Monday, April 28, 2008

ऊन: ताजे संदर्भ


सुडाचं बेफाम संतप्त ऊन नव्हतं ते. उभे आडवे वार करुन संपून जातं असं ऊन सायंप्रहरी, आणि आईच्या पदराआड दमून, हमसुनहमसुन लपून जावं तसं ढगांआड मिटून जातं.

हे ऊन जरा निराळं; द्रौपदीच्या कुळातलं. इथे दिवस-रात्र सुडाची चक्रं फिरतील, आत्मनाशाच्या बोलीवर, पराभव पलटवले जातील पण युद्ध संपणार नाही. दिवसाचे प्रहर अस्ताला गेले तरी आग शमत नसते आणि द्रौपदीच्या अस्पर्श केसांसारखे किरण, निळ्या गडद शाईला आटवत राहातात. आकाशात दुरवर काही ही दिसत नसतं. फक्त एखादाच चुकार पक्षी पंखातलं बळ तुटण्याआधी घट्ट मनानं उडत असतो.

रस्त्यावर घम्मटगार, खारट, शांतता, त्याच्या एका टोकाला उगवलेलं बोन्साय क्षितीज, आणि डोळ्यांना उघड दिसणारी ऊन्हाची तरल लहर. मी मान फिरवत दमट डोळे मिटतो तर पापण्यांआड सुर्याचे किंचित वर्तमान.

"स्वतःपुरते सुटकेचे पुल तयारच ठेवावेत आपण" कारच्या बंद डबक्यात एसीचा नॉब पिळत मी कितीदाही हे ब्रम्हवाक्य उच्चारलं तरी मला लाज वाटणार नसते.

डोळ्यांवरच्या थंड काचांतुन सरावाचा बहावा दिसला नाही तसा मात्र मी चरकलो. पार त्याच्या झाडाखालीच जाऊन थांबलो तसा जुन्या ओळखीतुन घट्ट भेटला तो.

"जुना परिचय?" एक खेळकर प्रश्न. बहाव्याच्या वीतभर सावलीतदेखिल मावत होता तिचा देह. डोळ्यात नवथर तारुण्य आणि घालमेल. "हो" मी काही तरी बोललं पाहीजे या कृतज्ञ भावनेतुन संभाषण पुढे नेण्याच्या प्रयत्नात विचारतो "इतक्या ऊन्हाच्या तुम्ही इथे काय करताय?" "कच्च्या सुर्यात बहाव्याच्या झाडाखाली भेटायचं ठरलं होतं माझं आणि मैत्रिणीचं. किती तरी वेळ झाला पण अजून पत्ताच नाही" मला लबाड हसु फुटतं. एक गल्ली पलीकडे दुसरया बहाव्याच्या झाडाखाली कच्च्या सुर्यात अजून एकाला मी उभा पाहीलेलं असतं, वाट बघतं...

Thursday, April 24, 2008

इंजिनिअरींगचे दिवस

आमचं FE, TEचं हॉस्टेल तसं नवं होतं आणि कॉलेजपासून थोडंस लांबदेखील. SE, BEचं हॉस्टेल मात्र कॉलेजच्या आवारातच होतं. कॉलेज तसं फार मोठं नव्हतं. मुख्य बिल्डींग, ड्रॉईंगहॉल्स आणि लॅब्ज सारं C आकारात. C संपतो तिथे वर्कशॉप्स. हा झाला कॉलेजचा मुख्य भाग. वर्कशॉपच्या मागे ऍनेक्स बिल्डींग. आणि मुख्य Cच्या एका बाजुला एक नवी बिल्डींग जोडलेली आणि दुसरया बाजुला लायब्ररी आणि त्यावर ऑडीटोरीयम. सगळं एकदम शिस्तीत म्हणजे कसं की मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल मुख्य शाखा म्हणून त्या मुख्य बिल्डींग मधे म्हणजे C मधे. सिव्हील पण मुख्यच शाखा पण का कोण जाणे त्यांचे वर्ग सगळ्यात मागे ऍनेक्स बिल्डींग मधे भरायचे. कदाचित सिव्हीलची पोरं आणि बरयाच प्रमाणात पोरीही विविधगुणदर्शनात वाकबगार होते. उगाच कुणाला आल्या आल्या कॉलेजच्या कलागुणांचं प्रदर्शन नको म्हणून त्यांना वाळीत टाकलं असेल. कॉलेजची सारी फेसव्हॅल्यु मात्र त्या नव्या बिल्डींगमधे होती. ती बिल्डींग ईलेक्ट्रॉनिक्स आणि कंम्प्युटरच्या गुणी, शांत, सालस, सज्जन, अभ्यासु इ. इ. गुणांनी ठासून भरलेल्या शाम नावांच्या मुलांनी बहरलेली होती. त्यांच्या वर्गभगिनी सर्वसाधारण नाठाळ, खट्याळ, (वयोपरत्वे) सुंदर (तेव्हा तरी वाटायच्या!), ऎनवेळी अभ्यास करुनही क्लास मिळवण्याची अद्भुत कला अवगत असणारया जादुगारणी वगैरे वगैरे होत्या.

सर्व शाखांसाठी पहीलं वर्ष जनरल असतं, म्हणजे तोच अभ्यासक्रम. सर्वसाधारणपणे ड्रॉईंग, लॅब्ज आणि वर्कशॉप शारीरीकदृष्ट्या थोडे कठीण असतात. पण मग अचानकच कधी तरी दिव्या भारतीनं सुसाईड केली म्हणून बॉयलरवर तिचा फोटॊ चिकटवुन, त्याला हार घालून, रितसर श्रद्धांजली वाहीली आणि कॉमनऑफ घेतला असे रिलिफ असायचे. ड्रॉईंगच्यावेळी घोडा व्हायचा. म्हणजे उभ्या उभ्या झोप. वर्कशॉप म्हणजे पहील्या वर्षी चंगळ. खुरपं, स्टुल असले भणंग प्रकार बनवायला शिकवायचे. त्यात मि.मि. चे हिशोब. च्यायला, समजा तो स्टुल चांगला एक सेन्टीमिटरनं कमी जास्त झाला तर त्यावर बसणारा माणूस पडणार आहे का? आपण घरी सगळ्या सर्कसी करतोच की नाही? पण नाही. ते स्क्रॅप करा आणि नव्यानं बनवा. ते व्हर्निअर कॅलिपर आणि स्क्रुगेज नावाचे मंगळावरुन डायरेक्ट आयात केलेले प्रकार काही कुणाला झेपायचे नाहीत. मग कधी तरी दया येऊन एखादा कमी खडूस इनस्ट्र्क्टर (सर..सर..) पटकन तो जॉब बनवुन द्यायचा. ते स्टुल आणि खुरपी परवडली म्हणायला लावणारा स्मिथी नावाचा एक राक्षस होता. लोखंडाच्या दोन चिपा घ्यायच्या आणि त्याचा एक जॉब करावा लागायचा. हा जॉब कोणत्याही इंजिनिअरींग कॉलेज मधे कॉमन बरं का. त्या जॉबचं नाव मेल-फिमेल. नावाच्या बाबतीत एखाद्याची विनोदबुद्धी किती कारुण्यदायक असु शकते याचं वेगळं उदाहरण शोधून सापडणार नाही. या जॉबचा माझ्या बालमनावर इतका विपरीत परिणाम झाला की डा विन्सी कोड वाचताना जिथे जिथे स्त्री-पुरुष युनियनचे सिम्बलीक संदर्भ आले होते, मला तिथे तिथे हा मेल-फिमेल जॉबच दिसायचा. तर हा हाताला फोडं आणणारा जॉब २-३ रिजेक्ट नंतर परफेक्ट जमवुन निवांत बसलेल्या टोणग्याला नाजूक आवाजातली एखादी विनवणी आली की परत तिचा जॉब घासायला तयार होताना बघून, अजिबातच जॉब न जमलेले आमच्या सारखे काही जाम खुश व्हायचे.

कॉलेजचं एक आकर्षण होतं भव्य ऑडिटोरीयम. आमची ऍडमिशन प्रोसेस तिथेच झालेली त्यामुळे कॉलेजचा पाहीलेला पहिला भाग म्हणून त्या विषयी वेगळं ममत्व. गॅदरिंगचे दिवस आले की तिथे ऑडिशन्स, गाण्याच्या प्रॅक्टीसी यांना नुस्त उधाण यायचं. हिंदी गाणी खुप झाली म्हणून एक वर्ष ऎन दुपारी मराठी भावगीतांची स्पर्धा ठेवली. एका माठानं भेसुर आवाजात "अश्विनी ये नां" हे "भाव्गीत" म्हटल्यावर त्याला बिनतोड वन्समोअर देणं तर आपलं "पर्मकर्त्व्य" होतं.

कॅन्टीन नही देख्या तो क्या देख्या? चांगला सहा-सव्वासहा फुटाचा देखणा शेट्टी आण्णा चालवायचा आमचं कॅन्टीन. मैत्रिची असंख्य वर्तुळं असायची, रुममेट्स, वर्गमित्र, जीवापाड सख्खे मित्र, खोल आतल्या मैत्रिणी, सिनिअर्स, ज्युनिअर्स, सख्खे, चुलत, मावस मित्र-मैत्रिणी इ. इ.. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी कुणी न कुणी कॅन्टीन मधे पडीक असायचंच. आण्णाचे टेबल तुटेपर्यंत वाजवत बसलो तरी त्याचे ना नसायचे. कॅन्टीनमधे आम्ही गाण्याच्या प्रॅक्टीशी केल्या, पुस्तक वाचली, अभ्यास केला, नाचलो, हसलो, रडलो आणि जमलं तेव्हा तेव्हा खादाडीही केली. कॉलेज सोडताना स्क्रॅपबुकमधे आण्णाने फिलॉसॉफरच्या तोडीचा "संदेश" दिला होता. आम्ही दिलेलं छोटसं गिफ्ट घेताना आण्णाने "फिर मिलते है" चा वादा केला होता. बघु या कधी जमतो ते.

Sunday, April 20, 2008

हॉस्टेलचे दिवस

जून-जुलैत औरंगाबादेत मुक्काम हलवला तेव्हा असंख्य प्रश्न होते. सर्वात गहन प्रश्न होता हॉस्टेल झेपेल काय आणि तिथे काय काय होईल. तरी एक बरं होतं की बाकीचं कॉलेज अजून सुरु न झाल्यानं हिंडाफिरायला बरीच मोकळीक मिळणार होती. दोन-तीन दिवसात बरोब्बर आमची गॅन्ग बनली. सगळ्यांत मिळून ३ खोल्या होत्या पण मुख्य अड्डा आमची खोली. दिवसभर हिंडणे एकत्र आणि झोपायला आपापल्या खोलीत अशी न ठरवता वाटणी झालेली. नित्याची खोली आमच्या समोर आणि त्याचे रुपा (म्हणजे रुमपार्टनर) अजून आलेलेच नव्हते त्यामुळे तो एकटाच झोपायचा. सॅन्डी आणि पद्म्या एका खोलीत राहायचे. एके दिवशी अचानक नित्यानं सांगुन टाकलं की तो या पुढे आमच्या खोलीत झोपणार. त्याच्या खोलीत म्हणे कुणी तरी आधीच्या बॅचमधे सुसाईड केली होती, खिडकीला गळफास लावुन. जमिनी पासुन खिडकीची उंची ४-५ फुट! कुणी आत्महत्या करायची ठरवलीच तर पाय दुमडुन वगैरेच कराय लागेल. पण हॉस्टेलची अवस्था भयाण. पॅसेज मधे ट्युब नसायच्या कारण कुठलं तरी आत्रंगी कारटं ती ट्युब त्याच्या खोलीत लावायला घेऊन जायचा. आता अश्या अवस्थेत रात्री उठून बाथरुम पर्यंत जायचं म्हटलं तरी रस्त्यात नित्याची रुम लागायची आणि मग खिडकीत अपरिहार्य पणे लटकलेला कुणी तरी मागे मागे तरंगत यायचा. नेमकं त्याच वेळी अश्विनीनं ताजंच ऎकवलेलं आयेगा आयेगा आनेवाला आठवायचं. रात्री ही अवस्था तर सकाळी बाथरुम म्हणजे गाण्याचा आखाडा बनायचा. चक्रम पोट्ट्यांनी आतल्या सगळ्या कड्याच उखडुन टाकलेल्या. आंघोळ करताना गाणं म्हणणं कंपलसरी. नाही तर घुसलाच समजा कुणी तरी आत. मधल्या काळात पोरं अर्धा पाऊण तास आंघोळ करायला लागले, ताना वगैरे घेऊन. मग रहस्य कळालं की दरवाजा मागे सॅमंथा कोल्हटकरीण बाईंचा तो सुप्रसिद्ध फोटो कुणी तरी डकवला होता. दिवसाची अशी सुरेल सुरुवात फार थोड्यांच्या नशिबी असते. नित्या खोलीत राहायला आल्यावर आम्हा मुळ मालकांना पुढे काय होणार याचा अंदाज आलाच होता. आम्ही लावलेल्या "आलात आनंद, बसलात परमानंद, गेलात अत्यानंद" या पाटीला न जुमानता, एका शुभ दिवशी सॅन्डी आणि पद्म्यानेही त्यांचा मुक्काम आमच्या खोलीत हलवला. जगभरातले सगळे नमुने त्या खोलीत तेव्हा होते. अचानक एका रात्री सॅन्डीनं डिक्लेअर केलं की आमच्या खोलीतला पंखा भंगार आहे आणि तो बदलणं आवश्यक आहे. पुढची अमुल्य माहीती पद्म्यानं पुरवली आणि ऎन मध्यरात्री एका वापरात नसलेल्या रुममधे आम्ही घुसलो. आधी तिथला पंखा रिप्लेस केला मग आमचा पलंग पण कसा बकवास द्रोण आहे आणि तो लगे हात बदलणं आमच्या पाठीच्या आरोग्याच्या दृष्टीनं कसं आवश्यक आहे यावर सॅन्डीनं मध्यरात्री २-३ वाजता, इल्लिगली बंद खोलीत घुसलं असताना एक भलं मोठं लेक्चर दिलं. मर्फीचे नियम वाचले नंतर पण अनुभवले आधी. कधी नव्हे ते रेक्टर वर्मासर चक्कर मारायला हॉस्टेलमधे आलेले. दाराबाहेरची गॅन्ग बाहेरच्या बाहेर पसार, आम्ही दोघं-तिघं धुळभरल्या खोलीत श्वास रोखुन उभे आणि वाईट बातमी अशी होती की बंद दाराच्या तुटक्या फळीतुन आमचा अर्धा पलंग आत आणि अर्धा बाहेर होता! पण कदाचित वर्मासरही हॉस्टेलवर राहीलेले असावेत. सोयिस्कररित्या त्यांनी रस्ता बदलला आणि ते त्यांच्या क्वार्टरमधे परत गेले.

आम्ही इतपत सेटल झालो असतानाच सिनिअर्सचं कॉलेज सुरु झालं. आमचं हॉस्टेल म्हणजे FE, TE एकत्र आणि SE, BE एकत्र असं होतं. आमच्या बॅच पर्यंत कॉलेज रॅगिंग साठी प्रसिद्ध होतं. पण माज हा एक असा गुण आहे जो येईल ते शिंगावर घ्यायला शिकवतो. आणि तो आम्हा सर्वात ठासून भरलेला होता. आयुष्यातले दोन फंडे तेव्हा क्लिअर झाले. एक म्हणजे, अरे ला का रे केलं तर मुसांडी मारणारं रानडुक्कर पण गोंधळतं आणि दुसरं म्हणजे हिंमत दंडातल्या बेटकुळीच्या प्रपोर्शनमधेच असते असं काही नाही. आमच्या बॅचचं आणि आमच्या नंतरच्या बॅचंच त्यानंतर कधीच रॅगिंग, निदान शारीरीक रॅगिंग, तरी झालं नाही.

सिनिअर्सशी एकदा गुळपीठ जमल्यानंतर मस्तीला उधाण आलेलं. सिनिअर्सनी एक कल्चरल नाईट केलेली. ती आटोपुन आम्ही रात्री १-२ वाजता हॉस्टेलवर आलो तर हॉस्टेल बंद. हॉस्टेल १० वाजता बंद व्हायचं पण एरवी मामाशी गोड बोलून आम्ही आत घुसायचो. पण आज ७०% जनता बाहेर म्हटल्यावर मामा ही कसली रिस्क घ्यायला तयार नाही. मग काय, हॉस्टेलमधे असणारया पोरांनी खिडकीतून पांघरुण-उश्या फेकल्या आणि आम्ही हॉस्टेलच्या दारातच पथारी पसरल्या. वात्रटपणाची साथ पसरली आणि रेक्टर वर्मासरांच्या घरासमोर कल्चरल नाईट पार्ट २ सुरु झाला. बिचारे वर्मासर, नुक्तच लग्न झालं होतं त्यांचं!

नवी नवलाई म्हणे पर्यंत परिक्षेचे दिवस आले. हॉस्टेलनं जणु कात टाकली. अचानकच पोरं हातात मोठंमोठाली पुस्तकं घेऊन दिसायला लागली. कॅरिडोर्स सुन्न शांत आणि रात्री भक्क जाग्या. आमची तयारी काय काय ऑप्शनला टाकता येईल इथून सुरु आणि त्यात पवन्या एकदम हुश्यार होता. मागचे ५-६ पेपर बघून यावेळी इतकच करायचं असं त्यानं सांगीतलं की काय बिशाद होती त्याहुन वेगळं काही होण्याची. ऎन परिक्षेच्या आधी कुणीतरी सांगीतलं की परिक्षा लांबु शकते आणि ती बातमी मोहन सिनेमात आधी कळते. आता मोहन म्हणजे नावाप्रमाणेच! अफाट दर्जांचं टॉकीज आणि त्याहुन अफाट तिथले इंग्रजी सिनेमे. आमच्यातला जो सर्वात हुश्यार ढापण्या होता, त्याला सॅन्डीनं इतका घॊळला की त्याच्या सकट सगळे डर्टी डान्सिंग नावाच्या सिनेमाला यायला तयार झाले. कोणत्या भरोशावर माहीत नाही, पण सॅन्डीनं सगळ्यांना पटवलं होतं की जरी तो मोहनचा सिनेमा होता, जरी त्याला चांगलं ठळक A सर्टिफिकेट होतं तरी त्या सिनेमात 'तसलं' काही नसणार होतं (त्याच्या मते तो नृत्यकलेवर आधारीत एक सिनेमा होता) आणि मोहनला जाण्यामागे एकमेव हेतु म्हणजे परिक्षेची बातमी काढणे. अंधारात कुणाचेच चेहरे दिसत नव्हते या समाधानात सगळे सिनेमा बघत असतानाच कुणीतरी आरोळी ठोकली की अमुक दिवसांनी परिक्षा लांबली. बुडत्याला काडीचा आधार. अभ्यासाचे वेळापत्रक तेव्हढ्या आरोळीच्या भरवशावर परत आखलं आणि अभ्यासाला लागलो. आरोळी ठोकणारा विद्यापिठातला कारकुन होता की काय माहीत नाही कारण २-३ दिवसांतच परिक्षा लांबल्याची अधिकृत बातमी आली.

फर्स्ट इन्जिनिअरिंगची पहीली परिक्षा देऊन हॉस्टेलचा आम्ही काही काळापुरता निरोप घेतला.

Monday, April 14, 2008

Portrait of a poet

It doesn't belong to a day
It doesn't belong to a night
Hold on my dear, how can you select an evening for a dialogue? It belongs to poetry alone.

मिथकांचे जादुई प्रयोग करुनही मी कविता होणार नसतो.

प्रल्हादाचा बाप आठवतो मला; ऎन संध्याकाळी आतून उसवलेला, जणु सदेह कविताच! हसण्या न ह्सण्याच्या भ्रमात असतानाच कविता सामोरी येऊन उभी ठाकली. "मुळ मायेला विसरलास?" तिच्या स्वरात कधीच कसला भाव नसतो. "एक करार होता आपल्या दोघांत; ते आतलं जंगल वाचण्याचा" टाळ्यांच्या आवाजात माझं गात्र न गात्र बधीर झालेलं असतं तेव्हा आवाज कसे ऎकु येणार प्रिय? "सैतानाला आत्मा विकणारया माणसाची गोष्ट ऎकली आहेस तू?" मी ही निष्ठुरपणे बोललो. काळ्या फळ्यावर खडूचा कधीमधी चर्र्र असा सहन न होणारा आवाज होतो. मला उगाच आठवलं. नजरबंदीचा खेळ खलास झाला तेव्हा थकल्यासारखे आम्ही शांत बसलो आपल्या आपल्यातच. तिच्या संयमी, शांत चेहरयात संध्याकाळ विरघळत होती. "कन्फेशन्स!" चेहरे ओरबाडुन काढत मी हत्यार खाली टाकलं. प्रश्नचिन्हांचं गाठोडं तिनं उचकलं आणि एक जीर्ण प्रश्न माझ्या ओंजळीत ठेवून ती निघती झाली "कसल्याच खाणाखुणा नसलेल्या स्वगतागत सपाट पसरले आहे मी तुझ्या आयुष्यावर. जिथे तुला अर्थ सापडले, तिथे तू विरामचिन्हे पेरत गेलास, पुरुषासारखा. पण मग तुझ्या आत्मकेंद्रीत कथांच्या ऎन कविता होतानाच त्यांना स्त्रीत्वाचं रुपक का लाभतं?"

हा आरोप की आत्मवंचना की आणखी काही? मला अपरिहार्यपणे कवितेचं एक कडवं आठवतं

वास्तव परिमाणात मोजली जातात नाती
देवी, तुझ्या अनुग्रहानेच झाले हे दिव्य ज्ञान
तू वास्तवाच्या स्पर्शाचा दाहक झल्लोळ
कल्लोळ नंतर केंद्रात
देवी, कुठे फेडशील हे पाप?
मी कवी होणे हे विधीलिखीत असेलही
पण तू झालीस निमित्तमात्र

आता कवितेचं मुळ शोधणं आलं. स्त्रीसुक्ताचं असणं इतकं का अपरिहार्य आहे कवितेत? तिच्या निर्मितीक्षमतेशी कुठे नाळ जोडली गेली असेल कवितेची? की जनुकातुन आलेल्या गुणसुत्रांप्रती आपुलकी दाखवण्याचा एक किंचितसा प्रयत्न? हुसेनची बॅकलेस गजगामिनी आठवते अश्यावेळी. पंढरपुरच्या वाळवंटात हरवलेली आई शोधत भरकटणारया त्याच्या रेषा थबकल्या थेट स्टुडिओतल्या एका दिपशिखेपाशी. शांतारामबापुंचा तो कवी, नाव आठवत नाही त्याचं मला, त्याच्या कजाग बायकोत कविता शोधतो तेव्हा निर्मितीप्रक्रियेची कोणती गणितं मांडत असतो तो?

नर-मादी या मुळ, शाश्वत नात्याला जोखणारया असंख्य कलाकृती आहेतच पण केवळ त्या धुंदीत व्हिन्सीनं नटवीला कान कापून दिला असेल? बदलणारया हरेक मौसमातील रहस्य अस्वस्थ आत्म्याच्या तळाशी बाळगणारी ऋतुमती कुळामुळाच्या पार पल्याड उभी असते. तिची रहस्यं लिपीबद्ध करणं एव्ह्ढच तर ठरवलं होतं त्यानं. पार विस्कटून टाकलेला रुबिकक्युब रंगसंगतींच्या कित्येक शक्यता दाखवतो, तसं स्त्रीसुक्ताचं असणं रंग-अक्षरांच्या खेळात.

अनेक शक्याशक्यता तर्काच्या बोलीवर पारखुन पाहात असतानाच कविता पाठी मागे वळली "प्रश्नाला उत्तराची जोड दिली की प्रश्न संपतात असंच जरुरी नाही. सारी कोडी सोडवशील तर उभ्या ठाकलेल्या असंख्य उत्तरांच काय करावं हा अजूनच गहीरा प्रश्न निर्माण होईल. Let the riddle be riddle, Dear"