Saturday, January 19, 2013

भुताडी झांपा

टीव्हीवर दाखवतात तश्या सुहासनं स्टंपपासून ढांगा मोजल्या आणि हातातल्या बॉलला थुंकी लावावी की नाही याचा क्षणभर विचार केला. रोंगट्या गेल्या तीन ओवर आऊट होत नव्हता. सुहासनं पाचही बोटं तोंडात घातली. मळकट रबराची चव तोंडात घोळली आणि टपकन ओलेता बॉल एक टप्पा खाऊन नेमका रोंगट्याच्या बॅटवर पडला. रोंगट्यानं त्याच्याही नकळत बॅट फिरवली आणि बॉल बी-बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर ३०३च्या गॅलरीत जाऊन पडला. तोंडावर हात दाबला तरी पोरांच्या तोंडून अस्फुट किंकाळी फुटलीच. बॉल भुताडीच्या गॅलरीत पडला होता. भुताडीच्या घरातून काहीच बाहेर पडत नाही ...माणूस सुद्धा... असा सोसायटीतल्या पोरांमधे प्रवाद होता! हा निदान चौथ्या बॉलचा बळी होता.

...

श्रीनं अस्वस्थपणे कुस बदलली. मोठं होणं म्हणजे नक्की काय हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. परवाच्याच सातव्या वाढदिवसानंतर आई-बाबांनी त्याला आता तो मोठा झालाय हे स्पष्ट सांगीतलं होतं. मोठं होणं म्हणजे खेळणी कपाटात भरुन ठेवणं, शाळेची बॅग झालंच तर कपडेही आवरुन ठेवणं असं असेल तर मोठं होणं वट्ट बोर होतं. मोठं होण्यात मजा असते जेव्हा टीव्ही बघत कधीही लोळत पॉपकॉर्न खाता येतात किंवा कसलाही अभ्यास नसणाऱ्या ऑफीसात जाऊन, आई म्हणते तसं, उनाडक्या करता येतात तेव्हा. पण यातलं काहीच होतं नव्हतं.

मोठं होणं त्याला एका बाबतीत अजिबात म्हणजे अजिबातच आवडलं नव्हतं. त्यानं म्हणे आता एकट्यानं झोपायचं होतं ...वेगळ्या खोलीत. खरं तर बाबाशी गप्पा मारत आईच्या केसांतून हात फिरवत कधी झोप लागायची कळायचंही नाही. पण त्याच्या रडण्याओरडण्याला कसलीही दाद न देता बाबानं त्याला या खोलीत आणून टाकलं होतं. आधीच नवं घर, त्यात खोलीत एकट्यानं झोपायचं... श्रीनं परत कुस बदलली. घर तिसऱ्या मजल्यावर असलं तरी उंच झाडांची टोकं खिडकीच्याही वर गेली होती. त्यांच्या सावल्यांनी श्रीची खोली गजबजून गेली होती. श्रीला वाटलं झाडं हललं की सावल्या आकार बदलाताहेत आणि बोलत नसल्या तरी त्यांच्या गोंधळानं खोली दणाणून गेलीए. उद्या हे असं एकट्यानं झोपायचं नाही असं पक्कं ठरवुन श्रीनं गच्चं डोळे मिटून घेतले.


तिसऱ्या रात्री कधी तरी श्रीची झोप चाळवली. एक रात्र लाडावुन बाबानं परत आपल्याला आपल्या खोलीत आणून झोपवलय हे श्रीला कळायला फार वेळ लागला नाही. भिंतीवर सावल्यांनी नुस्ता उच्छाद मांडला होता. श्रीनं दोन्ही हातांनी डोळे दाबून धरले आणि भिंतीकडे पाठ फिरवली. उत्क्रांतीत विरत गेल्या तरी काही नैसर्गिक प्रेरणा वेळप्रसंगी उफाळुन येतातच. कुणाचं आपल्याकडं एकटक बघणं जाणवणं ही अशीच एक प्रेरणा. डोळे मिटले असले तरी श्रीला तशी जाणीव झाली. बोटांच्या फटीतून त्यानं डोळे किलकिले करुन बघितले. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर त्याच पलंगावर एक म्हातारी त्याच्याकडे टक लावून बघत पडली होती. श्री त्याच्याही नकळत मोठ्यांदा किंचाळला फक्त आवाज तेव्हढा आला नाही. रात्री उशीरा कधी तरी ग्लानीआल्यागत झालं आणि त्याच्याही नकळत त्याला झोप लागून गेली.


श्रीला वाटलं हे फारच भयंकर आहे. कुणी म्हणजे कुणीही आपल्यावर विश्वास दाखवु नये याला काहीच अर्थ नव्हता. आईला वाटतं की तो घाबरतोय तर बाबाला वाटतं की त्याला एकट्याला झोपायचं नाही म्हणून तो खोटं बोलतोय. श्रीला नुस्त्या कल्पनेनंपण रडु आलं. या असल्या मोठ्या होण्याला काहीच अर्थ नव्हता.


परत रात्र झाली. तट्ट डोळ्यांनी श्री भिंतींवरच्या सावल्यांकडे वटारुन बघत होता जणू काही कालची म्हातारी आज परत येणार होती- सावल्या-सावल्यांतून. त्यानं अस्वस्थपणे स्ट्रॉ चोखून बघितला. वॉटरबॅगमधलं पाणी कधीचं संपलं होतं. त्याला वाटलं आपल्याला आता शू होणार. पलंगापासून बाथरुम फार अंतरावर नव्हतं. पळत पळत गेलो तर कदाचित पोहचूनही जाऊ असं त्याला वाटलं. पाठीला डोळे नव्हते तरी पलंगावर मागे कुणी नाही याचा त्याला अंदाज आला तशी त्यानं उडी मारुन बाथरुमकडे धाव ठोकली. श्रीनं धाड्कन दरवाजा उघडला आणि आतून बाहेर येणारी म्हातारी मोठ्यांदा दचकली.


श्रीनं डोळे उघडले तेव्हा कपाळावरच्या थोरल्या टेंगळाची दुःखद जाणीव त्याला झाली. बाथरुमच्या चौकटीवरुन पलंगावर आपण कसे आलो हे कळायचा काहीच मार्ग नव्हता. पलंगाच्या काठावर म्हातारी रागानं त्याच्याचकडे बघत बसली होती.

"कश्याला आलायस माझ्या घरात? कोण आहेस तू?" म्हातारीच्या आवाजात जहरी संताप तटतटून भरला होता

श्रीच्या पोटात दाटून दुखायला लागलं. आत्ताच्या आत्ता दार उघडून कुणी आलं नाही तर आपण मरुनच जाऊ असं त्याला वाटलं. पण कुणीच आलं नाही.
...

दुसऱ्या दिवशी कुणीच त्याच्या गोष्टीवर विश्वासही ठेवला नाही. पण रात्र होत आली तसं त्याला स्वतःच्याच छातीतून रेल्वे पळाल्यागत धाडधाड आवाज ऎकू यायला लागला.
"मला माहीतीए, तू जागा आहेस. इकडे बघ" म्हातारीची चिरकी कुजबुज रात्रीचा अवकाश भरायला पुरेशी होती. "तू इथून जा. हे माझं घर आहे"
श्रीनं अंदाज घेतला. खोलीचं दार उघडं होतं. म्हणजे पळायचं झालं तर पांघरुण उचलायचं आणि धुम ठोकायची इतकंच. "पण आता आम्ही इथे राहायला आलोय. हे घर आता आमचै" स्वतःच्याही नकळत श्रीनं प्रतिवाद केला. ’एक शब्द खाली पडु देत नाही’ हे आईचं पेट्ट वाक्य श्रीला चुकीच्यावेळी आठवलं.

म्हातारी भस्सकन वसकली "बोलता येतं की तुला. परवापासून नुस्ता पळ पळ पळतोयस..हे बघ, गेली कित्येक वर्ष मी इथे राहातेय. फुकटचा ताप नकोय मला. आणि मुलांचा तर अजिबात नकोय"

"का?" प्रतिक्षिप्त क्रियेसारखा श्रीनं त्याच्याही नकळत प्रश्न विचारला.

म्हातारी सरसावुन बसली "फार बोलतोस तू. काय नाव काय आहे तुझं?"

"श्री"

"श्री? एव्हढंच? फक्त श्री?"

"म्हणजे मला श्री म्हणतात. श्रीराम नावै माझं. तुमचं?"

म्हातारी डॊळे बारिक करत वैतागली तश्या भिंतीवरच्या सावल्या जास्तच भिरभिरल्या "मला मुलं आवडत नाहीत. त्यांचे प्रश्न तर अजिबातच नाही." काही तरी आठवत नसल्यासारखं म्हातारीचे डोळे धुके झाले "आमचं आडनाव शुक्रे"

"पण मुलं का नाही आवडत तुम्हाला शुक्रेआज्जी?"

"झोप मुकाट. खुप रात्र झालीए."

...

कधी एकदा रात्र होते असं श्रीला झालं. आई-बाबांना यातलं काही म्हणजे काही सांगायचं नाही असं त्यानं पक्कं ठरवुन टाकलं होतं. डोळे छताला भिडवुन त्यानं अटीतटीनं झोप परतवुन लावायचा प्रयत्न केला पण कधीतरी पापण्या लवंडुन गेल्या.

"उठ. मुर्खासारखा परत इथेच आलास?" म्हातारी वाळक्या काटकीसारखं बोट श्रीच्या पाठीत टोचून बोलली.

झोपेतून उठण्यातला उत्साह श्रीला नवाच होता.

"तुम्हाला करमत नाही नां माझ्याशिवाय? आईपण असंच म्हणते" श्री निवांत होत बोलला. खोलीचं दार उघडं होतंच...दोन ढांगा टाकल्या की बाहेर...
...

"आज्जी गं, झोपु दे नां" श्री करवदुन म्हातारीला म्हणाला "रोज रात्री उठवुन गप्प्पा मारत बसवतेस...डोळे बघ माझे कसे लाल झाले आहेत"

"म्हाताऱ्या माणसांचा सगळ्यांना कंटाळा येतो. पोरं येतात, जीव लावतात आणि जाताना जीव घेऊन जातात..." म्हातारी डोळ्यांना शुन्यात रोखत म्हणाली "एकटी कशी बरी राहात होते मी. म्हटलं होतं नां इथून जा म्हणून. कश्य़ाला राहीलास? आणि आता म्हणतोस झोपु दे...मी बोलु कुणाशी?"

श्रीला धडं काय ते कळालं नाही पण समजावल्यासारख्या स्वरात तो म्हणाला "अगं आज्जी, कंटाळा येतो तर सगळ्यांशी गप्पा माराव्यात. आई म्हणते बोललं की बरं वाटतं. बाबा म्हणतो मी खुप बोलतो. तुला उगीच वाटतं तुला मुलं आवडत नाहीत म्हणून. मी तुला आवडलो की नै? तू जरा या खोलीबाहेर पडून गप्पा मारायला लाग. तुला मजा येते की नै बघ...आता झोपु?"

खोल श्वास घेत म्हातारी उत्तरली "झोप...एकदाचा..."

...

रोंगट्यानं घाबऱ्याघुबऱ्या बी-३०३चा दरवाजा वाजवला. सुहास, उम्या, केवड्या चड्डीतल्या चड्डीत थरथरत रोंगट्याचा हात धरुन उभे होते. ’सगळे बॉल शोधून घेऊन या नाहीतर तंगडं तोडेन’ असल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर सगळी टीम घेऊन रोंगट्या बी-३०३ला आला होता. श्रीनं हॉलमधे बसलेल्या म्हातारीकडे एकदा बघितलं आणि दरवाजा उघडला.

सगळी पोरं श्रीच्या आरपार चालत सोफ्यावर बसलेल्या म्हातारीकडे गेली.


"घ्या रे पोरांनो तुमचे चेंडु" आज्जीनं जमेल तेव्हढा प्रेमळ आवाज काढला "तुम्ही कधीच येत नाही आणि गॅलरीत हे ढीगभर चेंडु जमा होते. थोडा शिरा खाता?"

"शुक्रे आज्जी काय तेव्हढ्या डेंजर नाहीत हां" चेपल्या आवाजात उम्या रोंगट्याला म्हणाला. तोंडात शिऱ्याचा मोठा घास असल्यानं रोंगट्यानं नुस्तीच होकारार्थी मान हलवली.

"रोज तुमचं खेळणं झालं की याल का रे इथे? तुमच्याकडून रामरक्षा पाठ करुन घेते" आज्जीला अचानक आठवलं.


मान हलवत पोरं श्रीच्या आरपार चालत बाहेर पडली.


"आज्जी, आता हा गॅलरीचा दरवाजा जरा उघडा ठेव म्हणजे खालची गंमत बघत तुझा टाईमपास होईल" श्रीनं बसल्या जागून आज्जीला गॅलरीचा दरवाजा उघडून दिला आणि तरंगत तरंगत तो आतल्या खोलीत झोपायला गेला.

Thursday, January 17, 2013

साहित्यिक भौ- तेरी कहके ले ली रे बावा

म्हणजे संपलंच म्हणायचं एकदाचं! संमेलनाचं सुप वाजलं हा वर्तमानपत्रवाल्यांचा लई लाडका शब्द. तर तेही वाजून झालं.


हल्ली होतं काय आहे की संमेलनाच्या अध्यक्षांची ओळख दिपिका चिखलीयापेक्षाही कमी असते. म्हणजे जे काही बापडे मराठी य्मयेच्या वाटेला गेलेले असतात केवळ तेच अध्यक्षांना साहित्यिकली ओळखु शकतात. आता या उत्सवांना एकदा श्टार व्हॅल्यु नाही म्हटलं की विचारतं कोण? अध्यक्षांनं एक तर लोकप्रिय तरी असावं किंवा समिक्षकप्रिय तरी...रमेश मंत्री, (गेले बिचारे) इंदिरा संतांना हरवुन (!!) अध्यक्ष झालेच होते की. त्यानं होतं काय की एक तर त्यांचा मेशेज जनमनात पोचतो किंवा मायमराठीच्या विचारधारेत ते कसली तरी भर पाडतात. आता काय एकूणच दोन्ही बाबतीत आनंद.

जेव्हा पासून वेडा डब्बा आला, डब्बेवाल्या काकांनी ठरवुनच टाकलं की लोकांना जड, गंभीर काही म्हणजे काही पचत नाही. त्याच चालीवर संमेलनातल्या गंभीर परिसंवादांना फाटा मारण्यात आला. यावेळी म्हणे राजकीय नेत्यांसाठी माझं वाचन की कायसा परिसंवाद ठेवला होता. त्याला बहुतेक बगळ्यांनी दांडी मारली. साहाजिक आहे. राजकारणात टिकायचं म्हणजे साहित्यवगैरे विषयांपासून दुर असलेलं बरं.

हल्ली मराठीत साहित्यीक जमात उदंड झाली आहे. कसंबसं लिहीलेलं एखादं पुस्तक स्वस्तात छापायचं, भाऊ-दादाला सांगून, चार पैशे खर्च करुन कुठल्याश्या अभ्यासक्रमात लावायचं की झाले तुम्ही साहित्यीक. संमेलनात हल्ली मोठ्या प्रमाणावर उंडारते ती ही असली जमात. यांना ऎकायला कोण जाणार? हल्ली चांगलं लिहीतं कोण? एखादी मेघना पेठे एखादा शफात खान, एखादा इंद्रजीत भालेराव, एखादा???.... बाकी चांगलं लिहीणारे खुपसे इंसिडेन्टल लिहीतात. त्यात सातत्य नाही, माहिती असते पण विचार नाही...

बरं ही करमणुक कमी होती की काय म्हणून यावेळी न-साहित्यीक वाद पार गुद्दागुद्दीवर आले. म्हणजे गेल्या संमेलनातही यादवांना वनवासात जावे लागले होते पण यावेळी जाज्वल्य अभिमानी बाहुबलींनी जाळून टाकु, काळं फासु, उधळुन लावु वगैरे अश्या तेजस्वी घोषणा दिल्या. काही शतकांपुर्वी भारता बाहेरुन आलेल्या लुटारुंनी संस्कृतीचा लोप व्हावा म्हणून भली थोर ग्रंथालये जाळली होती म्हणे....असंच युरोपात, बहुदा इंग्रजांच्या देशात, कुठल्याश्या कवीला म्हणे बग्गीवाल्याच्या चाबकाच्या फटक्यांचा त्रास व्हायचा, कविताच सुचायच्या नाहीत म्हणून त्यानं राजाकडे तक्रार केली. तेव्हापासून आजतागायत बग्गीवाल्यांना तिथे चाबूक वापरायची बंदी आहे म्हणे. असो. असते एकेकाची संस्कृती!!

संस्कृतीवरुन आठवलं. आपल्या असंस्कृतपणाबद्दल चर्चिल की कोणीसं एकदम बरोबर सांगून गेला होता की एकदा का आपल्यासारख्या रानटी आणि फसवणुक करणाऱ्यांच्या हातात देश गेला की झालंच कल्याण. त्यातल्या त्यात साहित्य क्षेत्र जरा अराजकिय होतं पण संमेलन फुकट आणि सुंदर करण्याच्या नादात आपण त्याला राजकारण्यांच्या अंगणात नेऊन बांधलं. राजकारण हे भारतातलं असं एकंच क्षेत्र आहे जिथे लायकीपेक्षा उदंड पैसा, प्रसिद्धी आणि पॉवर कमीत कमी श्रमात मिळु शकतात. आपल्या आयुष्यात अराजकिय असं काहीच नाही. आपण चालतो त्या रस्त्याचा टोल, बघतो त्या सिनेमाची निर्मिती, खेळतो त्या संघाची मालकी, खातो त्या धान्याची अडती, बघतो त्या बातम्यांची बातमी इ इ इ राजकारण्यांनी व्यापलेलं आहे. रद्दीचा भाव आणि साहित्य अशी जोड लावणाऱ्या या जमातीला अचानक का बरं पुळका आला संमेलनाचा? उत्तर सिध्धं आहे. विविध निधीतून दिले जाणारे पैसे, खाण्यापिण्याची कंत्राटं, लागणारी वाहानं, उतरायची हाटेलं सगळ्यासगळ्यातून अमाप माया मिळते. शिवाय प्रसिद्धी आणि मायबोलीची सेवा केल्याचं श्रेय आहेच. पण निब्बर कातडीच्या साहित्यिकांना याचं ना दुःख ना खेद.

तर थोडक्यात काय की या वेळी साहित्यिक भौची एकूणंच कह के ले ली असं झालेलं आहे.

ता.क.- फे.बु वर नुक्तीच एका मित्रानं कविता टाकली आहे. पुढंच संमेलन म्हणे पिंपरी चिंचवडात आहे आणि त्यासाठी सोन्याचे सदरे आणि सोन्याच्या चड्यांची ऑर्डर आत्ताच गेली आहे.

वांझोट्या सात्विक संतापापोटी लिहीलेलं पोस्ट वाचवत नसेल तर गरजुंनी पुढील दुवे वाचावेत

बाबुराव हरवले आहेत..!

http://www.loksatta.com/sampadkiya-news/baburao-is-missing-40311/


साहित्यसंमेलन आणि मी

http://meghanabhuskute.blogspot.in/2013/01/blog-post.html

Monday, January 7, 2013

आईराजा उदो उदो


आठवणींचा नुस्ता काला झालाय. नियमांचे गारगोटी अट्टहास होण्याआधीच्या देवी तुझ्या आठवणी, देवी तुझा गोंधळ.

सातलाच रात्र व्हायची, लाईटीचे निव्वळ अपवाद, आग्रहही नसायचाच, लोक तसे समजुतदार होते. गोंधळाच्या रात्री मग तेलाचे पलिते पेटायचे. सरगाठ, निरगाठ, आतली गाठ, सगळं सगळं आवळुन आराधी, आराधणी जुन्या साड्यांचे पलिते बनवायचे. पलिते, घट्ट, सापासारखे, भप्पकन पेटून उठायचे नाही पण धुमसत राहायचे, रात्रभर. आराधी एरवी म्युन्सीपाल्टीत गटारगाडा ओढायचा पण नवरात्रात आकाशी निळ्या रंगाचा नेहरुशर्ट घालायचा. बघावं तेव्हा नशेत असल्यासारखे डोळे चढलेले, केस खांद्यावरुन खाली ओघळलेले, त्याच्याशी एक वाक्य बोलायचं म्हटलं की पाक्पुक व्हायचं. पण त्याच्या हलगीचं भारी आकर्षण. हलगी चढव्हायला आगीवर शेकावी लागायची. ताणलेल्या कातड्यावर फटकारलं की आवाज होतोच.

कॅलिडास्कोप थोडा फिरवला की मला सुभाषदादाचा भाऊ आठवतो. भिमसेनांकडे शिकायचा. उन्हाळ्यात तो आला की रात्री गाण्यांची मैफल जमायची. सर्वात शेवटी त्याला कुणीतरी जोगवा म्हणायचा आग्रह करायचा. पेटी-तबला बाजुला सारुन भली मोठी परात तो उपडी घालायचा आणि त्यावर ताल धरुन तो ’आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन’ म्हणायचा. अंगभर नुस्ता ताल; आपेगावकरबापुंच्या पखवाजासारखा, घुमत्कार...ताणलेल्या कातड्यावर फटकारलं की आवाज होतोच.

पलित्यांच्या उजेडात जेव्हढं देऊळ उजळायचं तेव्हढाच अंधार अंग चोरत प्रदक्षिणेचे रस्ते अजून गर्द करायचा. देवळात महापूर...माणसांचा, करवंट्यांचा, घामाचा. महापूर...श्रद्धा, पाप निस्तरण्याचा, परंपरा, विश्वासाचा. भावनेचा तुंबा स्फोट. हिरव्या साड्यांची देवीच्या खोलीत महाप्रचंड लाट...आणि देवी? 

केसांना उदवुन आलीस
पाण्याला भलती ओल
हिरव्या लहरीतून उठते
तू लख्ख जरीचे फुल

चांदीचे डोळे भगवे
मणक्यात खडीचे सर्प
निजलेल्या गोष्टीमधला
तू गारठलेला बर्फ

मळवटात दडल्या रेषा
कवड्यांचे भाकित थोर
लखलखत्या पदरावरती
तू भुल घातला मोर

पलित्यांच्या उजेडात पालखी निघायची. छोटीशी दिपमाळ चमकुन उभी राहायची. झांज, हलगीच्या आवाजाचा गोंगाट व्हायचा नाही. तालात कसलं आव्हान नसायचं. एक नुस्ताच झेन प्रवाह- नैसर्गिकरित्या वाहात जाण्याचा. पालखी परतली की देवळात गोंधळ सुरु व्हायचा. दुरड्या सरकवल्या जायच्या. कवड्यांची किणकिण वाढायची.

कॅलिडास्कोप परत फिरतो. मारुतीराव चितमपल्लींनी वारसाहक्कात देवीची कवड्य़ांची माळ आणि दुरडी मागून घेतली होती म्हणतात. मोठं कठीण व्रत. म्हटलंच तर देहभानाच्या स्वातंत्र्याचा एक अजाण उत्सव.

आराधणी बेभान घुमत असतात. मोकळे केस, कपाळभर पसरलेलं मळवट, अस्ताव्यस्त पदर...कुठल्या दबलेल्या भावना, दडपलेल्या वासना उन्मुक्त वाहात असतात. देवी स्वस्थ उभी असते. मध्येच पलित्यांच्या उजेडात एखादी गोंदणनक्षी क्षणभर चमकून जाते.

हातांवर नक्षी हिरवी
गोंदणात लपवी राणी
प्रश्नांचे टिंब ठिबकते
की गुढ आतले पाणी

बाईचे अंगण भुरटे
कवड्यांची उन्मन माळ
सांभाळ बयो पदराला
न गावात उडेल गं राळ

कवड्यांचे बनती फासे
चालीत बदलते दान
पलित्यांच्या अंधारात
देहातून उफळे रान

गोंधळ संपत येतो तसा ’आईराजा उदे उदे’चा एकच गजर होतो. देवळाच्या अवकाशात काही क्षणांपुरता गोठलेला काळ परत मोकळा वाहु लागतो.
देवी बंद दाराआड मुर्ती होवून उभी असते.