Friday, November 25, 2011

भिन्न षड्ज

हल्ली अचानक चांगलं घडण्यावर फारसा विश्वास उरलेला नाही. चांगलं घडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि याउपरही काही बरं घडेल याची खात्री कमीच. पण तसं अचानक घडलं खरं. कोऱ्या मनानं क्रॉसवर्डमधे हिंडत असताना सवयीनं एक चक्कर सीड्यांमधून मारली. गेली कित्येक वर्षं एकही सीडी विकली न गेल्यासारखा तो सेक्शन. तेच ते अगम्य इंग्रजी आल्बम, जुनेच जसराज, भिमसेन, तडकामारु पण त्यातल्यात्यात खपावु रिमिक्स आल्बम वगैरे वगैरे. मला इथून हिंडताना शेवाळल्यासारखं वाटतं. तरीही आशाळभुतपणे मी काही वेगळं मिळेल म्हणून चौकस डोळे फिरवले. "भिन्न षड्ज". मी घाईघाईनं सीडी उचलली. एकच होती. कुणी हिसकावुन घेतली तर? नकळत सीडीवरची पकड घट्ट झाली. सीडीत काय आहे हे माहीत असतानाही परत एकदा कव्हर वाचून काढताना आजि म्या ब्रम्ह पाहीलेची अनुभुती आली.
खरं म्हणजे मी स्वतःपुरत्या काही चौकटी आखलेल्या आहेत. ब्लॉगवर आवडती सार्वजनिक माणसं आणायची नाहीत हा त्यातला एक महत्वाचा नियम. ब्लॉगवर कविता पिटायच्या नाहीत हाही एक समजुतदार नियम. पण बऱ्याचदा हव्यासापोटी हे नियम मोडले गेले. आतली गाठ नियमांपेक्षा मोठी ठरली.
भिन्न षड्ज तर नियमांपलीकडे जाणाऱ्या माणसाचा सिनेमा. म्हणून परत एकदा नियम बाजुला ठेवून मी लिहायला बसलोय. हा खरं तर विरोधाभास आहे. बाईंना एकुणात शब्द खटकतात. त्यांना स्वरांनीच सगळं सांगायचं असतं. कितीतरी वेळा हे ऎकलय मी. आणि परत शब्दच वापरुन सगळं लिहीतोय मी. दुसरा गोंधळ, जवळची किंवा जवळीक दाखवणारी माणसं त्यांना ताई- किशोरीताई म्हणतात. मी अगदी जन्मल्यापासून नाही तरी आठवतं तेव्हापासून त्यांना बाईच म्हणतो म्हणजे बाई अगदी आग्यावेताळ आहेत हां किंवा बाईंनी आज कत्ल केला असं. गोंधळागोंधळात मेंदु अजून थोडा सुरकुतला.
अमोल पालेकरांनी आयुष्यात अनेक धाडसी कामं केलीत, बादल सरकार महोत्सव त्यातलंच एक महत्वाचं. पण किशोरी आमोणकरांवर डॉक्युमेंटरी करणं हे जीवावर बेतु शकणारं काम. बाईंचे मुड्स सांभाळणं हा मोठा धोका झालाच पण त्याहूनही धोकादायक म्हणजे बाईंच्या अलौकीक गाण्याचं, त्यांच्या वेगळेपणाचं नेमकं संक्षिप्तीकरण करुन ते लोकांसमोर ठेवणं. पण पालेकरांनी हे काम केलं, बऱ्या प्रमाणात यशस्वीरित्या केलं.
बाईंच्या गाण्यातलं वेगळेपण फार सुंदररित्या त्यांनी स्वतः तर सांगीतलं आहेच पण गंमत म्हणजे शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन यांनीही जवळ जवळ ते तसंच पकडलय. बाई म्हणतात, मी गाताना गाण्यातला भाव होऊन जाते! कुणी गाताना असं गाणंच होऊन जात असेल तर बाई, तुम्ही त्रासदायक अ-तरल महाभागांवर खुशाल ओरडा. या डॉक्युमेंटरीचा एक चांगला गुण म्हणजे इथे पिसाटलेला निवेदक नाही. बहुतेक वेळ बाई बोलतात किंवा इतर सहकलाकार. बाईंना तापट म्हणणाऱ्यांना बाईंच एक वेगळंच रुप या फिल्म मधे बघायला मिळतं जेव्हा त्या मोगुबाईंबद्दल बोलतात. आईनं मला शिकवलं असतं तर मी आज कुठे असते असा सवाल बाईंच्या तोंडून ऎकायला मिळाला, तेव्हा गरगरायला झालं. बाईंची मी स्वतः विकत घेऊन ऎकलेली पहीली कॅसेट म्हणजे हंसध्वनी. एखाद्या रागाचा इतका सुंदर विस्तार फार विचारी गायकालाच करता येतो असं माझं तेव्हाचं प्राथमिक मत जेव्हा मी आज बाईंच्या या वाक्याशी ताडून बघतो तेव्हा तापट बाई खऱ्या की गुरुभक्त शिष्या बाई खऱ्या हाच प्रश्न उरतो. इथे नकळत लता-माई दुकलीशी तुलना झाली. बाईंचा आवाज गेला तेव्हाची परिस्थिती बाईंच्या मुलांनी सांगीतली आहे. दहा वर्ष- न गाता- शक्यय? बाईंनी तत्व सोपं केलं, मी आतल्या आत गात होते! डिट्टो कुमार!! दिशा असली की प्रवासाला शिस्त राहाते खरंय पण मुळात प्रवासातच जर हरखुन जाता येत असेल तर कुठं जायचयं कितपत महत्वाचं मानायचं? एखाद्या गुढ कोड्याचा उलगडा व्हावा तश्या बाई उलगडत जातात. बाईंवर घराण्याची परंपरा मोडल्याचा आरोप होतो. मला स्वतःला कुणा क्रिएटीव्ह माणसानं नियम वगैरे तोडला की प्रचंड आनंद होतो. आता नक्कीच नवं काही तरी होण्याची एक शक्यता तिथे जन्माला आलेली असते. कुमारांनी बऱ्याच चौकटी पारच मोडून टाकल्या. बाईंनी तेव्हढी नासधुस केली नाही याच उलट मला वाईटंच वाटतं. कुणाला घराण्याला बांधीलच आलापी ऎकायच्या असतील तर आद्य-पुरुषाच्या रेकॉर्डच ऎका. एकच राग जेव्हा गायक वेगवेगळ्या मैफिलीत गातो, तेव्हा प्रत्येक वेळी ती नव-निर्मीती असते हे हिंदुस्थानी गान परंपरेचं वैशिष्ट्य. दोन स्वरांमधलं अवकाश कसं पेलायचं, स्वरांना आकार कसा द्यायचा यावर विचारी गायक जेव्हा चिंतन करतो, तेव्हाच नवं काहीतरी निर्माण होतं. झापडबाज समिक्षकांना देव क्षमा करो!
अगदी भाबडेपणे सांगायचं तर अमोल पालेकर आणि संध्या गोखलेंनी फार पुण्याचं काम केलय. उच्च निर्मितीमुल्य, नेमका फोकस, फापटपसाऱ्याला चाट, दुर्मिळ क्लिप्स, नेमकेपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सव्वा तास शब्दांपलीकडच्या गाण्याचं तत्वज्ञान आणि ते मांडणारी तत्ववेत्ती!
तरीही...
पालेकरांनी काही गोष्टी करायलाच हव्या होत्या...
बाईंनी त्यांच्या पुस्तकात राग-विचार मांडला आहे. स्वराचा उगम, त्याचं वैशिष्ट, प्राचीन परंपरा इ. बाईंनी थोडं ते इथं सोपं करुन सांगीतलं असतं तर ....
बाईंनी काही भजनं फार सुंदर म्हटली आहेत विशेषतः मीरेची. त्या आर्ततेमागे बाईंचं आत्मा-परमात्मा असं काहीसं तत्व आहे. ते स्वतः बाई सांगत्या तर...
बाईंनी काही वर्कशॉप्स केली होती. त्याचे काही तुकडे फिल्म मधे आहेत. पण या वर्कशॉप क्लीप्स निवांत मिळत्या तर....
बाई कश्या शिकल्या याबद्दल थोडक्यात उल्लेख आलाय. पण त्या शिक्षणावर बाईंनी कसा विचार केला आणि बाई इतरांच्या पन्नास पावलं पुढे कश्या गेल्या कळतं तर...
फिल्म सव्वा तासा ऎवजी अजून मोठी असती तर............

काही लोक समाधानी नसतात हेच खरं. पण ते किती बरंय!

Monday, November 21, 2011

रेषेवरची अक्षरे - स्टार माझा

स्नेहलमुळे यावेळी रेषेवरची अक्षरे स्टार माझा वर चमकलाय! थॅन्क्स स्नेहल
Thanks to Snehal, Reshewarchi Akshare is covered by Star Maza!

http://www.youtube.com/user/starmajha#p/search/0/0k0pisLF3SU

Wednesday, October 26, 2011

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी,सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.


इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.


दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत.


अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.


तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०११

Wednesday, August 31, 2011

चौकटी बाहेरचं गाणं: मुझे जां ना कहो मेरी जां...


काही समज असतात म्हणजे पक्केच असतात. उदा. सिनेमातलं गाणं म्हणजे किशोर आणि लता. मापटं दाबून दाबून मी त्यात आशा बसवतोच, पर्यायच नाही. सिनेमातलं गाणं म्हणजे आर डी., सलीलदा वगैरे वगैरे. जिनिअस लोकांमधे असली प्रतवारी करायलं बसलं की तुम पुकार लो वाला हेमंतकुमार, आपकी याद आती रही वाली छाया गांगुली, लग जा गले वाला मदन मोहन, सिने मे जलन वाला जयदेव ते पार.. दिल से वाला रहमान येऊन आपल्याकडे "यू तुच्छ!" अशी नजर टाकताहेत असा सॉलीड भास होतो. तोंडावर असं सण्णकुन आपटल्यावरही जित्याची खोड जात नाही.

मग ठरवलं काही तरी सर्वसमावेश (!) करु आणि आपल्याला बिनतोड कोण आवडतं ते एकदाचं (हाय...) ठरवुनच टाकु.

निवांतात कॉम्बिनेशन्स बघायला बसलो. लता- आर डी- गुलजार, आशा- आर डी - गुलजार इ. इ. म्हटलं यातून लसावि काढू आणि वा वा....गणित आणि कला यांचा अपूर्व संगम घडवुन आणि. . हे वेडेचाळे अजून किती चालले असते माहीत नाही पण मुझे जां ना कहो मेरी जां..आठवलं आणि खेळ खल्लास झाला. जिनिअसांमधे नंबरांची उतरण कसली लावायची?

गाणं- गुलजार
संगीत- कनु राय
आवाज- गीता दत्त

मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां
जां ना कहो अनजान मुझे, जान कहां रहती है सदा
अनजाने क्‍या जानें, जान के जाए कौन भला
मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां ।।


सर्कसच्या धुवट प्रकाशात जग्लरनं सराईतपणे चेंडु हवेत फिरवावेत तसं गुलजार शब्द फिरवतो. जीवलगाची ही जीवघेणी विनवणी! सगळ्या भाषांमधे अशीनतशी शब्दांची गंमत असतेच. पण हिंदी/उर्दुला जो लहेजा आहे, जी आदब आहे, जे वजन आहे ते (कबुल करुनच टाकतो) मराठीला नाही. मराठी तशी टणक आणि प्रसंगी उग्र भाषा आहे. अर्थात आरती प्रभु वगैरेंनीं त्यातूनही नक्षीकाम केलेलं आहे ही त्यांची प्रतिभासाधना. असो. शब्दांचे खेळ खेळताना हे सिनेमातलं गाणं आहे याचं गुलजारनं कुठंच भान सुटु दिलं नाहीए. पती-पत्नीतला दुरावा जां ना कहो अनजान मुझे या एकाच ओळीत अधोरेखित करुन आख्ख्या सिनेमाचा गाभा हा असा पकडायला फार ताकद लागते. प्राण-प्राणनाथा अशी उतरंड रचताना नात्यांमधली अनोळख सारा सारीपाट क्षणार्धात उधळु शकते ही शक्यता, नव्हे, ही भिती, गीता दत्तच्या आवाजात लख्ख ऎकु येते.

हे गाणं गीता दत्तखेरीज कुण्या दुसऱ्याच्या आवाजात ही कल्पना देखील असह्य आहे. किंचित अनुनासिक, अस्पष्ट, बंगाली छापाचा गीता दत्तचा आवाज गाण्याच्या दोन-तीन मिनिटात गाण्यात भावना पाहीजे म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच आहे. गाण्याच्या सुरुवातीला मुझे जां ना कहो मेरी जां वर निव्वळ अर्धा मिलिमीटरचं हसु, जां शब्दावर अंग-बेतलेलं कंपन आणि गाणंभर पसरलेली कमालीची दुखावलेली मादकता.

सुखे सावन बरस गए
कितने बार इन आंखोसे
दो बुंदे ना बरसे, इन भिगी पलकों से
मेरी जां...

या कडव्यात दुसऱ्या ओळीत गाणं आऊट ऑफ ट्युन होण्याचं किंवा यतीभंग होण्याचं भय काय असतं हे कुठलाही गानवेडा सहज सांगु शकतो. कनु रायनं काय चतकोर-पाव सुरात ते जे काही सांभाळलय त्याला तोड नाही! या गृहस्थाविषयी आपल्याला काहीच माहिती नसावी? पाप..

तिसरं कडवं परत गुलजार आणि गीता दत्तच्या नावानं!

होंठ झुके जब होठोंपर
सांस उलझी हो सांसोमें
दो जुडवा होठों की, बात कहो आंखोंसे
मेरी जां...

दबलेल्या श्रृंगाराची अव्यक्त अनुभुती अजून किती समर्पक शब्दात सांगावी गुलजार माणसा? आणि गीता दत्तनं सांस उलझी हो सांसोमें ओळीत सांस शब्दावर जे काही चेटूक केलय ते शब्दातीत आहे.शहाण्या माणसानं लौकीक अर्थानं श्वास रोखून पुनःपुन्हा या ओळी ऎकाव्यात. प्रत्येक कडव्याच्या पहील्या दोन ओळींच्या पुनरावृत्तीत, कंपनांमधे अतीसुक्ष्म फरक आहे. पहील्यांदा येताना या ओळी किंचित आवेगाने, ठसठशीतपणे येतात. पुनरावृत्तीत मात्र हताश झाल्यागत, साशंकपणे सोडुन दिल्याप्रमाणे प्रवाही येतात. शेवटच्या कडव्यात हे प्रकर्षानं जाणवतं सांस शब्दावर. पहील्यांदा गाताना तो शब्द किंचित आत ओढून घेतलेला आहे. जिनिअस! गाण्याविषयी बोलताना पडद्यावर ते साकारणाऱ्या पात्रांना टाळायचा मी फार प्रयत्न करतोय पण या कडव्यात ते अशक्य होऊन बसलय. स्मिताविषयी लिहीताना मागं मी लिहीलं होतं की सध्या सिनेमात इतके प्रयोग सुरु असताना त्या प्रयोगांना न्याय द्यायला स्मिता आज हवी होती. संजीवकुमारच्या बाबतीत हेच वाक्य मी काना-मात्रेचा बदल न करता म्हणु शकतो. पुर्ण गाणंभर त्यानं अवघडलेपण, हरवलेपण, रितेपण अत्यंत सहजतेनं वागवलय. दो जुडवा होठों की ओळींवर मात्र त्यानं त्याचे सिग्नेचर लुक्स दिलेत. ठाकुर डोळ्यांनी बोलतो तो असा! तनुजाच्या बाबतीत म्हटलं तर अन्यायच झाला. नुतनच्या अव्वल बेंचमार्कशी तुलना आणि तिचा स्वतःचा ढांग स्वभाव यामुळे तनुजा कायमच रॉ राहीली. कुठल्याही अविर्भावाशिवाय तनुजा या संपुर्ण गाण्यात हातातुन काही तरी अनमोल निसटण्याची धास्ती, कोसळतय ते सावरण्याचे आटोकाट प्रयत्न, अवस्थ तरी आपण आखलेल्या वर्तुळाविषयी अश्वस्त भाव देहबोलीतून सहज दाखवत राहाते.

गाणं संपतं ते परत मेरी जां..च्या अवीट सुंदर समेवर. फक्त यावेळी भर पडली असते ती गीता दत्तच्या लाडीक हसण्याची...


------**********------

आपण असंख्य गाणी ऎकतो. काही बकवास असतात, काही ऑल टाईम ग्रेट असतात, तर काही क्षणिक लाडके असतात. यातही परत काही कायम काळजाच्याजवळ असतात ते विशिष्ट "चौकटीं"मुळे. ही चौकट म्हणजे ठराविक संगीतकार, गीतकार आणि /किंवा गायक-गायिका इ इ यांची युती. हा खो खो सुरु करतोय तो अश्या गाण्यांसाठी जी तुमच्या लाडक्या चौकटीबाहेरची आहेत पण तुम्हाला जवळची आहेत. खो कुणाला द्यायचा, किती जणांना द्यायचा असा काही नियम नाही. शक्यतो एकाच गाण्याविषयी लिहीलेलं बरं आणि गाणं नवं की जुनं, गाजलेलं की न ऎकलेलं असली बंधनं नाहीत. एकच प्रामाणिकपणा स्वतःशी बाळगायचा तो म्हणजे आपली चौकट स्वतःच ठरवायची आणि त्याबाहेरचं गाणं निवडायचं.

Sunday, August 21, 2011

थोडंसं झेन आर्ट मालिकेबद्दल

झेन म्हटलं की बुद्धीझम, ताओइझम इ आठवतं. झेन (>>...चॅन>>...ध्यान!) म्हणजे स्वतःत डोकावुन बघणं/ स्व चा शोध घेणं. झेन म्हणजे अवघडाला बाजुला काढून सोपं होणं.

झेन आर्ट ऑफ सुसाईड मालिकेतल्या गोष्टी आत्महत्यांच्या नाहीत. To drift like clouds and flow like water हे झेन मधे महत्वाचं मानलं जातं. म्हणून कथेतल्या पात्रांच्या आयुष्यात जे लादलं गेलेलं होतं, जो गाभा नव्हता त्याच्या नष्ट होण्याविषयीच्या त्या कथा आहेत.

असं म्हटलं जातं की पाश्चिमात्य कलाकार स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांचं त्याच्या कलाकृतीवर रोपण करतो. थोडक्यात त्याच्या चश्म्यातुन आपण ती कलाकृती बघु पाहातो. या उलट पौर्वात्य कलाकार, खासकरुन झेन कलाकृती विशेष कोणताही आवेश न आणता, रंग, शब्द इ चे बंधन झुगारुन अत्यंत सोप्या भाषेत अभिप्रेत अर्थाच्या मुळाशी पोचतात (उदा. बाशोची ही कविता- Even that old horse । is something to see this । snow-covered morning ).

माझ्यासाठी झेन आर्ट ऑफ सुसाईड ही मालिका हा एक प्रयोग होता. प्रत्येक कथेचं बीज आणि त्यांचे फॉर्म्स हे प्रयोगाच्या खाजेखातर वेगवेगळे नव्हते तर ती त्या कथावस्तुची गरज होती. बुडबुड्यांचं खच्चीकरण आणि प्रतिमांचे तारण मधलं आभासी जिणं आणि त्यामुळे ओढावलेली निरर्थकता हे हीण होतं. तर शुन्याखाली गोठणबिंदु मधे जगण्या-मरण्याच्या दोन टोकांमधला प्रवास आहे. (My coming, my going -- । Two simple happenings । That got entangled)

असो.

जाता जाता, हे १२५वं पोस्ट

Monday, August 8, 2011

झेन आर्ट ऑफ सुसाईड- शुन्याखाली गोठणबिंदु

बर्फात कवीची पावलं उमटतात; केवळ म्हणून मर्त्य म्हणायचं तुला. हिवाळ्यात रंगांचे साजिरे उत्सव सुरु असताना श्वेतांबर तुझे अस्तित्व बर्फाच्छादीत टेकडीच्या पार्श्वभुमीवर कणाकणाने उदयाला येते. "त्वचेशी एकरुप असावेत असे शुभ्र कपडे घालतेस?" माझ्या कुतुहलाला अंत नसतो आणि तूही उत्तराला बांधील नसतेस. आत्म्याच्या विणीचा किंचित उसवलेला धागा असावा तसं आपलं सहचर्य- विमुक्त बांधलेलं. "Dare you see a Soul at the White Heat?" प्रश्नाची धार बोथट करायला उलट प्रश्नांची भक्कम तटबंदी काही क्षणात उभी करु शकतेस तू. कवीला अशक्य काहीच नसतं. "If White- a Red-must be!" रक्ताच्या काळसर लाल रंगाचं तुला कोण आकर्षण!

"फलाटाकडे धावत येणारी आगगाडी पाहीली की सारे बांध फोडून रुळांखाली झोकून द्यावं वाटतं."

मी विलक्षण भेदरलेला, तुझा हात गच्च धरुन हिवाळ्यात गोठलेल्या स्टेशनवर शुन्यवत नेहमीचा उभा.

"नजरेचं संमोहन भेदून उंच इमारतीच्या गच्चीतून तळाकडे सुर मारावा. आधी शुभ्र त्वचेवर उमटेल डाळींबी नक्षीचा टपोरा दाणा, मग शुभ्र कपड्यांवर आणि मग शुभ्र बर्फावर आख्खं लाल काळसर डाळींब..."

तुझं कवीपण बेभान पण तुला उंचीचं भयही तसलंच अफाट. तरीही मला आवडतं तुझं तंद्रीदार बोलणं, वाटतं कधीच संपु नये

"The blood is a sunset. I admire it.
I am up to my elbows in it, red and squeaking.
Still it seeps up, it is not exhausted.
So magical! A hot spring"

त्वचेला भेदून हाडं फोडणारा हिवाळा, यंदा जरा निर्घॄणच. पाण्यावरचा बर्फाचा पातळसा पापुद्रा बघता बघता बेटा सारखा नव्याने उगवुन आला. सवयीच्या पायवाटा शुभ्र चुऱ्यात निवून गेल्या. हिवाळ्यानं जिणं असह्य झालं तसं गाव उठवायचं ठरलं. हिवाळ्यातलं निर्वासितपण ध्रुवाजवळच्या या गावाला तसं नवं नव्हतंच. पण तुझं इथे रुजणं जरा अनपेक्षित...

"All the gods know is destinations.
I am a letter in this slot
I fly to a name, two eyes.
Will there be fire, will there be bread ?"

"माझ्या मरत्या आईनं मला इथं पाठवलं. हा तिचा गाव आणि हे घर अन त्याखालचं तळघरही तिचंच. पोटाच्या आणि नात्यांच्या भुकेपाई ती शहरात गेली. मृगजळाची असंख्य बांधकामं केली. भुकेतला फोलपणा लक्षात आला तेव्हा उशीर झालेला. मरताना हातात इथला पत्ता दिला आणि इथे हार्प शिकवणाऱ्या प्रोफेसरांचा संदर्भ. म्हणाली एकटपणा प्रतिभावंताचा मोक्ष असतो."

एकटेपणाचे संदर्भ हे असे- अनुवांशिक! तुला या गावात, शेजारीपाजारी क्वचितच कुणी ओळखतं. सतत पांढऱ्या कपड्यात वावरणारी आणि दिव्याच्या धुकट प्रकाशात टेबल-खुर्चीच्या काठावर बसणारी एकलकोंडी तरणी बाई अशी तुझी ओळख. यावर तू फक्त हसतेस; निर्व्याज म्हणणार नाही मी, कदाचित समजुतदार.
पण तुझ्याही हक्काच्या जागा आहेतच.

स्वतःइतकं एकनिष्ठ? "-कवितेशी" कवितेइतपत सहचर्य? "- हार्प शिकवणाऱ्या प्रोफेसरांशी" आणि मी? "- अशारीर, अशब्द सोलमेट!" कुठल्याही संदिग्धतेशिवाय तुझी कन्फेशन्स.

"आत्म्याच्या हाकांचे पडसाद लख्ख ऎकु येतात या गावी. त्यांना शब्दांची सुरकुतली त्वचा दिली की कविता बनते. उदासवाण्या हिवाळ्यात बर्फाला लगडुन अर्थांची भुरभुर होते. तो चिमटीत धरुन टिचला की कविता वाहाती होते. असण्या-दिसण्याच्या कल्पनेपलीकडे त्वचेखालच्या गुलाबीसर तंतुंची नाजुक नक्षी मला जास्त आवडते. जे असतं, जे दिसतं, ऎकु येतं, भोगता येतं त्यापेक्षा जे अज्ञात, संदिग्ध, आकारहीन असतं त्याची मला ओढ आहे. मी त्याच्या कविता करते. म्हणूनच मी मृत्युच्या कविता करते. "

It is a love of death that sickens everything...

वृद्ध वृक्ष जास्त डेरेदार असतात आणि त्यांच्या सावल्याही व्यापक शितल. अनुभवांचे ऋतु पानगळतीच्या गणतीपेक्षा कैक अधिक. झाडांवर वसतीला आलेली पाखरंही पिढीजात हक्क गाजवतात अश्या वृक्षांवर. पण उन्मळुन पडतात तेव्हा भुतकाळातली मुळं हादरवणारं वास्तव उघडकीला आणतील त्याचं काय? कुठलाही पत्ता मागे न ठेवता हार्प शिकवणारे प्रोफेसर विनापाश रात्रीतून गाव सोडून निघून गेले तेव्हा तू अशीच अंतर्बाह्य हललीस. " कुठल्याही संबोधनावर, कुठल्याही मायन्यावर न अडता, रोज तुम्हाला एक पत्र मी लिहीन प्रोफेसर." जिव्हार दुखऱ्या जखमा शब्दांच्या रंगीत उत्सवात झाकु पाहातेस तू.

हिवाळा अमानुष म्हणावा इतपत तीक्ष्ण झाला तसा तू तळघरात मुक्काम हलवलास, पण गाव सोडला नाहीस.

तळघरातल्या शेकोटीत लाकडं जाळत तू हिवाळा संपण्याची वाट पाहत होतीस. सोबतीला काही पत्र आणि काही कविता. ऎन युद्धात दगाफटका व्हावा तशी तळघरातली लाकडं एक दिवस संपली. बाहेर गाव संपलेला आणि तुझ्या पिचक्या मनगटात कविता लिहीण्याव्यतिरिक्त कसलीही ताकद नाही. कोळश्याच्या धुगधुगीत प्राण यावेत म्हणून तळघरातल्या जुन्या वस्तु शेकोटीत टाकण्याची तुझी कोण लगबग. तितक्यात कुणाची तरी जीर्ण पत्रं तुझ्या हाताला लागली. थिजत जाणाऱ्या डोळ्यांनी तू वाचायला बसतेस तुझ्या आईची पत्रं-तिच्या प्रियकराला लिहीलेली, हार्प वाजवायचा तो...

शब्दांमधे नजरबंदीची विलक्षण ताकद असते. एकेका अक्षरावर जीव गहाण पडत जातो पण तुझी पापणीही लवत नाही. तळघर विझु झालेल्या कोळश्याच्या धुरानं भरत चाललय पण तुला त्याचं भान नाही. बर्फाची चिरेबंद तटबंदी हवेतुन पसरत तुला जिवंतपणीच चिणु पाहातेय. हवा कशी गच्च जड आणि मृत्युगार.

तुझे डोळे आता लवत नाहीत. शब्दांचे अनर्थ शरीरातुन उमटलेल्या शेवटच्या उबेशी रेझोनन्समधे. तुझ्या लाकडी खुर्चीशेजारी अस्पर्श तुझ्या कविता आणि न पाठवलेली काही पत्रं....


The way she laid his letters, till they grew warm
And seemed to give her warmth, like a live skin.
But it is she who is paper now, warmed by no one.

मी, श्रीशिल्लक, तुझा सोलमेट -. the ghost of an infamous suicide!!

Sunday, July 17, 2011

झेन आर्ट ऑफ सुसाईड- प्रतिमांचे तारण

॥१।।

"ब्रम्हदेवा, हैस का?" अशी दणदणीत हाक फक्त शिवराजच मारु शकतो. त्याला मी दार उघडुन आत घेतलं तेव्हा चार मजले चढून त्याचा भाता फुलला होता. खरं म्हणजे माझं नाव ब्रम्हे पण शिवराज मला कायमंच विविध नावानं हाका मारतो. आम्ही सगळी दोस्त मंडळी ठरवुन एमपीय्सी झालो. मी पोलीसात फौजदार, कुणी तलाठी, कुणी अजून काही आणि तसंच शिवराज राज्य वखार मंडळात चिकटला. "बोला चित्रगुप्त" मी त्याला डिवचुन बोलायचं म्हणून बोललो आणि अपेक्षेनुसार उसळुन निषेधाच्या स्वरात शिवराज म्हणाला "आम्ही वखारीतही कारकुन आणि देवांच्या राज्यातही कारकुनच म्हणा की एकुण! मरु दे. मला तुझा एक युनिफॉर्ममधला रुबाबदार फोटो दे" माझ्या बीटमधले शिपाई मला पिक्चरमधल्यासारखे साहेब म्हणतात मला माहीत होतं पण त्यांची लोणीबाजी शिवराजपर्यंत गेली असेल वाटलं नव्हतं. "अरे खेचत नाही बाबा. खरंच दे. तुला फेसबुक माहीतीए का? नसेलच माहीत, तुम्ही पैलवान लोक. ते असतं, त्यावर जुने मित्र शोधता येतात. नवे मित्र मिळवता येतात. त्यावर शिव नावासोबत तुझा फोटो टाकावा म्हणतो. आपला फोटो टाकला तर फेबु बंद पडायचं घाबरुन" राक्षसी हसत शिवराजनं माझ्या पोटात चार गुच्चे लावले.मला आता पुर्ण लिंक लागली. कसल्याशा योजनेखाली त्यानं एक सरकारी लॅपटॉप काढला होता. वखारीत वेळ जात नाही म्हणून तिथं हा लॅपटॉपवर काही तरी चाळे करायचा. ही फेबु भानगड मी ऎकून होतो. शिवराज दिसायला अर्क होता खरं; पुढे आलेले तंबाखुचे डागवाले दात, काळाकभिन्न रंग, सुटलेलं अस्ताव्यस्त पोट पण म्हणून माझ्या फोटोनं काय साध्य होणार होतं मला कळालं नाही. शेवटी खाली नाव शिवराजचंच असणार होतं नां? "आपले सगळे मित्र तर इथंच आहेत. तुला कशाला हवय ते फेबु?" मी टाळण्याच्या दृष्टीनं उगाच काही तरी बोललो. "कल्पना कर उद्या फेबुवर मला तन्वी भेटली तर? ती विचारेल ब्रम्हे कुठे आहे?" माझ्या पोटात पाशवी गुद्दे मारत शिवराजनं जुन्या तारा उगाच छेडल्या. मी नाईलाजानं माझा फोटो त्याला देऊन त्याची बोळवण केली.तन्वी एव्हाना दोनेक मुलांची आई झाली असेल...मी कटाक्षानं विचार करायचं टाळलं

।।२।।

जवळजवळ तीन महीन्यांनी शिवराज भेटला तेव्हा हरवल्यासारखा वाटला. दोन पेग पोटात गेल्यावर त्याचं तोंड सुटलं. "फेबुवर खुप दोस्त भेटले. तिकडे अमेरिकेत गेलेले पण. काही नवे दोस्त पण मिळालेत. माझा फोटो बघून लोक क्राईमबद्दल काय काय विचारत असतात. मी नेटवरचं बघून काही तरी त्यांना सांगत असतो. लोकांना भारी वाटतं." त्यानं माझ्या फोटोला त्याचा फोटो म्हटल्यावर मला दचकायलाच झालं. कदाचित चढली असेल...पण दोनातच? "तुला माधुरी आठवते का? ती पण आहे फेबुवर. अमेरिकेत असते. अजून तिनं फ्रेन्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट नाही केलीए. तिला कदाचित वेळ नसेल, किंवा मी आठवत नसेल..." शिवराजनं माधुरीपाई कॉलेजभर घातलेले अनेक धिंगाणे मी विसरलो नव्हतो. ती कश्याला करेल मैत्री? माधुरीसोबत येणारं जोड-नावही मी विसरलो नव्हतो. मीही खरुज काढलीच "तो विशाल आहे का रे फेबुवर?" विशाल आणि माधुरीचं कॉलेजात "होतं" असं म्हणायचे सगळे. "नाय रे. अजून तरी नाय दिसला. तुझी तन्वीपण आहे बरं का फेबुवर. छान मुलगी आहे तिला तिच्याच सारखी दिसणारी." हरामखोराला चढली नव्हती म्हणायची...

||३॥

ब्रम्हेनं विशालाचा विषय काढल्यावर शिवराजला राहावलं नाही. वखारीत गेल्यावर त्यानं दबक्या हातांनी विशालचं फेबु प्रोफाईल काढलं. डोळ्यांवर गॉगल चढवलेला देखणा बेफिकीर फोटो होता त्याचा. शिवराजनं रजिस्टरमधल्या नोंदी बघाव्यात तश्या निरखुन तिथल्या कॉमेन्ट्स बघितल्या. ढीगभर लोकांनी अगम्य भाषेत लोल, बफन, थनक्स असं कायबाय लिहीलं होतं. माधुरीच्या अगदीच मोजक्या पण सुचक नोंदीही त्याला दिसल्या. शिवराजचा अगम्य शब्द गुगल करायचा उत्साह लगेच मावळला. विशालचं प्रोफाईल बऱ्याच अंशी कुलुपबंद होतं. शिवराजनं हर प्रकारे शिरकाव करुन बघितला पण गोल फिरुन फेबु परत पासवर्डवर थबकायचं. वैतागुन शिवराजनं मा-धु-री टाईपलं आणि सखेद आर्श्चयानं फेबुची तटबंदी सपशेल कोसळली. शिवराज विस्फारलेल्या डोळ्यांनी विशालचं फेबु अंतरंग बघत राहीला.

॥४॥

वखारीतून फोन म्हटल्यावर मला शिवराजशिवाय दुसऱ्या कुणाचा असेल असं वाटलंच नाही.
"इन्स्पेक्टर ब्रम्हे का? मी दाभाडे बोलतोय राज्य वखार मंडळातून"
"बोला" माझा आवाज प्रचंड साशंक.
"अहो तुमचे दोस्त आहेत कुठे? कधी येतात कधी जातात कळत नाही. हल्ली रात्रीची जास्त घेतात की त्यांच्या झोपेचे वांधे चाललेत माहीत नाही. बघावं तेव्हा डोळे तारवटलेले असतात. कधी टेबलावर पाय पसरुन झोपी जातात आणि आता जवळ जवळ आठवडा झाला, ऑफिसात फिरकलेच नैत. अहो आम्ही सांभाळुन घेतोय पण कुठं पर्यंत? शिवराजचे दोस्त म्हणून मला फक्त तुमचीच माहीती होती म्हणून तुमच्या कानावर घालावं म्हटलं"
"बरं झालं दाभाडेसाहेब तुम्ही मला सांगीतलंत. शिवराजचं इथे फारसं जवळंच असं कुणी नाही. मी बघतो काय करायचं ते"

॥५॥

मध्यरात्रीचं शिवराजनं हल्कंच फेबुवर विशालच्या नावाखाली प्रवेश केला.
"महीन्याभराचा विरह संपला...मी परत आलोय"
तासाभरात दहाएक लाईक्स आणि तितकेच वेलकमचे संदेश आले.
गेल्या कितीतरी रात्री शिवराजनं विशालच्या संदेशांची नीट छाननी केली होती. कोण कुणाचं कोण आहे, कुणाशी विशाल कसा बोलतो, त्याची भाषा काय असते, कोण कुठं आहे हे सगळं त्यानं व्यवस्थित पाहून ठेवलं होतं. माधुरीशी त्याची सलगी काय पातळीची होती हे ही त्याला समजुन चुकलं होतं. मात्र गेला महीनाभर हवेत विरावा तसा विशाल फेबुवरुन अदृश्ष्य झाला होता. अगदी माधुरीलासुद्धा त्यानं फक्त ’भेटू’ एव्हढाच शेवटचा संदेश पाठवला होता. विशाल परत आला तर काय? या नावडत्या प्रश्नावर विचार करायचाच नाही असं ठरवुन शिवराज अमेरिकन वेळेत परकाया प्रवेश करुन विशालमय बनायचा. मित्रांशी गप्पा, छेडखानी, नेटवरचे जुनेच विनोद विशालच्या प्रोफाईलवर दुथडीभरुन वाहायला लागले.

॥६॥

असंख्य प्रयत्न करुनही काही केल्या मला शिवराज भेटत नव्हता. हा योगायोग होता का या बद्दल मला साधार शंकाच होती. शेवटी साध्या वर्दीतले काही शिपाई त्याच्या मागावर ठेवून मी त्याची कुंडली नव्यानं मांडली.
लपंडाव संपवत मी त्याला उडप्याच्या हॉटेलात ओढतच आणला.
"काय शिव?" माझ्या आवाजातली चीडचीड न लपवता मी सरळच मुद्द्यावर आलो
"हाय शिव. किती वर्षांनी भेटतोय आपण" शिवराजच्या वागण्याबोलण्यात, कपड्यांमधे कमालीचा फरक पडला होता आणि तो टिपता टिपता त्याच्या बोलण्याकडे माझं दुर्लक्षच झालं.
"नुक्ताच परत आलोय अमेरिकेहुन, महीन्याभरासाठी" शिवराज नशेत नसला तरी तारेतच बोलत होता "लग्न करुन जाईन म्हणतो. तुला माधुरी आठवते नां? तिच्याशी लग्न करतोय मी. तू कसा विसरशील म्हणा तिला....कॉलेजमधे असताना काय मागे लागायाचास तू तिच्या! पण बरं झालं शिव, तू तुझ्या मागं लागण्याच्या गुणाचा वापर पोलिसगिरीत करतोयस ते. मी वाचतो फेसबुकवर तुझे किस्से आणि केसेस. धमाल येते रे. तुझं नाव शिव न ठेवता शॅरलॅक होम्स ठेवायला पाहीजे!"
मला सणकुन भोवळ आली. हे नक्की काय चाललय? हा मला शिव का म्हणतोय? आणि स्वतःला काय समजतोय?
आपल्याला आडून आडून बोलता येत नाही. मी फौजदारी आवाज लावत विचारलं "शिवराज, नाटक करत असशील तर बंद कर. वखारीतून तुझा दाभाडे रोज मला विचारतो तू कुठे आहेस म्हणून आणि तू हे मधेच अमेरिकेचं काही तरी बरळतोयस. हे काय लावलंयस तू? असली नकली क्राईमचे किस्से स्वतःच्या नावानं आणि माझ्या फोटोखाली खपवलेस. आणि आता मला शिव म्हणतोयस. गांजापाणी केलं असशील तर ऎक, मी ब्रम्हे, फौजदार ब्रम्हे आणि तू शिवराज. आता भरभर बोल"
गडगडाटी हसत शिवराजनं बिस्लेरी तोंडाला लावली "शिव-शिव, माय फ्रेन्ड शिव, तू कामाच्या जबरदस्त ताणाखाली आहेस? मी विशाल आणि तू फौजदार शिव, लेट्स गेट इट क्लिअर! आपण कॉलेजमधे एकत्र होतो आणि खुप वर्षांनी आपण आता फेसबुकवर भेटलोय. यात काय कन्फ्युशन आहे मित्रा?"
मला आता गरगरायला होतं होतं. शिवराज कधी उठून निघून गेला मला कळालंही नाही.

पुढे कित्येक दिवस मला शिवराज कुठेच दिसला भेटला नाही.

॥७॥

डोकं चक्रावणाऱ्या अनेक केसेस मी वाचतो, बघतो पण शिवराजचं प्रकरण एकदम भुतीया होतं. हे वेड की भानामती की काही बाहेरचं म्हणायचं मला कळत नव्हतं. डोक्यात सतत शिवराज-विशाल-माधुरी हेच घुमत होतं. आणि त्यातच बसच्या तुडुंब गर्दीत मला माधुरीसारखी दिसणारी कुणीतरी दिसली. ही बया अमेरिकेतून कश्याला आणि कधी आली? एकटीच की विशालही असेल सोबत? मग शिवराज लग्नाचं म्हणतो ते खरं की काय? की शिवराज म्हणजेच विशाल असेल? मी डोकं चाचपुन बघितलं, अजून तरी ते जागेवरंच होतं.
नंतरचे दोन दिवस फॉलो केल्यावर माझी खात्रीच पटली की ती बया माधुरीच होती.
एक घाव दोन तुकडे करायचं ठरवुन माधुरीच्या घराच्या एकट कोपऱ्यावर एका संध्याकाळी मी उभा राहीलो. अंधारुन आलं तरी मला सरावानं माणुस ओळखु आलं असतं. नेहमीपेक्षा अंमळ उशीराच माधुरी अंगावरुन पुढं गेली.
"सुक सुक" काय बोलायचं ते न ठरवल्यानं माझ्या घशाला कोरडं पडली होती "माधुरी? माधुरी..."
माधुरीनं अंधारात वळून बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. साशंक चेहऱ्यावर आधी अविश्वास आणि नंतर भितीचं भयाण सावट दाटून आलं. तिचे भोकर डोळे अजूनच विस्फारले आणि चेहरा पांढराफटक पडला. तिनं दुसऱ्या सेकंदाला तोंडावर हात दाबला तरी त्यातून अस्फुट अशी किंकाळी निघालीच
"शिव...नाही...शक्य नाही...भुत...शिव..मी नाही" आणि ती बेशुद्ध पडली.
गर्दी जमून तमाशा होण्याआधी मला हे प्रकरण समजुन घ्यायचं होतं. मी तिला जीपच्या मागच्या सीटवर नीट झोपवलं. आता फक्त असंख्य प्रश्न...माधुरी मला शिव का म्हणाली? आणि काय शक्य नव्हतं? तिला कुठलं भुत दिसलं म्हणून ती घाबरुन बेशुद्ध पडली?
पाण्याचा शिपका तोंडावर बसला तशी माधुरीला हुशारी आली.
"माधुरी, मला ओळखलंस. आपण कॉलेजमधे एकत्र होतो..."
"शिव, मला का छळतोस? जिवंतपणी कॉलेजभर माझी बदनामी करुन छळलंस आणि आता.." माधुरीनं दोन्ही हातांनी चेहरा गच्च झाकून घेतला "आधी विशाल परत आला आणि आता तू...देवा शपत सांगते जे घडलं ते संतापाच्या भरात घडलं....विशालचा फेसबुकवर मेसेज आला तेव्हा आधी वाटलं की कुणीतरी गंमत करतय, भयंकर गंमत पण नंतर काहीच न घडल्यासारखं विशाल फेसबुकवरुन नेहमीप्रमाणे अपडेट पाठवत राहीला. मी घाबरले. हे कसं शक्यय? पण कुणाला सांगायची सोय नव्हती. माझा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण आज तू..."
मी आवाक होऊन ऎकत होतो. हातातला ससा मोडु न देता जाळं मांडायचं होतं आता "काय सांगितलं विशालनं माझ्याबद्दल?"
"विशालनं परवा कामाच्या ताणाखाली तू आत्महत्या केल्याचा अपडेट टाकला होता. मी स्वतः तुझ्या फेसबुकवर तुझी सुसाईड नोट वाचली नंतर. खरं सांगते शिव, कॉलेजनंतर फेसबुकवर तू येईपर्यंत मला तू लक्षातही राहीला नव्हतास. पण तू आज इथे..."
शिवराजनं वेडेपणाच्या भरात फेबुवर असले उद्योग करुन ठेवले असतील याची मला सुतरामही शंका नव्हती. आणि इथे ही बाई मला भुत समजुन कसकसले कन्फेशन देत होती. ही इतके वर्ष अमेरिकेततरी होती का याचीही मला आता खात्री नव्हती. अस्तित्वाचे भास निर्माण करणारी फेबुसारखी कसली ही प्रतीसृष्टी होती देव जाणे. स्वतःविषयीच्या असंख्य खऱ्या-खोट्या समजांना उजाळा देत मैत्रीचे कच्चे-पक्के उमाळे काढणाऱ्यांची कमतरता नव्हती तर तिथे!
"आणि विशाल का आलाय परत?" विचारचक्रातून भानावर येत मी खेळ चालु ठेवला
"माहीत नाही शिव" गुडघ्यांमधे डोकं घालून माधुरी म्हणाली "पण विश्वास ठेव, मी त्याला मुद्दाम धक्का दिला नव्हता. तो अमेरिकेतून आला तेव्हा मला वाटलं तो माझ्याशी लग्न करायला आलाय. पण त्याला नाती नको होती. म्हणाला, अमेरिकेला चल, एकत्र पण बंधनाशिवाय राहु. शब्दाला शब्द वाढला आणि हात झिडकारुन उठताना तोल जाऊन दरीकाठच्या जंगलात तो गडगडत गेला. काट्यकुट्यातून, दगडधोंड्यावर ठेचकाळत दरीच्या तळाशी विशालला जाताना मी स्वतः पाहीलय शिव. आणि दोन महीन्यांनी अचानक विशालचं फेसबुकवर अपडेट येतं ’मी परत आलोय’ तर याचा अर्थ काय लावायचा शिव? मागचे संदर्भ नाहीत, शब्दांच्या अर्थांमधे प्राण नाहीत फक्त मध्यरात्रीचे फेसबुक अपडेट येत राहातात. विशालच्या अतृप्त आत्म्यानं त्याच्या फेसबुकचा ताबा घेतला असेल का असा प्रश्न वेडगळ ठरवण्याआधी आज तू हा असा इथे..."

॥८॥

डॉक्टरांनी शिवराजला फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डरची पुढची पायरी सांगत त्याच्यावर उपचार सुरु केले. त्या डिजीटल दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्षात जगणं सुरु करायला शिवराजला वेळ लागत होता खरं पण गेले काही दिवस तो त्याच्या वखारीत नियमित जात होता.

॥९॥

त्या रात्री रुटीन गस्त घालत मी शिवराजच्या घराजवळ होतो. स्वारी काय करतेय बघावं म्हणून मी खिडकीकडे सहज बघितलं आणि दचकलोच. खिडकीच्या दुधी काचेवर शिवरामची सावली पडली होती. कश्यावर तरी उभा असावा असं वाटलं आणि एक छतावरुन एक फिकट रेघेसारखी सावली लटकत होती. काय होतय हे लक्षात होऊन मी जीवाच्या आकांतानं त्याच्या घराच्या दरवाजावर थापा मारायला सुरुवात केली. शिवराजनं दार उघडलं, चेहऱ्यावर गोंधळलेले आणि अपराधी भाव. मी आत डोकावुन बघितलं. शिवराजनं पंख्याला दोरी लटकावुन त्याच्या लॅपटॉपला गळफास लावला होता. लॅपटॉपवर विशालच्या फेबुची प्रोफाईल स्पष्ट दिसत होती.
"एका प्रतिबिंबासारखा चिकटलाय विशाल माझ्या आयुष्याला, ब्रम्हे. आरश्यावरचं हे धुकं उठल्याशिवाय मला माझा चेहरा दिसुच शकणार नाही. आज विशालनं स्वतःला संपवलं तर उद्या शिवराज जगेल. विशाल मस्ट डाय"
मी मुकपणे मान हलवली. काल एका अर्थी विशालचा खुन झाला होता, आज एका अर्थी विशालनं आत्महत्या करणार होता.

Friday, June 17, 2011

झेन आर्ट ऑफ सुसाईड- बुडबुड्यांचं खच्चीकरण

बोलणे- कंठातून अर्थपुर्ण आवाज काढून संवाद साधणे
वाङमयीन ऊपयोग- खापराचं तोंड असतं तर फुटलं असतं, उचलली जीभ लावली टाळ्याला, बोलेल तो करेल काय, बोलाची कढी, कर्माला बोल लावणे इ इ
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही नेतेमंडळी बोलतात.
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही अभिनेतेमंडळी बोलतात.
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही शिक्षकमंडळी बोलतात.
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही प्राध्यापकमंडळी बोलतात.
नेते-अभिनेते मंडळी बोलून करोडो रुपये कमावतात. शिक्षक-प्राध्यापक मंडळीही बोलून लाखभर रुपये जमवतात.
अबोल विद्यार्थ्यांनाही वाटलं आपण बोलून फायदा करावा. फायदा-तोटा इयत्ता चौथीत शिकवतात. भांडवलशाही इयत्ता चौथीत शिकवतात.
जमा - खर्च = फायदा
अबोल - अ =बोल
बोल(णे) =फायदा
म्हणून अबोल = जमा इ. इ.
विद्यार्थीदशेत अकलेची कमतरता असल्याने ही जमा पुंजी उधळण्यासाठी प्राध्यापकांच्या खोलीबाहेर रांग लावून तोंडी परिक्षेसाठी मुले उभी होती.बाळासाहेबही उभा होता. निर्लेपपणे त्यानं रांगेत मागेपुढे बघितलं. क्वचित एखादा-दुसरा चेहरा ओळखीचा वाटला तसं त्यानं कसंनुसं हसुहसु केलं. मुलं आपापल्या तांड्यात मुक्तपणे खिदळत होती. बाळासाहेबाकडे बघून कुणीच हसुहसु केलं नाही. त्याचा किंचित चेहराही कुणाला ओळखीचा वाटला नाही. सहा महीन्याच्या सेमिस्टरात बाळासाहेब हजेरी लावून आपलं इंजिनिरिंग कॉलेज सोडून मित्रांसोबत भलभलत्या कॉलेजातले वर्ग आणि कट्टे पालथे घालत होता. आणि आता त्याच्या नावाचा कुणीतरी पुकारा केला तेव्हा त्याला स्वतःलाही त्याचं नाव अनोळखी वाटलं.
"Have a sit Mr. B. K. ummmm" तोंडी परिक्षेसाठी दुसऱ्या कॉलेजातून आलेले गुरुवर्य बाळासाहेबाच्या आडनावावर अडखळले
"Sir, please call me Balasaheb" चेहऱ्यावर खानदानी चंद्रबळ आणत बाळासाहेबानं गुरुवर्यांची सुटका केली.
दुसऱ्या कॉलेजातून आलेल्या गुरुवर्यांना सोबत म्हणून एक घरगुती गुरुवर्यपण परिक्षा घ्यायला बसले होते. एक माणुस एकटा असतो. दोन माणसे दुकटी असतात म्हणजेच दोन माणसे एकटी नसतात असं तर्कसिद्ध गणित या व्यवस्थेमागे होतं. व्यवस्था म्हणजे सोय. व्यवस्था म्हणजे तयारी. व्यवस्था म्हणजे समाजाची घडी. व्यवस्था म्हणजे भडभुंजांना तथाकथित क्रांती करता यावी म्हणून असलेला अदृष्य क्रुर चेहरा.
घरगुती गुरुवर्यांनीं हातातल्या फायलीतून मान वर करुन बसलेल्या तिन्ही शिष्यांना निवृत्त नजरेनं न्याहाळलं.
"You, Balasaheb, I never remember you seeing in the class. I know these other two fellows for sure. What are your names by the way?"
"Umesh, Sir" पुटपुट १
"Daulat, Sir" पुटपुट २
"But I was present in the class Sir, always. You can check attendence record" बाळासाहेब रेटून बोलला.
अ‍ॅटेन्डन्स असला म्हणजे माणुस वर्गात उपस्थित होता असं समजायचं? घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली. तात्विक प्रश्नांची व्यावहारीक सोडवणूक फार कठीण असते. घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली. दुसऱ्या कॉलेजातून आलेल्या माणसासमोर असंल प्रकरण किती ताणायचं? घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली. शिवाय, याचं नाव बाळासाहेब.असंल भारदस्त नाव म्हणजे हा कदाचित आपला जातवाला देखिल असेल. घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली.
"Tell me something about buoyancy force" दुसऱ्या कॉलेजातून आलेल्या गुरुवर्यांनी प्रश्न विचारला.
उमेशनं निराशाग्रस्त मान क्र.१ हलवली.
दौलतनं चतकोर वाक्य इंग्रजीतून बोलून उरलेलं उत्तर मराठीत दिलं.
उमेशनं निराशाग्रस्त मान क्र.२ हलवली.
"Anything from you Balasaheb?"
"I always used to think as a kid, why Lifebuoy is not Lifeboy. But I was taught why Lifebuoy is not Lifeboy in this college" बाळासाहेब काहीतरी बोलला.लहानपणी लाल रंगाची लाईफबॉयची छोटी वीट डोक्यात पडून आलेलं टेंगुळ त्याला नकळत आठवुन गेलं.
उमेशनं निराशाग्रस्त मान क्र.३ हलवली.
नंतर बाळासाहेबानं दौलतच्या मराठी उत्तराचं छापेबाज इंग्रजीत भाषांतर करुन अनुवाद स्वतःच्या नावावर खपवला. इंग्रजीत शिकलं पाहीजे हा बागायतदार पप्पांचा आग्रह किती कामाला आला हे पाहून बाळासाहेबाला गहिवरुन आलं. लहानपणी "आय वॉन्ट टू गो टू टुलेट" हे मम्मीला न कळल्यानं त्याचा भविष्यकाळ "हागु झालं" कळाल्यावर झालेल्या धुलाईच्या यादेनं बाळासाहेबाला गहिवरुन आलं.
परिक्षेतून बाहेर आल्यावर बाळासाहेबानं गहीवरुन दौलतला मिठी मारली.
मिठी मारली की मैत्री होते हे बाळासाहेबाचं साधं तत्वज्ञान. बाळासाहेबाची कुठल्याही मुलीशी मैत्री नव्हती.
"तू नेहमी पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट का घालतोस? तू नेहमी तेल लावून भांग का पाडतोस?" बाळासाहेबानं दौलतला विचारलं.
"त्यानं स्वच्छ वाटतं. मी मग या हॉस्टेलच्या बाकीच्या मुलांसारखा दिसत नाही," दौलत
"तू नेहमी इतकं प्रयत्नपुर्वक स्वच्छ का बोलतोस", बाळासाहेब
"त्यानं स्वच्छ वाटतं. मी मग या हॉस्टेलच्या बाकीच्या मुलांसारखा दिसत नाही," दौलत
"तू मला इंग्रजी शिकवशील का? मग मला अजून स्वच्छ वाटेल. मी शिकेन, सुशिक्षित होईन. बाप म्हणाला त्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी करायचं. माय म्हणाली मी स्वच्छ दिसायचं, स्वच्छ काम करायचं, स्वच्छ पैसे कमावायचे, स्वच्छ बायको करायची" दौलत
"ग्रेटैत रे तुझे बाप-माय. काय क्लॅरिटी आहे थॉट्समधे. मला यायचंय तुझ्या घरी सुट्टीत" बाळासाहेब
दौलतचा स्वच्छ नकार "तू नाही राहु शकणार तिथे"
मग सुट्टीत दोघंही बाळासाहेबाच्या घरी गेले.
रात्री गप्पा मारताना मधेच बाळासाहेब गॅसवर चहाचं आधण ठेवून आला.बाळासाहेबाला खरंतर दारु प्यायला आवडतं कारण ती गॅसवर चढवावी लागत नाही. बाटलीतून पेल्यात ओतली की सरळ पिता येते. शिवाय किडनी स्टोन वितळतो ते वेगळंच. झालंच तर दारु प्याली की बाळासाहेबाला मोकळं बोलता येतं. बाळासाहेबाला मित्रांशी मोकळं बोलायला आवडतं.
पण दौलत दारु पित नाही, पण दौलत मित्र आहे, पण दौलतशी मोकळं बोलायचंय म्हणून चहाचं आधण.
चहा उतु येतो.
फस्स्स्स्स्स
दौलतला जोरात पळता येतं. त्यानं पळत जाऊन चहा वाचवला.
चहा पिताना बाळासाहेबानं नाक वर करुन वास घेतला, "कसला तरी वास येतोय. गॅस नीट बंद केलास नां?"
नाक अजून फेंदारुन बाळासाहेबानं निदान नक्की केलं "हा गॅसचाच वासै"
"अरे नाही रे", दौलत "मी आग विझवुन आलोय रे. चांगलं २ वेळा फुंकून फुंकून विझवलं चुल्हण"
"अरे गॅसचा नॉब बंद करायचा असतो, आग नाही विझवायची" बाळासाहेबाची सापेक्ष चिडचिड
"मला गॅस बंद करायला शिकवशील का? मला फार आवडेल .."

सुट्टी संपून बाळासाहेब कॉलेजात परतला तेव्हा स्नेहसंमेलनाचं वारं पसरलेलं.
बाळासाहेबाच्या वर्गानं स्नेहसंमेलनात महाराष्ट्राची लोकधारा की असंच कायसं करायचं ठरवलं.
महाराष्ट्राचे सण, संस्कृती, महापुरुष यांची महती आपणंच गायची असं ठरलं.
सणांमधलं छान छान कार्यक्रमात घ्यायचं ठरलं.
महापुरुषांमधलं छान छान कार्यक्रमात घ्यायचं ठरलं.
संस्कृतीमधलं छान छान कार्यक्रमात घ्यायचं ठरलं.
लोकधारेच्या दिवशी बाळासाहेब प्रसन्न मुद्रेनं, प्रसन्न कपडे आणि त्यावर प्रसन्न फेटा घालून बैलगाडीत मिरवत आला. बैलगाडीत ठेवलेल्या कर्ण्यांमधून येणाऱ्या उडत्या चालीच्या गाण्यांवर मुलं दुडक्या चालीत नाचत होती.
घरगुती गुरुवर्यांनी खुणेनं बाळासाहेबाला बोलावलं, "अरे, आपली संस्कृती म्हणजे ढोल-ताशा, हलगी. आपली संस्कृती म्हणजे वाघ्या-मुरळी, तमाशा. आपली संस्कृती म्हणजे तडक जाळ बकरं-कोंबडी."
घरगुती गुरुवर्य १०.५ अंशात झुलत संस्कृतीची व्याख्या करतात.
बाळासाहेबही १०.५ अंशात झुलत उत्तरतो "सर, ढोलवाले फार पैसे मागतातै म्हणून डॉल्बी आणलं. तुम्ही म्हणाल तर तुमच्या क्वार्टरवर कापु कोंबडी"
दोघंही सारख्या अंशात झुलत असल्यानं एकमेकांना ते सापेक्ष सरळ कोनात वाटतात.
घरगुती गुरुवर्य वेलदोड्याच्या वासाखाली दारुचा वास झाकत मनःपुर्वक होकार देतात.
बाळासाहेब पानमसाल्याच्या वासाखाली दारुचा वास झाकत एका हरकाम्याला मनःपुर्वक कामाला लावतो.
दोघंही दारुच्या सारख्याच अंमलाखाली असल्यानं त्यांना एकमेकांचा सापेक्ष सरळ वास येतो.
"सर, तो दौलत ढोल, हलगी मस्त वाजवतो. ऎ बाळासाहेब, तू सांग की. तुझ्या ऎकण्याबाहेर नाही तो" दुसरा हरकाम्या बोलला.
"मला कसं माहीत नाही?" बाळासाहेबाचा जरासा बावचळुन प्रश्न
"अरे माझ्याच हॉस्टेलला राहातो तो. मला माहीतै. सांग तू," हरकाम्या
दौलतचा सपशेल नकार.
बाळासाहेबा कडून दोस्तीची कसम.
दौलतचा सपशेल नकार.
सगळ्या जमावाचा दबाव.
दौलतचा सपशेल नकार.
घरगुती गुरुवर्यांची घरगुती मार्कांबाबत आठवण.
दौलतचा नाईलाज.
त्याला खरं तर सांस्कृतीक असं फारसं काही आवडत नाही. संस्कृती म्हणजे जुन्या अवशेषांचा इतिहास. गुलाबीसर असं तपकिरी काही.आपली मुळं सापडण्याची दाट शक्यता असलेली डेंजर जागा म्हणजे संस्कृती.संस्कृती म्हणजे किंचितही धक्यानं तडकणारा काचेचा महाल. संस्कृती म्हणजे जाज्वल्य, स्वाभिमान, मोडीतला तपशील आणि मोडीत काढलेला तपशिल.
दड्म
डंडं दड्म
डंडंडं दड्म दड्म
विचारात मग्न दौलतच्या नकळत हातातल्या काड्यांनी हलगीवर ठेका धरला आणि विद्यार्थीवृंद बेभान होऊन सांस्कृतीक नृत्यात तल्लीन झाला.
मिरवणुक कॉलेजभर हिंडून घरगुती गुरुवर्यांच्या क्वार्टरवर गेली आणि अल्पोपहारानंतर महाराष्ट्राची लोकधारा संपल्याचं घोषित करण्यात आलं.

दुसऱ्या संध्याकाळी बाळासाहेब काहाबाही करु पाहातो. पण त्याचा वेळ जात नाही. त्यानं १३, १७, २३ आणि २९ चा पाढा आठवुन पाहीला. त्यानं ञ च्या आधी आणि नंतर कुठली मुळाक्षरं येतात आठवुन पाहीलं. वेळ जातंच नाही म्हटल्यावर मग तो दौलतच्या हॉस्टेलावर आला. दौलत रुमवर नव्हता. म्हणजे भौतिकशास्त्राच्या नियमानुसार तो दुसरीकडे कुठेतरी असणार. बाळासाहेबाला बारावीत भौतिकशास्त्रात कितीही मार्क पडते तरी त्यानं दौलतला शोधून काढलंच असतं. कारण हॉस्टेलच्या गच्चीवर हलगीचा बेभान तुकडा वाजत होता.

"हे बघ, आलास दोस्ता, मी उलटी हलगी वाजवतोय" झोकांड्या खात दौलत जागचा उठला ’डंची ददड्म चिग्डम चिग्डम’ "कुणी मेलं की असं वाजवतात. काल साला आपला मृत्यु झाला. आज आपण तो सेलिब्रेट करतोय"
दौलतचा बाप देवीसमोर हलगी वाजवतो. हल्ली खुप देव निघालेत. पण हलगी फक्त देवीसमोरच का वाजवतात दौलतला माहीत नसतं. दौलतला हलगी वाजवायला आवडत नाही.
कुणी मेलं की मढ्याला नेतानासुद्धा दौलतचा बाप हलगी वाजवतो पण उलटी. हल्ली लोक सहजी मरत नाहीत. दौलतला उलटी हलगी वाजवायलाही आवडत नाही.
दौलतच्या बापाला कुणीही ड्रमर म्हणत नाही. तो हलगीवालाच राहातो. अनेक पुस्तकात अनेक थोर लोकांनी लिहूनही लोक काम, प्रतिष्ठा, पैसा आणि जात यांचा संबंध लावतात. हल्ली थोर लोकांचं कुणी ऎकत नाही. दौलत हा सामान्य विद्यार्थी असल्यानं त्याचंही कुणी ऎकत नाही. दौलतला काल सर्वांनी हलगीवाला व्हायला भाग पाडलं. दौलत हा सामान्य विद्यार्थी असल्यानं त्याचं कुणीही ऎकत नाही.
दौलतचा बाप स्वतःची हलगी स्वतःच बनवतो. तो स्वयंपुर्ण आहे. मेलेलं जनावर ओढून तो स्वतःच्या बुचक्या अंगणात आणतो.रापीनं ते सोलतो. त्याचं कातडं कमावतो आणि हलगी बनवुन वाजवतो.
दौलतला रक्त-मांस याचा अंगणात पडलेला सडा बघवत नाही. म्हणून तो डॉक्टर न होता इंजिनिअर होणार आहे. पैसे नसल्यानं दौलत तसाही डॉक्टर होणार नसतो. दौलतला बहुतेक हलगीवालाही व्हायचं नसतं.
दौलतची माय अंगणातला रक्त-मांसाचा चिखल तुडवत अंगण सारवुन काढते.तरीही दौलतला घरभर मेल्या जनावराचा भास होत राहातो. मायच्या स्वच्छ धुतल्या लुगड्याला, तिच्या स्वयपाकाला, तिनं घातलेल्या गोधडीला, चुलीतल्या लाकडाला सडक्या मांसाचा वास येत राहातो असं दौलतला सारखं वाटतं. म्हणूनच बहुतेक सगळ्या सुट्ट्या दौलत हॉस्टेलवरच्या त्यातल्या त्यात स्वच्छ खोलीत घालवतो. दौलतच्या मायलाही वाटतं की दौलतनं स्वच्छ राहावं. दौलतला आत्ता सारखं वाटतय की काल क्वार्टरवर कापलेल्या कोंबडीच्या रक्ताचे डाग आपल्या डोळ्यात उतरुन धुवट पांढऱ्या शर्टावर उमटलेत.
दौलतला वाटतय की काल आपला मृत्यु झालाय. स्वतःच्या मृत्यु पावण्याला आत्महत्या म्हणतात.
दौलतला असं बरंच काही बोलायचं असतं. पण तो अबोल राहातो.
अबोल = जमा इ. इ.
सगळं समजुन बाळासाहेबही अबोलपणे उरलेली दारुची बाटली तोंडाला लावतो.
अबोल = जमा इ. इ.

Sunday, March 27, 2011

अनु का बाई सु अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया

यत्ता सहावीतला चि. सव्यसाची बुक्कलवार वर्गभेदाचा बळी पडला म्हणणं म्हणजे जगाला प्रेम अर्पावे ही वैषयिक कविता आहे म्हणण्यासारखंच झालं. पण चि. सव्यसाचीच्या मते तरी तसंच झालं होतं. परंपरागतरित्या अ, ब, क आणि ड तुकड्यांना काही अर्थ होता आणि दुसऱ्या गावाहुन बदली होऊन आल्यानंच आपण ड तुकडीत ढकलले गेले आहोत हा त्याचा ठाम समज शाळा सुरु होई पर्यंत राहाणार होता. ऎन उन्हाळ्यात नव्या गावात यावं लागल्यानं शेजारच्या बंगल्यातली लिला देशपांडे सोडली तर त्याची कुणाशीही ओळख होऊ शकली नव्हती. "पाचवी-सहावीतली मुलं तुम्ही. कसलं मुलगा-मुलगी करता रे?" असं आईनं दहावेळा वैतागुन म्हटलं तरी लिला देशपांडे ही मुलगीच आहे या बद्दल चि. सव्यसाचीला तिळमात्र संशय नव्हता. ती फ्रॉक घालायची, तिच्याकडे चेंडु-बॅट ऎवजी बाहुल्या होता आणि ती मठ्ठासारखी पुस्तकं वाचायची तरीही तिच्याशी खेळण्यावाचून पर्याय नाही हे कळून चि. सव्यसाचीला अव्यक्त दुःख झालेलं. पण एक दिवस त्यानं पुढाकार घेऊन जमेल तेव्हढं मऊ आवाजात लिला देशपांडेला म्हटलं"ही बघ तुझी बाब्री. मी तिला डॅन्सच्या स्टेप्स शिकवत होतो तर हिचा हात बघ नां. काई तरी झालं..." पुढच्या काही सेकंदात चि. सव्यसाचीला अनुक्रमे डोक्यावर बारकासा आघात, कानात मोठ्ठा घंटानाद आणि चेहऱ्यावर मार्जार-खुणांची जळजळती आग असे साक्षात्कार झाले. अपघातानंतर जेव्हा चि. सव्यसाची भानावर आला तेव्हा त्याच्या चुकांची उजळणी झाली, बाहुली ही बाहुली नसते तर ती फ्यॅम्ली मेम्बर असते आणि तिचं नाव बाब्री नसून बार्बी असतं, ती लग्नाची बार्बी असल्यानं ती डॅन्स करणार नसते आणि सर्वात वाईट म्हणजे तिचा हात नुक्ताच मुळापासून उखडुन निघालेला असतो. लिला देशपांडेनं या गुन्ह्यासाठी त्याला कधीच माफ केलं नसतं. पण ती चि. सव्यसाचीहुन तब्बल एक वर्षानं मोठी असल्यानं नव्या शाळेत जाताना त्याला सोबत घेऊन जाणं ती टाळु शकत नव्हती. तसा तिच्या आईचा आदेशच होता मुळी. गावातला मोठा चौक ओलांडताना लिला देशपांडेनं जेव्हा त्याचा हात धरला तेव्हा चि. सव्यसाची प्रचंड अस्वस्थ झाला. नव्या गावात त्याला कुणी ओळखत नव्हतं म्हणून ठीक.
शाळेच्या रस्त्यात लिला देशपांडेनं त्याला फारचं महत्वाची माहिती सांगीतली. त्यांच्या शाळेची म्हणे फाळणी झाली होती; जुनी शाळा आणि नवी शाळा. जुनी शाळा गावात, लहान जागेत होती आणि नवी शाळा शाळेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत होती. तिला मोठं ग्राऊंड होतं पण ती जर्रा गावाबाहेर होती. जुन्या गावाबाहेर जे नवं गाव होतं तिथं नवी शाळा होती आणि त्यात बहुतेक नव्या गावातली नवी मुलंच होती. चि. सव्यसाची नव्यानव्यानं गडबडुन गेला. "पण लक्षात ठेव, जुनी शाळा हीच खरी शाळा. आपल्या देशाचा, गुरुजनांचा आणि शाळेचा मान राखावा. तुला शिकवतीलच. लहान आहेस अजून" लिला देशपांडेच्या शेवटच्या वाक्यानं नाही म्हटलं तरी चि. सव्यसाची दुखावला गेला. "आणि एक, तू ड मधे आहेस नां? हे बघ, अ म्हणजे फक्त हुशार मुलींचा वर्ग, ब म्हणजे फक्त मुलांचा वर्ग. हे नव्या शाळेत आहेत. क आणि ड जुन्या शाळेत आहेत. क मध्ये फक्त मुली आहेत आणि ड मध्ये हुशार मुली आणि मुलं मिक्स आहेत" मुलांचं नीट वर्गीकरण करत लिला देशपांडेनं सांगीतलं. थोडक्यात हुशार मुलं ही संरक्षित प्रजाती असून ती दुर्मिळ आहे आणि त्यांची हुशारी कायम ठेवण्यासाठी त्यांना ड वर्गातल्या हुशार मुलींसोबत ठेवावं लागतं हे लिला देशपांडेनं चि. सव्यसाचीच्या मनावर यशस्वीपणे बिंबवलं.
अशी पराभुत मनोवृत्ती घेऊन चि. सव्यसाची वर्गात आला तेव्हा त्याला वाटलं त्याच्या विपरीत त्याला पुढचं बाकडं बसायला मिळालं. पण त्याचं कारणही उघड होतं. पुढच्या चार बाकड्यांवर चार गुणिले पाच अश्या एकुणात सबंध वीस मुली होत्या. त्यांच्या मागच्या बेंचवर चि. सव्यसाची बसवला होता.
"अबे, क्लास्टीचर कोणये बे?" बाजुचं पोरगं फिसफिस्लं. तो ही नवा होता हे चि. सव्यसाचीला नंतर कळालं.
उन्मेष बेतुरकर ज्यांना शाळेत सगळेजण उन्मेष सर म्हणायचे ते क्लास-टीचर आहेत कळाल्यावर जुन्या पोरा-पोरींमधे उत्साहाचं वातावरण पसरलं. उन्मेष सर गणित भारी शिकवायचे आणि सोबतीला त्यांच्या वर्गाची गॅदरिंगला जय्यत तयारी करुन घ्यायचे त्यामुळे त्यांच्या वर्गाचं दरवर्षी चांगलं नाव व्हायचं. उन्मेष सरांच्या स्वभावाची झलक नव्या वर्गाच्या ओळख परेडीतच मिळाली. त्यांनी ताबडतोब सगळ्या पोट्यासोट्यांना घरगुती करुन टाकलं. काहीच दिवसात चि. सव्यसाची बुक्कलवारचा रितसर बुकल्या झाला, त्याच्या बाजुच्या नव्या मुलाचं नामकरण नित्या झालं, खो खो खेळणाऱ्या सदानंद मिटकरीचं मिट्या आणि सतत डोळे उघड-मिट करणाऱ्या मुदकण्णाचं मिचमिच्या असं नाव पडलं. मुली तश्या नशिबवान, वैशालीचं वैशे आणि मंजुशाचं फक्त मंजे झालं.
"बुकल्या, तू कश्याला रोज त्या पोरीसोबत येतोस बे?" फारुक उर्फ फाऱ्यानं मधल्या सुटीत डबा खाताना विचारलं आणि त्यावर नित्या, मिट्या सगळेच फिस्सकन हसले. "चौकात घाबरत असलं तो" कुणीतरी म्हणालं अन सगळेच एकदम फुटले. खजील आवाजात बुकल्या जमेल तेव्हढा जोर आणून म्हणाला "आपण नाई कुणाला घाबरत, ऎरक्ताची शप्पत." "नक्की नाई?" नित्यानं विचारलं "निळ्यासारखं समोरच्या पोरीला गुच्चा ठेवून दाखवशील तर खरं...."
बुकल्या दोन पोर सोडून त्याच्याच बाकड्यावर बसलेल्या निळकंठाकडे लक्ष देऊन पाहात होता. त्याच्या बाकड्यासमोर पोरींच बाकडं होतं. बाकड्याबाहेर आलेलं पाठीचं कुबड, त्यावर कुणाच्या भिस्स वेण्या तर कुणाचे तरी गजरे लोंबत होते. दोन तासांच्या मध्ये सर यायला अजून वेळ होता तेव्ह्ढ्यात निळ्याचं पेन खाली पडलं. दोन बाकड्यांमधे अंतरच इतकं कमी होतं की निळ्या पेन घ्यायला खाली वाकला अन त्याचं टणकं डोकं समोरच्या सुरेखा साळुंकेच्या पाठीत धाप्पकन आपटलं. कळवळुन तिचा जीव वर आला. मधल्या सुट्टीत मिट्या, नित्या, फाऱ्या सगळ्यांनी निळ्याभोवती गराडा घातला. "मायला" दर वाक्यागणीक एक शिवी असं गणित असलेला मिट्या म्हणाला " ती साळुंके पोरींची मॉनिटर काय झाली, टर्टर वाढलीचे तिची. बघितलनं, मोरे सर आपलं चुकलं की उलट्या हातावर फुटपट्टीनं हाणतात आणि साळुंकी मात्र फेव्हरेट. तिला नुस्तंच ’पुढच्या वेळी निट करा साळुंकेबाई’ असं...पोरी म्हणजे तापे नुस्ता" आपण मुलीशी कधीच लग्न करणार नाही अशी भीषण प्रतिज्ञा मिट्यानं तसल्या लहान वयात केली होती.
मिट्याचं स्फुर्तीदायक की काय म्हणतात ते तसलं भाषण ऎकून सगळ्यांनाच त्वेष चढला. यापुढे शिवाजीला जसे मुगल तश्या पोरांसाठी पोरी म्हणजे कट्टर वैरी हे जणु ठरुनच गेलं. निळ्यासारखं बुकल्यानं त्याच्या समोर बसणाऱ्या अनुसुया पवारचा बदला घ्यायचा असं ठरलं. मिट्याच्या मते अनुसुया पवार ही गणितात डुंबणारी लठ्ठ म्हैस होती. ती भराभरा गणितं सोडवायची आणि बाकीच्या पोरांना मग भाषण ऎकावं लागायचं. प्रत्यक्ष मिट्याला तिच्याकडून एकदोनदा वही तपासुन घ्यावी लागली होती. गणिताच्या दातेबाईंचा आग्रहच होता तसा.
बुकल्यानं हातातली वही खाली टाकली, इकडे तिकडे पाहात तो धाडकन खाली वाकला. अनुसुया पवारची पाठ आता येईल मग येईल असा विचार करत असतानाच त्याचा शब्दशः कपाळमोक्ष झाला. अगदी ऎनवेळी अनुसुया पवार पुढे सरकली आणि बुकल्याचं डोक बाकड्याच्या काठावर आपटलं. "मंजे, काळ-काम-वेगाची गणितं नीट कर हो बाई" अनुसुया पवारचा खवट आवाज बुकल्याच्या कानात स्पेशल ईफेक्ट सारखा घुमत होता "ऎन परिक्षेत नाही तर म्हणशील, आमचं कपाळच फुटकं...या चाचणीच्या सिल्यॅबस मधे आहे तो च्पाटर"
बघता बघता अर्ध वर्ष निघून गेलं. शाळेत गॅदरिंगचं वारं पसरलं. उन्मेषसरांनी ठराविक मुलांची मिटींग बोलावली. "आपल्याला या वर्षी खो-खोची ट्रॉफी मिळालीच पाहीजे. गेल्या वर्षी ब तुकडीकडून तुम्ही वाईट हरला होतात, मला आठवतय. हा मिट्या सोडला तर साधे नियमही ठाऊक नव्हते कुणाला. यंदा नवी टीम बनवु, प्रॅक्टीस करु. आणि जिंकून दाखवु"
आठवड्याच्या आत पॉलिटेक्निकच्या ग्राऊंडवर पहाटे पाचला पोरं प्रॅक्टीसला जमु लागली. मिट्या कॅप्टन आणि नित्या उप-कॅप्टन बनला. दोघांनाही सगळे नियम पाठ होते. उघड्या पायांनी ग्राऊंडवर पळताना खडे बोचले की देव आठवायचे पण स्वतः उन्मेषसर हजर आहेत म्हटलं की पोरांमधे दहा हत्तींचं बळ यायचं.
प्रत्यक्ष खेळ सुरु झाले आणि शाळेत उत्साहाचा वारु बेलगाम दौडु लागला. कब्बडी, लंगडी, मल्लखांब, धावणे एक ना अनेक स्पर्धांचं नुस्तं मोहळ उठलं. नव्या शाळेच्या ग्राऊंडवर स्पर्धा असल्यानं तिथली पोरं-पोरी फुकट भाव खात होती. स्पर्धेगणिक जुने विरुद्ध नवे असे वाद उफाळुन यायला लागले. कधी नव्हे ते लहान-मोठे वर्ग विसरुन जुन्या-नव्यांचं घोषणांच युद्ध सुरु झालं.
वर्ग सजावट स्पर्धेत बुकल्याचा वर्ग सजवताना पाचवी ड तल्या पोरांनी पताका कापून चिकटवल्या तर लिला देशपांडेनं सहावी क च्या मुलींची समुहगायनाची प्रॅक्टीस करुन घेतली. एकूणात स्पर्धा नवी विरुद्ध जुनी शाळा अशी सुरु झाली होती. स्पर्धांमधे जे मागे पडत होते ते आपल्या शाळेच्या बाकीच्या वर्गांना मदत करयाला पुढे सरसावले होते.
बघता बघता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली. सहावी ड विरुद्ध गतवर्षीचे विजेते सातवी ब यांची खो-खोची फायनल मॅच लागली. मिट्यानं अप्रतिम पोल मारले आणि तीनेक गडी टिपले. उजवा पाय पुढे घेत डाव्या हातानं पोलचं टोक धरायचं आणि पोलवर शरीर तोलत झपकन दुसऱ्या बाजुला झुकून पलीकडचा गडी टिपायचा. मिट्यानं प्रॅक्टीसच्या दरम्यान हे अनेकवेळा केलं होतं. आजही त्यानं उन्मेषसरांना निराश केलं नव्हतं. प्रयत्न करुनही बुकल्याला प्रॅक्टीसमधे पोल मारायला कधीच जमलं नव्हतं. त्याचा दरचवेळी फाऊल व्हायचा. नित्याला पोल मारणं तितकं सफाईनं जमायचं नाही. पण तो सॉलीड पळपुटा होता. बुटका असल्यानं नुस्ता खाली वाकला तरी सातवी ब च्या पोरांच्या हातातून तो निसटुन जायचा. शेवटचे ३ गडी राहीले असताना नित्याला खो मिळाला आणि त्याच्या समोर असलेल्या पोरावर त्यानं डाईव्ह मारला. शेवटची पाच मिनिटं उरली होती आणि सातवी ब ची दोन टाळकी अजूनही जीव खाऊन पळत होती. बुकल्याला खो मिळाला. त्यानं मान खाली घातली आणि सरळ रेषेत तो उठला. सरळ उठशिल तर कुठल्याही बाजुला वळता येईल, मिट्यानं त्याला प्रॅक्टीसच्या दरम्यान सांगीतलं होतं. समोरचा पोरगा कधी उजवीकडे तर कधी डावीकडे झुकत चांगलीच हुल देत होता. अजूनही बुकल्यानं दिशा ठरवली नव्हती. कुणीतरी काऊंट-डाऊन करत होतं आणि मैदानावर सण्ण शांतता होती. "बुकल्या डाईव्ह मार" बाहेरुन कुणीतरी सणसणीत ओरडलं. बुकल्यानं लक्षच दिलं नाही. पडलं की आपल्याला चांगलच लागत हे तो स्वानुभवावरुन ओळखुन होता. इतक्यात बुकल्याला झुलवण्याच्या नादात सातवी ब चं ते पोरगं रेषेबाहेर गेलं आणि फुकटंच आऊट झालं. प्रचंड ओरड्यात आणि शिट्यांमधून देखिल दोन मिनीटं उरल्याचं बुकल्याला कळून गेलं. त्यानं उजवीकडे वळून दिशा पकडली. "जिंकुन जिंकुन जिंकणार कोण? जुन्या शाळेशिवाय दुसरं कोण!" तसल्या गोंधळातसुद्धा लिला देशपांडेचा आवाज सॉलीड घुमला. उन्मेषसरांनी डोळे वटारुन पाहील्यावर तिनं लगेच सुधारणा केली "जिंकुन जिंकुन जिंकणार कोण? सहावी ड शिवाय दुसरं कोण!"
"बुकल्या घेऊन टाक. बुकल्या देऊन टाक. सबसे आगे बच्चे कौन? जितेगा भाई जितेगा...." शेवटच्या मिनीटात घोषणांच जणु युद्ध सुरु झालं होतं. बुकल्याला चकवुन शेवटचा गडी दुसऱ्या बाजुला जात होता. आता खो दिला तरच हा टिपला जाईल हे ओळखुन बुकल्या आत वळला आणि त्यानं तोल सावरायला म्हणून लांब केलेल्या हाताला पलीकडचं सावज अलगद लागलं. लांब हात असणारी माणसं थोर नशीबाची असतात असं बुकल्याची आई नेहमी म्हणायची, त्याला विनाकारण आठवलं. मैदानावर जुन्या शाळेच्या पोरांनी धमाल गोंधळ घातला होता. तब्बल तीन वर्षांनी जुनी शाळा जिंकली होती.
"ए सव्या, इकडे ये" लिला देशपांडेनं गोंधळ थोडा ओसरल्यावर बुकल्याला कोपऱ्यात बोलावलं "छान खेळलास हं. तुझ्या मित्रांनाही सांग. आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान वाटला" एका डोळ्यानं पलीकडे उभ्या असणाऱ्या मिट्या, नित्याकडे बघत बुकल्या लाजून "थ्यॅन्कु थ्यॅन्कु" म्हणाला. "तुम्ही खेळत होता तेव्हा तिकडे तुमच्या वर्गाला बाय मिळत मिळत तुमच्या वर्गातल्या मुलीदेखिल खो खोच्या फायनलला पोचल्यात. त्या बिचाऱ्यांना तसं काही फारसं येत नाही. शिवणापाणी खेळल्यासारख्या पळतात बिचाऱ्या. तुम्ही मदत कराल तर त्याही जिंकतील. शिकवाल त्यांना? उद्या त्यांची फायनल आहे..." लिला देशपांडेनं जणु वात काढलेला सुतळी बॉम्ब पेटवुन बुकल्याच्या हातात दिला.
"वेडपटैस का बे?" मिट्यानं तिथंच हिशोब संपवला "आपण आणि पोरींना मदत? जीव गेला तरी नाही" मिट्या नाही म्हटल्यावर नित्या आणि फाऱ्यानंही पाठ फिरवली. तिथंच कोपऱ्यात उभं राहून पोरी मोठ्या आशेनं वाट पाहात होत्या. "त्यांची फायनलै. नव्या शाळेतल्या अ तुकडी बरोबर. पाचवीतल्या पोरींकडून हरतील तर शेण घालतील सगळे आपल्या तोंडात" वैतागुन बुकल्या बोलला. "मग तू कर की मदत. आम्ही नाही नाही म्हणणार त्याला." फाऱ्यानं तोडगा काढला.
मुदकण्णाला घेऊन संध्याकाळभर बुकल्या वैशी, सुरेखा, मंजी, अनुसुया यांना खेळाचे नियम समजावत राहीला. केवळ वाघ मागे लागला तरच धावु अश्या शिकंदर नशीबाच्या या पोरी उद्या काय खो खो खेळतील याची चिंता घेऊन बुकल्या उशिराचा घरी निघाला. लिला देशपांडे सोबत जाताना पहिल्यांदाच त्याला लाजल्यासारखं वाटलं नाही.
उन्मेषसरांनी कंपलसरी केलं म्हणून सगळे वर्ग मुलींच्या मॅचसाठी आले होते. मैदानात खेळ सुरु होता की निबंधस्पर्धा हे कळु नये इतपत शांतता होती. ना आरडा-ओरडा ना घोषणा. केवळ बाय मिळून दोन्ही संघ फायनलला आले होते. सहावी डच्या सगळ्या पोरी बाद झाल्या आणि नव्या शाळेतल्या पोरांना अचानक स्फुरण चढलं. नेहमीचे "जितेगा भाई जितेगा.." सुरु झालं. वैशीनं सुस्त उभ्या असलेल्या दोन पोरी एका दमात टिपल्या आणि बुकल्यानं नकळत जोरदार आवाज लावला "सहावी ड आगे बढो, हम तुम्हारे साथ है" युद्ध सुरु झालं की डॊळ्यात रक्त उतरतं म्हणतात. बघता बघता सहावी ड च्या पोरी पाचवी अ ला भारी पडु लागल्या. मंजीनं पळताना समोरच्या पोरीला दणकुन ढकलला तेव्हा नित्यानं कचकचित शिट्टी मारली. शेवटची काही मिनिटं उरली तेव्हा अनुसुयाला खो मिळाला. फारसं पळावं लागु नये या हिशोबानं तिनं पोल जवळची जागा पकडुन ठेवली होती. वेगात खो देण्याची प्रथा नसल्यानं पळापळीची स्पर्धा असल्यागत पोरी नुस्त्याच पळत होत्या. "ही जाडी काय स्पीडची गणितं करत पळतै का बे?" मिट्यानं वैतागुन हवेतच त्वेषानं मुठ फिरवली. "ए अन्सुये. पकड त्या पोरीला" मिट्याच्याही नकळत त्याच्या तोंडून निघून गेलं. हाताला लागता लागता पोरगी निसटते की काय वाटलं तेव्हा पोल जवळ अनुसुयेनं खो देऊन पोरगी टिपवली. शेवटचा एक मिनीट उरला आणि अनुसुया परत कुणाच्यातरी मागे पळत होती. आता मात्र मिट्याच्या आतला कॅप्टन जागा झाला होता. मैदानाबाहेरुन उड्या मारुन मारुन तो सुचना द्यायला लागला. अनुसुया खो देतच नाहीए म्ह्टल्यावर त्यानं सरळंच आवाज लावला "अनु का बाई सु, अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया. अनु का बाई सु, अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया" न सुटणारं गणितं जिद्दीनं सोडवावं तसं अनुसुयानं शेवटी त्या पोरीला पकडला. ती पोलजवळ उभी होती. मैदानात कुणीच उतरलं नाही हे बघून तिनं मागे बघत मिट्याला म्हटलं "यांचे अजून तीन गडी राहीलेत. काय करु?" "अग बघतेस काय? त्या रेषेजवळ त्या पोरी उभ्या आहेत. त्यांना आपल्याला पळायचय हे कुणी सांगीतलं नसणार. पळ आणि तिथंच टिप त्यांना" जिवापलीकडची चपळाई दाखवुन अनुसुयेनं शेवटच्या काही सेकंदात तीन बळी मिळवले आणि मॅच संपल्याची शिट्टी झाली. मैदानभर अनु का बाई सु, अनु का बाई या- अनु का बाई अन्सुयाचा नुस्ता जयघोष झाला.
सहावी ड चा वर्ग जिंकला होता. सर्वार्थानं जिंकला होता.
काही अस्फुट रेषा नुक्त्याच पुसल्या गेल्या होत्या

Tuesday, March 8, 2011

वैती

आज वैती दरबारात उभी होती. अंगावरच्या वस्त्रांच्या चिंधुकल्या सावरल्या तरी विखरुन जातील अश्या विसविसलेल्या. विशेष प्रसंग म्हणून मध्यरात्री भरवलेला दरबार आणि त्यातले खासेच मानकरी वृद्ध डोळ्यांनी वैतीवर चोरुन कटाक्ष टाकत होते. शरीराच्या गरजा भुक आणि हव्यास यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात, ज्ञानी अमात्यांच्या मनात नकळत चोरटा विचार आला. सरावाने कमावलेला कोडगेपणा क्षणभरासाठी कमी पडला, पण क्षणभरच. अमात्य दुसऱ्या क्षणी कर्तव्यकठोर प्रधानाच्या भुमिकेत शिरले. आणि आवाजातला करडेपणा न लपवता त्यांनी हलकेच हा दिली "वैती"
राजा शौनकाने आपला चिंतातुर चेहरा वैतीकडे वळवला. वैतीला पाहाताना शौनकालाही अंगभर डोळे फुटले. पण आजचा प्रसंग वेगळा होता.
"वैती, तुझ्या जंगलातून तुला शोधून आणून या अवेळ दरबारात उभे करण्यामागे काही कारणं आहेत. सुर्याचा किरणही पोचत नाही अश्या गुहांमधे राहातेस तू.जवळपासच्या वस्तीतले लोक घाबरतात तुला. तू म्हणे वशीकरण जाणतेस. पशु-पक्ष्यांना त्यांच्या भाषेत बोलतेस. वस्तीतली तरुण मुलं जंगलात चुकली की तुझी भुल पडते त्यांना. त्यांना कैद करतेस तू तुझ्या चित्रांमधून आणि असंबद्ध गाण्यांतुन. गावात परत आले तरी त्या मुलांची भुल उतरत नाही. तुझ्या नजरबंदीची जादु उतरत नाही."
"कुणी खरंच रस्ता चुकतं तर कुणी सरावाचा रस्ता चुकवुन जंगलात येतं." निर्भीड आवाजात वैती उत्तरली "माझी भाषा ज्यांना कळते, त्यांना असंबद्ध गाण्यातले सुर उमगतात, रेषांमधले अंधार उजळुन मिळतात. गावात जाऊन मग ती त्यांची गाणी करतात, शिल्प करतात, चित्र करतात किंवा मुकाट मनात तरंगांचे गान करतात. त्यांना त्यांचे डोह सापडवुन देणं हे माझं प्रारब्ध. बुडणे वा तरणे हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न."
अमात्यांनी नकारार्थी मान हलवली. कुमारांना असले शौक नव्हते.
धीर एकवटुन अमात्यांनी विचारलं "वशीकरण जाणतेस तू?" कुमारांना वैतीच्या जंगलात घुटमळताना बघितल्याची स्वारांची खबर होती...
वैतीचं जंगल अजून गडद झालं.
शरीर असतंच, शरीराला भुक असते, भुल असते आणि मोहही असतो. निती-नियमांच्या चौकटी वेशीबाहेर पडलं की कश्या कोसळतात हे फक्त मीच जाणते. आणि त्याहुनही तुमची वेस नकोच होती मला म्हणून तर समाजापासून लांब जंगलात एक माझं जंगल उभारलं मी. शरीर असतंच महाराज आणि निर्मितीच्या अवघड क्षणी देहाला शरण जाणं ही असतं. स्वतःच असं जंगल असणं तसही फार टोकाचं असतं.
"तुमचे कुमार हरवलेत? जंगलात?" मनातली सगळी आंदोलनं झटकुन वैतीनं प्रश्न केला. सतत वेड्या माणसांसारखी आतच आत कोडी सोडवु नयेत इतपत व्यवहार ज्ञान तिनं मिळवलं होतं. कानांवर उडत उडत आलेल्या अफवांना तिनं नुस्तं प्रश्नचिन्ह चिकटवलं होतं आत्ताच.
दरबारात कुजबुजीचं पीक पिकलं. गेले कित्येक दिवस कुमार, या राज्याचा वारस, बेपत्ता होता ही फक्त खास्यांनाच ठाऊक असणारी बातमी या जंगली पोरीलाही माहीत होती? की लोक म्हणतात तसं भविष्य दिसतं हिला? की कुठल्या पक्षानं सांगीतलं हिच्या कानात? कुमारांचे शौक तसे पिढीजात...हिच्या रंगीत देहाच्या भुलीत फसणंही फार अशक्य नव्हतं त्यांच्यासाठी.....
"कुमारांना पाहीलसं तू?" एकमेकांना जोखण्याच्या खेळाचा विलक्षण कंटाळा येऊन उद्वेगाने शौनकाने थेट प्रश्न विचारला "कुमार आले होते तुझ्याकडे? तुझं तारुण्य, तुझं गुढं, तुझं शरीर निव्वळं एक रमल आहे, लोक म्हणतात.... फशी पाडलसं तू माझ्या मुलाला...?"
"महाराज, देह हेच अंतीम सत्य असतं?" स्वतःच्याही नकळत वैती जंगलात शिरली
कित्येक वर्षांपुर्वी हाच प्रश्न अमात्यांनी ऎकला नव्हता काय? तो प्रसंग आजच्यापेक्षाही खाजगी आणि नाजुक होता..
************************************************************************************* राणीवशातल्या दासीनं शौनकाला जे सांगीतलं ते खोटं ठरतं तर दासीचं काळीज महाराज स्वतःच्या हातांनी हासडते.
सुकन्या महाराणी राजाशी एकनिष्ठ नाहीत हे सांगताना दासीची जीभ न झडते तरच नवल. एकनिष्ठ आणि विश्वासातल्या अमात्यांना तेव्हढं घेऊन करायची तेव्हढी चौकशी महाराजांनी केली. हल्ली सुदेव पंडीताची राणी महालात जास्त लगबग महाराजांनीही टिपली.
"तुम्हाला काय कमी आहे म्हणून तुम्ही सुदेव पंडीताच्या कच्छपी लागावं?" आवाजाच्या मर्याद्या सांभाळत शौनकानं विचारलं
"आमच्यात काय कमी म्हणून आपण रितसर चार लग्न केलीत महाराज?" महाराणी कसल्याश्या अजब निश्चयासह बोलत होत्या
"या राज्याला आपण वारस दिला नाहीत महाराणी"
"या राज्याला अजूनही वारस नाही महाराज"
अमात्यांनी शौनकाच्या तलवारीची मुठ न धरती तर अनर्थ होता.
नखाखाली मुंगी मरावी तसा सुदेवपंडीत एके दिवशी पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली टिचून मेला. आरोप ठेवले की प्रत्यारोप आले, न्यायनिवाडाही आला. वेडेपणाला धरबंध नसतो हे तसं फार सोईस्कर. मरण्याआधी शौनकाचा निर्वंश होण्याचा सुदेवाचा शाप सुकन्येने कोरडेपणाने पचवला. बाईपणाच्या चक्राकार कोड्याचा मध्य काय हे तिला स्वतःला कधीच ठरवता येत नाही सुकन्येला पुन्हा तिच प्रचिती आली.
************************************************************************************* वैतीनं सोबत आणलेली झाडाची साल जमिनीवर पसरवली. जीव वाचवुन इथून निघायचं तर काही समजांनां वाढवायला हवं. चित्रलिपीतून कुमारांचा शोध घेण्याचा नजरबंद प्रयोग वैती भर दरबारात करणार होती.
पळसाचा लालभडक रंग, गवतचुऱ्याचा गर्द हिरवा अन वैतीच्या पोतडीतून असे असंख्य रंग निघत राहीले. बोटांनी वैती रंगाचं गारुड पसरवत राहीली. झाडं, मनुष्याकृत्या, रंग-सावल्यांचे असंख्य खेळ वैती मनापासून मांडत होती.चित्रातलं जंगल वैतीवर चढू लागलं. रंगवताना ती स्वतःचं अस्तित्व आणि काल-स्थलाच्या मर्याद्या विसरुन गेली.
************************************************************************************* ऎन मध्यरात्री अमात्य सुकन्या महाराणींना घेऊन ज्यावेळी जंगलातून जात होते, त्याच वेळी इकडे त्यांच्या महालाला लागलेल्या आगीत राणीविषयी महाराजांचं मन कलुषित करणारी दासी जळून मेली. महाराणींच्या मरणाचा शोक शौनकाला आणि इतर दासींना अनावर झाला होता. मेलेल्या दासीच्या अंगावर राजदागिने चढवायची क्लृप्ती कामाला आली होती, शौनकानं विचार केला. सुकन्येला मरण तर येणार होतं पण इतकं सहजी नाही.
"अमात्य" आपलं भविष्य उमजुन सुकन्येनं रहस्याचा उलगडा केला "आम्हाला मारण्याचं पातक कराल ते ठीक पण आमच्या पोटी जन्मु घातलेल्या जीवाचा काय अपराध?"
अमात्यांनी चमकुन सुकन्येकडे पाहीलं "पण महाराज.."
"हे मुल महाराजांचंच आहे अमात्य, विश्वास ठेवा. कुणाच्या न कळत चौकटीची बंधन उधळणं आम्हाला सहज शक्य होतं. महाराज अंगवस्त्रांची गुपीतं जपतात, तशी आम्हालाही जपता आली असती. मात्र आम्ही परंपरांचा मान राखत स्वतःच्या ईच्छा-अनिच्छांचा विचार न करता शरीर फक्त महाराजांच्याच आधीन केलं. पण आपण विद्वान, आपणच सांगावं देह हेच अंतीम सत्य असतं? आम्हाला सुदेवाच्या पांडिती चातुर्याची, तल्लख विनोद बुद्धीची आणि विविध विषयातल्या सखोल ज्ञानाची भुरळ पडली. कुणी सांगावं शरीराची पडलीही नसती"
"पण आपण महाराजांना आपल्या या अवस्थेविषयी सांगीतलं का नाही? गेली कित्येक वर्षं या राज्याला वारस मिळावा म्हणून यज्ञ, मंत्र-तंत्र, होम होताहेत..."
"कट-कारस्थानं, युद्ध यातून महाराज आमच्या वाट्याला येतात ते असे किती? आणि कुणी सांगावं, बाकीच्या वांझ राण्या मंत्र-तंत्रही करतील. आम्ही महाराजांना ही बातमी सांगण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहात होतो आणि आज ही वेळ, हा प्रसंग" सुकन्या विषण्ण आवाजात उत्तरली
"अमात्य, आपण आता परत फिरलो तर? आपण सत्यकथन कराल तर महाराज ऎकतीलही"
अमात्यांचा गळा दाटून आला "महाराणी, आपल्या महालाला लागलेल्या आगीत एव्हाना कुणी जळालंही असेल. आपल्या सुतकाचे खाजगी उत्सव एव्हाना सुरुही झाले असतील. शरीर अंतीम सत्य नसेलही महाराणी पण त्याच्या अस्तासोबत अनेक प्रश्न मिटतात हे खरं"
"अमात्य, ही रत्नं, हे पाचु, हे दागिने, सारं सारं घ्या" दीनवाणेपणानं सुकन्या म्हणाली "पण अश्या अवस्थेत आमच्या हत्येचं पातक घेऊ नका अमात्य"
क्षणभर थबकुन अमात्यांनी जवळच्या शेल्यात सुकन्येचे सारे दागिने घेतले. बोटातली राजमुद्रा तेव्ह्ढी सुकन्येला परत करत अमात्य थकून म्हणाले "आपली पारखं चुकली महाराणी. पण आम्ही कर्तव्यात चुकायचो नाहीत"
************************************************************************************* वैतीनं झाडाच्या सालावर सबंध जंगल उतरवलं होतं. हिरवी तपकिरी पानं, हत्तीच्या पायागत माजलेल्या झाडांची खोडं, त्यावरुन अल्लाद लटकणाऱ्या वेली आणि साऱ्यांना छेदून जाणारा करपट लोखंडी भाला. भाल्याच्या टोकावर चितारलेलं शौनकाच्या निशाणाचं चिन्हं गर्दीतही उठून दिसत होतं. "निश्चितच" शौनकानं दोन्ही हात पाठीमागे बांधत घोषणा केली "कुमार जंगलात आहेत." वैतीचं चित्र हुबेहुब असणार, नव्हे ते आहेच. फक्त कुमार परतेपर्यंत गुप्तता पाळणं आवश्यक आहे. शौनकानं काही क्षण विचार केला आणि मागे उभा असणाऱ्या सेवकाच्या कानात काही कुजबुज केली.
थोड्याच वेळात सेवक एक मोठा घडा घेऊन आला. घड्याचं तोंड मोठ्या कसोशीनं बांधलेलं. त्यानं तो वैती समोर ठेवला.
"यात तुझं इनाम आहे. तुझं कसब आम्ही पाहीलं. अजून थोडी परिक्षा बाकी आहे. घड्यात न बघता केवळ स्पर्शानं आत काय आहे हे ओळखशिल तर जंगल तुला जहागिरीत देऊन टाकु"

साशंक नजरेनं वैतीनं घड्यावरंच फडकं बाजुला केलं आणि आत हात घातला. तलम काळा पोत एकसंध अंधार, जीवघेणा तीव्र. तिनं चुरुन पाहीला नाजुक बोटांनी आणि स्वतःच्याच स्पर्शानी शहारली. रिकामपणाचा डोह स्थिरावला तसं घड्याच्या तळाशी तिला हिवाळा सापडला. आर्त तिला गाणं सुचलं-कधीचं हरवलेलं

ती चांदण वेळच होती । चांदही थबकला होता
उन्माद फुलाचा शोषून । सर्प थरारत होता.
तो तटतटलेला माथा । डोळ्यात वीजेचा साज
श्वास म्हणावा त्याला । भासते समुद्री गाज.

वैतीचा श्वास जड झाला. शरीराचं ओझं झालं. परत परत कुणी शरीराला डसावं आणि त्याचीच चटक लागावी असा घटभारी मंतर. मोठीच गंमत असते शरीराची, वेदनेपलीकडच्या सुखाची.

एका विलक्षण नशेत वैतीनं दरबार सोडला आणि ती दिसेनाशी झाली.
अचानक झालेल्या या घटनांची संगती न लागलेल्या अमात्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्यानं शौनकाकडे पाहीलं तेव्हा शौनक उत्तरला "कुमार सापडेपर्यंत आपण गुप्तता पाळायला हवी. कोण जाणे ही पोर झाडाच्या कानात बोलेल तर वाऱ्यासोबत जगभर कुमारांच्या गायब होण्याची बातमी पसरेल. पण आता धोका नाही. ही जंगलात जाईपर्यंत घड्यातल्या सापाचं विष भिनेल हिच्या शरीरात. संथ पण मोठं परिणामकारक असतं या सापाचं विष"
"अमात्य, ते चित्र बघा. जंगलाचा कुठला भाग असेल असं वाटतं ते पाहा आणि सैनिकांच्या तुकडीला घेऊन जंगल पिंजून काढा" शौनकानं अतीव समाधानानं आज्ञा सोडली.
अमात्यांनी चित्र निरखुन पाहीलं आणि नकळत त्यांच्या तोंडून अस्फुट किंकाळी बाहेर पडली.

एव्हाना चित्राचे रंग वाळले होते.
हिरवी तपकिरी पानं, हत्तीच्या पायागत माजलेल्या झाडांची खोडं, त्यावरुन अल्लाद लटकणाऱ्या वेली, साऱ्यांना छेदून जाणारा करपट लोखंडी भाला. आणि भाल्याला एखाद्या वेलीसारखा लगडुन लख्ख निळाशार सर्प. गुंजासारखे लाल त्याचे डोळे भाल्याच्या टोकाला टोचलेल्या पौरुषाला जणु संमोहित करत होते. आकाशाच्या निळ्या धुक्यात कुमारांचा चेहरा हलकाच लपून गेला होता

अमात्यांनी चार सैनिकांना घेऊन जंगलाकडे धाव घेतली
************************************************************************************* कुमारांनी मोठ्या प्रयत्नांनी वैतीची गुहा शोधून काढली होती. तिच्या असंख्य कहाण्या आणि तिच्या देहाचं गारुड यांची त्यांना भुरळ पडली होती. अजिंक्य असलेलं तिच्या देहाचं चक्रव्युह त्यांना भेदायचं होतं.
मद धुंद असल्यागत चालत येणारी वैती कुमारांनी पाहीली आणि त्यांच्या शरीराचे रोखलेले बांध तट्तटा तुटले.

वैतीला वाटलं आपल्या डोळ्यांवर कुणी चढलय. घड्यातला अंधार अंगभर पसरलाय. उष्ण-थंड समुद्री लाटा अंगभर आदळाताहेत.
परत परत कुणी शरीराला डसावं आणि त्याचीच चटक लागावी असा घटभारी मंतर. मोठीच गंमत असते शरीराची, वेदनेपलीकडच्या सुखाची.

थरथरले क्षणभर सारे । तो अजिंक्य अजिंक्य होता
धुंदीत परत मग फिरला । तो सर्प देखणा होता.
मी ओतप्रोत निलकांती । क्षण अनंत मग कैफाचे
ओठांनी टिपले होते । लावण्य निळे सर्पाचे.
************************************************************************************* अमात्यांनी वैतीच्या गुहेत प्रवेश केला तेव्हा पहाटेच्या फटफटत्या उजेडात त्यांना निळेजार पडलेले वैती आणि कुमारांचे निष्प्राण देह दिसले.
...आणि वैतीच्या बोटात काळी पडलेली सुकन्येची राजमुद्रा.

Thursday, February 10, 2011

लोकशाही, गांडु बगीचा

नाव जरा भडक दिलं म्हणजे निदान चार डॊकी इथे हिटा मारतील हा साधा हिशेब. सालं व्यावसाईक लेखकं आणि पत्रकार हल्ली काही गंभीर लिहीत नाहीत तर आपण तर प्रयोगशील ब्लॉगवाले. आपली लाल/निळी/ जांभळी आपणच करायची. गंभीर म्हटलं की लोकांना हाताशी जेलुसीलची बॉटल लागते. बरं हल्ली आर्टी म्हणवुन घेण्याची पण फॅशन राहीली नाही वरच्या वर्तुळात, त्यामुळं तो तोंडदेखला ऑडिअन्सही बाद. सारं कसं हल्कंफुल्कं असावं, म्यॅच २०:२०ची शिवाय त्यात नाचणाऱ्या पोरींचा तडका, नाटकं निव्वळ भरत जाधवीय पद्धतीचं-अंगविक्षेपी विनोदी, सिनेमे अजागळ हसवणारे! आपला राष्ट्रीय प्राणी अस्वल केला तर? सारं कसं हसतं खेळतं...
जन्मापासून लिंकनची ऎकलेली रेकॉर्ड- लोकांनी- लोकांसाठी- लोकांकडून चालवलेली पद्धत. मग परवाच प्लेटो की कुणाचं वाक्य वाचलं- लोकशाही ही गुंडपुंड आणि रिकामटेकड्या लोकांकडून चालवली जाईल. सॉलीड टाळी दिली. फुकट १ मार्काचा लिंकन वाचला इतकी वर्ष.
मुळातच भारतीय मनोवृत्ती धकवुन न्यायची, सोईस्कर ते स्विकारायची, सहन करण्याची, कुणाच्या तरी टाचेखाली राहाण्याची, आंधळी आणि भित्री. त्यामुळे आज आपल्या लोकशाहीनं जी अगम्य दिशा आणि गती पकडली आहे, ती कुठे नेईल याचा विचार केला तरी लटपटायला होतं.
राज्यसभा, विधान परिषद ही जेष्ठांची सभागृह मानली जातात. आपले संसदीय रचनाकार हुशार, त्यांना विद्वान लोक निवडुन येणार नाहीत याचा सॉलीड कॉन्फीडन्स असल्यानं त्यांनी आधीच ही सोय करुन ठेवली. पण ते एक हुशार तर आपण सात हुशार. तिथेही आपण नेहमीचेच यशस्वी पाठवले. मनमोहन सिंग राज्यसभेवर असतात पण ते विद्वान आहेत. पण ज्याचं तोंड गटार आहे असे मणी शंकर अय्यर राज्यसभेवर? तेही लेखक म्हणून? लोकांनी निवडणुकीत नाकारलेले कर्तृत्वहीन गृहमंत्री पाटील ग्यिरे तो भी टांग उपर म्हणत राज्यसभेत? बरं जे खरंच विद्वान आहेत, ना त्यांना तोंड उघडायला संधी मिळाली ना कुठल्या कमिटीवर जाऊन दिशा द्यायला. आता उरलो भत्त्यापुरता अशी बऱ्याचजणांची स्थिती.
परवाच काही आकडेवारी वाचली. अंधूक आठवतय त्याप्रमाणं, १०%-१२% आमदार-खासदार पिढीजात याच धंद्यात आहेत आणि एकट्या कॉंग्रेसमधे हे प्रमाण २०%-२२% आहे. म्हणजे समाजसेवा ही काही लोकांच्या जिन्समधेच असते. ऎसी कळवळ्याची जाती की कायसं म्हणतात ते हेच बहुदा. आमचे झुल्पीकार देशमुख एकदा बोल्ले, वकीलाचा मुलगा वकील, डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होतो ते चालतं मग आमची मुलं राजकारणात आली तर लगेच घराणेशाही कशी? अहो काका, एकतर ही मुलं तो धंदा व्यवस्थित शिकून येतात आणि दुसरं म्हणजे आम जनता पैसे देऊन त्यांची सेवा घेते. नाही आवडलं तर चालले पुढे. राजकारणात तसं नाही नां काका. तिथे कसलं शिक्षण नाही ना तुम्ही नावडले तर मीठ आळणी म्हणण्याची सोय. बरं तुम्ही आमच्याकडून पैसे ही घेत नाही! त्यामुळे आमची गोची. कोणे एकेकाळी राष्ट्रसेवादल, युक्रांद तसंच अभाविप आणि अश्या बऱ्या संस्था/चळवळी इ इ होत्या. यातली उत्साही मंडळी छोट्या गटातून पुढे येत राजकारणात यायची. त्यांना चळवळीचा बेस असायचा (निदान अशी समजुत असायची), पाय जमिनीवर असायचे. पुढे जाऊन माजले तरी निदान स्वतःचं म्हणायला काही कर्तृत्व असायचं. आता मुळात हाणामाऱ्या आणि पैसीय-माज या कलमांखाली कॉलेज-विद्यापिठातल्या निवडणुका, चळवळीच बंद पाडल्यात. बॉटम-अप म्हणता येईल असं नेतृत्व पुढं येण्याचा एक मोठा सोर्स इथंच बंद झाला. मग अचानक एक दिवस गंमत होते आणि कुण्या युवराजांचा राज्याभिषेक होतो. ते कुठून आले, आधी काय करत होते, त्यांची लायकी काय, ते पुढे काय करणार काही म्हणजे काही महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं त्यांच मधलं नाव आणि आडनाव. दॅटस द सिग्नेचर! हे शिलेदार अगदी छोट्या संस्थानाचे युवराज असतील, माने, उनका सिग्नेचर डजंट कॅरी व्हॅल्यु तर राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी कुण्या अमुकतमुक प्रतिष्ठा"ण" च्या नावाखाली खुप साऱ्या टग्यांचे फ्लेक्स अचानक चमकायला लागतात. सरकार, राजे अश्या उपाध्या, फोटो शक्यतो हातात मोबाईल, डोळ्यावर काळ्या काचा-सोनेरी दांड्यांचा गोगल, आणि चमचम करता है ये बदन इतपत शिसारी येइस्तो सोनेरी लखलखाट. (मध्यंतरी सोलापुर रस्त्यावर इंदापुरात कुण्या सरकारांच अप्रतिम फ्लेक्स होतं. विविध अ‍ॅंगलनं काढलेले गॉगलबाज फोटो- बाकी वर्णन वर केलं तसंच आणि सगळी कडे पत्री सरकार लिहीलेलं. नाना पाटलांनी जीव दिला असता हे बघून किंवा पत्री तरी ठोकल्या असत्या).
बरं निदान मायबाप जन्ता तरी हे नाकारेल तर ती ही शक्यता नाही. "माय, आईवीणा लेकरु हाये. पंजालाच निवडुन द्यायला पायजे" असं आमच्याकडे काम करणाऱ्या मावशी निव्वळ चाळीशीच्या राजीवबाळा बद्दल बोललेल्या. इंदीरा आवास योजना किंवा जवाहर रोजगार योजनेत काम करणाऱ्या दुर्गम भागातल्या माणसांना आजही इंदीरा किंवा जवाहर जिवंत असून आपल्याला तेच पैसे देतात असं वाटतं. ही अतिशयोक्ती नाही. शतकानुशतके कुणा न कुणा राजाच्या आधीन राहाण्याची सवय लागलेल्या आपल्या मनोवृत्तीला आजही कुणी तरी राजा लागतोच. बाळ चे बाळासाहेब होतात, शरदच्या मागे राव किंवा साहेब चांगलं दिसत नाही म्हणून नावाचं शरद"चंद्र""जी""राव" होतं, नेत्यांच्या साठ्या होतात, जिवंतपणीच पुतळे उभे राहातात, वाढदिवसाला हातात चांदीची तलवार, डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात न पेलवणाऱ्या नोटांच्या माळा घातल्या जातात. या नव्या राजां (आणि राण्या)ची स्तुती करताना भाटांची कुठेच कमतरता दिसत नाही.
... कारण बहुसंख्य भाट हे भाडोत्री. नेत्यांना पक्ष आणि पक्षाला तत्व भाडोत्री तद्वतच. घरंचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांचे दिवस गेले. भाटांना हल्ली पैसे देऊन आणावं लागतं, कुठल्या तरी समितीत पद द्यावं लागतं, निवडणुक आली की दारु-मटनाची सोय करावी लागते. काय करणार? त्यांनाही बऱ्यापैकी पोट असतं!
आपली लोकशाही ही बॉटम-अप आणि टॉप-डाऊन असं सुलटे-उलटे पिरॅमिड एकमेकांवर ठेवलेली रचना. ग्रास रुटचे प्रश्न तिथेच सोडवायचे, जर त्यात सर्वत्र सारखेपणा असेल तर एक सर्वसमावेशक उत्तर वरच्या स्तरातुन मिळवुन सर्वत्र राबवायचं. काही गोष्टी, व्हीजन म्हणून किंवा जास्त स्ट्रॅटेजिक म्हणून वरुनच येतात, खालच्या थरानं त्या लोकांपर्यंत पोचवायच्या. वाचायला सोपी वाटणारी ही साखळी कधीचीच तुटली आहे. वरच्यांचे अजेन्डे वेगळे आणि खालच्यांचे चाळे वेगळे. पक्ष, जात, धर्म, भाषा, एकगठ्ठा मतं आणि निव्वळ माझा फायदा या गिरणीत लोकांचं दळण दळतय.
या सगळ्या दुष्टचक्रात लोकशाहीही काही साधारण वकुबाच्या लोकांनी अतीसाधारण कुवतीच्या लोकांसाठी चालवलेली व्यवस्था होऊन बसली आहे. तुमच्यामागे जातीचा, संघटनेचा, भाषेचा इ इ प्रचंड आधार नसेल किंवा तुम्ही पैश्यांनी सारेच विकत घेऊ शकत नसाल तर या व्यवस्थेत सरासरीकरण होण्यासाठी तुम्ही आदर्श व्यक्ती होता.
यावर नियंत्रण कुणाचं? मुख्य म्हणजे आपलं. आणि मग तोच चंद्रमा नभात ही जुनीच रेकॉर्ड- आपण मतदान करत नाही, आपण जात बघून मत टाकतो, आपण पैसे घेऊन मत देतो, सगळेच साले नालायक होते इ इ इ. हॅरी ट्रम म्हणतो तसं Democracy is based on the conviction that man has the moral and intellectual capacity, as well as the inalienable right, to govern himself with reason and justice.. आणि हे होत नसेल तर इतक्या मोठ्या सर्कशीत सगळे निकम्मे असं म्हणून नकारात्मक मतदानाचा सोपा हक्क आपल्याला नसावा?
नियंत्रण करणारी अजून एक यंत्रणा म्हणजे लोकशाहीचा चोथा स्तंभ (तेच ते- चवथा). (उरलेले दोन स्तंभ फारच संवेदनशील-छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणारे आणि त्यांच्याबद्दल नवं काय लिहीणार- सगळंच तर हिंदी पिक्चर मधे दाखवुन झालय असं म्हणत मी ते स्तंभ फोल्ड करतोय!). तर हा चोथा स्तंभ म्हणजे पेपरवालं. दिशा दाखवणं, लोकमानसाचं प्रतिबिंब योग्यपणे सरकारपर्यंत पोचवणं, चुकांबद्दल फटकारणं आणि कधी केलंच तर चांगल्या कामाचं कौतुक करणं अश्या साधारण अपेक्षा. पण राजकारण्यांनी पेपर किंवा संपादक विकत घेऊन आपल्या डोळ्यांवर तिथेही पट्ट्याच बांधल्या आहेत. महाराष्ट्रात सामना, एकमत, प्रहार निदान उघडपणे राजकारण्यांचे पेपर आहेत. पण काही सुमार मंडळी एकतरी पद्म मिळेपर्यंत सोनियाबाई आणि राहुलबाळाविषयी छान छान लिहीणार असा पण करुन बसले आहेत. उनका चुक्या तो भी हम सावर लेंगे बाबा अशी ही संपादक मंडळी. कुणाला रसायनशास्त्रातल्या संशोधनाबद्दल नोबेल मिळालं तर गुगल करकरुन संपादकीय पाडतील पण आपल्या दत्तक पालकांविषयी ब्र काढणार नाही हा यांचा खाक्या. काहींचा जीव घरावर पडलेल्या शेणगोळ्यांनी मेटाकुटीला आला तर काही वारंवार मार खाउन ही धडाडीनं ग्रेटभेटा घेत राहतात हाच काय तो दिलासा.
आता हे दळलेलं पीठ परत दळून काय मिळालं? कप्पाळ! काहीच नाही. आता वादविवादाची खुमखुमी जिरावी म्हणून काही प्रश्न-
१) कुठलाही "इसम" निवडुन देण्याच्या लायकीचा नाही हे मत टाकण्याची सोय सोप्पी करता येईल का?
२) पट्टेवालं गाढव झेब्रा वाटु शकतं. सत्य कळाल्यास निवडुन गेलेल्या "इसमास" वापस बोलावण्याची काही सोय करता येईल का?
३) अमुक प्रमाणात मतदान न झाल्यास ते मतदान रद्द करता येईल का? १५% लोकांनी निवडुन दिलेला "इसम" उरलेल्या ८५% जणांचं प्रतिनिधित्व कसं करणार? तिथे परत निवडणुक घालण्यात यावी. हाच प्रसंग तिसऱ्यांदा झाल्यास जेष्ठांच्या सभागृहातील कुणालातरी तो मतदार संघ "आंदण" देण्यात येऊ शकतो का?
४) ६० वर्ष वयावरील "इसम" समाजसेवा करु शकतो पण त्याला कुठल्याही निवडणुकीत उभे राहाता येणार नाही याची "व्यवस्था" करता येईल का?
५) कुठलाही "इसम" दोनदा निवडुन आल्यास (सलग अथवा तुकड्यांत), त्याने आपली समाजसेवेची खाज अन्यत्र भागवावी असं काही करता येईल का?
६) निवडुन गेलेल्या "इसमास" एखादे मंत्रीपद "उपभोगायचे" असल्यास त्याची शैक्षणिक आर्हता आणि संबंधित अनुभव वेशीवर टांगता येतील का?
७) टॅक्स भरणाऱ्यांच्या मतांना जादा किंमत देऊन वेटेड अ‍ॅव्हरेजनं मतमोजणी करता येऊ शकते का?