Friday, November 30, 2007

शिव्या- एक देणे!

किती थोड्या गोष्टी आहेत माणसाच्या आयुष्यात जिथे देणारा खुष असतो आणि घेणारा खल्लास! तरीही शिव्या भाषिक दृष्ट्या अस्पृश्य का? असे म्हणतात की तुम्हाला एखादी नवी भाषा किती येते याची परीक्षा घ्यायची असेल तर नव्या भाषेत शिव्या द्यायला सांगा. इतकं सारं असूनही शिव्यांना आपण सांस्कृतिक घटक मानत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे.

शिव्या आणि मनुष्यप्राण्याचं वय यांच्या आंतरीक संबंधांविषयी फारसं संशोधन झालेलं नसलं तरी सांखिकीदृष्ट्या ते सिद्ध करणे फारसे कठीण नाही. उदा. तुम्ही आम्ही लहान असताना भयंकर भांडणे झाली की फार फार तर गाढव किंवा मुर्ख असे म्हणून आत्माराम शांत करायचो. नीट आठवून बघा, कॉलेजमधे या दर्जाची शिवी कधी दिली आहे का? तिथे सर्वसामान्यपणे जो उद्धार होतो तो इथे लिहीणे शिष्टसंमत होणार नाही अन्यथा मी दुर्मिळातदुर्मिळ पुण्यवचने तुम्हा सारयास ऎकविली असती. तर मुळ मुद्दा असा की कॉलेज मधे कानाखाली जाळ शिव्या काढण्या ऎवजी कुणी 'अरे गाढवा' असं म्हटलं तर किती विनोदी वाटेल? आणि कॉलेजमधली दुषणे पन्नास वर्षे वयाचा माणूस द्यायला लागला तरी आपल्या भुवया वर जातातच की. तर, पुराव्यानिशी हे सिद्ध केले जाऊ शकते की शिव्या आणि मनुष्यप्राण्याचं वय यांचा सरळ संबंध आहे. पुनरुक्तीचा धोका पत्करुन हे मी परत सांगु ईच्छितो की म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे म्हटले जाते. म्हातारी माणसे परत 'अरे मुर्खा' वगैरे बालपणीच्याच सदवाण्या उच्चारत असतात.

शिव्या ही खरे तर मौखिक हिंसाच आहे. पण गुद्याचे काम मुद्यावर होणार असेल तर अश्या हिंसेचा मी पुरस्कार करतो. ताजाताजा बांधलेला रस्ता महिन्याभरात खराब होतो, तुमच्याच जीवंतपणाचे सर्टिफीकीट द्यायला कारकुन पैसे मागतो, सिग्नल तोडून बाईक आपल्या कारला घासून जाते, बॉस सगळ्यामागे त्याचेच नाव लावतो....कल्पना करा..या अंतहीन यादीपाई किती रक्त वाहु शकते! पहिल्या, दुसरया आणि भविष्यातल्या तिसरया महायुद्धातही एव्हढा रक्तपात होणार नाही जर अश्या सारया प्रसंगात आपण गुद्द्यांवर आलो तर. भाषेच्या या एका अपरुपाने सारया मानवजातीवर अनंत उपकार केले आहे. खेंगट्यांनी हसण्याचं काम नाही. फार गहन विषय आहे हा.

शिव्यांचा जागतिक मागोवा घेण्याआधी आपण आपल्या मातीतल्या शिव्यांकडे वळू. प्रादेशिकवाद मराठी माणसाच्या अंगी कसा भिनला आहे हे पाहायचे असेल तर शिव्यांचे अन्वयार्थ आणि भाषेच्या छटा आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतील. कोकणी माणूस सहजपणे 'अरे रांडेच्या' म्हणेल. देशावर उच्चारुन बघा हे शब्द! पुण्यातल्या शिव्या कायमच अरबटचरबट असतात, अरे खेंगट, अहो शहाणे/विद्वान किंवा गेला बाजार मसण्या. मुंबई मुक्कामी, विशेषतः डोंबवली आणि मालाडला लोकल मधे चढताना म आणि भ यावरुन सुरु होणारया शिव्या सहजपणे "सोडल्या" जातात, जसे मोगल स्फुर्ति येण्यासाठी दीन दीन म्हणायचे तसे. तुम्हाला दंगल घडवायची असेल तर हे शब्दोच्चारण तुम्ही मराठवाड्यात करुन पाहा.

थोडं गंभीरपणे बोलायचं झालं तर शिवी हा एक सांस्कृतिक दहशतवाद आहे. म, भ तत्सम शिव्या हा वंशशास्त्राच्या दृष्टीने अक्षम्य अपराध आहे. किती थिल्लरपणे, किती सहजपणे उच्चारले जातात हे शब्द!

मान्य, तुम्हाला-मला भयंकर संताप येतो, रक्त उसळतं, मेंदु तरंगायला लागतो, कानातून वाफा यायला लागतात, उलटे-सुलटे कसेच आकडे सुचत नाहीत. मग बघता काय, कारची काच बंद ठेवायची आणि खच्चून 'काय रे भैताड' अशी व्हेज शिवी द्यायची. तुम्हालाही शिवी दिल्याचं समाधान आणि खाणारयाला ही!

Wednesday, November 28, 2007

पाहुणा

येऊरच्या जंगलात तिसर्यांदा स्टार्टर मारुनही गाडी सुरु झाली नाही तेव्हा मात्र गाडीत जरा चलबिचल झाली. संध्याकाळची वेळ, त्यात ड्रायव्हरही सोबत नाही आणि आता गाडीही रखडली आहे. "Shit! निदान सेलची तरी रेंज असावी. निघाल्यापासून अपशकून." मोबाईलची बॅटरी आणि सिग्नल, दोन्ही जेमतेम एक कांडी दाखवत होते. दिवस वाईट सुरु झाला की सगळच वाईट होतं म्हणतात, तसंच काही तरी. सिग्नल सारखा येत आणि जात होता पण शेवटी कसबसं बोलणं झालं आणि कामाचं ठिकाण चालत जाण्याच्या अंतरावर आहे हे कळाल्यावर जंगलातल्या त्या त्रस्ताचा जीव जरा भांड्यात पडला. कार तिथेच सोडून चालत जाण्याचा निर्णय जसा झाला तसा अचानक घुबडाचा घुत्कार जंगलातल्या शांत वातावरणात घुमला. "जंगलात घुबडाचा नाही तर काय लताचा आवाज येणार आहे?" अशुभाची चाहूल विनोद केला की जाते असं काही लोकांना उगाचच वाटतं. असो.

अर्धा पाऊण तास चालूनही कोणीच का दिसत नाहीत म्हणून चंद्राच्या प्रकाशात जंगलातल्या त्या अनोळखी पाहूण्यानं घड्याळ पाहीलं तर ते कधीच बंद पडलं होतं, मोबाईलच्या बॅटरीनं मान टाकली होती आणि डोक्यावरचा चंद्र अभद्र ढगांआड वेगाने नाहीसा होत होता. घश्याला कोरडं पडली होती ती भितीने की जवळ पाणीही नाही या कल्पनेने हे न समजल्याने पाहुणा भराभर पाऊले उचलायला लागला.
"अहो सुक..सुक.."
"कोणी तरी आहे मागे" शहरात राहून ही काही आदीम भावना जाग्या असतात. बाजूच्या झाडीतही धुसपुस झाली. "हे भास नसणार". मघाच्याच आदीम प्रेरणांनी मेंदुला सुटकेचे जुने मार्ग दाखवले आणि स्वःतच्याही नकळत पाहुण्याच्या पायांनी वेग पकडला.
"अहो सुक..सुक.." आवाज वाढला..जवळूनही आला
"मागे पाहू नकोस" अंतर्मनाचा इशारा इतका स्पष्ट होता की गाव दिसे पर्यंत पाहूणा पळतच राहिला. आदिवासी पाड्यांवर अंधार लवकर पसरतो आणि भोवतालचे वातावरण भलतेभलते आकार घ्यायला लागतं हे खरंच पण म्हणून कुणाचीही चाहूल लागु नये? "काही तरी चुकतय"
पाहुणा धापा टाकत उजेडाच्या दिशेने धावला.
"आल्या आल्या मॅडम आल्या. अहो मॅडम, होत्या कुठे तुम्ही? तुमची गाडी बंद पडली ते ठिकाण इथून १० मिनिटांच्या अंतरावर होतं आणि आता तुम्ही तब्बल दिड-दोन तासांनी उगवताय. शुटिंग खोळंबलं की हो तुमच्या पाई"
"मी..मी रस्ता चुकले होते"
"वाटलचं मला. म्हणूनच इथले दोन आदिवासी पाठवले होते तुम्हाला शोधायला..ते बघा आलेच ते"
"साहेब, या बाईंना सुक सुक करुन घसा कोरडा पडला बघा पण या थांबायलाच तयार नाहीत. पळत सुटल्या ते थेट इथंच आल्या की"
"मॅडम..आता थोडा वेळ थांबावं लागेल. चंद्र पुन्हा उगवला की शुटिंग सुरु करु. शॉट असा आहे की तुम्ही जंगलात तुमच्या प्रियकरासोबत आला आहात आणि निसर्गाच्या साक्षीने तो तुम्हाला एक हिरयांचा हार घालत आहे आणि मग तुमचा डायलॉग. आपल्याला लोकांना असं सांगायचं आहे की हिरा है सदा के लिये. ओके?"

पाडावरचे सगळे अर्धे नंगे आदिवासी शुटिंग बघायला जमले होते. यथावकाश चंद्र उगवला. दिग्दर्शक महोदयांनी सगळे लाईट घालवले आणि घसा फाडून आरोळी फोडली "लाईट! कॅमेरा!! ऍक्शन!!!"

अर्धेनंगे आदिवासी तोंड उघडे टाकून काय सुरु आहे ते बघत होते.
एका चिकण्या दिसणारया माणसानं काही तरी कानापुसी झाल्यावर खिशातून एक चमकणारा हार काढला आणि पाहुणीच्या गळ्याभोवती गुंफला. पाहुणीने डोक्यावरचा घुंघट मागे सारला, एक अत्यंत मधुर हास्य देत तिने डोळे मिटले आणि किंचित पुढे वाकून ती लाजल्यागत म्हणाली "You May Kiss The Bride Now!"

...आणि पंगत पाहुण्यावर तुटून पडली.


--------------------------------------------------------------
लहानपणी मी आणि माझी ताई एक मजेदार खेळ खेळायचो; नाटक आणि सिनेमाच्या जाहिराती एकत्र करुन काही तरी मिनिंगफुल वाक्य तयार करायचा. म्हणजे कसं, "भटाला दिली ओसरी""अचानक""रंगल्या रात्री अश्या"...अर्थात ही सगळी चावट नावं आजच्या काळातली आहेत आणि चावटपणाही! पण तो खेळ सर्वसाधारण पणे असा असायचा.
काल टिव्हीवर कोणत्यातरी हिरेवाल्याची ऍड बघताना "ती" "त्या"ला हिरयाचा हार घातल्याबरोबर You May Kiss The Bride Now!" चं आवताण देते आणि पुढच्या क्षणी मला मतकरयांच्या "पाहुणा" चा "आणि पंगत तुटून पडली" हा शेवट आठवला. वय बदलतात, खेळाचे स्वरुपही बदलते पण खेळ तेच राहातात हेच खरे.
या लेखाला कसलंही साहित्यिक मुल्यं नाही (आधीच्या लेखांना आहे असं मीच ठरवुन टाकलेलं आहे:)) तेव्हा गंमतशीर स्वभावाच्या लोकांनीच ही "भयकथा" वाचावी.

Monday, November 26, 2007

पुरुषसुक्त: दोन टिपणे (180!)

-१-

अस्तित्वाचे अपभ्रंश सोबत घेऊन
जगताना
थकलास
तर थांब कधी माझ्या दाराशी
कवितेचे एखादे जुने कडवे
उखाण्यासारखे सामोरे घेऊन येईन मी
तर कदाचित वितळेल तुझा दगडी
चेहरा
आणि ओथंबून वाहणारया तुझ्या शब्दांना मिळेलही
अर्थाचा एखादा दृष्टांत

-२-

कोणतेही बंधन
नको असते मला
की काळाची एखादीही मेख
पण पाठीतून आरपार
जाणारा मज्जारज्जू
सतत खुपत राहातो
जसा वारयावर धावणारा अबलख अरबी घोडा
वरचेवर कुणी पेलावा
धारदार भाल्यावर