Tuesday, December 9, 2014

#सेन्स: गंध

माणसाचं शरीर हा इंजिनिअरींगचा अजब नमुना आहे. इतकं गुंतागुंतीचं, ईंटीग्रेटेड आणि कमालीचं सिंक्रोनायजेशन असणारं यंत्र अजून तरी माणसाला (बहुदा) बनवता आलेलं नाही. ज..रा हे यंत्र ऍस्थेटिकली मजेदार आहे. आपण स्वतःच जन्माला माणूस म्हणून आल्याने आणि आजुबाजुला माणसांचीच गर्दी पाहून, सवयीने कदाचित ही ऍस्थेटीक गंमत आपल्याला कळतच नाही. म्हणजे बघा नां, माणसाचे हात कसे खुंटाळ्याला टांगलेल्या बेंगरुळ नेहरुशर्ट सारखे लटकत असतात किंवा अचानक मुळं फुटावित तसे कंबरेपासून उगवलेले पाय किंवा चेहऱ्यावर बाहेरुन डकवलेलं नाक नावाचा ३D अवयव! बरं या प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट वेगळाच. या नाकाचेच तरी प्रकार किती; सरळसोट, नकटं, आपरं, फताडं, फेंदारलेलं, चोचीसारखं, पोपटासारखं इ इ. उपयोग? दोनंच... श्वासोश्वास आणि वास घेणं...श्वासोश्वासात फारशी गंमत नाही...तो चालु आहे तोपर्यंत यंत्रवत चालूच राहातो, जाणवतही नाही आणि थांबतो त्यानंतरही जाणवत नाही! वासाचं मात्र तसं नाही. चकलीच्या खमंग वासाने जिव्हा खवळते तर पहील्या पावसाच्या वासाने, खरं तर मृद्गंधाने, चित्तवृत्ती बहरुन येतात, फिनाईलच्या वासाला हॉस्पिटलच्या गंभीरतेची साथ असते तर आजीच्या नऊवारच्या जुनाट वासाला एक स्निग्ध ऊब असते. वासाचं सुगंध आणि दुर्गंध असं वर्गीकरण म्हणजे फारंच बाळबोध झालं. बरं याला काही नियमही नाही. कुत्र्याचा मालक जसा सांगत असतो की आमच्या कुत्रा कधी चावत नाही तसं मासे खाणाऱ्याला माश्य़ांचा वास कधीच येत नाही. मात्र माश्यांच्या वासाने (दुर्गंध म्हटल्यास माझ्या जीवावर कोणकोण उठेल याची यादी अंमळ मोठी आहे) मुळापासून हादरलेली काही मंडळी माझ्या पाहाण्यात आहेत. छाती भरुन नव्या पुस्तकांचा वास घेणारी खुपशी आनंदी मंडळी माझ्या मित्र परिवारात आहेत आणि त्यांच्या वासाने फटाफटा शिंकणारे शाईशत्रुही आहेतच. गंध म्हटलं की अजून काय आठवतं? माझ्या आठवणींना शिस्त नाही आणि म्हणून कोणता क्रमही नाही. प्रचंड बाबापुत्यानंतर मी गहु दळून आणायला गिरणीला जायचो, अत्यंत रटाळ काम पण एकदा तिथे पोचलं की गंमत वाटायची. धुकं पसरावं तसं गिरणीभर शुभ्र कण पसरलेले, एकदा धोपटला तर निदान चार लोकांचं एकवेळचं जेवण होईल इतकं पीठं नखशिखांत मिरवणारा गिरणीवाला काका. आणि पीठाचा तो सरमिसळ गंध. एक अदृष्य लक्ष्मणरेषा असायची. ती ओलांडली तर खोकणा ठरलेला. 

वाढत्या वयानुसार छोट्या गोष्टींमधली गंमत आटत चालली तसे गंधांचे परिमाणही बदलत गेले. पण आजही गंध म्हटलं की आपसुक फुलंच का आठवावीत? फुलांच्या वंशसुक्ताचे आरोह-अवरोहच मुळी सुगंधाने रेखलेले असतात. निसर्गात कुणी लाडके, कुणी दोडके असले तरीही फुलांवर "त्याचे" विलक्षण प्रेम असणार. कुणाला रंग, कुणाला गंध, कुणाला आकार तर कुणाला  अजून काही.... माणसासारखीच झाडे काही घरांमध्येच रमतात म्हणे. लहानपणी जी झाडे घरी रमली त्यातली सगळी तथाकथित बेरंग सदरात मोडणारी. पारिजात, मोगरा, कुंदा, निशीगंध, जाई-जुई....सगळी शुभ्र पण एखादं फुलही हुंगावं तर त्यांचा बहर नकळत आपल्या आत रुजत जातो. पारिजातकाचा गंध त्याच्या देठासारखाच, केशरी, किंचित विरक्तीकडे झुकणारा. सकाळी अंगणभर पारिजातकाचा सडा पडला की बाकी फारसे लाड न होणाऱ्या देवांचे घर गंधगार होऊन जायचे. निशीगंधाचं तसं नाही. त्या फुलाला एक आब आहे. रुपडं साजूक, एखादा सुंदर सिंड्रेला गाऊन घालावा तसं अगदी देठापर्यंत आलेलं पाकळीचं टोक आणि त्या शुभ्र रंगात अलगद मिसळुन जाणारं फिकट हिरव देठ. त्याचा सुवास हा खानदानी श्रीमंती सारखा पुरुन उरणारा, किंचित मादक, विलासी. एक छडी आणावी तर चांदण्या लगडुन याव्यात तशी फुलं लहडलेली. पण म्हणून उन्मुक्तपणे गंध नाही उधळायची ती. आदबीनं जवळच्या वर्तुळात प्रवेश कराल तर मधूर मंद मार्दवशील गंध येईल त्या फुलांचा. रातराणीचं तसं नाही. चिमुटभर चांदणचुरा वागवत एखाद्या धीट चिंधी सारखी शारीर भिडते ती. त्यात स्वतःला उधळुन टाकायची कोण घाई. या गारुडाच्या जवळून जाल तर आयुष्यभर नजरबंदीत राहायची तयारी हवी. मोगऱ्यां जरा अधलं मधलं. त्याला निशीगंधाचं खानदानी तेज नाही आणि रातराणीचं ओसंडून वाहाणं नाही. मोगरा म्हणजे जरासा सरगम मधल्या म सारखा, शुद्ध आणि तीव्र, दोन्ही डगरींवर पाय असणारं फुल. निशीगंधासारखाच मंद सुवास पण जरासा सैलसर, कमी टोकदार, किंचित विरळ. गंध उधळुन देण्याची रित रातराणीसारखी बेभान नव्हे आणि निशिगंधासारखी पोक्तही नव्हे, मोजकीच आटोपशीर. एक फुल पाण्यात टाकले तर पाण्याच्या अणुरेणुला गंधीत करुन टाकते.

फुलांच्या कौतुकाला आकाश पुरं पडत नाही. थबकण्याला एक विरामचिन्हाचं निमित्त हवं असतं इतकंच.