Sunday, August 24, 2008

अदृष्यांच्या भेटींचे दृष्टांत

बेटां-बेटांनी बनलेली असतात माणसं. प्रत्येक ओळखी साठी एक नवाच कप्पा, एक नवंच बेट. वाहात बेटे जवळ आली तर माणसांचं जंगल होईल याची भिती. पूर आलाच तर काही बेटांना बुडवुनही पुराणकालीन नोहा सारखी बाकीची बेटे वागवत मानवजातीचं अस्तित्व मिरवत पुढे जायचं आपण. पण आता हे वेगळं. आता हे वेगळं, कारण मी स्वतःच स्वतःला तुझ्या बेटावर पुनर्वसित करत आहे. फाळणीसारख्या काही खुणा, किंचित कत्तलींचे इतिहास आणि आठवणी साठवणारया मेंदुंच्या काही पेशी मागे सोडून मी आज तुझ्या वसतीला आलोय. रंगांचे काही तलाव होते माझ्या बेटावर, तिथून तुला आवडणारे करडे, तपकिरी, काळपट रंग आणलेत मी. तश्याच काही विराण्या रागदारीतून अन शुष्क, विराण, बेभान ऋतु सोबतीला. तू म्हणालीस एकट्या माणसाला इतकं पुरेसं असतं.

मी तुझ्या वसतीला आलो आणि मी हे लपवले नाही. मी काहीच लपवत नसतो पण माझ्या आगमनाचे उत्सवही तू किंवा मी साजरे केले नाहीत. किंबहुना आता नवेच पाठशिवणीचे खेळ सुरु झाले आहेत. तुझ्या शहरात राहायचं आणि तुलाच टाळायचं. हे खेळाचे नियम की आपल्या संबंधांचे तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न; मला कळत नसतं. तुझ्या असंख्य चेहरयातला एक आर्टी चेहरा मी निवडला. आणि तोच माझा झाला. तुझ्या कविता बेसावधपणे उलगडत गेल्या आणि माझ्याच झाल्या. तुझे शब्द, माझे झाले, तुझे आर्त, माझ्या उरी इतरले, तू म्हणजेच मी झालो; अपरंपार श्रद्धेचा एक उखाणा! घात झाल्यागत तुला एक पत्र आणि तेव्हा पासून माझे अस्तित्व तुझ्या प्रतिभासाधनेपुरतेच मर्यादित. माझ्या अनुभवांचे टोक, तुझ्या लेखणीला जोडलं अन तुझे चष्मे घट्ट माझ्या डोळ्यांवर (उचकटले तर डोळे ही सोबत निघतील असं तुला कधी वाटत नाही?). काचेच्या घरात राहात असल्यागत जगण्याचे सारे सोस तू इतरांसमोर उलगडत गेलीस, अन मी? मी, माझा हरेक श्वास, अस्तित्वाचे ताण, सुक्ष्मदर्शकाखाली ठेवून तुझ्या हवाली केले. मला भोगत, स्वतःचे भोग चढवण्याची कोण ही लगबग प्रिय!

बेटे जवळ आली की माणसांची जंगलं होतात. ओळखं, झाड म्हणून; रंग, एकजात हिरवा; सारी मुळे आपापसात हेवेदावे असल्यागत एकाच ठिकाणाहून पाणी शोधणारी. तस्संच होतय तुझ्या शहरात आल्यापासून. किंवा कसं, जणू कॅमेराची लेन्स झुम करत करत तुझी ओळख जवळ येत अस्पष्ट व्हावी तसं. तद्रूप, चिद्रूप, विद्रूप सारी तुझी विविध रुपे इथे, तुझ्याच शहरात उलगडत गेली. तुझ्या कवी असण्यापलीकडचे संदर्भ नकोच होते मला. माणूस म्हणून, प्रेयसी म्हणून, अमूक आणि तमूक म्हणून तू कशी असशिल याची भितीयुक्त उत्सुकता होतीच पण माझ्या मनातल्या प्रतिमांचं हसंही होवु द्यायचं नव्हतं मला आणि म्हणूनच तुला तोंडातोंडी सामोरी येण्याची सार्थ भिती.

या डोळ्यांतून त्या डोळ्यांत वाहाताहेत बेटं पण सामोरी कधीच येणार नाहीत. आपली ओळख, कवितेपासून कवितेपर्यंत आणि भेटींचे दृष्टांत कायमच अदृष्य.

Wednesday, August 20, 2008

आवडलेले थोडे काही

मित्रांनो, खुप दिवसांनी एक नवा खो-खो सुरु करतोय. विषय तसा बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा आहे त्यामुळे मझा यावा हीच (श्रींची!) ईच्छा.

कविता जश्या बालभारतीच्या तावडीतुन मुक्त झाल्या, तुम्हा-आम्हाला त्या (अचानकच?) आवडायला लागल्या. त्या आवडीनिवडीतही जिवाच्या जवळ असणारया काही कविता असतातच. हा खो खो अश्याच कवितांसाठी.

यावेळी खेळाचे नियम जssरा बदलतोय.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- -----------------------

सखीची मुलगी- कवी ग्रेस (निवडक कडवी)

सखीच्या मुलीला कसे काय द्यावे
उन्हांतील हे भव्य शब्दांगण?
इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो
स्वतः सावलीचा मुका साजण...

जळातील चांदीत मासा रडावा
तसा मेघ येतो सखीच्या घरी
घराच्या भयाने उभा श्वास तोलून
धरावी मुलीने पुन्हा बासरी?

तिने जीव द्यावा असा जीव न्यावा
पुढे सर्व हो कांचनाचे धुके
लिलावात वाटणे संभवे ना
अशाने सखीला कधी पोरके.

--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- -----------------------

दु:ख- कवी ग्रेस

//१//
निर्वंश समुद्रावरील वाळवंटात उभे
राहिले की मला ऎकू येतात
माझ्या कविता.
एखाद्या प्राचीन साम्राज्याचा निखालसपणे
खचलेला भूभाग.
मावळत्या मिठीतील काळा करंद मोर...
दुःख सांगितले की हलके होते.
आकर्षक होते जगून दाखविले की.
मरुन दाखवल्यावर
दुःख मिटते?

//२//
स्वप्नलिपी वाचणारया प्रेषिताच्या खांद्यावरुन
ढळलेला पक्षी थेट पडला
तो काळोखातच.
डहाळ्यांवर फार दिवसांच्या सुकलेल्या
चांदण्यांचे तेजस्वी व्रण होतेच.
आणि मग उशीरा रात्रीपर्यंत शहरातून
निर्घूण कत्तलीच्या बातम्या
येतच राहिल्या.

//३//
आवड तरी कशी? दुःखद नक्षीची कविता,
प्रिय व्यक्तीचे प्रदीर्घ चुंबन;
ज्या खेड्यांत प्रार्थना भरत होती
तिथल्या विहिरीचे काळे पाणी;
उशीर झाला म्हणून लिलावात विकलेले
घर. मनाचे आणखी कोणते धर्म असतात?
रडून थकले की सगळेच जीव झोपी जातात.


--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- ---------

माझा खो मेघना आणि क्षिप्राला...

Wednesday, August 13, 2008

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी


खुप आधी नाटकांविषयी लिहीलं होतं. नाट्यगीतांविषयी न लिहीतो तर कुठे तरी आत रुखरुख लागली असती.

मराठी गाण्यांची पहीली आठवण म्हणजे भावनातिरेकाने मळमळणारी करुण, दारुण भावगीते. रस्त्यावरची भिकारीण असो की कॉलेजात जाणारी चंपट पोरं असो, सारी आळवुन आळवुन शुद्ध, दाणेदार, स्वच्छ, सुमधुर आवाजातच गाणार. ते खोटे शब्द, खांडेकरी आदर्शांचा काव्यगुळ यात खरं तर मराठी गाण्यांचा आमच्या पुरता मुडदाच पडला असता पण..

..पण वसंतराव भेटले. वसंतराव म्हणजे बाप-माणुस. आधी नुस्तंच "घेई छंद मकरंद" आवडायचं कारण त्यातली तानांची भराभरा उलगडणारी भेंडोळी. "घेई छंद" चं विलंबित व्हर्जन मिळमिळीत वाटायचं आणि तडफदार वसंतरावांबद्दल आदर द्विगुणित व्हायचा. तेव्हा उत्तुंग नाट्यशिल्प (कदाचित) दुसरया कुठल्या तरी नावाखाली कॅसेटच्या स्वरुपात मिळायचं. कान जरा सेट झाल्यावर "घेई छंद" च्या विलंबित लयीची पण मजा कळायला लागली. तो पर्यंत वसंतराव नुस्ते छा गये थे. "मृगनयना रसिक मोहीनी" सारखं तलावातल्या चांदण्यासारखं संथपणे पसरत जाणारं गाणं असो की "सुरत पिया की" सारखी दमसाजाची परिक्षा घेणारं, प्रचंड चढं-उतार असणारं गाणं असो किंवा "तेजोनिधी लोहगोल" सारखी सर्वांगसुंदर प्रार्थना असो, वसंतराव वॉज अनबिटेबल. म्हटलं तर सारीच नाट्यगीते आणि म्हटलं तर प्रत्येक गीताची जातकुळी वेगळी. वसंतरावांनी सर्वच प्रकार लिलया हाताळले. वसंतरावांची तान न तान सुस्पष्ट, स्वच्छ, शब्दांची आब राखणारे उच्चार आणि रंगमंचावर अपेक्षित असणारी स्वरांची जबरदस्त फेक असा साराच अफलातुन मामला. वसंतरावांचा मोठेपणा इथेच संपत नाही. डबक्यातल्या पाण्याला वाट नाही मिळाली तर त्याला कुजका वास यायला लागतो. नाट्यसंगीताला वसंतरावांनी वास येण्याआधीच नवी वाट काढून दाखवली. बालगंधर्व, दिनानाथ यांच्या (ऎकिव)सुवर्णयुगानंतर पुढची पिढी जुनेच सुर आळवत होती. नाविन्याच्या अभावापायी महाराष्ट्राची एकमेव प्रेझेन्टेबल कला मरते की काय असं वाटत असतानाच वसंतरावांनी समर्थपणे ती परंपरा पुढे नेली.

याच पालखीचा पुढचा समर्थ भोई म्हणजे अभिषेकीबुवा. गायक म्हणून अभिषेकी थोर होतेच पण एक कॉम्पोजर म्हणून मला त्यांच्या बद्दल जास्त आदर आहे. "सर्वात्मका सर्वेश्वरा" सारखं आधुनिक पसायदान असो की "अबिर गुलाल" सारखा कल्लोळ कल्लोळ अभंग असो, बुवांचं गाणं टू द पॉंईंट असायचं, कुठेही फापटपसारा नाहीच. कट्यार काळजात घुसली हे जसं वसंतरावांचंच नाटक होतं तसं धाडीला राम तिने का वनी, मीरा मधुरा ही बुवांची नाटकं होतं. कैकयीचा त्रागा व्यक्त करणारं "मी झाले अवमानिता" असो की "कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला" मधलं भरताचा आर्त असो, त्या गाण्यांमधले भाव कॉम्पोजिशन मधे पुरेपुर उतरलेले. "लेवु कशी वल्कला" या आशा खाडीलकरांनी म्हटलेल्या गाण्यात तर वनवासातील सीतेचे फुटप्रिन्ट्स इतके ठळक आहेत की जेव्हा सीता गाते "नीट नीरीची गाठ न जुळते/नीरी वरती नीरी न जुळते//कटी वरुनी झरते, ओघळते मेखला" (शब्दांची चु.भु. दे. घे.), डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त गोंधळलेली, बावरलेली सीताच येते. आणि बाईंनी की ते गाणंही अश्या काही झोकात गायलय की तोंडून नुस्तं "वा!" असंच बाहेर पडावं. "हे सुरांनो चंद्र व्हा" बद्दल तर काय बोलावं? कुसुमाग्रजांनी जणु नवं मेघदुतच लिहीलय असं वाटतं.

या दोन महाविरांव्यतिरिक्त रामदास कामत, प्रभाकर कार्येकर, बकुळ पंडीत, अजीत कडकडे असे असंख्य जण गाऊन गेले. तरीही..

..तरीही ही परंपरा सायनोसायडल लयीसारखी खाली-वर होत राहीली. का? प्रतिभावंतांचा अभाव, गायक-नटांचा अभाव, प्रसंगाशी विसंगत कोंबलेली गाणी, काळाचा महिमा ..ही यादी अजूनही लांबवता येईल. पण उपयोग काय? आज काही छोटे मोठे अपवाद सोडले तर दामलेबुवांव्यतिरिक्त गाणारं आणि लोकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करु शकणारं कोणीच नाही. लेकुरे उदंड झाली सोडली तर त्यांनी ही गाणं फार गंभीरपणे घेतलं नाही हा जरासा आपल्याच नशिबाचा वाईट भाग म्हणावा

केरळात कथक्कली, कुठेतरी भरतनाट्यम, कुठे कुचिपुडी असे विविध वारसे विविध संस्कृतींना लाभले. महाराष्ट्राला मात्र दगडांच्या देशा गाण्यागत लावणी, तमाशे, शाहीरी असे रफ-टफ प्रकार वाट्याला आले. सुस्कांरीत म्हणावा असा नाट्यगीत हा एक ठेवा या मातीला लाभलेला पण तो ही कालौघात मिटत जातोय. सध्या सारेगमात छोटी छोटी पोर ज्या तडफेने नाट्यगीतं म्हणताहेत, ते ऎकलं की उम्मीद पे दुनिया कायम है चा अनुभव येतो हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

Tuesday, August 5, 2008

भरल्या पोटीचा न-अभंग

कोंबड्यागत फोनाचे आरविणे-मेलाचे फोनातच चेकविणे
स्वप्नांच्या बुडावर लाथविणे-आपणची आपुल्या

निग्रहाने पुस्तक मिटणे-एमओएमांमागे जीवा पळविणे
पापण्यांना तिष्ठविणे-भरल्या पोटी

कळफलकावर कळा काढिणे-दुसरयांच्या घाणी निस्तरणे
आपुल्या खालचे जळणे-कोणा न दिसे

सश्याचे आतची धडधडणे-श्वासांचे येणे अन रेंगाळणे
सुरांचे आर्त आळविणे-मनयोगासाठी

शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे
त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नसे