Tuesday, December 9, 2014

#सेन्स: गंध

माणसाचं शरीर हा इंजिनिअरींगचा अजब नमुना आहे. इतकं गुंतागुंतीचं, ईंटीग्रेटेड आणि कमालीचं सिंक्रोनायजेशन असणारं यंत्र अजून तरी माणसाला (बहुदा) बनवता आलेलं नाही. ज..रा हे यंत्र ऍस्थेटिकली मजेदार आहे. आपण स्वतःच जन्माला माणूस म्हणून आल्याने आणि आजुबाजुला माणसांचीच गर्दी पाहून, सवयीने कदाचित ही ऍस्थेटीक गंमत आपल्याला कळतच नाही. म्हणजे बघा नां, माणसाचे हात कसे खुंटाळ्याला टांगलेल्या बेंगरुळ नेहरुशर्ट सारखे लटकत असतात किंवा अचानक मुळं फुटावित तसे कंबरेपासून उगवलेले पाय किंवा चेहऱ्यावर बाहेरुन डकवलेलं नाक नावाचा ३D अवयव! बरं या प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट वेगळाच. या नाकाचेच तरी प्रकार किती; सरळसोट, नकटं, आपरं, फताडं, फेंदारलेलं, चोचीसारखं, पोपटासारखं इ इ. उपयोग? दोनंच... श्वासोश्वास आणि वास घेणं...श्वासोश्वासात फारशी गंमत नाही...तो चालु आहे तोपर्यंत यंत्रवत चालूच राहातो, जाणवतही नाही आणि थांबतो त्यानंतरही जाणवत नाही! वासाचं मात्र तसं नाही. चकलीच्या खमंग वासाने जिव्हा खवळते तर पहील्या पावसाच्या वासाने, खरं तर मृद्गंधाने, चित्तवृत्ती बहरुन येतात, फिनाईलच्या वासाला हॉस्पिटलच्या गंभीरतेची साथ असते तर आजीच्या नऊवारच्या जुनाट वासाला एक स्निग्ध ऊब असते. वासाचं सुगंध आणि दुर्गंध असं वर्गीकरण म्हणजे फारंच बाळबोध झालं. बरं याला काही नियमही नाही. कुत्र्याचा मालक जसा सांगत असतो की आमच्या कुत्रा कधी चावत नाही तसं मासे खाणाऱ्याला माश्य़ांचा वास कधीच येत नाही. मात्र माश्यांच्या वासाने (दुर्गंध म्हटल्यास माझ्या जीवावर कोणकोण उठेल याची यादी अंमळ मोठी आहे) मुळापासून हादरलेली काही मंडळी माझ्या पाहाण्यात आहेत. छाती भरुन नव्या पुस्तकांचा वास घेणारी खुपशी आनंदी मंडळी माझ्या मित्र परिवारात आहेत आणि त्यांच्या वासाने फटाफटा शिंकणारे शाईशत्रुही आहेतच. गंध म्हटलं की अजून काय आठवतं? माझ्या आठवणींना शिस्त नाही आणि म्हणून कोणता क्रमही नाही. प्रचंड बाबापुत्यानंतर मी गहु दळून आणायला गिरणीला जायचो, अत्यंत रटाळ काम पण एकदा तिथे पोचलं की गंमत वाटायची. धुकं पसरावं तसं गिरणीभर शुभ्र कण पसरलेले, एकदा धोपटला तर निदान चार लोकांचं एकवेळचं जेवण होईल इतकं पीठं नखशिखांत मिरवणारा गिरणीवाला काका. आणि पीठाचा तो सरमिसळ गंध. एक अदृष्य लक्ष्मणरेषा असायची. ती ओलांडली तर खोकणा ठरलेला. 

वाढत्या वयानुसार छोट्या गोष्टींमधली गंमत आटत चालली तसे गंधांचे परिमाणही बदलत गेले. पण आजही गंध म्हटलं की आपसुक फुलंच का आठवावीत? फुलांच्या वंशसुक्ताचे आरोह-अवरोहच मुळी सुगंधाने रेखलेले असतात. निसर्गात कुणी लाडके, कुणी दोडके असले तरीही फुलांवर "त्याचे" विलक्षण प्रेम असणार. कुणाला रंग, कुणाला गंध, कुणाला आकार तर कुणाला  अजून काही.... माणसासारखीच झाडे काही घरांमध्येच रमतात म्हणे. लहानपणी जी झाडे घरी रमली त्यातली सगळी तथाकथित बेरंग सदरात मोडणारी. पारिजात, मोगरा, कुंदा, निशीगंध, जाई-जुई....सगळी शुभ्र पण एखादं फुलही हुंगावं तर त्यांचा बहर नकळत आपल्या आत रुजत जातो. पारिजातकाचा गंध त्याच्या देठासारखाच, केशरी, किंचित विरक्तीकडे झुकणारा. सकाळी अंगणभर पारिजातकाचा सडा पडला की बाकी फारसे लाड न होणाऱ्या देवांचे घर गंधगार होऊन जायचे. निशीगंधाचं तसं नाही. त्या फुलाला एक आब आहे. रुपडं साजूक, एखादा सुंदर सिंड्रेला गाऊन घालावा तसं अगदी देठापर्यंत आलेलं पाकळीचं टोक आणि त्या शुभ्र रंगात अलगद मिसळुन जाणारं फिकट हिरव देठ. त्याचा सुवास हा खानदानी श्रीमंती सारखा पुरुन उरणारा, किंचित मादक, विलासी. एक छडी आणावी तर चांदण्या लगडुन याव्यात तशी फुलं लहडलेली. पण म्हणून उन्मुक्तपणे गंध नाही उधळायची ती. आदबीनं जवळच्या वर्तुळात प्रवेश कराल तर मधूर मंद मार्दवशील गंध येईल त्या फुलांचा. रातराणीचं तसं नाही. चिमुटभर चांदणचुरा वागवत एखाद्या धीट चिंधी सारखी शारीर भिडते ती. त्यात स्वतःला उधळुन टाकायची कोण घाई. या गारुडाच्या जवळून जाल तर आयुष्यभर नजरबंदीत राहायची तयारी हवी. मोगऱ्यां जरा अधलं मधलं. त्याला निशीगंधाचं खानदानी तेज नाही आणि रातराणीचं ओसंडून वाहाणं नाही. मोगरा म्हणजे जरासा सरगम मधल्या म सारखा, शुद्ध आणि तीव्र, दोन्ही डगरींवर पाय असणारं फुल. निशीगंधासारखाच मंद सुवास पण जरासा सैलसर, कमी टोकदार, किंचित विरळ. गंध उधळुन देण्याची रित रातराणीसारखी बेभान नव्हे आणि निशिगंधासारखी पोक्तही नव्हे, मोजकीच आटोपशीर. एक फुल पाण्यात टाकले तर पाण्याच्या अणुरेणुला गंधीत करुन टाकते.

फुलांच्या कौतुकाला आकाश पुरं पडत नाही. थबकण्याला एक विरामचिन्हाचं निमित्त हवं असतं इतकंच.

Tuesday, September 30, 2014

॥देहाचा अभंग॥


देह पांघरावा
आंथरावा देह
देहात मिटावे
उगवावा देह


देह सजवावा
मोगरावा देह
देह दिठी दिठी
स्पर्शपार देह


देह निरखावा
मुळमाया देह
देह अट्टहास
भ्रमभास देह


देह रुजवावा
ऋतुभार देह
देह कळीकोंभ
मुळारंभ देह

Wednesday, July 9, 2014

अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे


अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे.

आशाळभुत कुत्र्यागत शेपूट हलवत शब्दांची झुंबड मेंदुला लगडून असते. एखादा साक्षात्कार भोगावा आणि प्रतिमांचे सुलभीकरण करावे असा नियम नसतोच, तो निव्वळ लिहित्या माणसाचा हव्यास. श्रीयुत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, तुम्ही मायन्या पल्याडची माणसं (आणि तशीही तुम्हाला कोऱ्या पत्राचीही सवय आहेच म्हणा) पण अक्षरामागे अक्षर ठेवावे आणि अर्थांची भाषांतरे व्हावीत असा सजीव सोहळा सहज होणे नाही.

It's a derived art form my friend. Painters are blessed ones. They can create absolute language. किंवा कसे, तंबोऱ्याची दाणेदार स्वरलिपी... निर्दोष लावावेत आणि नक्षत्र ओल कंठामध्येच मुरुन जावी तसे.

आणि इथे मी, प्रत्येक शब्दापोटी माझ्याच मुळाक्षरांची गुणसुत्रे तपासून घेत आहे.
तंद्रीला तीन मिती असतात; अनुभवांचे टोक निर्ममपणे पारखण्याची, आत्ममग्न लयीची आणि प्रस्तरांच्या पल्याड परकाया प्रवेशाची.

अनुभवांचे आरसे वाकवावेत तसंतसे नार्सिस्ट होत जातात. मी... मला... माझे....च्या गारगोट्या अस्पष्ट ठिणग्या उडवत राहातात. उद्धार करण्यासाठी कुणी गोरखनाथ ’चल मच्छींदर गोरख आया’ची हाक घालतो आणि स्व-प्रतिमांची एकके विलग होण्यास तेव्हढे निमित्तही पुरेसे असते. अनुभवातून जाताना प्रवासाचे कौतूक कमीच, घाई असते तो अनुभव संपवण्याची, मुक्कामी पोचण्याची. जेव्हा तो देजा-वु चा क्षण येतो आणि तो हुकुमी आणणं हे त्या लिहीत्या मनाचं कसब, तेव्हा तो अनुभव उलटसुलट पारखता येतो, असंख्य शक्यतांना जन्म देता येतो, अनुभवातून कोरडंठाण उभं राहाता येतं किंवा कॅलिडास्कोपसारखं गरगरा फिरवुन रंगीत चित्तरकथाही बघता येतात.

लयीला एक गत असते. स्वतःभोवती फिरत फिरत वर्तुळातून असंख्य वर्तुळे जन्माला घालणाऱ्या भोवऱ्यासारखी लय. कुणीतरी आपल्यापुरतं अवकाशाला पिळ घालतं आणि आपण आपलं विश्वामित्री नवं विश्व अस्वस्थपणे उसवत राहातो. माझ्या आत्ममग्न लयीला शांततेची दाट पार्श्वभुमी असते. पाण्याच्या एका थेंबाचं बेफाम कोसळणंही नकोच असतं मला. क्षणाक्षणाला जुळणाऱ्या आणि उसवणाऱ्या लय-बिंदुतून मला अनुभवांची एक साखळी ओवायची असते. एक प्रचंड आवर्त आणि मुठभर पारा, सृजनाच्या निव्वळ प्रार्थनांच्या बळावर आपण लिहीत राहातो.I lean to you, numb as a fossil. Tell me I'm here...
त्रयस्थपणे लिहीता येत नाही, कुणी तसा दावा करुही नये. माझा एक अंश, गुणसुत्रात लपवलेली एखादी नक्षत्रवेल माझ्या प्रत्येक पात्रात मला रुजवावीच लागते पण त्याही आधी वरवरचे पापुद्रे खरवडुन मला माझ्या पात्रांच्या आत्म्याला भिडावं लागतं..छे...मलाच पात्र व्हावं लागतं. सावित्री म्हणते तेच खरं स्वतःच मोर व्हायला हवं. पात्रांच सहज काहीच नसतं. लहरी ऋतुंनी झपाटून टाकावं तशी बेभरवश्याची असतात ती. एकेक ठिपका जोडून रांगोळी जोडावी तसा त्यांच्या भुतकाळ जोडावा लागतो. त्यांचे विखार, विकृती, चांगुलपण, त्यांचा भवताल अंगावर घ्यावा लागतो. आत्मभानाची टोके सुटू न देता पडभिंतीच्या सावल्या आपल्या अंगणात रुजु देणं तितकंस सोपं नसतं. तरीही डोळे मिटले की धुक्यातून त्यांना हक्कानं उमटावा लागतं तर त्यांच्या कहाण्या शब्दांच्या उधारबोलीवर लिहीता येतात. Kiss me, and you will see how important I am, हे स्वगत परतीच्या बोलीवर, लेखक शोधणाऱ्या प्रत्येक पात्राच्या कपाळावर आज मी पुन्हा लिहीतो.

Saturday, March 22, 2014

अनुवाद ३: He Wishes for the Cloths of Heaven


विल्यम यीट्सची ही १८९९ मधली प्रसिद्ध कविता. ही कविता सिनेमा, टीव्ही मालिका आणि इतरही पुस्तकांमधून वापरली गेली आहे असं विकी सांगतं.
या कवितेचा अनुवाद करता करता मला एक सयामी कविता सुचली, यीट्सच्या कवितेची जुळी बहीणंच जणु. तिला नाही म्हणणं अशक्यच होतं म्हणून अनुवादाचा दुसरा भाग म्हणजे ती सयामी कविता. कृष्णाच्या नजरेतून यीट्सची कविता कशी दिसेल असं काहीसं त्या सयामी कवितेचं स्वरुप आहे.
 
Had I the heavensembroidered cloths,
Enwrought with golden and silver light,
The blue and the dim and the dark cloths
Of night and light and the half-light,
I would spread the cloths under your feet:
But I, being poor, have only my dreams;
I have spread my dreams under your feet;
Tread softly because you tread on my dreams
- William Butler Yeats


तेरे लिए सपनों की चादर बुनुं


प्रिय,
दैवदत्त एखादा शेला असता,
सोनेरी आणि चंदेरी प्रकाशलहरींनी विणलेला,
गर्द निळ्या, सावळ्या रंगाचा,
अंधाराची सळसळ, दिवसाचे लख्खं लावण्य आणि संध्याकाळचे बावरपण कोरलेला
तर
तुझ्यासाठी त्याच्या पायघड्याही घातल्या असत्या.
पण कफल्लक माणसाकडे फक्त स्वप्नं असतात....
जssरा जपून पाऊल टाक
प्रिय,
त्या कोवळ्या स्वप्नांची मलमल मी तुझ्यासाठी पसरवली आहे.


----सयामी कविता----

॥सत्यभामा॥

बयो,
तुझे चंचल पाऊल
पृथ्वीच्या अहंकारी टोकावर ठेवशील
तर कोण चकमक उडेल (आता स्त्रियांच्या मत्सराचे नवे दाखले नकोच आहेत मला)
हा माझा दैवदत्त शेला-
सोनेरी आणि चंदेरी प्रकाशलहरींनी विणलेला,
गर्द निळ्या, सावळ्या रंगाचा,
अंधाराची सळसळ, दिवसाचे लख्खं लावण्य आणि संध्याकाळचे बावरपण कोरलेला,
त्याच्याच
तुझ्यासाठी पायघड्या घालतो.

॥राधा॥

तुझ्या झिजलेल्या पावलांवर
कोणती नक्षी काढु राधे?
तुझ्या वाटेवर मी माझे श्यामल डोळे पसरेन
माझ्या स्वप्नांमधून मग तू चालत जाशील!!

Tuesday, March 18, 2014

अनुवाद २: Poor Old Ladyही कविता(!) टाईम्सच्या यादीत का आली याचं मला कुतुहल आहे. खरं म्हणजे याला फार तर बडबडगीत म्हणता येईल! बहुदा हे version रोज बोनचं आहे. मला हे वाचून सगळ्यात आधी 'साताऱ्याचा म्हातारा
शेकोटीला आला' हे कुठल्याही सहलीतलं must sing गाणं आठवलं.

Poor old lady, she swallowed a fly.

I dont know why she swallowed a fly.

Poor old lady, I think shell die.


Poor old lady, she swallowed a spider.

It squirmed and wriggled and turned inside her.

She swallowed the spider to catch the fly.

I dont know why she swallowed a fly.

Poor old lady, I think shell die.


Poor old lady, she swallowed a bird.

How absurd! She swallowed a bird.

She swallowed the bird to catch the spider,

She swallowed the spider to catch the fly,

I dont know why she swallowed a fly.

Poor old lady, I think shell die.


Poor old lady, she swallowed a cat.

Think of that! She swallowed a cat.

She swallowed the cat to catch the bird.

She swallowed the bird to catch the spider.

She swallowed the spider to catch the fly,

I dont know why she swallowed a fly.

Poor old lady, I think shell die.


Poor old lady, she swallowed a dog.

She went the whole hog when she swallowed the dog.

She swallowed the dog to catch the cat.

She swallowed the cat to catch the bird.

She swallowed the bird to catch the spider.

She swallowed the spider to catch the fly,

I dont know why she swallowed a fly.

Poor old lady, I think shell die.


Poor old lady, she swallowed a cow.

I dont know how she swallowed a cow.

She swallowed the cow to catch the dog.

She swallowed the dog to catch the cat.

She swallowed the cat to catch the bird.

She swallowed the bird to catch the spider.

She swallowed the spider to catch the fly, I dont know why she swallowed a fly.

Poor old lady, I think shell die.


Poor old lady, she swallowed a horse.

She died, of course.


"एक बिचारी म्हातारी"

 

म्हातारीच्या बोळक्यामधून थेट शिरली माशी

माहीत नाही शिंकेतून की बाहेर येते कशी

म्हातारीच्या खपतीची बातमी आली काय?

 

म्हातारीच्या हाती गावला काळा सावळा कोळी

गिळला त्याला, पोटामध्ये राडेबाज ढवळी

कोळ्याच्या जाळ्यामध्ये माशी अडकेल काय?

म्हातारीच्या खपतीची बातमी आली काय?

 

म्हातारीनं शॊधून गिळला टिंग्या टवळा पक्षी

पक्षी गिळला म्हातारीनं गाव आहे साक्षी

पक्ष्याच्या चोचीमध्ये कोळी गावेल काय?

कोळ्याच्या जाळ्यामध्ये माशी अडकेल काय?

म्हातारीच्या खपतीची बातमी आली काय?
 


म्हातारीचं डोकं फिरलं गिळून टाकलं मांजर

डोळे चोळा, नीट बघा, हिंडत होतं लाजरं

म्हातारीच्या पोटामध्ये पक्षी आणि साय

पक्ष्याच्या चोचीमध्ये कोळी गावेल काय?

कोळ्याच्या जाळ्यामध्ये माशी अडकेल काय?

म्हातारीच्या खपतीची बातमी आली नाय?
 
 
म्हातारीनं मांजर गिळलं, गिळून टाकलं कुत्रं

हाश्य नाही हुश्य नाही ढेकर दिला मात्र

कुत्र्याच्या सपाट्यात मांजर गवसेल काय?

मांजराला लुसलुशीत पक्षी सापडेल काय?

पक्ष्याच्या चोचीमध्ये कोळी गावेल काय?

कोळ्याच्या जाळ्यामध्ये माशी अडकेल काय?

म्हातारीच्या खपतीची बातमी येणार हाय
 
 
म्हातारीचं घडा भरला गिळली गाय काशी

हाडे गेली मस्णामध्ये राहु आला राशी

कुत्र्याच्या पेकाटात गाईचा पाय

कुत्र्याच्या सपाट्यात मांजर गवसेल काय?

मांजराला लुसलुशीत पक्षी सापडेल काय?

पक्ष्याच्या चोचीमध्ये कोळी गावेल काय?

कोळ्याच्या जाळ्यामध्ये माशी अडकेल काय?

म्हातारीच्या खपतीची बातमी आली काय?

 

ऎकावं ते नवल आख्खा घोडा गिळला माय

म्हातारीच्या खपतीची बातमी आली हाय
 

Monday, March 17, 2014

अनुवाद १: Hope is the Thing with Feathers


Hope is the thing with feathers

That perches in the soul,

And sings the tune without the words,

And never stops at all.

 

And sweetest in the gale is heard;

And sore must be the storm

That could abash the little bird

That kept so many warm.

 

Ive heard it in the chilliest land

And on the strangest sea;

Yet, never, in extremity,

It asked a crumb of me.

- Emily Dickinson


"आशेला पंख असतात"

 
आशा म्हणजे छोटा पक्षी
आत्म्यावरची साक्षर नक्षी
गाण्यामधल्या तरल स्वरांवर
अखंड झुलणारी गुलबक्षी

 
समुद्रवारे फणफणणारे
उन्मादाचे वादळ रे
चिरडून जाईल सहजपणे हे
छोटे पाखरु गाणारे

 
पक्षी पण बर्फात उगवले
सागरमाथ्यावरुन उडाले
पंखांवर स्वप्नांना पेरुन
निर्मोही ते भिरभिरले