Sunday, July 5, 2009

सुफी-(याना)-(नामा)

"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला.

कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..."

नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग.

लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला.

जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो
जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी अंबरी अंबरी

आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुणा या इथल्या.



स्वस्तात मिळणारया हार्मोनिअमवर पट्टी इतकीच झिजून गेलेली बोटं सराईत;
सुरांचं भान नाही की ते बेभान आहेत सांगणं कठीण;
ढोलकीचं कमावलेलं कातडं कडक वाजतय
"चढता सुरज धिरे धिरे ढल जायेगा"

टाळ्यांच्या कोरसला पार्थिव पार्श्वभुमी
पीर, थडगे
उद्ध्वस्त फकीराचा एकट दर्गा

साद-प्रतिसाद, सवाल-जवाब, फॉलो-थ्रु
रॉ किंवा सिनेमास्कोप
कव्वालीचा झिलकरी
गातच राहातोय

हराम वर्तनाला
धार्मिक वतन?
ऎकावं ते ते नवल!

"मैने काबे का हज कर के देख लिया"
कव्वाल, तुझ्या सहाशे वर्षाच्या इतिहासाचा भुगोल
बदलतोय

सिंहासनावरुन परमेश्वराला खेचलय कुणी
आणि काळजात खोचलय कुणी

प्रेयसीची गाणी समजता काफीर?
कंट्रोल एफ़ प्रेयसी रिप्लेस वुईथ बाप्पा
"तेरा तुझ को सौंप दे क्या लागत है मोर
मेरा मुझमें नाहीं जो होवत सो तोर"

सुफी,
ह्र्दयावर गोंदवावं
आत्म्याला पिंजून काढावं
वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं
इतका का परमेश्वर जवळ असतो तुमच्या सुरांच्या?
कंठाळ कोरस जाऊन ड्र्म्सचे प्लास्टीक, इलेक्ट्रॉनिक बीट्स आले
रागातून सारंगा, तुम्ही सरगम आणले
पण तुमच्या प्रार्थनांची मग्नता कश्यानेच मोडली नाही.
डोळे उघडावे कशाला?
"नैनों को तो डसने का चस्का लगा रे"
आतल्या आतच उघडतात आणि मिटतात तुमचे ऎहीक डोळे.
आतल्या आतच होतात तुम्हाला दिव्यत्वाचे साक्षात्कार.
दिव्याला पाहून नमस्कार.
सुफी,
तुमच्या सुरांनी भरती आलेले
समुद्र लपवताना तारांबळ उडते तेव्हा
आमचेही डोळे उघडतात आणि मिटतात आतल्या आत

Saturday, June 20, 2009

...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून
जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले,
तडकले, जागोजाग तेव्हाच्या.
आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी
निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या.
..
आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या.
एका उपनदीचे नाव डार्लिंग."




नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आभाळ थोडेसे कलेल तेव्हा हाकेच्या अंतरावर थांबशील तू? कावळ्यांचे हाकारे रान उठवित नाहीत पण आत्ममग्न जंगलाची वीण उसवण्याचे सामर्थ्य असते त्यांच्या ओरडण्यात.



तू अर्थ, माझ्या शब्दातीत, शब्दहीन कवितांचे. अनुभवांचे, प्रतिमांचे ध्रुवीकरण झाले की गाभूळलेल्या पावूस थेंबागत मेंदुच्या कुठल्याश्या पाकळीत हल्केच फुलतेस तू. डार्लिंग, तुला जशी शब्दांची तहान नाही तसे मलाही तुझ्या वैश्विकरणाचे मोह नाहीत.



मैत्रिण आठवते मला. तिच्यावर रचलेले काही शब्दपुंजके, कविता म्हणते ती त्यांना, तिला भेट दिले कुणी. अपेक्षेपेक्षाही मला ते शब्दपुंजके दाखवुन वेडावण्याचेच भाव जास्त होते त्यात. काय साध्य करायचे असते त्यातून? माझी आत्ममग्न लय मोडण्याचे दुःसाहस? शब्दांची मायावी शक्ती? की डार्लिंग तुझ्या दुर्बोध, अशारीर अस्तित्वाला प्रत्यक्षात येण्याचे आव्हान?




"राम चालला पुढे असे जुनेच वाटले" आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. अंधाराचा लख्ख कवडसा चमकतो क्षणभर. अहिल्येला मिळालेला शाप हे रघुरामाच्या स्पर्शापुरते निमित्त. स्पर्शाच्या साक्षात्कारात तुझे शब्दमल्हार, शब्दवेल्हाळ, शब्दगंधार अस्तित्व नव्याने उदयाला येते डार्लिंग आणि माझ्या कवितांना शब्दांचे शक्य आयाम मिळतात. तुझे आकार साकारताना माझ्या कविता देहचूर होतात.



राजपुत्र


लडाखच्या वाळवंटात बौद्ध भिक्षुणी चोरुन जमिन उकरते. खोलवर आत दडवलेला आरसा काढून स्वतःचे तारुण्य न्याहाळते. मोहाशिवाय मुक्ती नाही हे तिला कळेल कधी तरी? काही गोष्टी उगाच आठवत राहातात.

राजपुत्राने आरसा पाहीला. प्रतिबिंबाच्या डोळ्याला डोळा देताना बुबूळात उमटत जाणारया अंतहीन प्रतिमांच्या इंद्रजालाची त्याला भूलंच पडली. कवितांचे अमानुष वादळ संध्याकाळभर घोंघावत राहीले.

Thursday, May 28, 2009

भिंतीवरचे काळे धुके

"शेवाळ्यासारखं बुळबुळीत काही अंधार अधांतर भिंतभर पसरत होतं. धुरासारखं असलं तरी वास नव्हता त्याला. पण डोळ्यांवर अदृष्याचा पडदा ओढण्याचं अचाट सामर्थ्य मात्र होतं; धुक्यासारखं; तेही काळ्या रंगाच्या धुक्यासारखं. बघता बघता डोळ्यांदेखत घरातली भिंत काळवंडत गेली. ’ते विषारी आहे’ एक मन आतून ओरडलं पण नजरबंदीच्या प्रयोगासारखे माझे डोळे काळ्या ठीक्क पडलेल्या भिंतीवरुन काही हलत नव्हते. कुणीतरी आकाशगंगेतलं एखादं कृष्णविवर भिंतीवर मायाजालासारखं पसरवावं तसं समोरच्या भिंतीवरच्या काळ्या धुक्याकडे माझे पाय माझ्या ईच्छेविरुद्ध मला ओढत होते. अम्मांनं हाक मारली नसती तर कदाचित मी त्या धुक्यात विरुनही गेले असते. भिंतीवरची ओंगळवाणी पाल एकदा मारली तरी आपल्या मनात ती कितीतरी वेळा तडफडत मरतच राहाते तसं काही तरी झालय मला. मी ते काळं धुकं विसरुच शकत नाही. काही तरी अशुभ, विषारी आणि दुष्ट आहे इथे. आम्ही हे घर लगेच सोडलं. पण इथे जो कुणी नवीन राहायला येईल त्याच्या साठी मी, शवर्री किणी, ही नोट ठेवत आहे."


मी सलग दुसरयांदा हे पत्र वाचलं. हल्ली मी छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. पण हे पत्र वाचून मी अस्वस्थ झालो. रादर, माझ्या घराबद्दलं असं लिहीणारया शर्वरी किणीचा मला भयंकर राग आलेला आहे. याच किणीबाईंनी एक वर्षापुर्वी याच फ्लॅटसाठी आक्काच्या किती मनधरण्या केल्या होत्या! जुना फ्लॅट आहे म्हणून भाडं ही कमी करुन घेतलं होतं. लोक सोईस्कररित्या विसरतात आणि लोकांच्या अश्या वागण्यानेच माझा संताप संताप होतो. टेक अ डीप ब्रीद. ..संतापामुळे फक्त नुकसानच होतं. पण किणीबाईंच्या एपिसोड नंतर इथे भाडेकरु मिळणं कठीण झालय हे खरं. आजुबाजुची मुलं देखील इथून जाताना चट्कन न बोलताच घाईघाईने पुढे सटकतात. माझं ठीक आहे, माझ्या काही फारश्या गरजा नाहीत पण आक्काच्या एक्कलकोंड्या संसाराला याच फ्लॅटचा टेकू आहे. निदान तिच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून का होईना, या फ्लॅटमधे कुणीतरी राहायला यायला हवं. मिस्टर गुरुनाथ शब्दे, टेक अ डीप ब्रीद...सगळं काही ठीक होईल. किणीबाईंची नोट तुमच्याच हातात पडली हे किती चांगलं झालं!

तुमच्याशी बोलत काय बसलोय? पुढचा भाडेकरु यायची वेळ झाली तरी मी अजून इथेच हे कळालं तर आक्का खवळेल. घ्या! आलीच वाटतं मंडळी.

गुरुनाथ शब्देंनी दार आतून उघडायला आणि लॅचची चावी फिरवुन आक्का आत यायला एकच गाठ पडली. दारासमोरुन उड्या मारत जाणारी दोन लहान मुलं अचानक आलेल्या कुबट गार वारयानं गुदमरायला झाली आणि शब्दांचं ओझं असह्य झाल्यागत चिवचिवाट बंद करुन चुपचाप चालती झाली. व्हरांड्यात घू घू करणारी कबुतरं मरणांतिक भीतीनं आवाज न करताच उडून गेली. आक्कांनी सांडणारं हसु ओठ दुमडून तिथंच थांबवलं आणि भसाड्या आवाजात त्यांनी "या" असं आमंत्रण दिलं. गुरुनाथ शब्देंनी अंग चोरुन आक्कांना आत येऊ दिलं. त्यांच्या मागोमाग आलेल्या पाहुण्यांनां आक्कांनी निरस सुरात विचारलं "नाव काय म्हणालात तुमचं?"


"नयन महेश्वरी" शंकाच नाही. अहो शाळेपासून सोबत होतो आम्ही. अगदी दोन वेण्या ते पोनी टेल असा सारा प्रवास मी तिच्या सोबत केलेला आहे. गेली १-२ वर्ष मी तिला पाहीली नाही म्हणून काय झालं? नो मिस्टेक, नयनच ती. शाळा-कॉलेजातले कोणतेही ग्रुप फोटो तुम्ही काढून बघाल तर नयनच्या जवळपास मी दिसेनच दिसेन. नाही, तशी घट्ट मैत्री वगैरे नव्हती आमची. मुलींशी मैत्री म्हणता आक्कानी उभा सोलला असता मला. आक्का सोडून बाई माणसाशी बोलण्याचा प्रसंगच आला नाही कधी. खरं तर हिंमत झाली नाही असं म्हणायला हवं आणि ..जाऊच द्या.

काही दिवस सुरळीत गेले पण नंतर..

नयन बेचैनपणे कुस पालटत राहीली. या जागेचे संकेत आणि ऎकलेल्या अफवा तिला अस्वस्थ करत होत्या. दाराच्या उंबरयावरच खिळा धसून पाऊल रक्ताळले होते तिचे. नवाच गृहप्रवेश केल्यासारखी पावलं उमटली होती तिची घरभर. आणि यावर त्या घरमालकीणबाई म्हणाल्यापण,"कशी लक्ष्मीसारखी पावलं उमटलीत. घर लाभणार तुम्हाला. आता काही सोडत नाही तुम्ही हे घर". आपण घराला की घर आपल्याला सोडणार नाही? नौकरीचा हट्ट न करतो तर आज स्वतःच्या घरात आपण झोपलो असतो, नयनने सुस्कारा टाकला.

नयनला लाभायलाच हवं हे घर. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या घरापासून असं दूर राहून नौकरी करणं सोपं असतं का? मला वाटतं आय शुड स्पीक विथ हर. आक्काला अजूनही ते आवडणार नाही पण तिच्याशी मी बोललो तर तिला कदाचित एकटं वाटणार नाही. एकटेपणाबद्दल तुमचा काही अनुभव?

कुजत चाललेलं स्थिर पाणी, त्यावर शेवाळ्याचा हिरवट काळसर जाड थर. एखादा खडा उडून आला तर त्याला शोषून प्रत्त्युतरादाखल पाण्याचा एखादा थेंबही न उडवणारा असह्य डोह. जुन्या, अस्पर्श पाण्याला वासनेची डूब असते. ते अंगाला लागले की पाण्यालाच तहान लागते देहाची. स्पर्शासारखे देहभर पसरत जाते ते आणि उभ्या देहाचे पाणीच करुन टाकते. नयन अर्धवट जागी झाली ती अश्या काही तरी भयंकर विचित्र स्वप्नामुळे. तिच्या पलंगभर शेवाळलेले पाणी पसरले होते.

हे गुरुनाथ शब्देचं घर आहे? आक्कांना भेटून आल्यावर कितीतरी वेळ नयन विचार करत होती.
गु.. रु.. ना.. थ.. श.. ब्दे. गु..रु..लहानपणापासून तिच्या वर्गात असणारा एक किडूकमिडूक नगण्य मुलगा. भेदरल्या डोळ्यांचा आणि ज्याचे शब्द कधी ओठापर्यंत आलेच नाहीत असा मुलगा. ज्याने...

...ज्याने एक वर्षापुर्वी गावाबाहेरच्या जुनाट डोहात आत्महत्या केली तो गुरुनाथ शब्दे! नयन, आयुष्यभर तू कधी तरी माझ्याशी बोलशील याची मी वाट पाहीली. प्रत्येक फोटोत आपल्या आजुबाजुला धडपडणारा, मुकाटपणे परस्पर तुझी कामं करणारा सश्याच्या काळजाचा मुलगा तुला कधी तरी आवडेल असं मला वाटत राहीलं. पण तू तुझ्या जगात मश्गुल राहीलीस. मग मी हिंमत करुन आक्काला तुझ्याबद्दल सांगीतलं. बेभान आक्काचे अशुभ शब्द आठवले की अजूनही काटा येतो अंगावर. शब्दांनी शब्द वाढले आणि नकळत आक्काच्या प्रौढ कुमारीपणाचा उल्लेख झाला. तिरमिरीत आक्कानं तापल्या तेलाचं भांडं ढकललं आणि अंगभर आयुष्यसरुन उरणारया वेदनांचा डोंब उठला. संतापाच्या भरात दाह मिटवणारं पाणीच जवळ केलं मी. त्या शेवाळलेल्या गर्द काळ्या पाण्याने सारं देहपणच नष्ट केलं आणि तरीही फिरुन इथेच आलो मी, सारया अपुरया ईच्छा, वासना घेऊन, माझ्याच घरात. नयन, तुला आठवतय नां?

नयन बधीर होऊन पलंगाच्या काठावर बसली होती. परत परत हातातले फोटो चाळूनही तिला त्यातला गुरुनाथ शब्दे नक्की ओळखु येत नव्हता. खोलीभर पसरलेल्या अनंत शांततेचा कोलाहल तिला असह्य होत होता.

टेक अ डीप ब्रीद गुरुनाथ..तिला आठवेल. नाही आठवतय तिला. टेक अ डीप..श्वास नाही पुरत आता. टेक अ..श्वासाची गरजच नाही गुरुनाथ आणि नयनचा श्वास कोंडायला...

...बघता बघता खोली निर्वात होत गेली. नयनला वाटलं भिंती जवळ जवळ येऊन तिला चिणून टाकतील. अंधारातही भिंतींचं काळं होणं लपत नव्हतं. घरभर धुकं पसरत होतं. ओलं, शेवाळी, काळं धुकं.

Wednesday, May 20, 2009

धार्मिक वगैरे वगैरे

"आपण धार्मिक आहोत का?"

गेले कित्येक महीने, कदाचित वर्षं, हा प्रश्न विक्रमाच्या वेताळासारखा माझ्या मानगुटीवर बसला आहे. आज ते भूत परत नव्यानं उगवुन आलं याचं कारण नुक्तंच एका पुस्तकाचं वाचलेलं ब्लर्ब!

थोडं मागं वळून बघायचं तर मी संघाच्या शाळेत शिकलो. अगदी दहावी पर्यंत खाकी चड्डी घातली. शाखेत कधीच गेलो नाही पण शाखेत जास्त आणि शाळेत कमी असणारया मास्तरांवर मनापासून प्रेम केलं. पण म्हणून मी संघिष्ट किंवा कुठलाच पोथीनिष्ठ झालो नाही. पर्यायानं संघाची शाळा माझं कसलंही धार्मिक ब्रेन-वॉशिंग करु शकली नाही. मग मी धार्मिक नाही का? सर्वसाधारणपणे आपण कुणीतरी नसतो म्हणजे ते सोडून दुसरं कुणीतरी असतो (सोप्पय!). मी कम्युनिस्ट असुच शकत नाही कारण तेव्हढा झापडबंद मी कधीच नव्हतो.मग मी समाजवादी आहे का? आमच्या घरी य वर्षं साधना मासिक यायचं. एस. एम, नानासाहेब गोरे, सानेगुरुजी ही आई-दादांची दैवतं होती. पण काही अपवाद वगळता समाजवाद्यांची ढोंगं फार उघड दिसायची. कित्येकांचं दुटप्पी वागणं, उरलेल्या थोड्यांचं कधी अगतिक आणि जास्त करुन अव्यवहारिक वागणं समाजवादाच्या मर्याद्या उघड करायचं. डार्विन वगैरे बुवांनी तर सर्व्हावय ऑफ फीटेस्ट सांगून सर्वजण सारखे वगैरे थोतांडातली हवाच काढली. अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश या घोषणा आणि ते नेते भिंतीवरच्या कॅलेन्डरवरच राहीले. त्यांचे राजकिय अन्वेषार्थ निराळे पण माझ्या मानेवरच्या वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर हे नव्हे. थोडक्यात विचारसरणी, राजकीय, सामाजिक बांधीलकी आणि धार्मिकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे निदान माझ्यापुरतं तरी मी स्पष्ट करुन टाकलं.

मग मी अजून अस्वस्थ होतो. एक सोपं उत्तर शोधायचा माझा पहीलाच प्रयोग फसलेला असतो. ज्या पुस्तकानं गडे मुडदे उखडले ते पुस्तक काहीतरी हिंदुइझम असं वर्णन करतं. हिंदुइझम ? सोशल-इझम, कम्युनि-इझम हे मी समजु शकतो. त्या त्या जीवनपद्धतींबद्दल/ समाजपद्धतींबद्दल हे ईझम आहेत. शब्दबद्ध करावी इतपत युनिफॉर्म आपली जीवनपद्धत/ समाजपद्धत आहे? प्रश्नातून उलगडणारे प्रश्न जास्त टोकदार आणि अंतर्मुख असतात. मुळात ज्या बेसवर हा सो-कॉल्ड ईझम टेकला आहे तो तरी युनिफॉर्म आहे? जसा जसा विचार करावा तसं तसं याच उत्तर जास्त जास्त नकारार्थी येतय. कोणत्याही धर्माला एक सुप्रीम-देव असतो. ख्रिश्चनांना जिझस, मुस्लिमांना अल्ला तसा हिंदुंना? अनंतकोटी!! वैष्णवांच्या देवाचं नाव घ्याल तर शैव खवळतात. ग्रामदैवतं, अघोरपंथी, जाती-जातींचे, प्रांता-प्रांतांचे असंख्य देव असे निर्नायकी असावेत? विशेषतः हाडा-मांसाच्या राजात देव मानणारया आपण भारतीयांचे देव मात्र राजा शिवाय असावेत हे जरा विचित्रच! धर्माचा एक मार्गदर्शक असा धर्मग्रंथ असतो जो त्या समूहाचे नियम, कायदे बनवण्यात मदत करतो. गंभीर प्रसंगी त्याच्या हवाल्यावर गंभीर आणि दुरगामी परिणाम होऊ शकणारे निकाल दिले जातात. त्या त्या समुहाच्या घरा-घरात बायबल, कुराण इ. ग्रंथ दिसतात. हिंदु धर्माच्या कोणत्या पुस्तकाला एकमुखानं धर्मग्रंथ म्हणावं? आणि हे म्हणणं आपल्या नियमांत परावर्तित व्हावं? माझ्या घरातल्या शेकडो पुस्तकांत मला कधीच रामायण, महाभारत किंवा भगवतगीता सापडणार नसते. धर्माला काही मुखंड असतात. देवाचे काही लाडके, ज्यांना देवा कडून डायरेक्ट ऑर्डरी मिळतात म्हणे, ज्यांना धर्मग्रंथाचं आपण पामरापेक्षा जास्त आकलन असतं म्हणे. इन-शॉर्ट, देवानं त्यांना खास निवडुन दिलेलं असतं, त्याचं रिप्रेझेन्टीव्ह म्हणून (असं त्यांना वाटतं!). पोप,खोमिनी अशी ही लाडकी व्यक्तिमत्व. कदाचित आपले देव अनंतकोटी असल्याने, त्याचे दुतही अनंतकोटी असतील. थोडक्यात, याही कसोटीवर हिंदु धर्म फेल. धर्माची, धर्मग्रंथाची म्हणून एक भाषा असते. भले ही ती भाषा त्या धर्माच्या लोकांना नीट येत नसेल पण ती एक अधिकृत भाषा असते. आपल्याकडे भाषा किती हे धड देवालाही सांगता येईल की नाही सांगणे कठीण. धर्म कडवट असतात. धर्मांना आतून पंथांच्या, जातीच्या पालव्या फुटतात पण एका धर्मात दुसरा धर्म मिसळलाय याची उदाहरणे विरळाच. शिख धर्म, जैन धर्म, बुद्ध धर्म ज्या पद्धतीने हिंदु धर्मात मिसळले आहेत ते पाहाता त्यांना हिंदु धर्मातील एका पंथाचे रुप आले यात नवल नाही. आणि असे असंख्य तुलनात्मक मुद्दे मांडता येतील.

मग माझी धार्मिकता ठरवणारा हा माझा धर्म नक्की आहे तरी काय? इट्स जस्ट अ रॅपर! आपली खरी ओळख, धर्माच्या आधारे नसून जातीच्या आधारे आहे हेच खरे. या असंख्य जाती समुहांना काही सामुदाईक रुढी, रिवाज, रिती यांनी बांधून ठेवणारं रॅपर म्हणजे हिंदु धर्म. धर्माची व्याख्या जशास तशी जातीला लागु होत नाही. पण जातीची मुख्य ओळख रोटी-बेटी व्यवहार, एक भाषा, जगण्याची बरयापैकी एक सारखी तरहा अशी आहे. शिवाय जातीला प्रादेशिकवादाचं आणखी एक अस्तर आहेच. कदाचित याच मुळे धर्माच्या नावाने केलेलं राजकारण इथे फोल ठरतं पण जातीनिहाय मागीतलेला मतांचा जोगवा यशस्वी ठरतो. कदाचित याचमुळे हा धर्म कधी कडवट बनला नाही की उन्मादक भाषणांनी इथे कुणी फार काळ कुणाची डोकी पिकवु शकला नाही. कदाचित याचमुळे इतका पुरातन असूनही हा धर्म जगभर वाढला नाही. कुण्या त्रयस्थ माणसानं हिंदु धर्म स्विकारायचा ठरवला तर त्याला कुठली तरी जात स्विकारावी लागेल, धर्म नव्हे.

विक्रमाचे मौन तुटलेले पाहून वेताळाने नेहमीचे विकट हास्य केले आणि तो परत झाडाला जाऊन लटकला.

धार्मिक अवडंबर, उन्माद, गुरु-बुवांचं उदात्तिकरण आणि जगण्यातलं कुतुहल हरवुन टाकणारा ठक्क कोरडा भोगवाद याच्या अधेमधे कुठेतरी एक रॅशनल, माणुसपणाच्या पातळीवर जीवंत असतो, तो माझा धर्म!

Sunday, April 26, 2009

नाचु आनंदे


खुप सारी वाट पाहाणे
उत्सुकता चिंता
प्रार्थना
आनंद
नवा जीव
जागरण दुपटी लंगोट
पेढे जॉन्सन पावडर तेलपाणी सल्ले चौकश्या
अधून मधून लाल गुल्मोहर
पिवळा बहावा
आनंद..

Friday, April 10, 2009

मुक्ताची डायरी

दि. १ फेब्रु

//श्री गणपती प्रसन्न//

शाळेत बाईंनी डायरी लिहीण्याचं महत्व सांगितलं. गुरु म्हणजे देव म्हणून तर बाईंचं ऎकलं पाहीजे. काही वाईट मुले त्यांचे ऎकत नाहीत. देव त्यांना नरकात पाठवेल हे नक्की. माझं बघून सईनं पण डायरी लिहायचं ठरवलं आहे. म्हणजे ती पण नरकात जाणार नाही. आम्ही सतत एकत्र असतो. ती नरकात जाणार नाही हे कळल्यानं मला मस्त वाटलं.

कु. मुक्ता फडणिस,
इ. ३री अ

दि. २ फेब्रु

काल आईला डायरी दाखवली. ती म्हणाली की असं गणपती प्रसन्न वगैरे लिहायचं नसतं आणि दरवेळी पानाखाली नाव आणि वर्ग लिहायची पण गरज नसते. पण मग ही माझी डायरी आहे हे कसं कळणार? आणि मी ३री अ त म्हणजे हुशार मुलांच्या वर्गात शिकते हे कसं कळणार? मग तिने वहीला निळ्या रंगाचं कव्हर घालून दिलं आणि त्यावर मोठ्या अक्षरात मुक्ताची डायरी असं लिहून दिलं. मला मस्त वाटलं. आईचं सगळंच मस्त असतं. तिचा गोरा गोरा रंग, तिच्या हातचा खाऊ, तिचा गोड आवाज एकदम मस्त. पुष्करदादा आणि अन्यादादा तिच्याच सारखे गोरे आहेत पण मी बाबांसारखी आहे, गव्हाळ रंगाची. पुष्करदादा म्हणतो असा काही रंग नसतो (मी रंगाच्या पेटीत बघितलं. मला गव्हाळ रंगाचा खडू नाही दिसला म्हणजे तो खरं बोलत असणार) आणि अन्यादादा मला काळी म्हणतो मग मला फार वाईट वाटतं. मी आईसारखी गोरी का नाही?

दि. १२ फेब्रु

सईनं डायरी लिहीणं थांबवलं. मला ती नरकात जाईल अशी सारखी भिती वाटते. खरं तर मला ही रोज काय लिहायचं कळतच नाही. गेले पाच सहा दिवस मी नुस्तंच शाळेत गेले, जेवले असंच लिहीत आहे. मग मी बाईंना विचारलं. त्यांना सगळं माहीत असतं. त्या म्हणाल्या की रोज नाही लिहीलं तरी चालेल. ज्या दिवशी मनाला वाटेल त्याच दिवशी लिहीलं तरी चालतं. आणि त्यांनी सांगीतलं की आपली डायरी कुणाला वाचायला द्यायची नाही. ती गुप्त ठेवायची. हे मला मस्त वाटलं. मी ती माझ्या कपड्यांच्या कपाटात ठेवली. पण अन्यादादा सारखं घर उचकत असतो म्हणून त्या डायरीवर आडा-मोडा-शनिवारी-पाय तोडा असा मंत्र पण घालून ठेवला आहे. अन्यादादाचा पाय तुटला तर? मला खुप भिती वाटली. डायरी अदृष्य करायचा मंत्र मिळाला तर बरं होईल. सईला विचारायला पाहीजे. बाईसारखं म्हणतात सईला नको तिथे जास्त अक्कल आहे म्हणून


दि. १ मार्च

परिक्षा आल्या. खुप अभ्यास करायला पाहीजे. नंबर आला नाही तर बाई सरळ क तुकडीत घालतील

दि. १५ मार्च

परिक्षा झाली की दुसरया गावाला जायचं असं बाबा रात्री आईला सांगत होते. म्हणजे काचकांगरयांसाठी रंगीत काचा जमवायला वेळ आहे अजून. सईच्या गावाकडची एक बहीण येणार आहे. ती आम्हाला अजून मस्त खेळ शिकवणार. मस्त! मी पुष्करदादाला विचारलं तर वस्सकन अंगावर आला आणि म्हणाला डफ्फर तुला कश्याला उचापती हव्या? आपली ट्रांफर झालीए. मला काहीच कळालं नाही. तो नेहमीच असा वसवस करत असतो. आई तर नेहमी म्हणते अरे तुम्ही सख्खी भावंडं नां? किती रे भांडता. पण त्याचं मुळी माझ्यावर प्रेमच नाही. आणि आता त्याला खुप अभ्यास इंग्रजीतून असतो (इ. ७वी ब, हुशार मुलांचा वर्ग) त्यामुळे तो अजून फुशारक्या मारतो. अन्यादादाला विचारलं तर तो म्हणाला डफर म्हणजे मुर्ख आणि त्याला काही ट्रांफरचा अर्थ सांगता नाही आला. अन्यादादा आत्ता ५वी ब त आहे. त्याला थोडंस इंग्रजी येतं. मला खुप राग आलाय. बरं झालं आपण इंग्रजांना हाकलुन लावलं

दि १ एप्रिल

आमची ट्रांफर झाली म्हणजे बदली झाली असं आईनं सांगीतलं. म्हणजे नवीन गावाला जायचं आणि इथे परत कध्धी नाही यायचं. सई म्हणाली एप्रिलफुल केलं असेल पण आई कध्धी खोटं बोलत नसते. मला सारखं रडू येतय

दि १८ एप्रिल

आमचं सामान बांधणं सुरु आहे. मी खुप रडले. मी रडले की सगळेजण अगदी पुष्करदादापण माझं ऎकतो. पण यावेळी कुणीच माझं ऎकत नाहीए.

दि १९ एप्रिल

आम्हाला सईच्या आईनं जेवायला बोलावलं होतं. मला आवडतो म्हणून आंब्याचा रस केला होता. रस मस्त होता पण मला सारखं रडू येत होतं. मग आई म्हणाली सईला आपल्याकडे झोपायला घेऊन जाऊ. सई एकदम डफ्फर आहे. इतक्या जवळच्याजवळ यायला पण तिने मोठ्ठी ब्याग घेतली.

दि १९ एप्रिल

मी आज दोनदा डायरी लिहीली.
सई एकदम भारी शुर आहे. तिने ब्यागेत कपडे भरुन आणले आहेत. ती आमच्याबरोबर पळून येणार आहे. मला तिचा एकदम लाड आला. मी माझी पिंकी बाहूली तिला देऊन टाकली. सईला ती टकली आणि हात मोडकी बाहूली फार आवडते. जर ती आमच्याबरोबर येणार असेल तर पिंकी बाहूली पण सोबतच असेल. मला आता बरं वाटतय. सईनं मला आईशप्पत घातलय. मी ती आमच्याबरोबर पळून येणार आहे हे कुणालाच सांगणार नाही. शप्पत मोडली की ज्याची शप्पत असेल तो मरतो

दि ३ मे

आम्ही आता नव्या गावात आलो आहोत. पण आम्ही इथे येताना खुपच तमाशा झाला. आम्ही सामानाबरोबर ट्रकमधे बसूनच जाणार होतो. मला मस्त वाटलं. सईपण कधी ट्रक मधे बसली नव्हती. पण ट्रक सुरु व्हायच्या आधी बाबांनी तिला उतरवून तिच्या आईकडे दिली. तिची ब्याग पण दिली. आमचा ट्रक जोरात जात होता आणि मागे सई रडत जोरजोरात पळत होती. पळता पळता ती पडली आणि पूर्ण रस्ताभर तिची ब्याग सांडली. रस्ताभर तिचे कपडे, रंगीत खडू, खेळंपाणीतली भांडी सांडली होती. मी पण जोरात रडून दिलं. माझी पिंकी पण तिच्याचकडे राहून गेली

दि १ जून

आम्ही नव्या गावात परत घर बदललं. आधीच्या घरापेक्षा हे घर आणि आजुबाजुचे लोक चांगले आहेत. आमच्या घराच्या एका कोपरयात मोठ्ठी विहीर आहे. तिकडे अजिबात फिरकायचं नाही असं आईनं बजावून ठेवलं आहे. तिथे बहुतेक भुत असावं. विहीरीत भुत असतं असं सई सांगायची. कोरेआप्पांनी तिथे काट्याची झाडं लावून ठेवली होती. कोरेआप्पांची मुलं खुप वांड आहेत असं आई बाबांना सांगत होती. काट्याच्या झाडांवरुन उडी मारुन ती विहीरीपाशी जायची आणि आत दगड टाकायची. त्यांची विहीर असली म्हणून काय झालं? भुतांना थोडंच कळतं ते?

दि १२ जून

पुष्करदादाबरोबर आज नवाच मित्र घरी आला होता. आमच्या घराच्या बरोब्बर मागे त्याचं घर आहे. पुष्करदादा त्याच्याबरोबर परत इथेही गाण्याच्या क्लासला जाणार आहे

दि १७ जुलै

अभ्यादादा एक्दम मस्त आहे. तो पुष्करदादाला पुश म्हणतो, अनुदादाला अन्या आणि मला मुक्ते, मुक्ती, मुक्ताताई, मुक्ताडे असं काहीही म्हणतो. अभ्यादादा आणि पुशदा सकाळी उठून रियाज करतात. अभ्यादादा पुशदाला आवाज द्यायचा असला की त्याच्या खिडकीतून कूऊ ss ऊ असं ओरडतो मग पुशदा पण तसंच ओरडतो. मग ते गाणं सुरु करतात साजन मोरा ss घर नहीss इss आया. एकदम डफर आहेत. सगळ्यांची झोप उडते पण यांचं आपलं साजन मोरा सुरुच असतं

दि १३ ऑगस्ट

मला आता अभ्यादादा आणि पुशदाची सगळी गाणी पाठ झाली आहेत. ना जाओ बालम किंवा रसिया तुम बिन एकदम मस्त. त्यात शब्दच नाहीत. नुस्तंच आ ऊ किंवा नि ग सा रे असं म्हणावं लागतं. मी जोरजोरात कधी कधी ती गाणी म्हणत असते मग अभ्यादादा म्हणतो मुक्ताताई, असा कुठलाही राग कधीही नाही म्हणायचा त्यांना राग येतो बरं. पुशदा माझ्याशी कध्धी असं नाही बोलत. पुढच्या जल्मी मला अभ्यादादासारखाच भाऊ मिळो

दि १७ ऑगस्ट

मला आता बरं वाटतय. म्हणजे नां त्या दिवशी काय झालं आम्ही काही मुली पंधरा ऑगष्टसाठी फुलं जमा करत होतो. मी मुद्दाम आईने शिवलेला परकर पोलका घातला होता कारण त्याच्या ओच्यात खुप फुलं जमा करता येतात. पण आमच्या अंगणातली सगळी फुलं कुणीतरी आधीच तोडली होती. आता काय करायचं? कोरेआप्पांच्या अंगणात खुप फुलं होती. आपल्या सगळ्यांचा देश एक नां? मग पंधरा ऑगष्टसाठी चार फुलं घेतली तर काय होतं असं म्हणत आम्ही मुली तार वर करून त्यांच्या अंगणात शिरलो आणि फुलं तोडायला लागलो. माहीत नाही कुठून पण अचानक मंग्या तिथे आला. मंग्या म्हणजे कोरेआप्पांचा वांड पोरगा. आला आणि सरळ आमच्या मागेच लागला की. म्हणे आमची फुले का तोडता. मंग्या एकदम बिनडोक आहे असं पुशदा म्हणतो. एकदम दगडच फेकून मारतो म्हणे. आम्ही सरळ पळतच सुटलो. तारेतून पळताना माझा परकराला खोच पण लागली. मागे वळून मंग्याकडे बघत पळताना अचानक समोर विहीरच आली की. मंग्यानं खुप रागानं मोठ्ठा दगड उचलला अन फेकला की विहीरीत आणि वर तुलाही असंच फेकेन असंही म्हणाला. माझी तर तंद्रीच लागली. विहीरीतलं काळं पाणी गोल फिरत अचानक गार हवा बनून माझ्याभोवती फिरायला लागलं. मग त्या पाण्याला निळा आणि मग हिरवा रंग सुटला. रंगांच मग गर्र्गट झालं आणि परत सगळं पाणी काळं झालं. असं वाटलं आपल्याला कुणीतरी बोलवतय. खुप प्रयत्नांनी मी डोळे उघडले तर मी पलंगावार झोपले होते. मला म्हणे चक्कर आली होती आणि पुशदानं तिथून मला उचलून आणलेली.

दि २१ ऑगस्ट

माझा ताप उतरत नाहीए. पुशदानं मंग्याला बडवला म्हणे. आईला वाटतय की आम्हाला हे घर सोडून जावं लागेल. पुशदाची गाण्याची परिक्षा आहे पण माझी झोप मोडू नये म्हणून तो प्रॅक्टीस नाही करतए. अभ्यादादा आणि तो रोज मारुतीला जातात. त्यांच्या कपाळावर मस्त शेंदूर असतो.

दि २९ ऑगस्ट

पुशदा मला बरं वाटावं म्हणून रोज मारुतीला जातो आहे. देवा, मला सतत पुशदा सारखा भाऊ मिळो

दि १० सप्टे

आज आम्ही पुशदाच्या गाण्याच्या परिक्षेला गेलो होतो. त्याच्या गळ्यातून आवाजच निघत नव्हता. आईला वाटलं त्याने रियाज केला नाही म्हणून तसं होत आहे. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो.

दि १२ सप्टे

डॉक्टर म्हणाले की पुशदाचा आवाज शेंदूरामुळे गेला आहे. म्हणजे यानं कपाळाचा शेंदूर खाऊन बघितला की काय? मी आईला विचारलं तर ती मला जवळ घेऊन रडायलाच लागली. मी खुप घाबरले आहे.

दि २२ सप्टे

पुशदा म्हणाला की मुक्ते जिथे मी गाणं सोडलं तिथून तू सुरु करायचं. आता अभ्यादादा आणि मी रियाज करतो. काय माहीती तुम बिन चैन न आए म्हणताना आमच्या तिघांच्याही डोळ्यात पाणीच येतं

Sunday, March 29, 2009

माया

हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे
त्यात तगमग नसते उन्हाळी
निवून जाण्याचे सोसही नसतात
तुझ्या गुणसुत्रांची मांडण
कदाचित तशीच;
तालबद्ध अवरोहांची
विलंबित लय.

तुटण्याचे भय आणि
जोडण्याची उत्कटता
समेवर पेलतात
तुझे मायावी हात..

हात..
बर्फाचे
अभ्रकशुभ्र..
किंचित पारदर्शी
आणि संदिग्धही..

माझ्या देहचूर कविता
झाडात चंद्र अडकावा तश्या
उसवतात
तुझ्या स्पर्शातून

स्पर्श...
बर्फाचा..
अस्तित्वाचे दंश
पुसून रक्ताशी
एकरुप होणारा
वंशहीन..
हिवाळी ओल्या तहानेसारखा

तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या
हवाली करताना
फकिराच्या वासनेचा उरुस
तुझ्या दिठीत
पाहीला मी

आणि तेव्हापासून
माझ्या चेतनातंतूंवरुन
वाहाताहेत तुझे
ओले स्पर्श