बाजूनं जाणारा डब्बल भिंग्या न किंचाळता तर प्रेमापोटी चिणला गेलेला पहीला वीर म्हणून अनारकलीसारखंच कुमार बियाणीचं नाव झालं असतं. यत्ता आठवीची सुरुवात ही अशी दणदणीत झाली.शाळेत निदान दीड डझन मास्तरांचं नाव कुलकर्णी. त्यामुळे प्रत्येक मास्तरांना विशिष्ट उपनाम होतं. असेच एक आप्पासाहेब कुलकर्णी उर्फ आप्पासाहेब आठवी ड चे वर्गशिक्षक झाल्याचे कळाल्यावर बियाणी, डब्बल भिंग्या, काळा पहाड यांनी जोरात तर चिचुंद्री, चिमणी, मिस वन आणि थरकाप यांनी शालीनपणे आनंद व्यक्त केला. मुली शालीन असतात असा शाळेचा ठाम विश्वास असल्यानं काय तो हा फरक. ही बाळं कसला न कसला पराक्रम करण्यात शाळेत पुढं असायची म्हणून त्यांची प्रतिक्रिया महत्वाची. उर्वरित वर्ग हा अद्वैत तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारा असल्यानं त्यांना कोण शिकवतो हे महत्वाचं नव्हतं.आप्पासाहेब इतिहास आणि मराठी शिकवायचे. वर्गशिक्षक असल्यानं त्यांचा रोजचा पहीला तास. शालिनी करंजेचा आवाज चांगला म्हणून आप्पासाहेबांनी तिला वर्गाकडून रे हिंद बांधवा- थांब या स्थळीचालीत म्हणून घ्यायला सांगीतलं. मराठीत करुण दाते आणि आठवी ड मधे शालिनी करंजे स्वतःला तलत महमुद समजत. त्यातही करुणपेक्षा शालिनीच सरस; गाणं म्हणताना तिचा नुस्ता आवाजच नाही तर आख्खा देहही थरथरायचा. तिनं पहील्या दिवशी सुर लावला आणि डब्बल भिंग्या फिस्सकन हसला. "थरकाप बघ कसलं गाणं म्हणतेय." काळा पहाड गारा पडल्यासारखा टपाटपा हसला. "उठा मोहन साळेकर, सोन्या देशमुख. आज काय माकड छाप वापरुन दात भादरले का? सारखे आपल्या मुखाबाहेर पडतायत" आप्पासाहेबांनी उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार सगळ्यांचा गोपाळकाला करत आदेश दिला. "सर, सोन्या नाही, सोहन" काळा पहाडनं एकही दात कमी न करता प्रसन्नपणे उत्तर दिलं. "थरकाप, आपलं हे शालिनी, कसलं गाणं म्हणत होती म्हणून हसु आलं" तोंडातुन फुटलेले शब्द सावरता सावरता डब्बल भिंग्याला घाम फुटला. "या असे पुढे या, साळेकर आता तुम्ही एकतिस ते चाळीस असे पाढे पाठ करा आणि देशमुख तुम्ही तास संपेपर्यंत सुर्यनमस्कार घाला" आप्प्पासाहेब फाशीची शिक्षा सुनावल्यागत खडु मोडत पुढे सरकले. उरलेला तास आप्पासाहेब त्यांच्या भसाड्या आवाजात आणि मागोमाग ताज्या फुटलेल्या आवाजात मुलं आणि गदगदलेल्या आवाजात मुली रे हिंद बांधवा- थांब या स्थळीम्हणत अश्रु ढाळत होत्या.
यत्ता आठवी म्हणजे दोनाचे चार होण्याचे दिवस. साध्या गणिताचे बीजगणित आणि भुमिती झाले, सामान्य विज्ञानाचे वनस्पती अन जीवशास्त्र झाले. आठवड्याभरात आप्पासाहेबांनी साऱ्या विषयांची फाळणी करुन पोरांना वेळापत्रक वाटून टाकलं. नशिब थोर म्हणून दोन्ही गणितांना मिळून आख्ख्या एक देशपांडेबाई मिळाल्या. विज्ञानाचं नशीब मात्र सामान्य होतं. वनस्पती शिकवायला शिंदे सर तर जीवशास्त्राला महाजनबाई असे दोन गुरुजन होते. "अय्या, म्हणजे मोनी मावशी शिकवणार!" सावली पाटील तिच्या टोपणनावाला साजेसं लगेच चिवचिवली. "अबे, महाजनबाई म्हणजे चिमणीच्या मोनी मावशी म्हणे" बियाण्यानं सदा टवकारलेल्या कानांनी ऎकलेलं क्षणभरही न साठवता उपडं केलं. "म्हणजे आता नुस्ता चिवचिवाट!" डब्बल भिंग्या सुस्कारा सोडत पुटपुटला "एक चिमणी-अनेक चिमण्या । शेतावरती जमलेल्या॥" "दिदी दिदी फिर क्या हुआ?" काळा पहाडानं काळवेळ न बघता मोठ्यानं विचारलं आणि परत एकदा चार बाकांमधे खसखशीचं पिक आलं. आणि बुद्ध परत हसला!" स्वतःशीच बोलत आप्पासाहेब काळा पहाडजवळ आले. "आता परत आवाज आला तर देशमुख यावेळी तुम्ही सुर्यनमस्कार घालाल आणि साळेकर तुम्ही पाढे पाठ कराल. बियाणी तुम्हाला मी खेळाच्या मैदानावर पाठवेन; राठौर सरांकडे, पिटी करुन घ्यायला. येतय नां लक्षात?" आप्पासाहेबांनी करकच्चून दम भरला अन वर्गात स्मशान की काय म्हणतात तसली शांतता पसरली.तर कुठे होतो मी?" आप्पासाहेबांनी अत्यंत अपेक्षेने पहील्या डेस्कावरच्या मंजु पाटीलला विचारलं. ती भाषणात (त्याला काळा पहाड कॉन्फीडंटली वक्रुत्व म्हणतो), अभ्यासात, श्लोक पाठ करण्यात हट्कुन पहीली असते. सर, शिवाजी.." मंजु उर्फ मिस वन नम्र आवाजात तुटलेला धागा हल्काच जोडून देते.आप्पासाहेब इतिहास शिकवताना बाबासाहेब पुरंदरे बनतात "हां तर मी म्हणत होतो की बादशहाच्या दरबारात संतापानं थरथरत राजे म्हणाले-" "-आत येऊ का कुलकर्णीसर"या असल्या योगावर ताशाच्या तडतडाटासारख्या वर्ग हसला. आप्पासाहेबांनी हसु दाबत दाराकडं बघितलं. नुस्तंच गोल गरगरीत पोट... त्यांनी डॊळे ताणून बघितलं. पोटापासून बऱ्याच अंतरावर उरलेला देह होता!ही शाळेतली नवी एन्ट्री असणार हे ओळखुन आप्पासाहेबांनी हजेरीपटाकडं बघत आवाज दिला "ये पुष्कर"काही सेकंद गेले. अजून काही सेकंद गेले.आधी चिर्रर्र आवाज आला आणि मग रत्नाच्या घशातून आवाज फुटला "कुणी येत का नाहीए?"बियाण्यानं किडक्या देहातून बटाट्यासारखे डोळे ताणून बाहेर काढले "ते बघ ते बघ पुष्करचं पोट आलं. अर्रे, तो बघ मागोमाग उरलेला पुष्करपण आला"सोहन काळा पहाड होता तर पुष्कर शुभ्र चुरमुऱ्यांचं फुसफुशीत पोतं होता. बघता बघता दोनच दिवसात पुष्कर लाल आईस्क्रीमची कांडी जीभेवर विरघळावी तसा वर्गात मिसळुन गेला. नवीन येणाऱ्यात नुस्ता पुष्कर नव्हता. त्याच्या मागोमाग आठवड्याभरात वि.. सहमोरे सर पण आले, भुगोल शिकवायला.

Saturday, March 24, 2012

शब्द संपले तसा संवाद सुरु झाला

शब्द संपले तसा संवाद सुरु झाला

जळणाऱ्या कोंभाच्या आचेने
निबरत्वाचे बंध तुटले
तंबोऱ्याच्या तारांवर ताणून बसवलेला
तीव्र मध्यम
रेझोनेट झाला
पोक्त पिवळ्या नारंगी रंगांच्या
पॅलेटमधल्या मिश्रणाशी

मला गायचे नसते
माझे गाणे झाले
मौनाचे तल्खली ऍबस्ट्रॅक्ट झाले
गोठलेल्या देवराईत अशब्दांचे कल्लोळ झाले

Saturday, March 3, 2012

सरसकट गोष्ट (२)

एमबीए म्हणजे धर्मराजाचा रथच जणु, जमिनीला स्पर्श न करता दशांगुळे वरुन चालणारा. म्हणजे असं एमबीए न झालेल्यांना वाटतं. खरं तर एमबीए झालेल्यांनाही असंच वाटतं. पण राजाराम उर्फ आर आरला असं वाटत नाही. कारण तो या गोष्टीचा बहुदा नायक आहे. तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा खुप गरिबीतून एमबीए झालाय. पण तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा गाजर हलवा, मुली का पराठा असं खात नाही, उठसुठ तो मां असा टाहो फोडत आईला बिलगतही नाही, मात्र तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा फर्स्टक्लास फर्स्ट आलाय, तेही आय आय एम सारख्या प्रिमिअम बी-स्कुल मधून. त्याला कॅम्पसमधून उच्चकोटीची नौकरी लागूनही तो नम्र इ आहे. असं असलं की माणसाची मुल्य वगैरे उच्च आहेत असं म्हणण्याची पद्धत आहे. हल्ली नागरीकशास्त्रासारखं मुल्यशिक्षण वगैरे शिकवतात म्हणे आय आय एम मधे, स्कोरिंगला बरं असणार.
चिकट साखरेवर घोंघावणारी माशी वरच्यावर टिपावी तसं मायकी फर्नांडोनामक इसमाने आर आरला कॅम्पसमधे वरच्यावर उचललं. मायकी फर्नांडो नावावरुन जरी गोव्याच्या किनारी फेणी रिचवणारा किडूकमिडूक माणूस वाटत असला तरी तो जगप्रसिद्ध वगैरे असतो. जगप्रसिद्ध माणसं उधारी बाकी असल्यासारखं जगाला काहीतरी देत असतात. तसं मायकीनं
माणसाला माणूस न म्हणता ह्युमन कॅपिटल असा नवीन शब्द दिलाय. माणसा कधी रे होशील माणुस अश्या अर्थाचं हृदय पिळवटुन टाकणारं गाणं/कविता/भावगीत इ इ जुन्या काळी होतं. त्याकाळी हृदय पिळवटुन टाकणारं काहीही असलं की तुफान चालायचं, उदा पांढऱ्या साडीतली हातमशीन चालवणारी बाई, भिकाऱ्याच्या आवाजातली दुवा, तत्वापाई जीव देणारा मास्तर इ इ. मग माणसाला नेहमी येतो तसा हृदय पिळवटुन घेण्याचा कंटाळा आला. फॅशन बदलली आणि माणसाचा रिसोर्स झाला. रिसोर्स म्हणजे पैसा, वेळ, धातु, दगड, माती इ. आणि आता त्यात भर ह्युमन रिसोर्सची पडली. मेंदुंच्या वळ्यांच्या पुंगळ्या आफीसातल्या मशीनीत घालून लोक बदाबदा काम पाडायला लागले. इतका रग्गड रिसोर्स लावल्यावर सुट्टीत शक्तीपात होणार नाही तर काय? मग मेलेल्या तोंडानं लोक भसाभसा हिंडायला, दारु प्यायला, सिनेमे पाडायला जायचे. पण रिसोर्सचा प्रश्न भविष्यात बिकट होणार हे ओळखुन मायकीनं ह्युमन रिसोर्सिंगला ह्युमन कॅपिटल मॅनेजमेन्ट असा नवा तोंडावळा दिला. कॅपिटल म्हणजे भांडवल, गुंतवणुक. तर अश्या रितीनं मायकीनं आर आर नावाच्या दासात कॅपिटल गुंतवलं. काही लोक याला चुकून दास कॅपिटल असंही समजतात. पण समजांवर उपाय नाही.
आर आर मायकीच्या जगभरातल्या कंपन्यात हिंडून परत वर्तुळाच्या सुरुवातीच्या टोकाला, भारतात आला. मायकीच्या कंपन्या मनुष्यबळाशी संबंधित काहीच्या काही कामं करायच्या; ऑरगनायजेशन स्ट्रक्चरवर सल्ले, पगाराबाबत सल्ले, रिक्रुटमेन्ट, पेरोल मॅनेजमेन्ट, सिनिअर मॅनेजमेन्ट हायरिंग, मेन्टरिंग आणि असं बरंच काही. वेगवेगळ्या विषयातले तज्ञ विविध कंपन्यांना बेदम सल्ले द्यायचे आणि वर दाबून पैसेही घ्यायचे. खुप पैसे खर्च झाल्यानं समोरच्या कंपन्याही तज्ञांची मतं गंभीरपणे ऎकून घ्यायची. असे तज्ञ बऱ्याचदा डेन्जरस असतात. त्यांना फक्त आणि फक्त त्यांनाच त्यांच्या विषयातलं कळतं असं त्यांना वाटतं आणि त्यांना बाकी सगळं चुकीचं किंवा तुच्छ वाटत असतं. पण प्रत्यक्षात असं नसतंच म्हणून कंपनीचा तोल सांभाळायला कंट्रीहेड नावाचा जग्लर असतो. तो त्या देशातल्या मायकीच्या कंपनीच्या भल्याबुऱ्यासाठी पुर्णतः जबाबदार असतो. पण हा धंदा पडला माणसाबद्दलचा. आपल्या भावनांचं प्रदर्शन न करणं कितीही कुल असलं तरी खोल आत माणुस भावनाशील असतोच! खोल आत असं असलं की काहीही होऊ शकतं, जसं की शामची आई वाचून रडु येणं, सनी देओलचा सिनेमा बघून सिस्टीमचा राग येणं, दक्षिणेतले सिनेमे बघून उडु उडु होणं इ इ. तर अश्या भावनाशील माणसांसोबत काम करताना जरा अलिप्तपणे कुणी धंदा आणि भावनांची गल्लत तर होत नाही हे बघणारा माणूस म्हणजे इंडीपेंन्डट ऑब्सर्वर-इओ. आर आरला भारतातल्या मायकीच्या कंपनीसाठी इओचा रोल दिला होता. आर आर आणि इतर इओ डायरेक्ट मायकीला रिपोर्ट करतात. इओचा रोल म्हणजे गुळाची पोळी किंवा सोन्याची सुळी. कुणी त्याला नारद म्हणतं, कुणी सुपरबॉस म्हणतं. बहुतेकवेळा इओचं कंट्रीहेडशी लव्ह-हेट असं नातं असतं. पण आर आरचं श्रोतींशी बरं होतं.
श्रोती भारताचे कंट्रीहेड होते. नेहमीच्या पेरोल प्रोसेसिंग, बीव्हीचेक असली काम सोडून श्रोतींनी बरीचशी स्ट्रॅटेजिक कामंही मिळवली होती. टॉप मॅनेजमेन्ट मेंटरिंग, नव्यानंच भारतात आलेल्या एका एमएनसीला पॉलीसी फ्रेम करुन देणं इ इ. पण संबंधीत तज्ञांच्या हाताखाली जी नवी मुलं आली होती ती केवळ उच्छाद होती. ही मुलं म्हणजे देवाघरी पाठवावीत अशीच फुलं होती असं आर आरला देखिल वाटलं. वय वर्ष बावीस असणाऱ्या या छकुल्यांना स्वतः मायकीनं रिक्रुट केलं होतं. असली काम तो स्वतःच करायचा. मोहंजोदरो, हडप्पा यांना जशी संस्कृती होती तशी प्रत्येक कंपनीला संस्कृती असते. एखादी कंपनी लॉंन्ग टर्ममधे यशस्वी होण्यासाठी अशी संस्कृती तिथल्या माणसात मुरणं फार आवश्यक असतं असं मायकी म्हणायचा आणि म्हणून तो स्वतःच त्याच्या कंपनीसाठी लोक रिक्रुट करायचा. आर आर स्वतः एक एमबीए असल्यानं त्याला मन मनास उमगत नाही हे गाणं माहीत नव्हतं. तशीही जनरली एमबीए माणसं इंटरनॅशनल किंवा थेट शास्त्रीय वगैरेच ऎकतात. त्यांना भावगीत वगैरे व्याकुळ प्रकार आवडत नाहीत. तर आर आर स्वतः एक एमबीए असल्यानं त्याला मायकीचं मन उमजलं होतं असा त्याचा समज होता.
तर अश्या मनामनातल्या गोष्टी आर आर मायकीच्या कानाकानात पचकला. श्रोतींनी आणलेले नवे स्ट्रॅटेजीक प्रोजेक्ट ताज्या छकुल्यांमुळे फसतील असला आर आरचा रिपोर्ट ऎकुन मायकीनं दोघांनाही बोलावुन घेतलं.
"मायकी, नवीन आलेली पोरं शुद्ध गाढव आहेत. माझे सगळे प्रोजेक्ट त्यामुळे रेड मधे आहेत"- श्रोती
"श्रोती, नवीन स्ट्रॅटेजीक काम करायला तुला मुरलेलीच माणसं लागतील. पण रोजची गाढव-कामं करायला गाढवंच बरी!"- मायकी
"पण मायकी, ती पोरं दिवसभर ऑफीस दणाणुन सोडतात. सतत फिदीफिदी दात काय विचकतात, एकमेकांच्या अंगावर धावुन काय जातात. आणि काम शब्दशः उरकुन टाकतात. झालं, झालं, झालं...." श्रोती टोकाला पोचले हो्ते.
"श्रोती, त्यांच्यामुळे आपली प्रॉफीटॅबिलीटी किती वाढलीए बघा. स्ट्रॅटेजिक किंवा रोजंच बेमतलब काम, काहीही असलं तरी कंपनीला त्यापेक्षा जास्त फायदा महत्वाचा. आणि चार शेंगदाण्याच्या बदल्यात आणलेली ही माकडं जर फायदा वाढवणार असतील तर बेअर विथ देम" श्रोतींच्या पाठीवर थाप मारत मायकीनं डोळे मिचकावले "टेक अ चिल पिल ओल्डी"
श्रोतींनी थंडीची गोळी गिळली आणि कंपनीला रामराम ठोकला.

श्रोतींच्या जागी मायकीनं पिंकी सभरवालला आणलं.

पिंकी म्हणजे गुलाबी फुल । पिंकी म्हणजे मुलातलं मुल
पिंकी म्हणजे छोट्या मुलीची बाहुली । पिंकी म्हणजे छोट्या बाहुलीची मोठी साऊली
पिंकी म्हणजे मायेचं घरटं । पिंकी म्हणजे तोकडासा स्कर्ट
आर आरनं पिंकीबद्दलचे सारे तर्क करुन पाहीले.

पण पिंकी सभरवाल नामक सहा फुटाचा तगडा बुवा समोर येऊन उभा राहीला तेव्हा आर आरचा चेहरा उगाच उतरला.
"मी पिंकी" पिंकीनं मुक्तपणे न लाजता स्वतःची ओळख करुन दिली "कारण माझं नाव पिंकी आहे"
आर आरला स्वस्त विनोद आवडत नाहीत. आर आर आपल्या हमखास विनोदावर हसला नाही हे पिंकीनं नीट हेरुन ठेवलं. आई-बापानं जेव्हापासून हे नाव त्याला दिलय, तेव्हापासून हा विनोद पिंकी करत आलाय. त्याचा नाईलाज असतो.
पिंकी खुप विचार करतो. त्याला उगाच स्ट्रॅटेजिक वगैरे वाटायला लागतं. तो अजून खुप विचार करतो. त्याला वाटतं आपण अजून खुप विचार करावा, समुद्र किनारी बसावं, खुप सारी बिअर प्यावी, अजून विचार करावा, आजुबाजुला सामुद्रीक इंग्रजी सिरिअल मधे असतात तश्या स्फुर्तीदायक तरण्या बाया असाव्यात म्हणजे अजून विचार सुचतात. त्याला अचानक अश्लील वाटायला लागतं. ऑफीसात असं वाटणं ठीक नाही. तो विचार करणं थांबवायचा प्रयत्न करतो पण जमत नाही.
मग पिंकी दर दोन दिवसांनी मिटींग घ्यायचं ठरवतो. दह्याच्या विरजणात जीवाणु मिसळावा तसं तो कंपनीत रुजायचा प्रयत्न करतो. मिटींगमधे बोल बोल बोलतो. श्रोतींनी कश्या चुका केल्या हे रंगवुन सांगतो, तो कंपनीचं डीएनए बदलणारए हे सांगतो, स्वतःच्या दारु पिण्याबद्दल सांगतो. त्याला कुणीच काही सांगत नाही.
मिटींग नंतर पिंकी दमून निरीक्षणं लिहायला बसतो.
निरीक्षण १) नवीन टारगट पोरं (नटापो) आपल्या विनोदावर दबकत हसत होती. त्यांना प्रोत्साहन देऊन आपल्या सोबत ठेवलं पाहीजे. जुनी जाणती पोरं (जुजापो) आपल्याला विचारत नाहीत. त्यांना त्यांची काम खुप चांगली येतात पण त्यांना आपल्या सल्ल्याची गरज नाही. त्यांचे नक्कीच काही वेगळे अजेन्डे असणार. दे कॅन बिकम डेन्जरस.
निरीक्षण २) सगळ्यांनी खुप काम केली पाहीजेत. स्ट्रॅटेजिक माणसं कामं करत नाहीत. दारु पिली की कल्पना विस्तार होतो. स्ट्रॅटेजिक माणसांना कल्पनांची खुप गरज असते
निरीक्षण ३) अजू्न काय? अजून काय? हो हो हो हो
पिंकीला खुप काही करायचं असतं पण त्याला काय करावं हे सुचत नाही.
जुजापोंना वाटतं पिंकीला काहीच येत नाही पण त्यांना काय करावं हे सुचत नाही.
नटापोंना पिंकीची भिती वाटते पण त्यांना काय करावं हे सुचत नाही.
पिंकी कधी कधी पुस्तक वाचतो. त्याला बुद्धीला चालना देणारी पुस्तकं खुप आवडतात. त्यानं खुप शोधून बिरबलाच्या चातुर्यकथा मिळवल्या. घोडा का अडला, भाकरी का करपली या प्रश्नांना बिरबलानं दिलेलं उत्तर त्याला खरपुस आवडतं. आपल्या पुराणात सर्व प्रश्नांची उत्तर आहेत याचा त्याला सार्थ अभिमान वाटला. त्यानं लगेच जुजापोंची कामं नटापोंमधे आणि नटापोंची कामं जुजापोंमधे फिरवली.
जुजापोंनी सवंग सिनेमा तुफान चालावा तशी तुडुंब कामं करुन टाकली. पिंकीला खट्टु खट्टु व्हायला झालं.
नटापोंना वाटलं आईचं पत्र हरवलं सारखं आपलं काम कुणाच्यातरी मागं टाकून दिलं की आपल्यावरंचं राज्य जाईल. पिंकीला खट्टु खट्टु व्हायला झालं.
कस्टमरांनी मायकीला काम होत नसल्याचं सांगीतलं. मायकीनं पिंकीला काम होत नसल्याचं सांगीतलं.
मायकीनं रोज साडेसातला पिंकीला फोन करायला सुरुवात केली. पिंकीला किंचीत हार्ट ऍटॅक व्हायला सुरुवात झाली
पण मनात पिंकी पार पिसाळला आणि नटापोत जाऊन मिसळला. श्रावणात रोज कीर्तन व्हावं त्या श्रद्धेनं त्यानं नटापोंना रोज स्फुर्तीयुक्त भाषण द्यायचं ठरवलं. नटापोंशी बोलताना त्याला अंगावर रोमांच उभे राहाताहेत असं वाटायचं. कधी वाटायचं आपल्या डोक्यावर सोनेरी मुगूट आहे, गमबुट मधे पॅन्ट खोचून कंबरेच्या तलवारीवर हात देऊन आपण झोकदार उभे आहोत आणि नटापो पायाशी उभे राहून आपला शब्द न शब्द झेलाताहेत. नटापोंशी बोलताना पिंकीला अध्यात्मिक समाधान मिळायचं.
थोड्याच दिवसात पिंकीनं आवडते आणि नावडते अश्या दोन टोळ्या बनवल्या. नावडत्यांमधे नकळत सगळे जुजापो आले. तो जुजापोंशी जुजबी बोलून फक्त काम सांगायला लागला. जुजापो सगळी पडकी काम करतात पण जुजापोंना कधीच शाबासकी मिळत नाही. आर आर याचं निरीक्षण करतो. एमबीएच्या भाषेत याला थिअरी ऑफ एक्स म्हणतात. आवडत्या टोळीत बहुतेक सगळे नटापो असतात. पिंकी त्यांना रोज बोल बोल बोलतो. किंचित कामं देतो, तोंडदेखला दम देतो आणि पाठीवर खुप थापा देतो. आर आर याचंही निरीक्षण करतो. एमबीएच्या भाषेत याला थिअरी ऑफ वाय म्हणतात.
एक्स आणि वाय क्रोमोझोमचा गर्भाचा लिंग ठरवण्यात वाटा असतो हे आर आरला माहीत असतं. पण पिंकी म्हणतो तसं त्यानं कंपनीचं गुणसुत्र बदलणार का हे आर आरला माहीत नसतं. पण हळु हळु कंपनीतल्या स्पर्धात्मक चर्चा, सेमिनार इ बंद होऊन त्याजागी वासावरुन फळ ओळखा, स्पर्शावरुन गडी ओळखा, उंच उडी, खीर कुणी खाल्ली-घागर बुडी, सर्वोत्कृष्ट जेवण बनवणार कोण, करवंदासाठी बनवा कोन अश्य़ा स्पर्धा सुरु झाल्या. आणि बहुतेक सगळ्या स्पर्धा नटापोंनी जिंकल्या. नटापो जिंकले की ऑफीसच्या या टोकाचं त्या टोकाला क्युबिकलवरुन उड्या मारत पळत सुटायचे, कधी टारझन सारखे छाती बडवत विजय साजरा करायचे तर कधी चक्क मानवी मनोरा करुन धडाधडा पडून दाखवायचे. पिंकीला का कोण जाणे पण हे जाम आवडायचं.
जुजापो आपल्या परीनं आनंदी राहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आयोजित केलेल्या आठवड्याचं ताजं पुस्तक, कलम २१३- परिशिष्ट ब, व्हेरिअबलचं पे- शाप की वरदान अश्या दणकट विषयांवरच्या सेमिनारना पिंकी नाईलाजानं उपस्थित राहीला पण त्यानं मेंदु-मैथुन या एकाच शब्दात सगळ्या सेमिनारचं वर्णन करुन जुजापोंचं उरलंसुरलं खच्चीकरण करुन टाकलं.
जुजापो सैरावैरा कंपनी सोडु लागले.
आर आरकडं हमदर्द का सिंकारा नसतं म्हणून तो मेन्टरिंगवाल्या रणदिवेनां किंवा लिगलच्या हिनाला किंवा ऑडीटच्या कुलभुषणला कंपनी सोडण्यापासून थांबवु शकला नाही.
आर आरला क्रमानं वाईट, सुटकारा आणि आनंद अश्या भावना झाल्या, गेलेल्या लोकांसाठी.
पिंकीला क्रमानं आनंद, सुटकारा आणि भिती अश्या भावना झाल्या, उरलेल्या स्वतःसाठी.
कस्टमरांनी मायकीला दम भरला.
मायकीनं पिंकीला हग्या दम भरला. पिंकीला हार्ट ऍटॅकची साथ आली. फोन वाजला की हार्ट ऍटॅक, मिटींग भरली की हार्ट ऍटॅक, येतो म्हटलं की हार्ट ऍटॅक अन जातो म्हटलं की हार्ट ऍटॅक.
पिंकीला लहानपणी देखिल परिक्षा आवडली नसते. पण मायकीनं सांगीतल्यामुळं त्याला आत्मपरिक्षण, आत्मचिंतन की कायसं करायचं असतं.पिंकी खुप विचार करतो. त्याला वाटतं आपण अजून खुप विचार करावा. तो नटापोंनाही विचार करायला बसवतो. नक्की काय करायचं हे माहीत नसलं की पिंकीला कावरंबावरं व्हायला होतं. त्याला वाटतं आता दिवसातला कितवातरी हार्ट ऍटॅक येणार. नटापोंना एका मिटींगरुममधे आत्मपरिक्षण, आत्मचिंतन की कायसं करायला बसवलं असूनही त्यांचा दंगा सरत नाही. मग मात्र पिंकी तिरीमिरीत उठला आणि त्वेषा-द्वेषानं मिटींगरुममधे घुसला. एक मोठी आरोळी ठोकून पिंकी नटापोंवर जवळजवळ धावूनच गेला. पिंकीचं मोठ्या स्वरातलं चिंतन ऎकून आर आरनं मिटींगरुमच्या काचेला डोळे चिकटवले. आर आरला वाटलं आपण मायकीच्या ऑफीसात नाही तर एटूंच्या राज्यातच आलोय; टिंग म्हणताच जाते खाली, टुंग म्हणताच येते वर. पिंकीच्या मानेवरचे केस उभे राहीले होते आणि दात विचकुन तो साऱ्यांकडे पाहात होता. आतलं दृष्य शक्यतांच्या पलीकडंचं होतं. गौरी सातव एका उडीसरशी खिडकीत चढून बसली होती, अभिराम पंख्यावर चढला होता, अहमदच्या अंगावर शिरीष चढला होता, कुणी कोपऱ्यात दबा धरुन बसले होते तर कुणी दोन पायांवर थरथरत उभे होते. सारं काहीतरी विचित्र होतं. ढप्पं असा मोठा आवाज आला आणि तेव्हा आर आरनं बघितलं तर पिंकी ज्या टेबलवर उभा होता त्यावर त्याचं वळवळणारं शेपूट आपटून ढप्पं आवाज येतो होता. पिंकी एक हुप्प्या होता! आणि बाकीची नटापो वळवळणारी बारकी माकडं, लाल, काळ्या तोंडाची माकडं...
पिंकीला त्याक्षणी आत्मज्ञान प्राप्त झालं. ओळखा पाहु मी कोण असं कोडं नुस्तं दुसरीच्या पुस्तकात नसतं तर ते जीवनाचं भागधेय असतं वगैरे वगैरे. माझीया जातीचे मज मिळो कोणी वगैरे वगैरे. साथी हात बढाना वगैरे वगैरे.
आर आरचा यावर विश्वासच बसला नाही; एमबीएमधे शिकवलं नाही असं ही काही होतं तर! माणसांची वेगानं माकडं होताहेत अशी अफवा त्यानं ऎकली होती. पण अफवा पसरवणं आणि त्यांवर विश्वास ठेवणं हा कायद्यानं गुन्हा असल्यानं आर आरनं हे कधी मानलंच नव्हतं. अर्थात त्याला वेगानं वाढणारी हडेलहप्पी, छोट्या,मोठ्या टोळ्यांनी राज्य करणारे बाहुबली आणि एकूणच स्वस्त होत चाललेले जगण्याचे अभिरुचीहीन व्यवहार दिसत होते पण डार्वीन आजोबांनी सांगीतलेल्या उत्क्रांतीचा प्रवास उलट दिशेनेही होऊ शकतो हे त्याच्यासाठी नवलच होतं.
पिंकीला जगण्याचं नवं भान मिळाल्यापासून त्याचा आत्मविश्वास डब्बल झालेला असतो. त्याला वाटलं उरलेसुरले जुजापो पळवुन लावले की माकडांचंच राज्य. मग ही नवी ओळख लपवावीही लागणार नाही. सर्वत्र माकडंच माकडं, गोरी माकडं, काळी माकडं, दुबळी आणि शक्तीवान माकडं, उंच माकडं, बुटकी माकडं. मी म्हटलं की उडी मारणार, मी म्हटलं की कोलांटी मारणार, मी हस म्हटलं की हसणार, मी रुस म्हटलं की रुसणार, मी म्हणेन तस्संच काम करणार. पण मग या माकडांना जुजपो करतात ती सगळी कामं येतील?
गौरी सातवनं त्याला मार्ग दाखवला, रिक्रुटमेन्ट करायची झाली की नावाच्या चिठ्या उचलायच्या, पगार ठरवायचा झाला की जुगारात असतं, तसं चक्र फिरवायचं इ इ. खरं म्हणजे गौरी सातव त्याच्या जबड्याची व्यायामशाळा होती. गौरी सातव! गौरी सातव माकडीण!! अनाकर्षक, भावाच्या असाव्यात अश्या बेढब जीन्स घालून, पायात आवाज करणारे पैंजण आणि कानात लोंबणारे डुल घालून ऑफीसात यायची. पण आता हे सगळं किती निरर्थक आहे असं पिंकीला तीव्रतेनं जाणवलं. पिंकीच्या कानात गौरी सातव बोल बोल बोलली. माकडांना कामं येत नसली म्हणून काय झालं, त्यांच्याकडे दांडगी इच्छाशक्ती होती. कुठल्याशा पुस्तकात पिंकीनंही इच्छा तेथे मार्ग असा सुविचार वाचलेला असतो. त्याला आपल्यालाही काही सुचलं याचा निवडक आनंद होतो. दीड तासानं गौरी सातव पिंकीच्या केबिन बाहेर पडली तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर अपूर्व समाधान होतं.

सरसकट गोष्ट

एखादी कल्पना स्वतःची ओळख घेऊन येते, स्वतःचा फॉर्म घेऊन येते असं नेहमीच म्हटलं जातं. "सरसकट गोष्ट" जेव्हा सुचली तेव्हा तिचा फॉर्म सरसकट असणार नाही हे कुठं तरी ठाऊक होतं. पण वेळ, इच्छाशक्ती इ च्या अभावापाई ही गोष्ट मुळात अशी लिहीली गेली. एक गंमत, प्रयोग म्हणून दोन्ही फॉर्म (हा + थोडासा मला अपेक्षित) पोस्ट करत आहे. कुठला जास्त आवडला नक्की कळवा


॥गोष्ट॥

एखाद्या घटनेची सत्यता आपण अनुभवसिद्धतेवर पारखुन घेतो. राजाराम इथून पुढे जे सांगणार आहे ते कितीही अत्यर्क वाटले तरी त्याची गोष्ट खोटी असं का कोण जाणे पण म्हणवत नाही. ही गोष्ट राजारामच्या मते भविष्यात घडलेली आहे पण काल हा सापेक्ष असल्यानं भूत-भविष्य अश्या क्रमाला काहीच अर्थ नसतो.

॥ राजाराम ॥

आय आय एम ला नंबर लागणं, तिथे टॉप करणं हे जर स्वप्नवत असेल तर मायकीसाठी काम करणं हे पहाटेच्या स्वप्नासारखं होतं; विशफुल थिंकिंग! मायकी- माईक फर्नांडो म्हणजे ह्युमन रिसोर्सिंग क्षेत्रातला दादा. त्याला स्वतःला ह्युमन रिसोर्सिंग या शब्दाचा तिटकारा आहे. धातु, वीज, पैसा हे रिसोर्सेस झाले; त्याच पट्टीवर माणूस कसा मोजायचा असा त्याचा रास्त सवाल. माणसाच्या शक्तीवर प्रचंड विश्वास असलेल्या या माणसाने मग ह्युमन कॅपिटल मॅनेजमेन्ट अशी नवी संज्ञा प्रचारात आणली.
आय आय एमच्या कॅम्पस मधून उचलून त्यानं मला दोन वर्ष जगभर फिरवलं. प्रत्येक देशात त्याची एम एफ़ एच सी एम कंपनी मनुष्यबळाशी संबंधित काही तरी काम करायची; ऑरगनायजेशन स्ट्रक्चरवर सल्ले, पगाराबाबत सल्ले, रिक्रुटमेन्ट, पेरोल मॅनेजमेन्ट, सिनिअर मॅनेजमेन्ट हायरिंग, मेन्टरिंग आणि असं बरंच काही. त्या त्या देशाची संस्कृती, कार्य-संस्कृती, तिथले उद्योग, कायदे सगळं लक्षात घेऊन मायकी कंपनी चालवायचा. खरं म्हणजे पळवायचा हा शब्द जास्त योग्य!
जग हिंडून झाल्यावर इंडिपेन्डन्ट ऑबसर्व्हर म्हणून मी भारतात परत आलो. ईओ या रोलला मायकीचा चमचा, गुप्तहेर, कळलाव्या, सुपरबॉस अशी अनेक उपनाम आहेत. जगभरातल्या मायकीच्या प्रत्येक कंपनीत एक ईओ असतो आणि तो स्वतंत्रपणे मायकीला रिपोर्ट करतो. आमचा धंदा माणसांशी संबंधीत असल्यानं त्यात वैयक्तिक राग-लोभ आलेच. एक कंट्रीहेड आणि त्याच्यावर सोपवलेली मायकीची तिथली कंपनी हे वैयक्तिक राग-लोभ, ओळखी-अनोळखी कश्या मॅनेज करते हे मायकीला तटस्थपणे सांगणं हे ईओचं काम. म्हटलं तर गुळाची पोळी किंवा सोन्याची सुळी असं हे काम. आणि तेही मी घेऊन बसलोय भारतात जिथे व्यावसाईकतेच्या पलीकडे जाऊन नातेसंबंधांना जास्त महत्व दिलं जातं. पण भारत म्हणजे वाढणारी बाजारपेठ, स्वस्तात काम करुन देणारी तरुण, कल्पक उर्जा इथे भरपुर शिवाय जगभरातलं आऊटसोर्सिंग हब! भारतातलं सेंटर हे मायकीचं सर्वात मोठं सेंटर आणि मी त्याचा ईओ.
श्रोती होते तोपर्यंत इथे सारं सुरळीत सुरु होतं. नेहमीच्या रिक्रुटमेन्ट, पेरोल मॅनेजमेन्ट कामांशिवाय एका नव्यानंच भारतात आलेल्या मल्टीनॅशनलचं पॉलिसी बनवण्याचं मोठं काम आम्हाला मिळालं होतं, शिवाय काही सिएक्सओ हायरिंग आणि एक्जिक्युटीव्ह मेंटरिंगच्या पण असाईनमेन्ट मिळाल्या होत्या. आणि अचानक श्रोतींनी राजिनामा दिला. श्रोती कंट्रीहेड म्हणून यशस्वी होते, त्यांचा अनुभवही तगडा होता पण ते स्वभावाने जरा मवाळ होते. ऑफिसात नव्या भरती झालेल्या पोरांनी उच्छाद मांडलाय असं तक्रारवजा सुरात एकदा ते मला बोललेही होते पण आपल्या कंपनीची प्रत्येक रिक्रुटमेंट मायकी स्वतः करायचा त्यामुळे कुठे बोलायची सोय नव्हती. नवीन आलेले सारे मोठे प्रोजेक्ट फसणार या माझ्या रिपोर्टनंतर मायकीनं ताबडतोब मला आणि श्रोतींना मिटींगला बोलावलं.
"काम फसणारंच मायकी" श्रोतींच्या सुरातला वैतागवाणा भाव टोकाला पोचलेला होता "तू यावेळी निवडलेली माणसं शुद्ध गाढव आहेत. आणि गाढवांकडून काय काय अपेक्षा ठेवायच्या?"
मायकी गडगडाटी हसत म्हणाला "गाढव नाही श्रोती, माकडं आहेत ती माकडं! ताज्या रक्ताची, नव्या दमाची माकडं! अरे प्रॉफीट मार्जिन वाढवायचं म्हणजे स्वस्तात मिळणारे लोक घ्यावे लागतात. म्हणून चार फुस्कट शेंगदाण्यांच्या बदल्यात मला ही माकडं मिळाली. रोजची रिक्रुटमेन्ट, पेरोल मॅनेजमेन्ट असली काम ठीक करतात हे लोक. तू स्ट्रॅटेजिक असाईनमेन्ट उगाच दिल्यास त्या लोकांना. तू आता थकलायस ओल्डी!" मायकीनं बोलता बोलता पाठीवर मारलेली थाप सुचक होती. श्रोतींनी पंधरा दिवसाच्या आत राजिनामा दिला. मायकीच्या शब्दातला भावार्थ कळाला असं मला उगाच वाटलं; प्रॉफीट मार्जिन महत्वाची!
श्रोतींच्या जागी मायकीनं पिंकी सबरवालला आणलं. पिंकी हा बाप्या आहे हे त्याला प्रत्यक्ष भेटेपर्यंत कळण्याचं काहीच कारण नव्हतं! माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ त्याला अनपेक्षित नसावा. स्वतःची ओळख करुन देताना तो म्हणाला "मेरा नाम पिंकी है क्युं की मै पिंकी हुं" . त्या मिनीटाला मला तो सुमार हिंदी सिनेमातल्या व्हिलनसारखा स्वस्त वाटला.
महीन्याभरात त्यानं स्वतःला स्थिरस्थावर केलं आणि त्यानं त्याचं व्हीजन माझ्यासमोर मांडलं "श्रोतींनी खुप गोष्टी सुरु केल्या पण त्या तडीला नेल्या नाहीत. मला एक सेन्स ऑफ अर्जंसी निर्माण करायचीय. सुरु केलेली प्रत्येक असाईनमेन्ट वेळेत संपलीच पाहीजे यावर मी भर देणारै. थोडक्यात मला या कंपनीचं गुणसुत्र बदलायचय! "
जुन्या बॉसला शिव्याशाप घालून सहानुभुती मिळवायची हा फार पुरातन खेळ. या गळाला मी लागणार नसतो.

॥गोष्ट॥
भलेही तुम्हाला अरनॉल्ड श्वॅजनायगरचं स्पेलींग येत नसेल तरी तुम्ही त्याचा माणूस-(बनला) रोबो- (बनला) माणूस असे साय-फाय बघता. हे होऊ शकतं ही शक्यता तुम्ही नाकारत नाही.
आणि जर तसं असेल तर राजारामच्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल.

॥पिंकी॥
मेरा नाम पिंकी है क्युं की मै पिंकी हुं या माझ्या हमखास विनोदावर राजाराम हसला नाही हे मी नीट लक्षात ठेवणारै. हा मनुष्य डेंजरस असु शकतो. कुणावरही विश्वास ठेवणं धंद्यात धोकादायकच. या माणसावर तर नक्कीच ठेवु शकत नाही. वायची थिअरी सांगते की लोकांना काम करायला आवडतं म्हणून त्यांना आवडणारं काम आणि प्रोत्साहन द्या. हे पुस्तकात बरं दिसतं. कुणी मला एव्हढाच पगार देऊन कुठल्या बीचवर विनाकाम ठेवलं तर मला जास्त मजा येईल. माझ्यासारख्या स्ट्रॅटेजिक माणसाला कामं कसली सांगता? माझा थिअरी ऑफ एक्सवर जास्त विश्वास आहे. लोकांना काम नकोच असतं. त्यांना धमकावुन, पैशाचं अमिश दाखवुन काम करवुन घ्यावं लागतं. प्रत्येकाचे काही पोलीटीकल, पर्सनल अजेन्डे असतात आणि त्यांना ताळ्यावर आणायला माझ्यासारखा रिंगमास्टर लागतो.
आणि इथली लोकं तर त्यांच्या टीमपलीकडे कुणाशी बोलतही नाहीत. कुठूनतरी हे चक्र भेदावं लागेल. मला या चक्रात घुसायचं असेल तर असलेली सगळी चक्रं मोडून मला माझ्याभोवती फिरणारी चक्रं नव्यानं बनवावी लागतील.

॥ राजाराम ॥
पिंकीनं सगळ्यांचे जॉब रोटेट केलेत. पेरोलवाला सुब्बु रिक्रुटमेन्ट करतोय, मेन्टरिंगवाली दिपा बीव्हीचेक करतेय. सगळा गोंधळ माजलाय. मायकीपण शांत बसलाय. तो तसंही कंट्रीहेडच्या कामात ढवळाढवळ करत नाही. आठवड्याभरापुर्वी दिपाचा बॉस रणदिवे कंपनी सोडून गेला. त्याच्या मागोमाग कुलभुषण आणि हिना गेले. ही सगळी क्रिम होती. कंपनीत शांततापुर्ण कल्लोळ आहे. जुने जाणते जे मुळातच संयमशील होते ते अधीकच सोशिक झालेत. आठवड्याला होणाऱ्या, व्यावसाईक, ’चॅलेन्ज मी’, सारख्या बुद्धीचा कीस पाडणाऱ्या स्पर्धा बंद झाल्यात. हसतखेळत हॊणाऱ्या पार्ट्या बंद झाल्यात. नवे रंगरुट मात्र पारंच पिसाटलेत. श्रोती या मुलांना का वैतागले असतील हे मला आता स्पष्ट कळत होतं. त्यांना मेन्टर करायला कुणी नव्हतं. जी कामं त्यांना येत होती ती आपापसात फिरवली गेल्यानं नव्या कामांत अफाट चुका होत होत्या. कस्टमरच्या तक्रारी बनचुकेपणाने दुर्लक्षित केल्या जात होत्या.
या साऱ्या गदारोळात मला एकच प्रश्न पडलाय, मायकी, तू कुठे आहेस?

॥पिंकी॥
मला कसलासा संशय आहे. म्हणून मी त्या नव्या पोरांच्या टोळीला संध्याकाळी उशीरापर्यंत थांबवून घेतलय. मिटींगरुमच्या बंद दाराआड चालु असलेला त्यांचा कल्ला मला माझ्या केबिनपर्यंत ऎकु येतोय. मी आत गेलो तेव्हा अनामिक वासानं मी बेचैन झालो. कसल्याश्या हुरहुरीनं माझ्या मानेवरचे केस उभे ठाकले. माझ्याही नकळत मी एक जोरदार आरोळी ठोकली आणि त्या पोरांच्या अंगावर धावून गेलो. तेव्हढा एक क्षण सोक्षमोक्ष करायला मोकळा होता.

॥ राजाराम ॥
मिटींगरुमच्या आत जे सुरु होतं ते पाहून मी आवाक झालो. खरं म्हणजे माझ्या केबिनच्या आणि मिटींगरुमच्या मधल्या काचेच्या भिंतीला सिलीकॉनचे स्टीकर्स आहेत. पण नेमकं मला बसल्या जागी दोन सिलीकॉनच्या पट्ट्यांमधून मिटींगरुमच्या आतलं सारं दिसतं. पिंकीनं गळ्यात काहीतरी आडकल्यासारखा आवाज काढला आणि तो नव्या टीमच्या अंगावर धावून जातोय हे मला दिसलं होतं. पण त्यानंतरंचं दृष्य शक्यतांच्या पलीकडंचं होतं.
गौरी सातव एका उडीसरशी खिडकीत चढून बसली होती, अभिराम पंख्यावर चढला होता, अहमदच्या अंगावर शिरीष चढला होता, कुणी कोपऱ्यात दबा धरुन बसले होते तर कुणी दोन पायांवर थरथरत उभे होते. काहीतरी विचित्र होतं. ढप्पं असा मोठा आवाज आला आणि बघितलं तर पिंकी साऱ्यांकडे दात विचकत बघत होता आणि ज्या टेबलवर तो उभा होता त्यावर त्याचं वळवळणारं शेपूट आपटून ढप्पं आवाज येतो होता.
पिंकी एक हुप्प्या होता! आणि बाकीची पोरं वळवळणारी बारकी माकडं, लाल, काळ्या तोंडाची माकडं...

॥गोष्ट॥
उत्क्रांती कसा प्रवास करते हे डार्वीनंन सांगीतलं नाही. पण राजारामची क्षणार्धात खात्री पटली की उत्क्रांती वर्तुळाकार प्रवास करते. माकडाचा माणुस झाला आणि आता माणसाचं परत माकड होतय. जगभरातल्या संस्कृतींची मुजोरशाहीकडे वाटचाल सुरु झालीय. सर्वत्र हडेलहप्पी आणि बाहुबली हुप्पे छोट्या मोठ्या टोळ्यांचं नेतृत्व करतायत. महत्वाकांक्षी हुप्पे स्वतःच्या टोळ्या काढताहेत. छोट्या टोळ्यांना मोठ्या टोळ्यांचे हुप्पे हडप करताहेत. टोळ्यांमधली कमजोर माकडं हुप्प्या सांगेल तसं वागताहेत. माकडं आणि हुप्पे एकूण जगण्याचे व्यवहार स्वस्त करताहेत

॥पिंकी॥
तर हे एकूण खरं आहे. मायकीला बहुदा मी कोण आहे याचा अंदाज असावा आणि म्हणूनच त्यानंच निवडलेल्या माकडांना, हो शब्दशः माकडांना कंट्रोल करायला त्यानं मला आणलय.

॥ राजाराम ॥
तर हे एकूण खरं आहे. माणसांसारखी माकडं समाजात सर्वत्र सर्वदुर पसरताहेत ही फक्त अफवा नाहीए. मायकीनं, द ग्रेट मायकीनं, भांडवलशाहीपुढे पाय टेकून स्वस्तात मिळतात म्हणून माकडं भरती केलीयत आणि त्यांचा चाबूक एका हुप्प्याकडे दिलाय

॥पिंकी॥
हे फार छान आहे. मला कुणाकडून काम करुन घ्यायचय कळाल्यापासून मला नवाच हुरुप आलाय. नाही म्हणायला चार आठ माणसं आहेत पण त्यांना काहीतरी दीर्घ मुदतीची कामं देऊन चुप करता येईल. बाकीच्यांना नुस्तीच रुटीन कामं. रोज एकेकाला दोन दोन तास नुस्तं काम कसं करायचं भाषणं द्यावं लागतं पण इलाज नाही.
पण परवा गौरी सातव आली. आधी ती फारशी आवडायची नाही पण पडेल ते काम करते. रोजंचं भाषण ऎकून आता तिच्यात बरेच बदल झालेत. परवा म्हणाली की आपण सगळे सारखेच. इथल्या माणसांना पळवुन लावु. मग आपल्याला आपली ओळख लपवायची गरज नाही. सर्वत्र माकडंच माकडं, गोरी माकडं, काळी माकडं, दुबळी आणि शक्तीवान माकडं, उंच माकडं, बुटकी माकडं. मी म्हटलं की उडी मारणार, मी म्हटलं की कोलांटी मारणार, मी हस म्हटलं की हसणार, मी रुस म्हटलं की रुसणार, मी म्हणेन तस्संच काम करणार. पण मग या माकडांना माणसं करतात ती सगळी कामं येतील? तेव्हा गौरीचं म्हणाली की इच्छा असली की झालं, रिक्रुटमेन्ट करायची झाली की नावाच्या चिठ्या उचलायच्या, पगार ठरवायचा झाला की जुगारात असतं, तसं चक्र फिरवायचं. गौरीचे विचकलेले दात तिच्या बुद्धीमत्तेसारखेच चमकुन गेले

॥गोष्ट॥
पिंकीचा हडेलहप्पीपणा टोकाला गेला तसं राजारामनं एम एफ़ एच सी एम सोडली. त्यानं श्रोतींनां तिथं चालु असलेला प्रकार सांगीतला. पण त्यांचा तेव्हा त्यावर विश्वास बसला नाही . मात्र हळु हळु जगभरातुन अश्याच अफवा वेगाने येताहेत. ही गोष्ट अजिबात काल्पनिक नाही. कुण्या मृत किंवा जिवंत व्यक्तीशी काही साम्य आढळण्याची दाट शक्यता राजारामनं वर्तवुन ठेवलीच आहे.

Sunday, January 29, 2012

आभासी विश्वाचे वास्तव

वेब २.० आलं आणि दुतर्फा संवादाच्या असंख्य शक्यता नव्याने जन्माला आल्या. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग इ. ही सारी वेब २.०ची अपत्ये. प्रत्येकाचा हेतु एकच-संवाद. संवाद या एका मुलभुत गरजेच्या किती म्हणून मिती असाव्यात याच्या साऱ्या कल्पनांना मोडीत काढत, या माध्यमांनी, नवनवीन आभासी विश्वांना जन्म दिलाय.
ब्लॉग बद्दल बोलायचं तर थोडसं नोंदवही/डायरी, असं रुप असलेलं, तुलनेनं अनाकर्षक असं हे माध्यम. आपण लिहीलेलं कुणी आणि का वाचावं या संभ्रमात असलेले ब्लॉगर्स (ब्लॉग-लेखक), शब्दांच्या महापुरात नेमकं काय आणि किती वाचावं याचा अंदाज घेऊ न शकणारे वाचक आणि (मुख्यतः) इंग्रजीतून संवादाचं बंधन यामुळे या माध्यमाचं भविष्य काय हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच युनिकोडच्या रुपानं प्रादेशिक भाषांमधे लिहीणाऱ्यांसाठी एक छोटीशी क्रांतीच झाली. युनिकोडमुळे कुठल्याही विशेष सॉफ्टवेअर्सच्या गरजांशिवाय मातृभाषेत लिहीण्याची सहजच सोय झाली. बघता बघता मराठीतही ब्लॉगर्सचा सुकाळ झाला. साहित्यीक, पाककलाविषयक, भविष्याबद्दल, तांत्रिक माहीती देणारे असे एक ना अनेक विविध विषयांवर मराठी ब्लॉग वेगाने उदयाला आले आणि बरेचसे वेगाने बंदही झाले.
याच सुमारास, ब्लॉगवरच्या साहित्यविषयक नोंदींचं संकलन करण्याच्या संकल्पनेला एक ठोस स्वरुप देण्यासाठी संवेद (http://samvedg.blogspot.com/), मेघना (http://meghanabhuskute.blogspot.com/), अ सेन मॅन (http://asanemanthinks.blogspot.com/) आणि ट्युलिप (http://tulipsintwilight.blogspot.com/) ही ब्लॉगर मंडळी एकत्र आली. या मंडळींनीं रेषेवरची अक्षरे (http://reshakshare.blogspot.com/) या नावाने २००८ मधे पहीला ब्लॉग-दिवाळी अंक काढला. या उपक्रमाचे सर्वात महत्वाचे नियम म्हणजे निवडलेल्या नोंदी साहित्य-प्रकारात मोडणाऱ्या असाव्यात आणि ठराविक कालावधीत प्रसिद्ध झालेल्या त्या सर्वोत्तम नोंदी असाव्यात. या साऱ्या प्रक्रियेत संपादक म्हणून आमच्यापुढे असंख्य अडचणी असतात. काही समान आवडींमुळे आम्ही चौघे एकत्र आलो आहोत पण ही ओळख इंटरनेटच्या आभासी विश्वाला साजेशीच आहे. आम्ही चौघे कधीही एकत्र भेटलेलो नाहीत. काही टोपणनावांखालच्या खऱ्या ओळखी सोडल्या तर अगदी चेहरेही सर्वथा अनोळखी! दिवाळीच्या काही महीने आधी आम्ही आमच्या वाईट्ट व्यावसाईक वेळापत्रकातून वेळ काढून, जगाच्या कोण कोपऱ्यातून रात्रीबेरात्री इंटरनेटच्या माध्यमातून भेटतो. सर्वसाधारणपणे १५०-२०० ब्लॉग आणि त्यावरच्या पाचसहाशे नोंदी आम्ही संपादकाचा चष्मा लावून चाळून काढतो. प्रत्येक संपादकानं निवडलेली प्रत्येक नोंद ही कशी सर्वोतम आहे हे इतर तीन संपादकांनां पटे पर्यंत प्रत्येक लेखाचा कीस पाडला जातो. आणि इतर बऱ्याच खटाटोपींनंतर रेषेवरची अक्षरेचा अंक प्रकाशित होतो.
आज गेली चार वर्ष सलग हा उपक्रम चालवल्यानंतर मागे वळून बघताना या उपद्व्यापामागच्या उर्जेचा शोध घेताना बरंच काही उमजत गेलं. रेषेवरची अक्षरे सुरु केलं तेव्हा ब्लॉगवरच्या काही सर्वोत्तम साहित्यिक नोंदींचं संकलन एव्हढाच ढोबळ उद्देश होता. पण या मागची व्यापकता कालांतराने उलगडली. ब्लॉग हा तसा बऱ्यापैकी हौशेचा मामला. आपापले व्यवसाय सांभाळत लिहीताना काळ-काम-वेग या त्रैरासुराच्या राज्यात लिखाणाचा कोंभ कधी कोमेजून गेला हे बऱ्याच चांगल्या ब्लॉगर्सनां समजलंही नाही. अनुभवांनां निव्वळ शब्दबद्ध करणं म्हणजे लिखाण नाही, गजलेचं वजन सांभाळल्यानं चांगली गजल बनत नाही, बेताल कविता म्हणजे मुक्तछंद नाही हे आणि असेच जुनेच अनुभव संपादक म्हणून आम्हाला नव्यानं आले. इंटरनेटच्या महाजालात चांगलं लिहीलेलं विरुन जायला वेळ लागत नाही हे ही लक्षात आलं. संपादकाची भुमिका थोडीशी गंभीर झाली. रेषेवरची अक्षरेचे चारही वर्षांचे अंक आम्ही संदर्भासाठी म्हणून एका जागी आणले. ब्लॉगरनां लिहीण्याची उर्मी सोडली तर कसलंच मोटीव्हेशन, फायदा नसतो. त्यांना लिहीतं ठेवण्यासाठी नोंदींचा खो खो असे काही उपक्रमही आम्ही केले. "मला मुळात लिहावं का वाटतं?" किंवा "मावशीबोलीतल्या कविता" हे काही समाधान देऊन गेलेले खो खो. एका ब्लॉगरनं लिहायचं आणि परिचित ब्लॉगरला याच विषयावर लिहीण्यासाठी खो द्यायचा असं काहीसं या खेळाचं स्वरुप. या वर्षी एक पायरी ओलांडून आम्ही "लैंगिकता आणि मी" या विषयावर रेषेवरची अक्षरेच्या अंकात मुक्तचिंतन ठेवलं होतं. त्याला लिहीणाऱ्यांचा आणि वाचणाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच विषयावर कथा, कविता, आत्मचिंतन अशा कित्येक प्रकारे ब्लॉगर प्रकट झाले.
ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही मराठी साहित्याला नवं वळणं द्यायचा प्रयत्न करतो असं म्हणणं फार धाडसाचं आहे. पण आमच्या ग्लोबल गावकरी असण्याने, विविध संस्कृतींना सामोरे जाण्याने, बहुभाषिक असण्याने मराठीत नवे संदर्भ येताहेत हे नक्की. कथांमधे चित्रकलेसारखे क्युबिझमचे प्रयोग केले जाताहेत. चित्रकलेला शब्दात रंगवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जागतिक संस्कृतीचे दुवे स्थानिक संदर्भात मिसळुन गंभीर कथा लेखन होत आहे. एकीकडे पारंपारिक वळणाच्या अलंकारीक कवितांना उजाळा मिळताना दिसतोय तर दुसरीकडे स्वतःला अंतर्बाह्य तपासणाऱ्या कविता मुक्तछंदातून प्रकट होताना दिसताहेत. पारंपारिक अर्थाने किंवा प्राध्यापकीय समिक्षा नसेल पण कविता: आधी, आता आणि पुढे? किंवा कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना असे अत्यंत गंभीरपणे केलेले लिखाण समिक्षेच्या आयामात आपल्या परिने भर घालत आहे.
ब्लॉग हे माध्यम आम्ही गंभीरपणे घेतोय. गरज आहे ती या प्रयत्नांना प्रोत्साहान देण्याची, मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाशी या नव्या दमणुक करणाऱ्या माध्यमाला एक समांतर प्रवाह म्हणून मान्यता देण्याची. विविध व्यवसाय, विविध देश, विविध भाषा आमच्या लिहीण्यावर, वाचण्यावर, विचारक्षमतेवर पूर्वी कधीच नव्हता एव्हढा प्रभाव टाकताहेत. त्यातून मिळणारे अनुभव काही प्रस्थापित चौकटी मोडणारेही असतील आणि काही नवनिर्माण करणारे असतील. या आभासी विश्वाचं खरं तर एव्हढंच वास्तव!

>>>> युनिक फीचर्स गेल्या वर्षीपासून ई-साहीत्यसंमेलन भरवतय. गेल्यावर्षी रत्नाकर मतकरी या संमेलनाचे अध्यक्ष होते तर या वर्षी ग्रेस. यंदाच्या अंकात ब्लॉग माध्यमात नक्की काय चाललय याचा धांडोळा घेण्याची संधी मला मिळाली. हा लेख मुळ स्वरुपात इथे उपलब्ध आहे. एका चांगल्या उपक्रमाचे आणि अजून महत्वाचे म्हणजे ब्लॉगवरच्या साहीत्यीक लिखाणाला गंभीरपणे घेतल्याबद्दल युनिक फीचर्सचे आणि शितलचे मनःपुर्वक आभार!