Sunday, September 20, 2009

कविता: आधी, आत्ता आणि पुढे?

'Twas not my blame-who sped too slow
'Twas not his blame-who died
While I was reaching him
But 'twas - the fact that He was dead - एमिली


कवितेच्या प्रांतात सध्या एक स्फोटक शांतता आहे. हा स्फोट अनेक अर्थी आहे. कविता फारसं कुणी छापत नाही. कविता फारसं कुणी विकत घेऊन वाचत नाही. कवितेत नवे प्रयोग असे क्वचितच होताहेत. अगदी गेला बाजार, हल्ली कुणी कवींवर नवे विनोदही करत नाही! म्हणजे मराठीतली कविता मेली का? तर निदान अजून तरी नाही असंच उत्तर द्यावं लागेल. बाजारात भाराभर नवे कवी स्वतःच्या पैश्यांनी कविता संग्रह छापताहेत. सहज मराठी ब्लॉग-विश्वाचं निरीक्षण करा. कवितांच्या ब्लॉगची संख्या अगदी लक्षणीय! म्हणजेच उदंड जाहले कवडे!! वाचतय कोण? वाचल्यानंतर झिरपत जाऊन शिल्लक राहतय कोण? धोंड, विजया राजाध्यक्ष, सुधीर रसाळ या बाप-समिक्षकांनी समिक्षा केलेला शेवटचा कवी कोण? प्रश्नचिन्हांच्या ओझ्याखाली दबलात तरीही तुमचं उत्तर मला ठाऊक आहे. पाडगावकर, ग्रेस, भट, आरती प्रभु, कुसुमाग्रज, विंदा...अहो जुनी पिढी ही कवींची! सौमित्र आणि (समजा ओढून ताणून) संदीप खरे म्हणता? आणि हो,हो, सलिल वाघ देखील!! चांगले शिकलेले दिसता तुम्ही. वेळ लागला पण जमलं की उत्तर काही जणांना! बरं, मला आता असं सांगा, गेल्या दहा वर्षात पुढे आलेल्या कुठल्या कवीवर मोठ्ठ्ठ्ठी...चर्चा/वाद झालाय? कुणाच्या कवितांचा गंभीरपणे अभ्यास झालाय? कुणाच्या कवितांचे नवे अन्वयार्थ शोधण्यात येताहेत? कुणाच्या कवितांचे दाखले सहजपणे आपल्या लिहिण्या-बोलण्यात येताहेत? उत्तर येत नाही म्हणून असे नाराज होऊन चिडून नका जाऊ बुवा. कारण या प्रश्नाला उत्तर बहुदा नसावं/नाहीच. आजही मागणं मागायचं म्ह्टलं की पसायदान आठवतं, आजही पिंपातल्या उंदराचे आणि गणपत वाण्याच्या बिडीचे रहस्य शोधणे सुरु आहे, आजही सखीच्या मुलीला कसे काय द्यावे या ओळींवर जान कुर्बान करत ब्लॉगे पोस्टतायत आणि आजही सलाम म्हटलं की लोकांचा डावा हात आपसुक मागे जातोच आहे.

मग आजच्या कवींचे आणि कवितांचे नेमके संदर्भ काय? तुम्हाला त्या जुन्या चौकटी-बिकटी मोडण्याची भारी घाई बुवा. तुमची नवी चौकट ठोकायच्या आधी जुनी चौकट नक्की आहे तरी काय हे बघायला नको?

कवितेचे अभ्यासक कालखंडानुसार कवितेचे सर्वसाधारण प्राचिन, साठापुर्वीची आणि साठोत्तर असे वर्गीकरण करतात. काही जण कवींचे रोमॅन्टीक, निराशावादी, निसर्ग कवी आणि गेला बाजार दुर्बोध कवी असे ही वर्गीकरण करतात. कोण चुक आणि कोण बरोबर याचा फार काथ्याकुट न करता मी शक्यतो कालखंडानुसार आणि प्रभाव-वर्गानुसार एक इल्स्ट्रेशन करत आहे.(Click to view details of the illustration)

आता हे सगळं असंच आहे का? नाही.
कुसुमाग्रज १९६० आधी लिहीत होते आणि नंतरही. चित्रे, ग्रेस आजही लिहीतात. पाडगावकरांनी, विंदांनी कवितांच्या अनेक प्रांतात मुसाफिरी केली.

हे सर्वसमावेशक आहे का? नाही
तुमच्या आधी मीच सांगतो, गदिमा, महानोर सुटले! बहीणाबाई सुटल्या! पद्मा लोकूर, विलास सारंग, रमेश तेंडुलकर, यशवंत मनोहर, अर्जुन डांगळे सुटलेच..आणि कारण नसताना सुटले.

हे इल्स्ट्रेशन कवीचा भरात असण्याचा काळ आणि कवितेची सर्वसाधारण जातकुळी यावर आधारीत आहे. माझी सोय आणि माहीती यावर हे इल्स्ट्रेशन आधारलेले असल्याने काही गोष्टी चुकल्याही असतील पण आपण समिक्षक नसल्याने काटेकोरांटीचं भिंग थोडसं बाजुला ठेवून पुढे जाऊ.

कविता बाय डिझाईन, आशयघन, शब्दसंपृक्त, बंदिस्त, प्रतिमासंपन्न, नादयुक्त आणि गेयमधूर असते. पहील्या भागातले काव्य प्रकार पाहीले तर अभंग, ओवी हा एक प्रकार, पोवाडे, लावण्या हा दुसरा प्रकार आणि अलंकार-छंदयुक्त पंतकाव्य हा तिसरा प्रकार. दुसरया भागात पंतकाव्याचं लॉजिकल एक्स्टेन्शन म्हणता येईल अशी अलंकार आणि छंदयुक्त कविता जास्त प्रमाणात लिहीली गेली. याच टप्प्यात ज्युलियनांनी गजलेचे (फारसीतून) मराठीकरण केले. तिसरया भागातही अलंकार आणि छंदयुक्त कवितेचा दरारा राहीलाच तो अगदी आजपर्यंत. या टप्प्यात मुक्तछंद हा पारंपारिक छंदांना छेद देणारा प्रकार जास्त वेगाने पुढे आला. पण आजही कविता म्हटलं की अलंकार छंदयुक्त कविताच डोळ्यासमोर येते याचं कारण आधी म्हटल्याप्रमाणं कवितेचा डिझाईन फॉरमॅट. मग बाकीच्या काव्यप्रकारांचं काय? संत आणि शाहिरी काव्याचा फॉरमॅट हा त्यात येणारया विषयांना पुरक असल्याने आणि त्या विषयांवर आधारित काव्यनिर्मिती आता मर्यादित झाल्याने आता तो निव्वळ अभ्यासापुरता उरलाय. गजलेचा वारसा पुढे चालवला तो भटांनी आणि तो संपलाही त्यांच्याच सोबत. खरं तर गजल तिचे विषय, तिची नजाकत, शब्दांचे वजन, तिची पेश होण्याची पद्धत, शब्दांचा कणखर नाजुकपणा यामुळे मराठीत उपरीच. पण भटांना ते जमलं. आज विविध प्रकारे गजलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु आहेत पण भटांची प्रतिभा लाभलेला मात्र कुणीच दिसत नाही. आज जी गजल लिहीली जात आहे ती चुष म्हणून. मधल्या काळात जोतिबांनी अखंड, शिरीष पैंनी हायकु, किणीकरांनी उत्तर रात्र मधून काही प्रयोग केले पण त्यांचं पुढे काही झालं नाही. नाही म्हणायला उत्तर रात्रच्या धरतीवर चंगोनं मी माझा लिहीलं, ते तुफान खपलं आणि गावोगावी पॉकेटबुक सायजात काळा-पांढरा फोटो असणारे असंख्य लोकल चंगो जन्मले (आणि संपले).

नवी कविता ही छंदात किंवा मुक्तछंदात वाढणार आहे. भिती इतकीच की छंदबद्ध कविता केवळ छंदाच्या अट्टहासापाई शब्दांची तोडफोड करेल किंवा कृत्रिम वाटेल आणि दुसरी भिती मुक्तछंदातली कविता अधिकाधिक दीर्घ आणि दुर्बोध होत जाईल. मराठीतला गुलजार होण्याच्या नादात सौमित्रच्या काही फसलेल्या कविता आणि चित्र्यांच्या बरयाच दीर्घ गद्य कविता ही त्याची अनुक्रमे उदाहरणे.

कोणत्याही कलेवर होतो तितपत समाजाच्या स्थितीचा परिणाम कवितेवरही झाला/ होतो. कवितांचे विषय आणि त्यांची ट्रीटमेन्ट पाहीली की हे लगेच लक्षात येतं. जेव्हा पृथ्वी चौकोनी होती आणि सुर्य पृथ्वी भोवती फिरायचा, संतांची कविता देव, धर्म, बेसिक माणुसपणा यांच्या भोवती फिरत राहीली. राजांच्या आणि मोगली विलासी वातावरणात पोवाडे, फटके आणि लावण्या बहरात आल्या. आतल्या-बाहेरच्या, माणसाच्या-निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव व्यक्त करण्याचे भान कवितेतून उमटलं ते दुसरया टप्प्यात. कवितेतून निसर्ग, तत्वज्ञान, आंतरिक अन बाह्य सौंदर्य व्यक्त होऊ लागलं. हे होण्यामागं (इंग्रजी अमंलाखालची) नवी शिक्षण पद्धती काही अंशी जबाबदार होती. वागण्या-बोलण्यात, समाजात आलेला मोकळेपणा कवितेत परावर्तित व्हायला लागला. तिसरया टप्प्यात, शिक्षणामुळे आलेला अंतर्मुखपणा कवितेतुन उमटायला लागला. कधी नव्हे इतका "मी"पणा कवितेत डोकावायला लागला. ग्रेसांच्या कवितेतले वैयक्तिकांचे संदर्भ तपासले की कविता कशी आत्ममग्न होत गेली हे लगेच कळून येतं. याच उत्क्रांतीचा एक भाग म्हणजे इंदिराबाई, शांताबाईची कविता एक पाऊल पुढे गेली आणि प्रभा गणोरकर, वासंती मुजुमदार, अरुणा ढेरे इ. ची कविता स्त्री जाणीवा अधिक धीटपणे अधोरेखित करु लागली. शिक्षणानं आणि बदलणारया सामाजिक जाणीवांनी डोळे उघडले आणि परंपरेने किंवा निरुपायाने पुढे आलेल्यातला निरर्थकपणा जाणवायला लागला जो मांडला चित्रे, कोल्हाटकर, मनोहर ओक इ मंडळींनी. या कवितांनी पुर्वापार चालत आलेली कवितेतली संस्कार, सुरक्षितता, कुटुंबव्यवस्था, संकेत यांची चौकट जणु उद्धवस्तच करुन टाकली. निती-अनिती, अल्याड-पल्याड यांच क्रॉस-ब्रिडींग सुरु झालं ते या कवितांमधून. बदलती सामाजिक-राजकिय परिस्थिती कवितेत आली ती देखिल तिसरया टप्प्यात. शिक्षण माणसाला चौकस आणि जमलं तर बंडखोरही बनवतं. नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, दया पवार यांनी बंडखोर दलित कविता जन्माला घातली. दलित समाजाला जे हवं होतं ते कवितेतून क्रांती करुन मिळवण्यापेक्षा राजकिय माध्यमातून मिळवणं जास्त सोपं गेलं. दलित कवींचं झालेलं राजकिय अपहरण हे जसं त्या कवितेच्या पराभवाला कारणीभुत ठरलं तसाच कवितेतून बंड करता येतं हा दलित कवींचा फाजील आत्मविश्वासही. रक्त पेटवणारया बेभान आरोळ्या, सतत अस्थैर्याला आवाहन करणारी भाषा, दुःखाचं नागडं प्रदर्शन, कंठाळ प्रचारकी जहरी भाषा आणि पुनरावृत्ती यात दलित कविता मेली.

मग आजच्या परिस्थितीत कवितेत नक्की कोणते संदर्भ येणार आहेत? देव-धर्माच्या जाणीवा समुहात गडद होताहेत अन व्यवहारात फिकट त्यामुळे संत काव्यासारखे संदर्भ फिरुन नव्याने कवितेत येतील ही शक्यता जवळ जवळ नाहीच. जगण्याची गती माणसाला चक्रावुन टाकेल अशी झाली आहे आणि सौंदर्यविषयक जाणीवा बोथट झाल्या आहेत तरीही मानवी भाव-भावना या पुढे ही कवितेतून व्यक्त होत राहातील. पृथ्वी मी भोवती फिरायला लागल्याने नवी कविता अधिक अंतर्मुख, अधिक दुर्बोध, अधिकाधिक वैयक्तिक होत जाईल. पण वाढणारया निरर्थकतेमुळे आणि ग्लोबलायझेशनमुळे ती परत चित्रे-कोल्हाटकरांप्रमाणे उद्धवस्त चरणात जाते का हे पाहाणे मोठे इन्टरेस्टींग ठरणार आहे.

कालौघात टिकणे ही कवितेची परिक्षा आहे. पण हे टिकणे नर्मदेतल्या गोट्याच्या टिकण्यापेक्षा वेगळे. या टिकण्याला कवितेचे कालानुरुप बदलणारे (किंवा शाश्वत) आणि तरीही सुसंगत राहु शकणारे संदर्भ, कालातीत ताजेपणा अश्या काही कसोट्या आहेत. कविता हा निखळ भावनाविष्कार असल्याने तिच्या टिकण्यामागे रसिकांपर्यंत पोचण्याची ताकद असायला हवी हे जोडसुत्र. कवितेच्या बाबतीत हे महाकठीण काम. जनाधाराशिवाय कला टिकणे कठीण हे जर एक सत्य असेल तर कविता हा सर्वसाधारणपणे अपर क्लास वाङमय प्रकार मानला जातो हे दुसरे सत्य. कवितेची समज-उमज साधारण लोकांना नसते (बालभारती बाहेरच्या कविता कोण वाचतं रे गणु? ५ मार्कांचा ज्ञानेश्वर ऑप्शनला टाकणं जास्त सोपं !) असं क्षणभर खरं मानलं तर आई जेवु घालेना अन बाप भीक मागु देईना अशी ही कवितेची परिस्थिती.

हा चक्रव्युह १००% पार करणारी एकमेव कवीजात म्हणजे संतकवी. शतकांनंतरही ज्ञानेश्वरीचं गारुड अजून उतरलेलं नाही, तुकाराम गाथा भाषेपलीकडे जाते आहे, रामदास राज्यकर्त्यांनी वाळीत टाकले तरी ’मनातून’ जात नाहीत. या टिकण्यामागे कवितांचे समाज मनाच्या जवळ जाणारे विषय (अन त्या विषयांचे धार्मिक संदर्भ) , भाषेचा सहज-सोपेपणा, किर्तन-पुराण या मौखिक परंपरांचे पाठबळ ही काही सर्वसाधारण कारणं. चिन्हांच्या भाषेत बोलायचं तर संत काव्य हे कवितेचं सर्वात मोठं आणि सर्व-समावेशक वर्तुळ. पुढच्या टप्प्यात हे वर्तुळ लहान झालं आणि कविता तळागाळातील लोकांपासून तुटली. साधारण आणि उच्च साहित्यीक जाणीवा असणारा वर्ग कवितेचा वाचक राहीला. कवितेतून देव, धर्म, पोथी पुराण हद्दपार झाले अन निसर्ग, मानवी भाव, नाती हे विषय हाताळले जाऊ लागले. ही कविता देखिल टिकली आणि एका मोठ्या समुहापर्यंत पाझरली. साठीनंतर मात्र एक क्रांतीच झाली. मर्ढेकरांपासून पुढे कवितेचे एकसंध वर्तुळ जणु उद्धवस्तच झाले आणि त्याच्या जागी टोकदार संवेदनांची, काहीशी दुर्बोध भासणारी आणि तळागाळातीलच काय पण सर्वसामान्य माणसाशीही फटकुन वागणारी असंख्य लहान लहान वर्तुळे निर्माण झाली आणि होतच राहीली. आज ही वर्तुळे आकुंचन पावत पावत त्याच्या केंद्रबिंदुत प्रचंड वेगाने कोसळताहेत आणि वर्तुळे म्हणजे फक्त एक बिंदु बनून राहाताहेत.

पहील्या टप्प्याला लाभलेला मौखिक परंपरेचा वारसा पुढील दोन्ही टप्प्यात काही प्रमाणात उतरला आणि बराचसा यशस्वीही झाला. पहील्या टप्प्यात किर्तन, पुराण यांच्या माध्यमातुन कविता लोकांपर्यंत पोचली. तर दुसरया टप्प्यात, विशेषतः रवीकिरण मंडळ आणि बोरकरांनी काव्यवाचनाद्वारे कविता लोकांपर्यंत पोचवली. तिसरया टप्प्यात हाच प्रयोग यशस्वी केला तो विंदा, पाडगावकर आणि बापट या तिकडीने. कविता अश्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवायची का हा प्रश्न क्षणभर बाजुला ठेवला तर लोकांना या प्रयोगांनी कवितेकडे बरयाच प्रमाणात खेचुन आणले हे मात्र खरे. आज हाच प्रयोग काव्यवाचन आणि काव्यगायन यांच्या फ्युजन द्वारे पुढे जात आहे आणि त्याला प्रतिसादही मिळत आहे. भटांनी गजलेच्या बाबतीत हा प्रयोग केला तर मोडकांनी आणि काळ्यांनी ग्रेसांच्या कवितांचे साजणवेळाच्या माध्यमातून सोनं केलं. पण या प्रयोगाचे स्वस्त करमणुकीत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही याची ताजी उदाहरणे म्हणजे उदंड जाहलेली कवीसंमेलने आणि सध्या चलती असणारा संदीप खरेंचा कॉलेज गॅदरिंगच्या लायकीच्या टाळ्याखाऊ कवितांचा नाच-गाण्यांचा कार्यक्रम. (मौनाची भाषांतरे हे इतकं अचाट अशक्य सुंदर नाव निवडल्यानंतरही हा माणूस तुझे तुझे तुझ्या तुझ्या असं रिमेश हेशमिया गान-स्टाईल प्रमाणे का लिहीतो? असो. कवितेबद्दल बोलु, कवीबद्दल नको).

मग आजची कविता टिकेल का? जगण्याची गती आणि गुंतागुंत इतकी वाढली आहे की कवितेसारखा निवांत आस्वाद घ्यावा लागणारा साहीत्यप्रकार पार भरडुन आणि गोंधळुन जात आहे. ज्यांना ती लिहायची आहे त्यांची आव्हानं वेगळी. पण ज्यांना ती वाचायची आहे त्यांना त्यांच्या अनुभवकक्षा वाढवाव्या लागणार आहेत, वाचनाची माध्यमं बदलावी लागणार आहेत. दुर्बोध आणि आत्मकेंद्रित बनु पाहाणारया कवितेला आपल्या अनुभवांशी जोडून तिची पडताळणी करत राहाणं हा नव्या रसिकामागचा अनंत प्रपंच.