Wednesday, March 26, 2008

ऋतुसंभवलहानपणी मोठ्ठेच प्रश्न पडायचे.
निबंध यायचा "माझा आवडता ऋतु". नक्की वसंत, शिशिराबद्दल लिहायचे की हिवाळा, पावसाळा या बद्दल लिहायचे हे ठरे पर्यंत पेनचं नीब वाळून जायचं. असं वाटायचं की सध्याचा जो ऋतु आहे त्या पेक्षा नेहमीच दुसरा कोणताही ऋतु चांगलाच असणार. पावसाळ्यात पाऊस पडून सगळा राडा होणार, हिवाळ्यात ऎन थंडीत खाकी चड्डी घालून सकाळी सकाळी शाळेत जावं लागणार आणि उन्हाळा म्हणजे तर सगळी कडे कहर नुस्ता.

पण मग ऋतुंना नवे गंध, रंग, चव आणि स्पर्शही फुटले.

धम्म पिवळा आंबा आणि डझनांनी पुस्तकं घरी आली की ओळखायचं उन्हाळा आला. मोगरयाचं फुल टाकलेलं माठातलं डोहगार सुगंधी पाणी, कधी फ्रीज मधलं कॉनसन्ट्रेटेड रसना डायरेक्ट प्यायची लहर, वेलची टाकलेलं पन्हं आणि कैरीची वाटलेली डाळ... कुणाची बिशाद आहे उन्हाळ्याला वाईट म्हणण्याची!

ऎन पावसाळ्यात तासंतास पन्हाळीचं पाणी ओंजळीत जमा करत खिडकीत डोकं टेकवुन डोळे कधी स्वप्नांनी तर कधी पाण्याने भरण्याचे ही काही ऋतु होतेच कधी. गवताच्या पात्यावर टेकलेला एखादाच चुकार थेंब टिपलाच नाही तर मोती बनेल याची खात्री देणारा रंगबावरा ओला ऋतु. छत्री, रेनकोट न उघडताच रस्त्यावरुन रमतगमत गाणी गुणगुणण्याचे योग वसतीला यायचे कधी.

धुक्यातुन सायकल हाकत हिवाळा यायचा. लुनावाला मित्र उदारपणे खांदा द्यायचा. त्याला पकडून सायकलवर मांडी घालून सुखेनैव प्रवास व्हायचा. ट्युशन संपली की विझत आलेल्या शेकोटी शेजारी बसून कटींग टाकली की हिवाळा हळुच टपली मारायचा. खो-खो खेळताना खरचटलेला गुडघा कधीमधी कुरकुरायचा. वर्गातल्या कधीच न बोलणारया मुली कौतुकाने त्या लंगडीकडे बघून हसल्या की आपणच वर्ग जिंकुन दिल्यागत हिवाळा डोळा बारीक करुन गाल्यातल्या गालात हसायचा...वात्रटपणे!

मग पाऊस ही बदलला.. कधी कुमारांच्या स्वरातुन झिरपायचा तर कधी बरखा ऋतु आयी म्हणत किशोरीच्या इम्मॉर्टल स्वरात भिजायचा. मेघा झर झर बरसत रे म्हणणारया दृष्टीतल्या डिम्पलच्या दुर्बोध डोळ्यात पाऊस नुक्ताच दचकवुन गेलेला. कविता लिहीणारा पाऊस, कविता उसवणारा पाऊस, पावसाच्या कविता आणि पावसातही होड्या होऊन तरंगणारया कविताच. पाऊस चविष्टही. ओवा घातलेली गरमागरम खेकडा भजी, कोवळ्या कणसाचा अगम्य नावाला न जागणारा चवदार फजिता आणि मंद दरवळणारी कॉफी. पोराचा हात धरुन पहीला पाऊस अंगणात नाचत येतो तेव्हा सावित्रीचा मोर सोबत सोबतच असतो.

सिनेमातल्या ऋषीकपुरप्रमाणे देखणा तरुण हिवाळा ढिगभर स्वेटर घालायला लागला. "अंग से मेरे अंग लगा तू ऎसै, आज तू भी बोल मेरे गले से" एका झुळुकीचे निमित्तही पुरते दोघांना एका शालीत गुरफटुन धुक्याचे सैलसर पदर संथ दुपारभर पसरवायला. हिवाळा घुक्कट गुलाबी...हिवाळा म्हणजे शॉवर मधून पडणारे अनंत पाणी, हिवाळा म्हणजे महंमदासारखा लहरी जॉग, हिवाळा म्हणजे अजूनही पौष्टीक खावु आवश्यक आहे असे समजुन केलेले कॅलरीबहाद्दर डबाभर लाडु.

उन्हाळा तसा संतप्तच. बघावं तिकडं प्रकाशाचं थैमान. गॉगलच्या रंगीत काचेतुन आपल्यापुरता सौम्य करता येतो तो पण तरीही उग्रच. पण मग गंमत सुरु होते. एका झाडाला गाणं सुचतं, रंगांचं आणि बघता बघता बरीच झाडे कोरस मधे गावु लागतात. रंगांचं गाणं म्हणता म्हणता झाडं इतकी गुंग होतात की झाडांचेच रंग होतात. बहावा सदेह बुद्ध होतो. नाजूक पिवळे पावुस-बिंदु डोळ्यात मावत नसतात पण बहाव्याचं फुलण काही संपत नाही. धिप्पाड शरीराला न शोभणारी फिक्कुट गुलाबी फुलं वागवत शिरीष येतो. त्याचं गाणं तर सुगंधीही. हात लावला तर फुल विस्कटेल अशी भिती वाटत असतानाच वारयाच्या एका लहरीवर रात फुलों की बात फुलों की म्हणत फुलांचाच अभिषेक घडवतो शिरीष. डोळाभर रंग पसरावेत आणि तरीही संपु नये असं झाडांचं गाणं.

तुझ्या पापण्यांच्या टोकांवर
ऋतुंनी अलगद डोके टेकविले आहे प्रिय
जरा जपून उघडशील-मिटशील तुझे डोळे तर
ऋतुंचे सारेच संभव तुला भेटतील

आणि मलाही

Friday, March 21, 2008

Photos..again

एका जुन्या पोस्ट मधे नव्या कॅमेराबद्दल लिहिलं होतं. बरेच फोटॊ काढून झाले. एका छोटी झलक..
मु.पो. मुरुड जंजीरा


Saturday, March 15, 2008

"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?"

"लिखाणामागच्या प्रेरणा आणि चौकटी"

मेघनाने दिलेला खो स्विकारुन ही खेळ मी पुढे चालु ठेवत आहे.

कोणत्याही कलेमागच्या प्रेरणा या काही मुलभुत मुद्यांभोवती फिरत असतात. त्या मुद्यांना हात घालण्याआधी या लिखाणाच्या आणि त्याच्या अनुषंगाने येणारया कलांच्या उल्लेखाच्या सीमा रेषा स्पष्ट केलेल्या बरया. आदी कला म्हणून ज्यांचा उलेख्ख करता येईल अश्या तीनच कला; चित्र, नृत्य आणि संगीत. कोणत्याही पुरातन संस्कृतीचा अभ्यास केला तरीही परत परत हेच सत्य अधोरेखित होत राहाते. आदी मानवाने त्याच्या भाव-भावनांना वाट करुन देण्यास अत्यंत मुल स्वरुपात या कलांचा वापर सुरु केला. आणि त्या नंतर भाषा आली. भाषेचे महत्व केवळ संभाषणाचे साधन एव्हढेच न राहाता विविध आदी कलांचे "प्रोसेसायझिंग" करणे असे ही आहे. कुणी चित्रकार चित्र काढतो म्हणजे त्याच्या मनातील मुर्त-अमुर्त विचारांना तो चित्रातुन व्यक्त करतो किंवा कुणी मृदुंगावर तडधमची थाप देतो, त्यामागे एक विचारप्रक्रिया असते. माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीनंतर चित्र, संगीत आणि नृत्य या केवळ संवादा पुरत्या मर्यादित न राहाता अभिजात कलांमधे परावर्तित झाल्या आणि सर्वसामान्य माणसाचे या कलांशी नाते तुटले. भाषेचे महत्व आणि सामर्थ्य हेच, की ती एकाच वेळी सामान्यजनांचे संवाद साधण्याचे माध्यम असते आणि कलावंताचे अदभुत विश्व लिपीबद्ध करण्याचे साधनही. जेव्हा भाषा कलांचे "प्रोसेसायझिंग" करते असे मी म्हणतो, तेव्हा विविध कलामाध्यमांचे हेच लिपीकरण मला अपेक्षित असते (उदा. कुमारांचे सांगितिक विचार शब्दबद्ध करणारे "मुक्काम पोस्ट वाशी" हे पुस्तक) . म्हणूनच, या पोस्टचा आवाका मी लेखन/शब्द/भाषा एवढ्यापुरता ठेवणार आहे. अर्थात या सीमांचे बंध लवचिक आणि भासमान असल्याकारणाने जेव्हा गरज असेल तेव्हा मी जरुरीचे संदर्भ उधारीने घेईनच.

अनुभवांचे सादरीकरण म्हणजे लिखाण नव्हे. आपल्या अनुभवांना वैश्विक करण्याच्या प्रतिक्रियेत त्यांचे सुलभिकरण, विलगीकरण, छ्टांच्या प्रतिवारी करणे आणि जरुर असेल तेव्हा मोडतोडही करणे, ही लेखनप्रक्रियेची बहुदा पहिली पायरी असावी. अनुभवांचे हे वैश्विकरण आवश्यक आहे अन्यथा भाषेचे कलेत रुपांतर होणे ही मोठी कठीण गोष्ट. एकदा हे वैश्विकरण मान्य केले की येणारे बहुतेक सारे अनुभव एका विशिष्ट चष्म्यातुन पाहाण्याची सवय लेखक/कवींना लागत राहाते. उदा. जी.ए. किंवा ग्रेसचे लिखाण. रुढ अर्थाने नव्हे पण एका विशिष्ट मानसिक स्तरावर अनुभवांचे पोत तपासले जातात. जशी त्या लेखक/कवीची जातकुळी तसे अनुभवांचे पोतानुसार स्विकारणे वा नाकारणे गणितीय पध्दतीने म्हणावे इतपत यांत्रिक पणे होत राहाते. लिखाणाची उर्मी, प्रतिभेचे झटके हे त्या अनुभवांच्या तीव्रतेवर जसे अवलंबुन असतात तसेच ते त्या अनुभवांना काळाच्या कसोटीवर तोलणारया काही प्रसंगांवरही अवलंबुन असतात. काही अनुभव काळ, अवकाश या संकल्पनांच्या पल्याडही असु शकतात. वीस वर्षांपुर्वीचा एखादा प्रसंग कोड्यातील एखाद्या तुकड्याप्रमाणे आजच्या एखाद्या अनुभवाच्या तुकड्याशी निरलसपणे बिलगुन एक अखंड अनुभव-साखळी निर्माण करु शकतो. अनुभवांना सामोरे जाण्याचे कसब ज्याला जमते त्याला ते शब्दबद्ध करण्याचे वरही असतिल तर रसिकतेची पायरी ओलांडून तो कलावंताच्या पदाला पोचु शकतो.

खरी गंमत इथून सुरु होते. आपणच उभ्या केलेल्या रेखीव चौकटी कधी इतक्या जवळ येऊन उभ्या ठाकतात की पल्याडचे काही दिसुच नये. काही लेखक/कवींच्या बाबतीत या चौकटीच्याच बंदिस्त शवपेट्या झाल्या. अनुभवांना चाळणी लावता लावता नवे अनुभव शोषण्याची शक्तीच नाहीशी होत जाणे हे एका अर्थाने कलावंताचे मरणच. "शैली" असे गोंडस नाव दिले तरीही वास्तव तेच! असंख्य उदाहरणे आहेत आपल्याभोवती. परंपरांचे जिथे अवडंबर माजवले जाते त्या संगीत क्षेत्रात शैलीला नाकारणारे कुमार म्हणूनच ग्रेट ठरतात. शैली ठरते आहे हे लक्षात येताच क्युबिझमला रामराम ठोकून स्वतःच्याच प्रतिभेच्या विरोधात बंड करणारा पिकासो म्हणूनच काळाच्या कसोटीवर खरा ठरतो.

शब्दांच्या बाबतीत मोठा धोका हाच आहे की ते सर्वांच्याच परिचयाचे असतात. रोजच्या सरावाने त्यांच्या छटा जून झालेल्या असतात आणि अर्थ असंवेदनशील. नव्या शब्दनिर्मितीत शब्दबंबाळ होण्याच्या अजागळ शक्यता जपत जपत अर्थांना नेमक्या शब्दांना भेटवणे हे मोठे जिकीरीचे काम. शब्दांची प्रतीरुपे म्हटले तर अर्थाभोवती कोंदणागत बसतात आणि किंचितही फसले तर कृत्रिमही वाटू शकतात.

इतकी सारी सर्कस सांभाळीत लिहीण्याचे मनःपुत सोस तरीही का? पैसा आणि प्रसिद्धी ही सर्वमान्य कारणे दूर ठेवूनच या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. सगळेच लिहीतात म्हणून मी ही लिहीतो पासून सांगीतलेच नाही तर गुदमरुन जाईन इतपत टोकाच्या प्रतिक्रिया ऎकायला मिळतील असा हा दांडगा प्रश्न. कोडी घातल्यागत कविता लिहीताना नेमके काय साधायचे असते मला? बाटलीबंद संदेश ऎन समुद्रात भिरकावण्याचे समाधान? की तुम्हालाच ती बाटली मिळेल आणि तो संदेश तुम्ही डीकोड कराल याचे भय? दोन टोकांवर झुलत मी अनिश्चितकाल वावरत असतो. ती अनिश्चितता, तो संदिग्धपणा, अनुभवांच्या ओझ्यांखालुन उतरण्याची ती लगबग आणि नव्या अनुभवांची अपरंपार वाट.. सारेच लिखाणामागचे आदीम स्त्रोत.

एकाने एकालाच खो देण्याचा नियम जडपणे पाळत पुढचा खो मी फक्त ट्युलिपला देतो आहे.

Tuesday, March 11, 2008

रावणाप्पा

वेगळ्याच संदर्भात मला आज जुनी कविता आठवते

"स्विकाराचा वा नकाराचा पर्याय नसावा
तशी गुणसुत्रातुन आपसुक वाहात आलेली नाती.. "

किंवा असचं काहीसं लिहीलेलं कधी काळी.

मला लख्खकन रावणाप्पा आठवतो. नावात काही नसतं पण ओळखी दडवल्या की खपलीखालच्या काही जुन्या जखमा बिनचेहरयाच्या वाटु शकतात म्हणून ही धडपड. एक शक्यता, दुसरं काय? रावणाप्पाच्या गोष्टीला कन्फेशन म्हणुया? पाप कबुल करण्याला कन्फेशन म्हणतात. वास्तवमांडणीच्या अनुभुतीला काय म्हणतात? प्रश्नचिन्हांखालची टिंबे पुर्णविरामात बदलण्याआधी मला ही गोष्ट सांगायलाच हवी.

"रावणाप्पा, पाणी आणता का हो पटकन? पुजा खोळंबली आहे" वहिनींची हाक इतकी खणखणीत होती की त्या चौसपी वाड्यात किती तरी वेळ तो आवाज घुमत राहीला. मोठं शुन्य. सामंत पुजा सोडून तरातरा चालत निघाले. वाड्याच्या दहा-बारा खोल्या ओलांडुन येताना त्यांचा संताप वाढतच चालला होता. डोक्यावरचं माळवद करकरलं तसं छताचं तेलपाणी राहीलेलं आठवुन त्यांच्या संतापाचा पारा फुटण्याच्या बेतात आला. रावण कुठे असेल हे त्यांना नक्की माहित होतं. ते पडवीत आले तसा आडापाशी पाणी शेंदण्याच्या बादलीत काही तरी करताना पाठमोरा रावण त्यांना दिसला. हातातली चंदन उगाळण्याची सहाण दुसरया क्षणी रावणाच्या पाठीत बसली. त्या धक्क्याने रावणाच्या हातातले कासव धाडकन आडात पडले. रावणाला वाटले पुन्हा एकदा त्याची आईच त्या आडात पडली. माणसासारखी कासवं पाण्यात बुडून मरत नाहीत हे माहीत असुनही रावणाचा जीव कासावीस झाला.

असो. आता तुम्ही विचारल, सामंत कोण? मी कोण आणि कोण तो रावण? सामंत म्हणजे गावातील देशपांडे आणि रावण म्हणजे त्यांचा क्रमांक ५ किंवा ६ चा लहान भाऊ. रावणाचा नंबर फारसा महत्वाचा नाही जसा की आख्खा रावण. रावणाचं गाव महाराष्ट्र-आंध्र सीमेवर असल्यानं नावाचं फारसं कौतुक वगैरे नाही. सामंताची अवस्था सुंभ जळाला तरी..अशी होती. वडील गेल्यानंतर त्यांनी सारया भावांना सांभाळलं आणि कामं धंद्याला लावून दिलं होतं. रावण म्हणजे शेंडेफळ, आईवेगळा आणि शिक्षणात यथातथाच. त्यामुळे सामंतांच्या घरात हक्काचा नौकर झालेला. सामंतांचं घर आमच्या शेजारीच आणि रावण आमच्याहुन दोन चार वर्षं मोठा म्हणून आम्ही त्याला रावणाप्पा म्हणायचो झालं. आम्ही रावणाप्पा म्हणायचो म्हणून हळुहळु सारेच त्याला रावणाप्पा म्हणू लागले. त्याच्या आयुष्यातला तो बहुदा एकमेव सन्मान असावा.

काहीही केलं नाही म्हणून कुणासाठी वेळ थांबत नसतो. सामंतांनी रावणाप्पाचं एक गरीब पण नर्स म्हणून काम करणारया मुलीशी लग्न लावून दिलं. पोरगी चटपटीत होती, लग्नानंतर काहीच महिन्यात तिनं वेगळं घर भाड्याने घेतलं. कलणारया घरातल्या सावल्या जरा कमी झाल्या तसं सामंतांनी हुश्श केलं. सामंत वहिनींचा मात्र हातच मोडल्यागत झालं, काही दिवस. चुलीला घासलेलं मांजर कुठूनही घरी येतं तसा रावणाप्पा बायको दवाखान्यात गेली की परत वहिनींच्या दिमतीला येऊन बसु लागला. रावणाप्पाच्या बायकोने विविध प्रकारे त्याला कामाला लावायचे प्रयत्न केले पण घरबसव्या रावणाप्पाला कशाचच काही नव्हतं. भरीतभर म्हणून आता त्याला मुलगा हवा होता, वंशाचा दिवा म्हणून. "व्यायला काय? कुत्री मांजरपणं वितात. तुला काय धाड भरलीय?" रावणाप्पाचा मर्दपणा सीमापार झाला तसं त्या बिचारीनं मान तुकवली. बाईचं राबणं दिसत नसतं पण चांदणं पडतं म्हणे तिच्या गर्भार डोळ्यातुन. रावणाप्पा एका मुलाचा बाप झाला.

काही दिवस किंवा महिने समजु, गेले असतील. रावणाप्पा आजारी आजारीच असायचा. त्याच्या बायकोने सरकारी दवाखान्यात त्याला भरती केलं. केवड्याच्या पानासारखं पिवळं धम्म त्याचं शरीर पाहूनच डॉक्टरांनी कावीळीचं निदान केलं. रावणाप्पाच्या बायकोने तिला जमतिल आणि परवडतील तेव्हढे उपचार सुरु ठेवले. परिस्थिती खालावली तसं तिनं सामंतांना साकडं घातलं. रावणाप्पाला मोठ्या दवाखान्यात न्यायला हवं होतं. सामंतांची मुलगी त्याच वर्षी उजवली गेली होती. तंग हात अधिकच आखडला होता. सामंतांनी घरगुती वैद्यांचे उपचार सुरु केले. रावणाप्पाच्या पेंगुळलेल्या डोळ्यांत दिवसाही स्वप्नांनी हैदोस घालायला सुरुवात केली.

सामंतांच्या घरातील पडवी. पडवीतला शेवाळलेल्या काठांचा आड. आडातलं सदोदित काळं पाणी. रावणाप्पाचं स्वप्न रोज इथेच संपायचं. हळुहळु आडात आडवं पडलेलं कासव डोळ्यात तरळायला लागलं, त्याचं पांढरं शुभ्र पोट आणि त्यावर उमटलेली लाल फिकुटशी रेघ. काळ्या पाण्यात उमटलेले तरंग विरण्याच्या आत लाल रेघा काळ्या वर्तुळांभोवती फेर धरायच्या आणि तरंगांचे परीघ वाढतच जायचे. त्या दिवशी अघटित घडलं. स्वप्नातल्या कासवाची आई झाली. रावणाप्पा हलला. किती दिवस झाले होते त्याला आईला भेटून, तिच्या कुशीत दडून. त्याने हलकेच तिच्या बर्फगार खांद्यावर डोक ठेवलं आणि डोळे मिटले.

रावणाप्पाच्या जाण्यानंतरही त्याची बायको एकटीच राहायची. उगाच प्रवाद नकोत म्हणून सामंतांनी तिला घरी आणलं. रावणाप्पा गेला तेव्हा तिला दुसरयांदा दिवस होते. रावणाप्पा आजारी असल्यापासुनच तिच्या बद्दल गावात अफवा होत्या. अफवांनी सामंतांच्या घराचे दरवाजे ठोठावले तसं सामंतांनी रावणाप्पाच्या बायकोला घराबाहेर काढली. कसल्या साक्षी-कसले पुरावे. ऎन गर्भारपणात रावणाप्पाची बायको घराबाहेर पडली. घर सोडताना तिच्या डोळ्यात विश्वासघाताच्या खुणा ताज्याच होत्या.

काही वर्षं गेली आणि रावणाप्पाच्या बायकोचं गावातलं अस्तित्व नितळपणे पुसलं गेलं. काळाचे सुड मोठे विचित्र असतात. काहीच दिवसांनी सामंतांची मुलगी आणि तिचा काही वर्षांचा मुलगा घर सोडून सामंतांकडे कायमचे राहायला आले. गणितातल्या हिशोबांनी बेरीज-वजाबाक्या करुन सामंतांच्या घरात उत्तर तेच राहीलं फक्त मतितार्थ बदलले. सामंतांचा वाडा खचतच राहीला.

रावणाप्पासाठी रिल्केचे हे अवतरण

why is that I am always neighbor
to those lost ones who are forced to sing
and to say; Life is infinitely heavier
than the heaviness of all things

Wednesday, March 5, 2008

बडेबां

क्लासचा पहीलाच दिवस. राशिदला भेटलो. राशिद म्हणजे बडेबांचा मुलगा. बडेबांच्या दृष्टीनं तो त्यांचा एकटाच मुलगा होता. मुजाब, बडेबांचा मोठा मुलगा, त्यांच्या दृष्टीने असुर होता. ज्याला गाता येत नाही असा तो: असुर!. अर्थात मुजाबचा मुलगा, बडेबांचा नातु समर मात्र त्यांचा प्रचंड लाडका होता. पोरगा होता लहान पण बेट्याचा गळा म्हणजे मध होता नुस्ता. अर्थात ही सारी माहिती क्लास सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी मिळालेली. बडेबांकडे शिकायचं म्हणजे मार खायची तयारी ठेवायची एव्हढं गणित गाणं शिकु ईच्छिणारया प्रत्येकाला माहित होतं आणि तरीही त्यांच्याकडे गाणं शिकायला कायमच गर्दी असायची. कुठल्याच कोरया पाटीला ते क्लासमधे घ्यायचे नाहीत. किमान सुरात सरगम म्हणण्याइतपत शिक्षण झालं असेल तर त्या अर्धकच्च्यांच लोणचं राशिद घालायचा. राशिदनं साफ केलेले गळे पुढे बडेबां तासायचे. तर क्लासचा पहीलाच दिवस आणि "म्हणा" राशिदनं आदेश सोडला "काय येतं ते म्हणा." भुप! पर्यायच नाही. सर्वत्र शिकवला जाणारा पहीलाच राग म्हणजे भुप. घसा साफ केला, तंबोरयावरुन हात फिरवला आणि आरोह घेतले "सा रे ग प ध सा" डोळ्यासमोर किशोरीबाईंचा "सहेला रे" नाचत होता. "अरे आधी स्वर तरी नीट लावं" तिरसट जनानी आवाज आला. बडीमां, नक्कीच. त्या स्वतः गात नसल्या तरी बडेबांसोबत आयुष्य घालवुन त्यांचे कान अगदी तयार होते. मोठ्या धीराची बाई, जमदग्नी सोबत संसार करायचा तर डोक्यावर बर्फ आणि जीभेवर खडीसाखरच लागते हे त्या जिद्दी बाईला पुरेपुर माहीत असणार. मी उठून नमस्कार केला, नाव-गाव सांगितलं. गाण्याच्या क्ष परीक्षा झाल्या हे न विसरता सांगितलं तसं त्या गालातल्यागालात हसत म्हणाल्या "म्हणजे आधी तुझ्या मेंदुची आणि गळ्याची सफाई करणं आलं. बेसुरापेक्षा असुर परवडला रे बाबा" आणि त्या हसत उठून गेल्या. मुकाटपणे वास्तव मान्य केलं आणि सा लावण्यापासुन शिक्षणाला सुरुवात केली.
काही महिन्यात बडेबां समोर बसण्याइतपत प्रगती झाली तसं त्यांनी मला आणि समरला एकत्र शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या गाण्यात विलक्षण शिस्त होती. जरा कुठे चुकलं की कधी पाठीत गुद्दा पडायचा तर कधी कान तुटेपर्यंत ताणला जायचा आणि कदाचित माझ्यापेक्षा असले प्रसंग समर वर जास्त यायचे. बडेबां नेहमी सांगायचे "हिरा किती ही अमुल्य असला तरी त्यावर ढिगभर प्रक्रिया जोवर होत नाहीत, तोपर्यंत त्याची किंमत कोळश्याइतकीच असते." समर नुस्ताच हसायचा. त्याचं खरं प्रेम तबला होतं. विजेच्या वेगाने बोटं फिरायची बेट्याची पण बडेबांचा या बाबतीत सरळ नियम होता, तबला फक्त साथीला, दुय्यम आणि गाणं खरं. कधी त्या दोघांचे खटकेही उडत पण नंतर जसे वाद वाढायला लागले तश्या बडीमां तालमीला येऊन बसायला लागल्या. नवरयाची कला आणि नातवाचं प्रेम यात त्यांचं सॅन्डवीच होत चाललं होतं.

गंडाबंधनाचा दिवस जवळ येऊ लागला. गान परंपरेतील एक अत्यंत महत्वाचा दिवस आणि आम्ही त्या दिवसासाठी सतत रियाझ करीत होतो. समरचं तेव्हाही लक्ष नव्हतंच. मी समेवर यायला आणि त्याने त्रिताल पकडायला एकच गाठ पडली आणि आश्वासक समाधानाने आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. बडेबां खोलीत कधी आले आम्हाला कळालंच नाही. "सुनताही नही है सुवंरका बच्चा" गरागरा डोळे फिरवत बडेबांनी तबला लावण्याची हातोडी सपकन समरच्या लांबसडक बोटांवर मारली. समरचा आवाज ऎकुन बडीमां धावत आल्या तोपर्यंत तबल्याची शाई समरच्या रक्तात धुवुन निघाली होती. बडेबांनी त्यांची थोराड बोटे समरच्या डोळ्यांसमोर नाचवित निर्वाणीचा इशारा दिला "अब तू गायेगा, सिर्फ गायेगा"

गंडाबंधनाचा दिवस उजाडला. साग्रसंगीत गुरुपुजन झाल्यावर आम्ही एकेकजण गंडा बांधुन घेत होतो. सर्वात शेवटी समर गायला बसला. त्याचे सुर चाचपडत होते. असह्य झाल्यागत बडेबां उठले, स्टेजवर जाऊन त्यांनी लोकांना दंडवत घातला आणि अत्यंत क्रुरपणे समरच्या हातात घातलेला गंडा ओरबाडुन तोडला. "बडेबां, मी तुमचं गाणं टाकलं" समरच्या तोंडून तलवारीच्या धारेगत वाक्य बाहेर पडलं. जितक्या अनपेक्षितपणे हे घडलं तितक्याच वेगाने बडीमांनी समरचा हात धरुन त्याला स्टेजच्या मागे नेलं. स्वाभिमान चुरगळलेल्या अवस्थेत त्या दोघांनी कायमचं घर सोडलं.

काही वर्षें गेली. समर आणि बडीमां परत शहरात राहायला आलेत असं कळालं. त्यांना भेटायला जात होतो तर मन हलवणारं दृष्य दिसलं. समरचा रियाझ जिथे सुरु होता त्या खिडकी खाली बडेबां तल्लीन होऊन त्याचा तबला ऎकत होते. डोळे मिटलेले आणि त्यातुन निसटलेला एखादा बेबंद थेंब! मला पुढे जाववलं नाही. मात्र समरने कदाचित आम्हा दोघांनाही पाहीले असावे. काही महिन्यांनी त्याने मला बोलावले तेव्हा दृष्य जरा वेगळे होते. बडेबां अजुनही भिंतीला कान लावुन काही ऎकण्याचा प्रयत्न करीत होते पण माझ्या पर्यंत काहीच पोचत नव्हते. समरच्या समोर उभा ठाकलो तर त्याचा रियाझ सुरुच होता पण तबल्याचा आवाजच नाही. पाहीलं तर त्याने लाकडी तबला बनवुन घेतला होता. बोटं रक्तबंबाळ होती आणि डोळ्यात धग. त्याच्या बोटाच्या आघातांनी तबल्याचं लाकूड जागोजागी दबून गेलं होतं. हे कुठे तरी थांबायला हवं आणि ते मलाच थांबवायला हवं.

समरचा सोलो परफॉर्मन्स. सारं गावं जमा झालेलं. मी मोठी हिंमत बांधुन बडेबांना परस्पर आमंत्रण दिलं होतं. रांगेतील पहीलाच सोफा त्यांच्यासाठी राखुन ठेवला होता. दोन्हीपैकी कोण्याही बाजुने वीज कोसळली तरी कोळसा माझाच होणार हे जाणूनही मी हे उपद्व्याप केले होते. समरने स्टेजवर आल्याआल्या ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहीलं. सारे अपमान, सारं प्रेम, रक्ताचं नातं सारंच दाटून आलं होतं त्याच्या डोळ्यात. त्याने माईकवर जाहीर केलं "आजचा माझा परफॉर्मन्स माझे गुरु बडेबांच्या सेवेत" त्याचा हुंदका ऎकुन पडद्याआडून डोळे पुसत बडीमां पण आल्या. मी हाताला धरुन बडेबांना स्टेजवर नेलं आणि समरने एक अप्रतिम तुकडा वाजवुन त्यांचं स्वागत केलं. नंतर घडलं ते मोठं अजब होतं. बडेबां सरळ समरच्या पायाशी बसले आणि जमिनीला कान लावुन ते समरचा तबला ऎकु लागले. एक क्षण पुरला मला सगळा उलगडा होण्यास. बडेबांना सततच्या रियाझाने विशिष्ट प्रकारचा बहीरेपणा आला होता. त्यांना वरचे स्वर किंवा तबल्याच्या काही ठराविक मात्रा ऎकु येणं बंद झालं होतं. आणि म्हणूनच ते केवळ कंपनावरुन समरचा तबला ऎकत होते. बडेबांचं वृद्ध शरीर त्यांना ऎकुच न येणारया तालावर डोलत होतं. दूर आकाशात कबीर हसत होता
सुनता है गुरु ग्यानी..ग्यानी.. ग्यानी/ गगन में आवाज हो रही है झिनि झिनी ..झिनि झिनी